जगदंबा मंदिर

लाडनापूर, ता. संग्रामपूर, जि. बुलडाणा

सातपुडा पर्वतरांगांच्या पायथ्याशी, पांडव नदीच्या तीरावरील लाडनापूर येथे जगदंबा मातेचे प्राचीन पांडवकालीन मंदिर आहे. वनवासादरम्यान पांडवांनी येथे काही काळ वास्तव्य केल्याची पौराणिक कथा प्रसिद्ध आहे. या मंदिर परिसरात असलेल्या भुयारी मार्गावरून पांडवांनी जळगाव जामोदकडे प्रस्थान केल्याची लोकभावना आहे. नवसाला पावणारी देवी असा लौकिक असलेल्या येथील जगदंबा देवीच्या दर्शनासाठी पंचक्रोशीतील असंख्य भाविक येतात. माघ पौर्णिमेला येथे मोठा महाभंडारा होतो, तर शारदीय नवरात्रोत्सवादरम्यान नऊही दिवस येथे भाविकांची मांदियाळी असते.

महाराष्ट्र ही जशी संतांची भूमी आहे, तशीच ती शक्तीच्या उपासनेचीही भूमी मानली जाते. सह्याद्रीच्या रांगा आणि अरबी समुद्राच्या सान्निध्यात वसलेल्या या राज्यात देवीची साडेतीन शक्तीपीठे आहेत. कोल्हापूरची महालक्ष्मी, माहूरची रेणुका माता, तुळजापूरची भवानी माता आणि वणीची सप्तशृंगी माता ही राज्यातील प्रमुख श्रद्धास्थाने आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेची प्रेरणा देणारी तुळजापूरची भवानी माता महाराष्ट्राची कुलस्वामिनी आणि स्वाभिमानाचे प्रतीक मानली जाते. नाशिकच्या वणी गडावर अठरा हातांची जगदंबा सप्तशृंगी माता म्हणून विराजमान आहे; तिच्या दर्शनाने भक्तांची दुःखे दूर होतात, अशी मान्यता आहे. महाराष्ट्राची लोककला आणि संस्कृती जगदंबेच्या आराधनेशिवाय अपूर्ण मानली जाते. संबळ आणि डफाच्या तालावर जेव्हा गोंधळी ‘आई जगदंबेचा उदो उदो…’ असा जयघोष करतात, तेव्हा संपूर्ण वातावरणात एक चैतन्य निर्माण होते.

विश्वाचे संचालन करणाऱ्या या आदिशक्तीने विविध काळांत वेद-पुराण, दुष्टांचा संहार तसेच लोकरक्षणासाठी विविध अवतार धारण केल्याचे धर्मशास्त्रांमध्ये नमूद आहे. विश्वाची आई असलेल्या जगदंबा मातेची बुलडाणा जिल्ह्यात अनेक प्राचीन मंदिरे आहेत. या जिल्ह्यात घाटपुरी, शेंदळा, सव, पिंपळगाव देवी, सुलज, वानखेड, जानेफळ, शिवणी टाका आदी ठिकाणी या देवीची जागृत स्थाने आहेत. लाडनापूर येथील हे मंदिरही त्यापैकीच एक आहे. पूर्वी हा परिसर दंडकारण्याचा भाग होता. वनवासादरम्यान पाच पांडवांनी येथे काही दिवस वास्तव्य केल्याची आख्यायिका प्रचलित आहे. या मंदिर परिसरात एक भुयारी मार्ग आहे; त्यातून पांडवांनी जळगाव जामोदच्या दिशेने मार्गक्रमण केल्याचे सांगण्यात येते. सध्या या भुयारी मार्गाची पडझड झाली आहे. श्रीधरस्वामी लिखित ‘पांडवप्रताप’ मध्येही या स्थानाचा उल्लेख आढळतो. पूर्वी या मंदिराचे स्वरूप छोटेखानी होते, मात्र अलीकडेच झालेल्या जीर्णोद्धारानंतर या मंदिराला सध्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

जळगाव जामोद – परतवाडा राज्य महामार्गावरील लाडनापूर येथे पांडव नदीच्या तीरावर, निसर्गरम्य परिसरात हे मंदिर वसलेले आहे. काही पायऱ्या चढून मंदिरात प्रवेश करावा लागतो. मंदिराभोवती मोठे प्रांगण आहे. मंदिराजवळच दगडी दीपस्तंभ आहे. मुखमंडप, अर्धखुल्या स्वरूपाचा सभामंडप आणि गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. सभामंडपात एका लहानशा देवळीत भैरवनाथांचे स्थान आहे. सभामंडपाच्या मध्यभागी असलेल्या गर्भगृहातील चौथऱ्यावर जगदंबा देवीची मोठी शेंदूरचर्चित तांदळा स्वरूपातील मूर्ती आहे. या मूर्तीसमोर आणखी एक शेंदूरचर्चित तांदळा विराजमान आहे. या दोन्ही तांदळ्यांवर डोळे कोरलेले आहेत आणि त्यांच्या कपाळावर टिळे आहेत. या तांदळ्यांना वस्त्रालंकारांनी सजवण्यात येते. या दोन्ही तांदळ्यांवर उत्सवकाळात चांदीचे मुकुट लावण्यात येतात. या मंदिराच्या मुखमंडपावर शिखर आहे. गर्भगृहावर वरच्या दिशेने आकाराने निमुळते होत गेलेले पाच स्तरीय शिखर आहे. त्यावरील प्रत्येक स्तरांमध्ये देवकोष्ठके कोरण्यात आली आहेत. शिखराच्या वरच्या बाजूस द्विस्तरीय आमलक व कळस आहेत.

ही देवी कोणालाही रिक्त हस्ते माघारी पाठवत नाही, अशी भाविकांची श्रद्धा आहे. नवसाला पावणारी देवी अशी ख्याती असलेल्या या देवीच्या दर्शनासाठी नेहमीच भाविकांची गर्दी असते. माघी पौर्णिमेच्या दिवशी मंदिर परिसरात मोठा उत्सव होतो. या दिवशी भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात येते. शारदीय नवरात्रोत्सव हा येथील प्रमुख उत्सव आहे. या उत्सवादरम्यान नऊही दिवस येथे भजन, कीर्तनासारख्या विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. तसेच दांडियारास स्पर्धेचेही आयोजन केले जाते.

उपयुक्त माहिती:

  • संग्रामपूर येथून १३ किमी अंतरावर
  • बुलडाणा येथून ९९ किमी अंतरावर
  • संग्रामपूर येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने नदीतीरावर असलेल्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवासाची सुविधा नाही
  • संपर्क : मंदिर कार्यालय, मो. ९९६०१०२६२६

जगदंबा मंदिर

Back To Home