‘विश्वाची आई’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जगदंबा मातेची विदर्भात अनेक मंदिरे आहेत; त्यापैकी एक प्राचीन देवालय मेहकर तालुक्यातील शेंदला येथे आहे. सुमारे चारशे वर्षांपासून या ठिकाणी विराजमान असलेली जगदंबा मातेची मूर्ती १२ फूट उंच व सात फूट रुंद आहे. विदर्भातील सर्वात उंच मूर्तींमध्ये या मूर्तीची गणना होते. या मूर्तीला दोन नऊवारी साड्यांचे वस्त्र नेसवले जाते; यावरून या देवीच्या भव्यतेची कल्पना येते. या जागृत देवीच्या दर्शनासाठी दररोज शेकडो भाविक येतात. चैत्री पौर्णिमा तसेच शारदीय नवरात्रोत्सवादरम्यान येथे भाविकांची मोठी मांदियाळी असते.
‘जगदंबा’ या शब्दाचा शब्दशः अर्थ ‘जगाची माता’ असा आहे. ही शक्ती सृजन, पालन आणि संहार या तिन्ही वैश्विक प्रक्रियांचे मूळ मानली जाते. ‘मार्कंडेय पुराणा’तील ‘देवी माहात्म्य’ या खंडातील माहितीनुसार, जेव्हा महिषासुर, शुंभ-निशुंभ यांसारख्या बलाढ्य असुरांनी देवांचा पराभव करून स्वर्गावर ताबा मिळवला आणि ऋषीमुनींच्या तपाचा भंग केला, तेव्हा समस्त देवांच्या क्रोधातून आणि तेजातून एका महाशक्तीचा उदय झाला. अग्नी, वायू, विष्णू, शिव आणि इंद्राच्या तेजाचा संगम होऊन अठरा भुजांनी युक्त अशी ही जगदंबा प्रकटली. तिने प्रत्येक देवाकडून प्राप्त झालेल्या दिव्य शस्त्रास्त्रांनी सज्ज होऊन राक्षसांचा समूळ नायनाट केला; म्हणूनच तिला ‘महिषासुरमर्दिनी’ असेही संबोधले जाते.
धार्मिक आणि ऐतिहासिकदृष्ट्या महाराष्ट्राच्या मातीशी जगदंबेचे नाते अत्यंत घट्ट आहे. महाराष्ट्राची कुलस्वामिनी मानली जाणारी साडेतीन शक्तिपीठे म्हणजे या मातेचीच विविध रूपे आहेत. कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची भवानी माता, माहूरची रेणुका माता ही तीन पूर्ण पीठे आणि वणीची सप्तशृंगी माता हे अर्धे पीठ आहे. विश्वाचे संचालन करणाऱ्या या आदिशक्तीने विविध काळांमध्ये विविध अवतार धारण केल्याचे धर्मशास्त्रांमध्ये नमूद आहे. ‘विश्वाची आई’ असलेल्या या जगदंबा मातेची बुलडाणा जिल्ह्यात अनेक प्राचीन मंदिरे आहेत. त्यापैकी शेंदला येथील जगदंबा मातेचे हे मंदिर हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आहे.
या मंदिराची आख्यायिका अशी की सुमारे चारशे वर्षांपूर्वी सुतार कुटुंबात जन्मलेल्या एका मुलाला चिखल व मातीपासून देवदेवतांच्या मूर्ती बनवण्याची आवड होती. या आवडीतूनच तो भक्तिमार्गाला लागला. तो एकदा नाशिकजवळील वणी येथील सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी गेला होता. त्यावेळी ‘या देवीची स्थापना आपल्या गावात व्हावी’, अशी इच्छा त्याच्या मनात जागृत झाली. त्यामुळे त्याने देवीजवळ ठेवलेला शेंदूरचर्चित बाण उचलून आपल्या गावी आणला.
गावापासून काही अंतरावर एका दगडी चौथऱ्यावर त्याने या बाणाची प्रतिष्ठापना केली. त्यानंतर देवीच्या सेवेतच त्याने स्वतःला वाहून घेतले. देवीची पालखी घेऊन तो आसपासच्या गावांमध्ये फिरू लागला. या गावांतील ग्रामस्थ त्याला धान्य तसेच धनाच्या रूपाने मदत करत असत. या पैशांतूनच त्याने कच्च्या विटांचा वापर करून देवीची सुंदर मूर्ती घडवली आणि या मूर्तीवर शेंदराचे लेपन केले. कालांतराने ही मूर्ती जागृत झाली आणि ‘तिच्या दर्शनाने सर्व मनोकामना पूर्ण होतात’, अशी ख्याती पंचक्रोशीत पसरली. त्यामुळे अनेक भाविक तिच्या दर्शनासाठी येऊ लागले. १८९८ मध्ये येथे देवीचे मंदिर उभारण्यात आले. कालांतराने ‘समाजभूषण’ पुरस्काराने गौरवलेले आयाजी पाटील यांच्या पुढाकारातून या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. अलीकडेच झालेल्या अन्य एका जीर्णोद्धारानंतर मंदिराला सध्याचे स्वरूप प्राप्त झाले. मंदिराच्या प्रवेशद्वारातून आत आल्यावर प्रांगण लागते. प्रांगणात मंदिरासमोर दोन दीपस्तंभ आहेत. अर्धखुला सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या लाकडी द्वारपट्टीवर सुबक कलाकुसर आहे. प्रवेशद्वाराच्या ललाटबिंबावर गणेशाचे शिल्प आहे.
गर्भगृहात देवीची भव्य शेंदूरचर्चित मूर्ती आहे. या मूर्तीवर भुवया, डोळे, नाक, ओठ व कान स्पष्टपणे कोरलेले आहेत. देवीच्या नाकात चांदीची नथ आहे. या वस्त्रालंकारविभूषित देवीच्या चरणांजवळ शिवलिंग व पादुका आहेत.
मंदिर परिसरात एक यज्ञकुंड आहे, जिथे विविध प्रसंगी होमहवन केले जाते. परिसरात शिवमंदिर आणि गजानन महाराजांचे मंदिर आहे. येथे आसरा मातेचेही स्थान आहे. जागृत देवता असलेली ही देवी शेंदला गावची ग्रामदेवता आहे. चैत्री पौर्णिमेच्या दिवशी या मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. या दिवशी भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात येते. शारदीय नवरात्रोत्सव हा येथील प्रमुख उत्सव असतो. या उत्सवादरम्यान नऊ दिवस येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. नवमीच्या दिवशी येथे होमहवन करण्यात येते. या उत्सवादरम्यान दररोज शेकडो भाविक सकाळपासूनच दर्शनासाठी रांगा लावतात.