जगदंबा त्वरिता देवी मंदिर

तळवाडा, ता. गेवराई, जि. बीड

सतीने प्रजापती दक्षाच्या यज्ञात देहत्याग केल्याने संतप्त झालेल्या महादेवाच्या देहातून वीरभद्राची निर्मिती झाली. वीरभद्राची शक्ती वाढवण्यासाठी अनेक देवता त्याच्या देहात विलीन झाल्या. त्वरिता देवी त्यापैकी एक आहे. मोरपीस, झाडांची पाने व सर्प यांची वस्त्रे परिधान करणारी त्वरिता देवी आणि तिचे मूळ रूप हे औषधी, आयुर्वेद व विषाचा उतारा करणारे आहे. नंतरच्या काळात देवीला दुर्गा, तुळजाभवानी व महालक्ष्मीच्या रूपात पुजले जाऊ लागले. महाराष्ट्रात या देवीची मोजकीच मंदिरे आहेत. गेवराई तालुक्यातील तळवाडा येथील प्राचीन मंदिर त्यापैकीच एक आहे.

तळवाडा येथील मंदिराचा इतिहास हा महाराष्ट्राच्या मध्ययुगीन इतिहासाशी, विशेषतः शिवकाळाशी जोडलेला आहे. उपलब्ध माहितीनुसार, या मंदिराचे बांधकाम १६ व्या किंवा १७ व्या शतकात झाल्याचा अंदाज आहे. हा कालखंड दख्खनच्या इतिहासातील मोठ्या उलथापालथीचा काळ होता. १६ व्या शतकात दख्खनवर निजामशाही, आदिलशाही आणि कुतुबशाही या पातशाह्यांचे वर्चस्व होते, तर १७ व्या शतकाच्या उत्तरार्धात छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली.

हे मंदिर लांबवर पसरलेल्या सपाट परिसरातील एकमेव डोंगरावर वसलेले आहे. भौगोलिकदृष्ट्या त्याला ‘इन्सेलबर्ग’ (एकाकी टेकडी) असे म्हटले जाते. आजूबाजूला विस्तीर्ण पसरलेली शेतजमीन आणि सपाट पठारी प्रदेश असताना अचानक उंचावलेला हा डोंगर निसर्गाचा चमत्कार असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. ही देवी तुळजापूरच्या भवानी देवीचे रूप आहे. आजवर अनेक भक्तांच्या मनोकामना देवीने त्वरित पूर्ण केल्या आहेत. देवी नवसाला त्वरित पावते म्हणून तिला त्वरिता नावाने ओळखले जाते, अशी येथे लोकश्रद्धा आहे.

डोंगराच्या पायथ्यापासून मंदिरापर्यंत वाहनाने जाण्यासाठी पक्का रस्ता व पायी जाण्यासाठी कोरीव पाषाणात बांधलेला पायरीमार्ग असे दोन पर्याय आहेत. पायरीमार्ग सुमारे सहा फूट रुंद आहे. मार्गाच्या दोन्ही बाजूला पाषाणात बांधलेले सुरक्षा कठडे आहेत. पायरीमार्गाच्या प्रारंभी श्री गणेशाचे मंदिर आहे. गर्भगृहात वज्रपीठावर गणेशाची शेंदूरचर्चित पाषाण मूर्ती आहे. पायथ्यापासून मंदिरापर्यंत येण्यासाठी सुमारे १८० पायऱ्या आहेत.

डोंगरमाथ्यावर मंदिराच्या चारही बाजूंना पेव्हर ब्लॉकचे आच्छादन करण्यात आले आहे. या ठिकाणी अनेक वृक्ष आहेत, तसेच भाविकांना बसण्यासाठी आसने आहेत. मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर चार लहान-मोठे चौथरे व त्यावर निमुळत्या होत गेलेल्या गोलाकार दीपमाळा आहेत. यापैकी काही दीपमाळांवर शिलालेख आहेत. त्यानुसार या दीपमाळा सन १७०१ ते १७०४ दरम्यान उभारल्या गेल्या आहेत. मंदिरास सुमारे बारा फूट उंच दगडी बांधणीची भक्कम तटबंदी आहे. तटबंदीत एका कोपऱ्यात बुरूजसदृश दीपस्तंभ आहे. येथून बाजूलाच गोड्या पाण्याची बारव आहे. यातील पाणी कधीही आटत नाही, असे सांगितले जाते. या विहिरीच्या बाजूला आणखी एक दीपमाळ आहे.

तटबंदीत दोन प्रवेशद्वारे आहेत. त्यातील मुख्य प्रवेशद्वार दुमजली आहे. प्रवेशद्वार जमिनीपेक्षा उंचावर असल्यामुळे तीन पायऱ्या चढून जावे लागते. पायऱ्यांच्या दोन्ही बाजूला चौथरे आहेत. प्रवेशद्वाराच्या द्वारशाखा सपाट आहेत आणि वर त्रिकोणी कमान आहे. कमानीच्या खाली उठाव शैलीतील चक्र शिल्प आहे. प्रवेशद्वारास नक्षीदार लाकडी झडपा आहेत. आत दोन्ही बाजूला पहारेकरी कक्ष आहेत. येथून प्रवेशद्वाराच्या दुसऱ्या मजल्यावर जाणारा जिना आहे. प्रवेशद्वाराच्या वरच्या मजल्यावर नगारखाना आहे. नगारखान्यात त्रिकोणी कमानीने जोडलेले आठ स्तंभ व त्यावर छत आहे. छतावर सुरक्षा कठडा आहे. प्रवेशद्वारातून मंदिराकडे निघणारा मार्ग अत्यंत अरुंद आहे. तो थेट मंदिराच्या अर्धमंडपासमोर निघतो.

