सुमारे बाराव्या शतकात नाथ संप्रदायाचा उदय झाला. मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, गहिनीनाथ, जालिंदरनाथ, कानिफनाथ, भर्तरीनाथ, रेवणनाथ, नागनाथ आणि चरपटीनाथ असे नवनाथ मानले जातात. या सर्वांच्या जन्माच्या कथा अत्यंत रोचक आहेत. जालिंदरनाथांचा जन्म अग्नी म्हणजेच ज्वाळांतून झाला, म्हणून त्यांना जालिंदरनाथ असे नाव प्राप्त झाले. ‘श्री जालिंदरनाथ महिमा’ या ओवीबद्ध ग्रंथात त्यांच्या जीवनकार्याचे व चरित्राचे वर्णन करण्यात आले आहे. त्यांनी आपल्या जीवनकाळात सामान्यजनांच्या आयुष्यातील दुःख दूर करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी नाथपंथाच्या प्रचार-प्रसारासाठी वाहून घेतलेल्या आपल्या जीवनकार्याची सांगता येवलवाडी येथील गर्भगिरी डोंगरावर केली. येथे त्यांची संजीवन समाधी असल्याने आजही त्यांचे अस्तित्व जाणवते, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
पौराणिक कथांनुसार, जालिंदरनाथांचा जन्म मानवी देहातून झालेला नाही. ऋषिमुनींनी केलेल्या एका महान यज्ञातून, अग्नीच्या ज्वाळांमधून ते प्रकट झाले. त्यांना अंतरिक्ष ऋषींचा अवतार मानले जाते. ‘जाल’ म्हणजे पाणी; ज्यांनी आपल्या योगबळाने पाण्यावर विजय मिळवला आणि जलाला स्तंभित केले, ते ‘जालिंदर’. त्यांच्या तेजाने प्रत्यक्ष अग्नीही फिका पडत असे, असे वर्णन ग्रंथांमध्ये आढळते. जालिंदरनाथांच्या चरित्रातील सर्वात प्रसिद्ध गाथा म्हणजे राजा गोपीचंद आणि त्यांची माता मैनावती यांचा उद्धार ही होय. मैनावती ही जालिंदरनाथांची शिष्या होती.
आपल्या पुत्राने राजवैभवाच्या नश्वर सुखात न अडकता अमरत्वाचा मार्ग शोधावा, अशी तिची इच्छा होती. जालिंदरनाथांनी गोपीचंदाला अत्यंत कठोर परीक्षेतून तावून-सुलाखून काढले. राजमहालाचा त्याग करायला लावून त्याला वैराग्याची दीक्षा दिली. ‘भिक्षा वाढ गं माते’ म्हणत गोपीचंद जेव्हा आपल्याच आईकडे भिक्षा मागायला उभा राहिला, तो क्षण नाथ परंपरेत अत्यंत हृदयस्पर्शी मानला जातो.
जालिंदरनाथ हे ज्ञानेश्वरांचे समकालीन होते, त्यामुळे त्यांची समाधी तेराव्या शतकातील असावी, असे अभ्यासकांचे मत आहे. जालिंदरनाथांनी बारा वर्षे अरण्यात तपश्चर्या केली आणि त्यांच्यावर भगवान दत्तात्रेयांची कृपा झाली. त्यांनी थेट दत्तात्रेयांकडून अनुग्रह प्राप्त करून नाथ संप्रदायाची दीक्षा घेतली. त्यांनी संपूर्ण आयुष्यभर नाथ संप्रदायाचा प्रचार व प्रसार केला. हे करीत असताना त्यांनी कायम गोरगरीब जनतेच्या हिताचा विचार करून शिकवण दिली. योग, नीतिमत्ता, भक्ती व मोक्ष हेच माणसाच्या सुखाचे सोपान आहेत, हे त्यांनी जनमानसावर बिंबवले.
‘श्री नवनाथ भक्तिसार’ या ग्रंथातील अध्याय २८ आणि २९ मधील वर्णनानुसार जालिंदरनाथ यांनी कानिफनाथांना नाथ संप्रदायाची दीक्षा देऊन त्यांचे ‘कानिफनाथ’ असे नामकरण केले.
येवलवाडी येथील या मंदिरासमोर प्रशस्त वाहनतळ आहे आणि येथे येण्यासाठी पक्की डांबरी सडक आहे. वाहनतळावर पूजा साहित्य, खाद्यपदार्थ व इतर वस्तूंची दुकाने आहेत. मंदिराभोवती असलेल्या भक्कम तटबंदीत मुख्य प्रवेशद्वार आहे. मंदिर उंचावर स्थित असल्यामुळे प्रवेशद्वारातून मंदिरापर्यंत सुमारे पन्नास पायऱ्या चढून जावे लागते. पायरीमार्गाच्या दोन्ही बाजूला सुरक्षा कठडे आहेत, तसेच वर गजपृष्ठ आकाराचे छत आहे. मंदिराच्या प्रशस्त प्रांगणात असलेल्या उद्यानात पारायणासाठी मंडप उभारण्यात आला आहे. प्रांगणात भक्तनिवास, विश्रामधाम, देवस्थान कार्यालय व सेवेकऱ्यांची निवासस्थाने आहेत. पुढे प्राचीन काळातील दगडी बांधणीची दुसरी तटबंदी आहे. याही तटबंदीत प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वारासमोर दीपमाळ आणि दोन्ही बाजूला दोन चौथऱ्यांवर सिंहशिल्पे आहेत. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला दर्शनी भिंतीवर व्याल शिल्पे व चक्र नक्षी कोरलेली आहे, तसेच ललाटबिंबावर शिखरशिल्प आहे. या तटबंदीत उत्तर दिशेला दुसरे प्रवेशद्वार आहे.
सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. अर्धखुल्या स्वरूपाच्या सभामंडपात सुमारे वीस नक्षीदार चौकोनी स्तंभ त्याच आकाराच्या स्तंभपादावर उभे आहेत. हे सर्व स्तंभ एकमेकांना अर्धचंद्राकार कमानीने जोडलेले आहेत. सभामंडपात मध्यभागी जमिनीवर कासवशिल्प आहे. सभामंडपात उजव्या बाजूला नाथांची धुनी आहे. ती गेल्या सातशे ते आठशे वर्षांपासून अखंड प्रज्वलित असल्याचे सांगितले जाते. धुनीतील भस्म अंगाला लावल्याने शारीरिक तसेच मानसिक व्याधीतून मुक्तता होते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. पुढे सुमारे दोन फूट उंच चौथरा असलेले अंतराळ आहे. त्यापुढे गर्भगृहाचे प्रवेशद्वार आहे. द्वारशाखांवर उभ्या धारेची नक्षी कोरलेली आहे आणि ललाटबिंबावर पद्मफुलांची नक्षी आहे. गर्भगृहात मध्यभागी जालिंदरनाथांची समाधी आहे, तर मागील भिंतीलगत वज्रपीठावर नाथांची ध्यानस्थ मूर्ती आहे. मूर्तीसमोर चांदीच्या पादुका आहेत. गर्भगृहात डाव्या बाजूला नंदादीप आहे. असे सांगितले जाते की हा नंदादीप सातशे वर्षांपासून अखंड तेवत आहे. गर्भगृहाच्या बाह्य बाजूने प्रदक्षिणा मार्ग आहे. गर्भगृहाच्या मागील भिंतीत असलेल्या गवाक्षातून मंदिराच्या बाह्य बाजूने नाथांच्या समाधीचे दर्शन होते.
गर्भगृहाच्या छतावर पाच थरांचे गोलाकार शिखर आहे आणि शिखराच्या प्रत्येक थरात आठ देवकोष्ठके व त्यात विविध देवतांच्या मूर्ती आहेत. शिखराच्या शीर्षभागी एकावर एक असे दोन आमलक व त्यांवर कळस आहे.
समाधी मंदिराच्या बाजूला महादेवाचे मंदिर आहे. येथील शिवपिंडी सभामंडपात जमिनीखाली सापडली होती. ती प्रत्यक्ष जालिंदरनाथांच्या नित्य पूजेतील शिवपिंडी असल्याचे सांगितले जाते. महादेव मंदिराच्या समोर दत्तात्रेयांचे मंदिर आहे. ही दोन्ही मंदिरे हेमाडपंती स्थापत्यशैलीतील दगडी बांधकाम असलेली प्राचीन मंदिरे आहेत आणि त्यांवर विविध पशु व पक्षांची शिल्पे कोरलेली आहेत. या मंदिराच्या बाजूला एक लहान मंदिर आहे, ज्यात विठ्ठल-रखुमाईच्या मूर्ती आहेत. प्रांगणात दुमजली भक्तनिवास आहे. त्यात बाहेरगावाहून आलेल्या भाविकांना राहण्यासाठी खोल्या आहेत.
चैत्र पाडव्याला जालिंदरनाथांचा समाधी उत्सव येथे मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यावेळी राक्षसभुवन येथून कावडीतून गोदावरीचे पाणी आणून नाथांच्या समाधीला अभिषेक केला जातो. उत्सवकाळात हजारो नाथपंथीय भाविक, साधू, संत व संन्यासी नाथांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी येथे उपस्थित राहतात. यानिमित्ताने मंदिरात हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. वर्षभरात येथे दोन जत्रोत्सव असतात. त्यापैकी पहिली जत्रा माघ पौर्णिमेला भरते. यावेळी परिसरातील सर्व गावांतून महाला काठी मिरवणूक आणण्याची प्रथा आहे. मिरवणुकीने आणलेल्या महाला काठ्या मंदिरात उभ्या केल्या जातात. दुसरी जत्रा महाशिवरात्रीला असते. महाशिवरात्री म्हणजेच माघ कृष्ण चतुर्दशी ही तिथी नाथ संप्रदायात विशेष महत्त्वाची मानली जाते. कारण या संप्रदायाचे मूळ पुरुष ‘आदिनाथ’ म्हणजेच भगवान शिव आहेत. त्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी अनेक नाथ मंदिरांमध्ये जत्रा किंवा मोठे उत्सव असतात. याशिवाय या मंदिरात दसरा, दिवाळी, कोजागिरी पौर्णिमा, मकर संक्रांत आदी सण व उत्सव साजरे केले जातात. सर्व उत्सवांच्या वेळी मंदिरात नवनाथ भक्तीसार ग्रंथ पारायण केले जाते.