रेना, वाण व सरस्वती या नद्या बीड जिल्ह्यात डोंगराळ भागात उगम पावतात आणि दक्षिणेकडे गोदावरीस मिळतात. याशिवाय सिंदफणा आणि बिंदुसरा आदी नद्यांमुळे हा जिल्हा एकेकाळी सुजलाम सुफलाम होता. जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या बीड शहराचे प्राचीन नाव दुर्गावती नगर होते. चालुक्य राजवटीत राणी चंपावतीचे शहर म्हणून या शहरास चंपावतीनगर या नावाने ओळखले जाऊ लागले. राणीचा चंपावती किल्ला आजही इतिहासाच्या खुणा आपल्या अंगावर अभिमानाने मिरवीत आहे. या शहरात रामायणातील प्रसिद्ध जटायू-रावण युद्ध झाले. त्या युद्धात जटायू धारातीर्थी पडला. त्याची आठवण म्हणून शहरात जटाशंकर मंदिर उभे असल्याची आख्यायिका सांगितली जाते.
हे मंदिर चालुक्यकालीन म्हणजे सुमारे अकराव्या शतकातील असल्याचे अभ्यासकांचे मत आहे. मंदिराची स्थापत्यशैली व प्रवेशद्वारावरील शिलालेख पाहून मंदिराच्या प्राचीनत्वाची खात्री पटते. या मंदिराबाबत आख्यायिका अशी की रावणाने सीतेचे हरण करून तो आकाशमार्गे जात असताना जटायूने रावणाला थांबवण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्या दोघांत झालेल्या युद्धात रावणाने जटायूचे पंख छाटले. जखमी जटायू भूमीवर पडला असताना श्रीराम येथे आले.
जटायूने रामास सर्व हकीगत सांगून प्राण सोडले. रामाने जटायूच्या स्मरणार्थ शिवमंदिर बांधले. पुढे ते जटाशंकर नावाने प्रसिद्ध झाले.
बिंदुसरा नदीपासून काही अंतरावर असलेले हे मंदिर अत्यंत अरुंद गल्लीत आहे. मंदिरापर्यंत वाहने जाण्याचा रस्ता नसल्याने येथे पायी चालत यावे लागते. मंदिरास भक्कम तटबंदी आहे. या तटबंदीला लागून वाडे व राहती घरे आहेत. मंदिरास दुमजली प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वाराच्या वरील मजल्यावर नगारखाना आहे. प्रवेशद्वाराच्या वरील बाजूला दर्शनी भिंतीत शिलालेख दिसतो. शिलालेखातील अक्षरे उठाव शैलीतील आणि सुवाच्य आहेत. प्रवेशद्वारास नक्षीदार लाकडी झडपा बसविल्या आहेत. आत दोन्ही बाजूला पहारेकरी कक्ष आहेत. प्रवेशद्वारापेक्षा प्रांगण उंचावर असल्यामुळे तीन पायऱ्या चढून वर यावे लागते.
मुखमंडप, सभामंडप व गर्भगृह अशी मंदिराची संरचना आहे. मुखमंडपात पुढील बाजूस दोन नक्षीदार स्तंभ आहेत. स्तंभपादावर उभ्या स्तंभांचा खालील सुमारे पाच फूट भाग चौकोनी आहे, तर वरील दोन फूट भाग षटकोन, अष्टकोन, वर्तुळ अशा विविध भौमितिक आकारात आहे. स्तंभांच्या शीर्षभागी कणी, तर त्यावर हस्त आहेत. हस्तांवर चारही बाजूंना नागशिल्पे व पशू शिल्पे कोरली आहेत. मुखमंडपात वज्रपीठावर नंदीची काळ्या पाषाणातील मूर्ती विराजमान आहे. वज्रपीठावर चारही बाजूला चक्रनक्षी कोरली आहे. तसेच त्यावर पर्णलता, पुष्पलता नक्षी दिसून येते. नंदीच्या पाठीवरील झुल, वशिंड, शेपटी अत्यंत बारीक तपशिलासह कोरली आहे. त्यातून शिल्पकारांचे कौशल्य अधोरेखित होते.
