फलटण तालुक्यातील राजाळेची व परिसराची ग्रामदेवता असलेल्या जानाई देवीचे येथील मंदिर सुमारे ३२५ वर्षांपूर्वीचे असल्याचे सांगितले जाते. जानाई देवी ही महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या खंडोबाची मोठी बहीण मानली जाते. ही देवी स्वयंभू, जागृत व नवसाला पावणारी आहे, अशी भाविकांची श्रद्धा आहे. देवीचा वार्षिक उत्सव प्रसिद्ध असून त्यावेळी देवीला लावण्यात येणारा सुवर्ण मुखवटा हे येथील आकर्षण आहे. उत्सवात सहभागी होण्यासाठी साताऱ्यासह महाराष्ट्र व कर्नाटकमधील हजारो भाविक येथे आवर्जून येतात.
फलटणपासून काही अंतरावर असलेले राजाळे गाव हे येथील जानाई देवीच्या मंदिरामुळे प्रसिद्ध आहे. असे सांगितले जाते की फलटण येथील नाईक–निंबाळकर घराण्याची जानाई देवी ही कुलदेवता आहे. नाईक–निंबाळकर देवस्थान ट्रस्टतर्फे या मंदिराचा कारभार पाहिला जातो. फलटण संस्थानचे अधिपती मुधोजीराजे नाईक निंबाळकर यांच्यानंतर श्रीमंत मालोजीराजे आणि आता श्रीमंत रामराजे निंबाळकर यांना उत्सवकाळात विशेष मान असतो. उत्सवकाळात देवीची मूर्ती पालखीत ठेवण्याचा मानही मुधोजीराजे यांच्यापासून निंबाळकर कुटुंबीयांना आहे. गावात सापडलेल्या एका ताम्रपटावर जानाई मंदिर हे १६८९ साली बांधल्याचा उल्लेख आहे. ११ डिसेंबर १९६७ रोजी कोयना परिसरात झालेल्या तीव्र भूकंपामुळे मंदिर व तटबंदीची मोठ्या प्रमाणावर पडझड झाली होती. त्यानंतर १९७९ मध्ये केलेल्या जीर्णोद्धारानंतर मंदिराला सध्याचे स्वरूप आले आहे.
राजाळे गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी जानाई देवीचे मंदिर आहे. पूर्वाभिमुख असलेल्या या मंदिराभोवती ४० फूट उंचीची तटबंदी आहे व त्यात पूर्व व उत्तर दिशेला प्रवेशद्वारे आहेत. पूर्वेकडील प्रवेशद्वारासमोर दोन प्राचीन दीपमाळा आहेत. तटबंदीयुक्त मंदिर बाहेरून पाहिल्यावर एखाद्या किल्ल्याप्रमाणे भासते. तटबंदीमध्ये २५ फूट उंचीचा लाकडी दरवाजा आहे. येथून मंदिराच्या आवारापर्यंत जाण्यासाठी २० पायऱ्या आहेत. प्रवेशद्वाराच्या वरच्या मजल्यावर नगारखाना आहे. उत्तरेकडील प्रवेशद्वारानजीक असलेल्या ओवऱ्यांजवळ एक भुयारी मार्ग दिसतो. हा मार्ग सध्या बंद करण्यात आला असला, तरी असे सांगितले जाते की फलटणच्या राजवाड्यापर्यंत पूर्वी या मार्गाने जाता येत असे.
दगड व चुन्यात बांधकाम केलेले हे मंदिर हेमाडपंती रचनेचे आहे. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्यावर दुसऱ्या मजल्यावर एक मोठी गणेशमूर्ती आहे. दर्शनमंडप, सभामंडप व गर्भगृह असे मंदिराचे स्वरूप आहे. दर्शनमंडप हा अर्धखुल्या स्वरूपाचा असून मंदिराच्या भिंतींमध्ये जमिनीपासून दोन ते अडीच फुटांवर भाविकांना बसण्यासाठी दगडी बाकांची रचना आहे. दर्शनमंडप व सभामंडप यांच्यामध्ये असलेल्या दगडी स्तंभांवर वैशिष्ट्यपूर्ण कलाकुसर आहे. सभामंडपातील इतर स्तंभांवर फारशी कलाकुसर दिसत नाही. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावरील द्वारपट्टीवर नक्षीकाम केलेले दिसते. द्वारपट्टीच्या खालील बाजूस कीर्तिमुख, तर ललाटबिंबावर गणेशाची मूर्ती आहे. गर्भगृहात जानाई देवीचा तांदळा व त्याच्यापुढे मूर्ती आहे. ही मूर्ती सुमारे तीन फूट उंचीची आहे. मूर्तीला दररोज वेगवेगळ्या रंगांची वस्त्रे परिधान केली जातात. या देवीला हळदी–कुंकवाचा मळवट भरण्याची परंपरा आहे.
