सातारा शहराच्या पूर्वेकडे असलेल्या डोंगरावरील जरंडेश्वर मारुतीचे मंदिर जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. या मंदिराला धार्मिक व ऐतिहासिक महत्त्व आहे. संत तुकाराम महाराज व रामदास स्वामी यांचे येथे काही काळ वास्तव्य होते. असे सांगितले जाते की हे मंदिर समर्थ रामदासांनी बांधले असून १६५५ च्या सुमारास याच स्थानावर छत्रपती शिवाजी महाराजांनी समर्थांना दानरूपाने स्वराज्य दिले होते. राज्य सरकारकडून या मंदिराला तीर्थक्षेत्राचा ‘ब’ दर्जा देण्यात आलेला आहे.
जरंडेश्वर मारुतीचे मंदिर समुद्र सपाटीपासून ३७६० फूट उंचावर आहे. या मंदिराकडे येण्यासाठी चार मार्ग आहेत. एक जांब गावातून, दुसरा पाडळी गावातून, तिसरा शिवथरकडून भीमनगरमार्गे, तर चौथा मार्ग कोरेगावकडून जळगावमार्गे आहे. यापैकी कोणत्याही पायवाटेने येथे येण्यासाठी सुमारे दीड तासांचा वेळ लागतो. या सर्व मार्गांमध्ये जांब गावातून येणारी वाट तुलनेने सोपी आहे. सुरुवातीला साडेतीनशे ते चारशे पायऱ्या असून त्यानंतर पुढे डोंगरवाटेने मंदिरापर्यंत जावे लागते. डोंगराच्या पठारावर मुख्य मंदिरासमोर एक मोठे पिंपळाचे झाड आहे आणि त्याच्याशेजारी एक चौथरा आहे. या चौथऱ्याच्या बाजूला बाकोबा नावाच्या बोक्याचे एक छोटेसे स्मारक आहे. त्यासमोर गडावरील मुख्य देवता मारुती आणि जरंडेश्वराचे मंदिर आहे.
या मंदिराची आख्यायिका अशी की लक्ष्मणासाठी संजीवनी आणताना मारुतीकडून द्रोणागिरी पर्वताचा पडलेला एक भाग म्हणजे हा जरंडेश्वर होय, असे मानण्यात येते. मंदिर एक मीटर उंच चौथऱ्यावर बांधलेले असून गाभाऱ्यातील मारुतीची मूर्ती स्वयंभू आहे. मंदिराचा सभामंडप १९३० च्या सुमारास दासगिरी महाराजांनी बांधल्याची नोंद आहे. मंडपातील एका दगडी चौथऱ्यावर जरंडेश्वर महादेवाची स्थापना केलेली आहे. याशिवाय सभामंडपामध्ये संत तुकाराम महाराज, समर्थ रामदास स्वामी व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्ती आहेत. त्याचबरोबर पुराणातील आणि शिवचरित्रातील काही प्रसंगही या ठिकाणी रेखाटले आहेत.
जरंडेश्वर मंदिराच्या मागे दासमारुतीचे लहानसे मंदिर आहे. त्यासमोर श्रीराम मंदिर आहे. श्रीराम मंदिराची उभारणी १८६२ साली काळोजी बुवा यांनी केल्याची नोंद आहे. या मंदिर बांधणीबद्दल आख्यायिका अशी की काळोजी बुवांना श्रीरामाचे मंदिर हे जरंडेश्वराच्या पुढे बांधावे की मागे असा प्रश्न पडला होता. त्यावेळी हनुमानाने त्यांना दृष्टांत दिला आणि सांगितले की मी उड्डाण करीत आहे व श्रीराम माझ्या पाठीशी असल्यामुळे त्यांचे मंदिर मागील बाजूस बांधण्यात यावे. त्यामुळे जरंडेश्वर मंदिराच्या मागील बाजूस श्रीराम मंदिर आहे. जरंडेश्वराप्रमाणेच राममंदिरही एका चौथऱ्यावर बांधलेले आहे. मंदिराच्या गर्भगृहात श्रीराम, लक्ष्मण व सीता यांच्या संगमरवरी मूर्ती आहेत. मंदिराच्या सभामंडपात द्वारपालांच्या साडेपाच फुटी उंच मूर्ती आहेत. श्रीराम मंदिर आणि जरंडेश्वर मंदिर ही दोन्ही मंदिरे हेमाडपंती रचनेची आहेत. श्रीराम मंदिराच्या मागील बाजूस समर्थांची उपासना घळ असून त्यात समर्थांच्या पादुका आहेत. समर्थ रामदास स्वामी येथील वास्तव्यात घळीमध्ये बसत असत.
भक्ती आणि शक्तीचे प्रतीक असलेले जरंडेश्वर मारुतीचे स्थान हे जागृत असून हा मारुती नवसाला पावतो, अशी परिसरात ख्याती आहे. त्यामुळे प्रत्येक श्रावणी शनिवारी या ठिकाणी हजारो भाविक दर्शनाला येतात. पहाटेची काकड आरती पार पडल्यानंतर दिल्या जाणाऱ्या खिचडीच्या प्रसादासाठी भाविकांच्या येथे रांगा लागतात. श्रीराम व मारुतीच्या नामाचा येथे जयघोष सुरू असतो. जरंडेश्वरवरून अजिंक्यतारा, यवतेश्वर, मेरुलिंग, वैराटगड, चंदन, वंदन, नांदगिरी, वर्धनगड, पाटेश्वर, जनाई–मळाई हे किल्ले व टेकड्या दिसतात.
जरंडेश्वराच्या पायथ्याशी त्रिपुटी हे गाव आहे. येथील गोपालनाथ महाराजांच्या समाधी मंदिरामुळे ते परिचित आहे. गोपालनाथ महाराज हे एकनाथांच्या परंपरेतील ब्रह्मचारी नाथयोगी होते. येथील लोक त्यांना ब्रह्माचा अवतार मानत असत. त्यांचा जन्म १६९० मध्ये झाला आणि १७६६ मध्ये त्यांनी श्रावण अमावस्येला त्रिपुटी येथे संजीवन समाधी घेतली. त्यांचा ‘शिरोमणी’ हा ग्रंथ परब्रह्म संकल्पनेवर टीका विवरण करणारा म्हणून प्रसिद्ध आहे. मंदिराच्या मागे एक बांधीव तलाव आहे. हा तलाव १७५८ ते १७६३ या कालावधीत ब्रह्मेंद्र स्वामींनी बांधला होता, अशी नोंद आहे.
गोपालनाथ समाधी मंदिराचे स्वरूप सभामंडप व गर्भगृह असे आहे. सभामंडपामध्ये ब्रह्मेंद्रस्वामी, ज्ञानेश्वर महाराज व इतर संतांची चित्रे रेखाटलेली आहेत. गर्भगृहात समाधीच्या दुसऱ्या पायरीवरून सतत पाणी वाहत असते. गोकुळाष्टमी ते श्रावण वद्य अमावस्या या काळात गोपालनाथ महाराजांचा पुण्यतिथी महोत्सव येथे साजरा करण्यात येतो.