ऐतिहासिक छत्रपती संभाजीनगरमधील कुंवार फल्ली परिसरात असलेले जागृत गणेश मंदिर अनेक भाविकांचे श्रद्धास्थान आहे. गणेशोत्सवादरम्यान प्रतिष्ठापना करण्यासाठी सुमारे साडेतेरा फूट उंचीची ही मूर्ती बनवण्यात आली होती. मात्र एक टनाहून अधिक वजन असल्याने, तिचे विसर्जन करता न आल्याने, येथे या मंदिराची उभारणी करण्यात आली. उंचीच्या बाबतीत शहरातील तिसऱ्या क्रमांकाची ही गणेशमूर्ती आहे. नवसाला पावणारा, अशी या गणेशाची ख्याती आहे.
मूर्तीबद्दल अशी कथा सांगितली जाते की कुंवार फल्लीत वीर गणेश मंडळाचे हे मंदिर आहे. १९८५ मध्ये सार्वजनिक गणेशोत्सवादरम्यान मंडपात प्रतिष्ठापना करण्यासाठी मंडळाने रतन बगले यांच्या मूर्तिशाळेकडे या मूर्तीची नोंदणी केली होती. मात्र मूर्ती घडवत असताना बगले यांना आजारपणामुळे रुग्णालयात दाखल करावे लागले. त्यामुळे मूर्तीजवळ गणेशाचे वाहन असलेला मूषक बनवायचा राहून गेला. मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मूर्ती आणण्यासाठी मूर्तीशाळेत गेले असता मूर्ती तेथून हलेना. त्यासाठी केलेले अनेक प्रयत्न फोल ठरल्याने पदाधिकाऱ्यांनी गणेशाला साकडे घातले. काही पदाधिकाऱ्यांनी रुग्णालयात जाऊन बगले यांच्याकडून मूषक बनवून आणला. दुसऱ्या दिवशी मंडळाचे तीन पदाधिकारी चालत राजूर येथे गेले. तेथेही साकडे घातल्यावर ही मूर्ती हलली.
मूर्तीशाळेतून आणल्यानंतर मंडपात प्रतिष्ठापना करतेवेळी मूर्तीखालील ट्रॉली काढणे पदाधिकाऱ्यांना शक्य झाले नाही. २१ ब्राह्मणांच्या हस्ते अभिषेक करत ट्रॉलीसह असलेल्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. विसर्जनाच्या वेळी जास्त वजनामुळे मूर्तीचे विसर्जनही करता आले नाही. अखेर ट्रॉलीसह ओटा बांधून येथे छोटे मंदिर उभारण्यात आले. या मंदिराची स्थापना होऊन ४० वर्षे लोटली आहेत. पूर्वी या मंदिराचे नाव वीर गणेश मंदिर होते. कालांतराने ते जागृत गणेश मंदिर म्हणून ओळखले जाऊ लागले.
शहरातील कुंवार फल्ली परिसरात हे छोटेखानी मंदिर आहे. येथून जवळच राजाबाजार येथे शहराचे ग्रामदैवत असलेले संस्थान गणपतीचे देवस्थान आहे. जागृत गणेश मंदिराच्या पांढऱ्या रंगाच्या शिखरावर अष्टविनायकाच्या मूर्ती आहेत. गर्भगृहातील वरच्या भागात गणेशस्तोत्रे कोरण्यात आली आहेत. छतावर आकर्षक रंगरंगोटी करण्यात आली आहे.
गर्भगृहात प्लास्टर ऑफ पॅरिसची गणेशाची सुमारे साडेतेरा फुटी आकर्षक मूर्ती आहे. मुकुटधारी मूर्तीच्या चार हातांपैकी एक हात आशीर्वाद मुद्रेत असून एका हातात मोदक आहे. लाल रंगाचा पितांबर नेसलेल्या डाव्या सोंडेच्या या मूर्तीवर सुमारे २५ किलो वजनाचे चांदीचे दागिने आहेत. बसलेल्या स्थितीतील आकर्षक मूर्तीच्या पायाजवळ मूषक आहे. मूर्तीच्या पायांजवळ दोन्ही बाजूंना मयूर कोरण्यात आले आहेत.
भाविकांची अशी श्रद्धा आहे की हा गणेश नवसाला पावणारा आहे. त्यामुळे त्याच्या दर्शनासाठी मंदिरात शेकडो भाविक येतात. नवस फेडण्यासाठी अनेक भाविक देवाला विविध वस्तू अर्पण करतात. एका भाविकाने देवाला चांदीचा मुकुट अर्पण केला होता. गणेशोत्सवादरम्यान हा परिसर गर्दीने फुलून जातो. गणेशोत्सवात या मूर्तीजवळच लहान मूर्तीचीही प्रतिष्ठापना करण्यात येते. अनंत चतुर्दशीच्या दिवशी या छोट्या मूर्तीचे विसर्जन करण्यात येते. गणेशोत्सवादरम्यान येथे भजन, कीर्तन, सांस्कृतिक कार्यक्रम होतात. यावेळी मंदिरासह येथील परिसरात आकर्षक रोषणाई केली जाते तसेच संपूर्ण परिसरात रांगोळ्या काढण्यात येतात.
छत्रपती संभाजीनगर परिसरात उंचीच्या बाबतीत या मूर्तीचा तिसरा क्रमांक लागतो. पहिला क्रमांक चौराहा येथे १९९४ मध्ये स्थापन झालेल्या गणेश मूर्तीचा लागतो. या मूर्तीची उंची २३ फूट आहे. त्यानंतर दिवाण देवडी येथील पावन गणेश मंडळाच्या मूर्तीचा क्रमांक लागतो. अधिक वजनामुळे याही मूर्तीचे विसर्जन करता आलेले नाही. ही मूर्तीही रतन बगले यांनीच साकारलेली आहे. २१ फूट उंची असलेल्या या गणेशाचीही ख्याती नवसाला पावणारा अशी आहे.