मंदिराच्या बाहेरील भिंतीवर फुले व दैत्य असे कोरीव काम आहे. शिखरावरही अनेक देवी–देवतांच्या चुन्यामध्ये कोरलेल्या मूर्ती आहेत. हे शिखर जमिनीपासून ९० फूट उंचीचे आहे. मंदिराच्या आवारात गणपती, विठ्ठल–रुख्मिणी, मारुती व श्रीदत्त यांची लहान मंदिरे आहेत. याशिवाय मंदिराच्या समोरील बाजूस घडीव दगडातील दोन बारव आहेत. त्यांपैकी एका बारवेतील पाण्याचा वापर पिण्यासाठी होतो.
जानाई देवीचा वार्षिक उत्सव चैत्र कृष्ण सप्तमी व अष्टमीला असतो. या उत्सवासाठी १५ दिवस आधीपासूनच सर्व गावकरी तयारीला लागतात. देवीच्या पालखी मार्गावर रोषणाई करण्यात येते. घरोघरी सर्वत्र रांगोळ्या काढल्या जातात. उत्सवाच्या पहिल्या दिवशी सप्तमीला देवीची महापूजा व अभिषेक होतो. वस्त्रालंकार परिधान केल्यानंतर येथील आकर्षण असलेला देवीचा सुवर्ण मुखवटा मूर्तीवर लावला जातो. वर्षातील केवळ दोनच दिवस हा मुखवटा लावला जात असल्याने यावेळी प्रचंड पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येतो. त्यानंतर देवीच्या मानकऱ्यांकडून देवीला पुष्पहार अर्पण करून नैवेद्य दाखविला जातो.
येथील उत्सवाचे वेगळेपण असे की या देवीची पालखी ही अष्टमीला ब्रह्ममुहूर्तावर म्हणजे पहाटे चार वाजता निघते. नाईक–निंबाळकर कुटुंबीयांकडून देवीची चांदीची मूर्ती यावेळी सजविलेल्या पालखीत ठेण्यात येते. मानाच्या काठ्या, ढोल–ताशांचा गजर व झांज–लेझीम पथक यांच्यासह हजारो भाविक, अशी पालखी मिरवणूक निघते. प्रथम पालखी घेण्याचा मान हा शेलार व भोई यांना असतो. पालखी मंदिरातून निघाल्यापासून पुन्हा मंदिरात येईपर्यंत या पालखीसमोर कापडी पायघड्या अंथरल्या जातात. गुलालाची उधळण व फटाक्यांच्या आतषबाजीमुळे वातावरण भारलेले असते. सकाळी दहाच्या सुमारास पुन्हा पालखी मंदिरात पोचल्यानंतर हजारो भाविक दर्शनासाठी गर्दी करतात.
अष्टमीच्या दिवशी दुपारी कुस्त्यांचे फड रंगतात. ताशा–हलगीच्या गजरात ग्रामस्थ, सरपंच, उपसरपंच व यात्रा समितीतर्फे मल्लांना वाजतगाजत आखाड्याजवळ आणले जाते. याशिवाय नवरात्रोत्सवातही येथे विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. प्रत्येक मंगळवारी, शुक्रवारी व सप्तमीला जानाई देवीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी असते. सकाळी सहा ते रात्री दहापर्यंत भाविकांना मंदिरातील जानाई देवीचे दर्शन घेता येते. सकाळी आठ व रात्री आठ वाजता देवीची आरती होते.