पुढे समोरील बाजूस कठडा असलेला सभामंडप आहे. सभामंडपाचे प्रवेशद्वार कठड्यात आहे. बंदिस्त स्वरूपाच्या सभामंडपास तिन्ही बाजूने भिंती आहेत. समोरील कठडा व डाव्या-उजव्या बाजूच्या भिंतीलगत भाविकांना बसण्यासाठी कक्षासने आहेत. सभामंडपात कक्षासनात व भिंतीत एकूण दहा स्तंभ आहेत. त्यापैकी दोन स्तंभ मध्यभागी आहेत. या स्तंभांवरील हस्तांवर नाग शिल्पे कोरली आहेत. ही चालुक्य राजांची निशाणी असल्याचे सांगितले जाते. सभामंडपात जमिनीवर कासव शिल्प आहे. सभामंडपात गर्भगृहाच्या डाव्या व उजव्या बाजूला प्रदक्षिणा मार्गावर दोन प्रवेशद्वारे आहेत. गर्भगृह सभामंडपापेक्षा काही इंच उंचावर आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या द्वारशाखांवर पानाफुलांची नक्षी पहावयास मिळते. प्रवेशद्वारास नक्षीदार लाकडी झडपा आहेत.
गर्भगृहात जमिनीवर मध्यभागी शिवपिंडी आहे. शिवपिंडीवर छत्र धरलेला पितळी नाग आणि जलधारा धरलेले तांब्याचे अभिषेक पात्र छताला टांगलेले आहे. बाजूला पितळी त्रिशूल आहे. येथे शिवपिंडीभोवती सुमारे सहा इंच उंच धातूचा नक्षीदार कठडा आहे.
गर्भगृहात भिंतीलगत विविध देवतांच्या मूर्ती व तसबीरी दिसतात. तसेच वितानावर चक्रनक्षी आहे. गर्भगृहात उजेड व हवा येण्यासाठी वातायने ठेवली आहेत. गर्भगृहास बाह्य बाजूने प्रदक्षिणा मार्ग आहे. तेथील भिंतींत देवकोष्ठके आहेत. देवकोष्ठकात गणपती, शेषशयनी विष्णू, मारुती व इतर स्थानिक देवतांच्या मूर्ती आहेत.
मुखमंडपाच्या दर्शनी भागावर विविध शिल्पे आहेत. छतावर विटांनी बांधलेले चौकोनी शिखर आहे. शिखराच्या चारही भिंतीत प्रत्येकी तीन देवकोष्ठके आणि त्यात देवमूर्ती आहेत. शिखराच्या शीर्षभागी विशाल नंदी शिल्प आहे. सभामंडपाच्या छतावर चहूबाजूंनी सुरक्षा कठडा आहे. गर्भगृहाच्या छतावर चार थरांचे उतरत्या पायऱ्यांचे शिखर आहे. खालील थर अधिक रुंद आहे. त्यात चारही बाजूंनी प्रत्येकी तीन देवकोष्टके व त्यात देवमूर्ती आहेत. शिखराच्या या थरात वर चारही बाजूंना पशू शिल्पे आहेत. शिखराच्या दुसऱ्या थरात चारही कोनांवर देवकोष्ठके आहेत, ज्यात देवमूर्ती आहेत. तिसऱ्या व चौथ्या थरात चारही भिंतींवर विविध देवतांची शिल्पे आहेत. चौथ्या थरात वर चारही बाजूंना विविध पशू व पक्षी शिल्पे कोरली आहेत. शिखराच्या शीर्षभागी आमलक व कळस आहे.
महाशिवरात्री हा येथील मुख्य वार्षिक उत्सव आहे. यावेळी अनेक भाविक देवाच्या दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी येथे येतात. या दिवशी लघुरुद्रासह भजन, कीर्तन, संगीत, प्रवचन आदी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. श्रावण महिन्यात, तसेच अधिक मासात मंदिरात खास पूजनाचे आयोजन होते. सोमवार, एकादशी, प्रदोष, पौर्णिमा, अमावस्या आदी दिवशी मंदिरात येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असते.