अर्धमंडप, अरुंद सभामंडप व त्यापुढे प्रशस्त गर्भगृह अशी मंदिराची वैशिष्ट्यपूर्ण रचना आहे. अर्धमंडपासमोर संगमरवरी फरशी आच्छादित जमिनीवर कासव शिल्प आहे. अर्धमंडपात सभामंडपाच्या प्रवेशद्वारासमोर दोन्ही बाजूला सुमारे दोन फूट उंच चौथरे आहेत. पुढे सभामंडपाचे प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वाराच्या दगडी व सपाट द्वारशाखांच्या आत बसवलेल्या लाकडी द्वारशाखांवर, ललाटपट्टीत व मंडारकावर पानाफुलांची नक्षी आहे. ललाटबिंबावर गणेश शिल्प आहे. प्रवेशद्वारास नक्षीदार लाकडी झडपा आहेत. सभामंडपात दोन्ही बाजूला चौथरे आहेत. चौथऱ्यांच्या मधून अरुंद मार्गिका आहे. गर्भगृहाचे प्रवेशद्वार सभामंडपाच्या प्रवेशद्वारासारखेच आहे. वितानावर मध्यभागी चक्राकार नक्षी आहे.

गर्भगृहात वज्रपीठावर त्वरिता देवीची काळ्या पाषाणातील चतुर्भुज मूर्ती आहे. मूर्तीच्या हातात गदा, पद्म, शंख व चक्र आहे. वस्त्रे व अलंकार ल्यालेल्या या देवीच्या डोक्यावर सुवर्ण मुकुट आहे. मूर्तीच्या मागील चांदीच्या प्रभावळीत पानाफुलांची नक्षी आहे. गर्भगृहातून बाहेर पडण्यासाठी डाव्या बाजूने आणखी एक दरवाजा आहे. गर्भगृहाच्या बाहेरच्या बाजूने प्रदक्षिणा मार्ग आहे. गर्भगृहाच्या छतावर चार थरांचे गोलाकार व वर निमुळते होत गेलेले शिखर आहे. शिखराच्या खालील दोन थरांमध्ये प्रत्येकी बारा देवकोष्ठके व त्यात देवप्रतिमा आहेत. वरील दोन थरात स्तंभ नक्षी आहे. शिखराचे सर्व थर पद्मदल रिंगणाने विभागलेले आहेत. शिखराच्या शीर्षभागी एकावर एक असे दोन आमलक व त्यावर कळस आहे.

मंदिरासमोर भैरवनाथाचे लहान मंदिर आहे. मंदिरात वज्रपीठावर भैरवनाथ, भवानी देवी व जोगाई देवीची मूर्ती आहे. मंदिराच्या मागील बाजूला प्रशस्त चौथऱ्यावर यज्ञकुंड आहे. नवरात्रोत्सवात नऊ दिवस व चैत्र मासात महिनाभर येथे होम-हवन सुरू असते. मंदिराच्या प्रांगणात तिन्ही बाजूला तटबंदीला लागून ओवऱ्या आहेत. त्यांचा वापर भक्तनिवास व धर्मशाळा म्हणून केला जातो. उत्सव काळात या ओवऱ्यांमध्ये देवीच्या पीठ-मिठाच्या परड्या ठेवल्या जातात.

महिनाभर चालणारा चैत्र मासातील जत्रोत्सव व शारदीय नवरात्रोत्सव हे येथील मुख्य वार्षिक उत्सव मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. यावेळी हजारो भाविक देवीच्या दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी येतात. उत्सवकाळात मंदिरात होम-हवन, यज्ञयाग, भजन, कीर्तन, प्रवचन, जागरण, गोंधळ, महाप्रसाद आदी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. याशिवाय मकरसंक्रांत, कोजागरी पौर्णिमा, चैत्र पाडवा, दसरा, दिवाळी, आषाढ मास या सण व उत्सव काळात येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असते. मंदिरात मंगळवार, शुक्रवार, पौर्णिमा, अमावास्या, अष्टमी आदी दिवशी भाविकांची विशेष गर्दी असते.

उपयुक्त माहिती:

  • गेवराई येथून १५ किमी अंतरावर
  • बीड येथून ४८ किमी अंतरावर
  • गेवराई येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या टेकडीवरील वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात न्याहारीची सुविधा आहे, निवासाची नाही
  • संपर्क : मंदिर कार्यालय, मो. ९५९५८७७८४९

जगदम्बा त्वरिता देवी मंदिर

तलवाड़ा, गेवराई, जिला. बीड

Back To Home