इंद्रगढी माता मंदिर

घाटनांद्रा, ता. सिल्लोड, जि. छत्रपती संभाजीनगर


आदिमाया आदिशक्तीच्या साडेतीन पीठांपैकी पूर्ण पीठ असलेल्या माहूरगडाचे छत्रपती संभाजीनगरमधील सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा येथे उपपीठ आहे. अजिंठा डोंगररांगांमधील रेणुका मातेचे अधिष्ठान असलेल्या या देवीला इंद्रगढी देवी म्हणून ओळखले जाते. उन्मत्तांना धडा शिकवणारी, नवसाला पावणारी असा या देवीचा लौकिक आहे. इंद्राला वर देणाऱ्या या देवीचा दरवर्षी त्रिपुरारी पौर्णिमेला यात्रोत्सव होतो. त्यावेळी हजारो भाविक देवीचे दर्शन घेऊन नवसपूर्तीची वा नवीन नवसांची कबुली देतात.

या मंदिराची आख्यायिका अशी की प्राचीन काळी येथील एका गुहेत एक ऋषी आपल्या कन्येसह राहत असे. एके दिवशी देवराज इंद्र या परिसरातून जात असताना त्याची नजर या ऋषीकन्येवर पडली. सदैव अप्सरांच्या सान्निध्यात राहणाऱ्या इंद्राने ऋषीकन्येजवळ येऊन तिच्या सौंदर्याची कुचेष्ठा केली. त्यामुळे संतप्त झालेल्या ऋषीकन्येनेतुझा शक्तिक्षय होईल’, असा इंद्राला शाप दिला. तिची शापवाणी खरी ठरल्याने भानावर आलेल्या इंद्राने तिच्याकडे क्षमायाचना करत :शाप मागितला. मात्र ऋषीकन्येकडे :शाप देण्याचे सामर्थ्य नसल्याने हतबल झालेला इंद्र विष्णूकडे गेला. त्यांनी इंद्राला रेणुका मातेची आराधना करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार इंद्राने रेणुका मातेची आराधना केल्यावर देवीने त्याला शापमुक्त केले. त्यावेळी इंद्राने, वाईट कृत्यांचा पश्चाताप झालेल्या भक्तांना अभय देण्यासाठी देवीने येथेच अधिष्ठान करावे, अशी इच्छा देवीकडे व्यक्त केली. तेव्हापासून ही देवी या गडावर स्थायिक झाली. इंद्राला वर देणारी म्हणून इंद्रवरदायिनी हे तिचे नाव पडले. पुढे अपभ्रंश होऊन ते इंद्रगढी झाले.

कन्नड, सोयगांव पाचोरा या तालुक्यांच्या सरहद्दीवर घाटनांद्रा हे गाव आहे. या गावच्या उत्तर दिशेला पाच किमी अंतरावर इंद्रगढी मातेचे मंदिर आहे. मंदिराकडे येताना दूरवरूनच गड दिसू लागतो. इंद्रगढीच्या पायथ्यापर्यंत रस्ता आहे. पुढील डोंगराचा रस्ता चढण्यासाठी मंदिराच्या विश्वस्त मंडळाने श्रमदानातून रस्ता बनवला आहे. काही अंतर चढल्यावर विस्तीर्ण पठार लागतो. या पठाराच्या उजवीकडे दक्षिणमुखी मारुतीचे मंदिर आहे. समोर इंद्रगढी मातेचे मंदिर डावीकडे मातृतीर्थ तलाव आहे. या तलावातील पाणी प्राशन केल्यावर त्वचारोग नष्ट होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे.

परिसरात नक्षीकाम आकर्षक कलाकुसर असलेल्या दगडांचे अवशेष असल्याने पूर्वी येथे देवीचे दगडी प्राचीन मंदिर होते, असे सांगितले जाते. १९९० मध्ये मंदिराच्या विश्वस्त मंडळाने येथे नवीन मंदिर उभारले. मंदिरासमोर एका छोट्या चौथऱ्यावर भव्य त्रिशूल आणि ध्वजपताका आहेत. हे मंदिर जमिनीपासून उंचावर असल्याने आठ पायऱ्या चढून दर्शनमंडपात प्रवेश होतो. दर्शमंडप, सभामंडप, गर्भगृह आणि प्रदक्षिणा मार्ग असे मंदिराचे स्वरूप आहे. येथील सभामंडप मोठा असून भाविकांच्या सोयीसाठी येथे पुरुष स्त्रियांसाठी डावी उजवीकडे रेलिंग लाऊन दर्शनरांगा तयार केल्या आहेत. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावरील ललाटबिंबावर गणेशाची मूर्ती आहे प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला कलशांची चित्रे आहेत. गर्भगृहात एका चौथऱ्यावरील मखरात तांदळारूपात इंद्रगढी माता विराजमान आहे.

त्रिपुरारी पौर्णिमेला देवीच्या गडावर मोठी यात्रा भरते. त्यादिवशी मंदिरात पूजाअर्चा झाल्यावर दुपारी देवीला रोडग्यांचा नैवेद्य दाखवला जातो. या यात्रेदरम्यान हजारो भाविक येथे येऊन देवीचे दर्शन घेतात. या गावातून लग्न होऊन गेलेल्या स्त्रिया आवर्जून येथे येऊन खणानारळाने देवीची ओटी भरतात. यात्रेदरम्यान पूर्ण झालेले नवस फेडले जातात, तसेच नवीन नवसही केले जातात. यात्रेसाठी अनेक भाविक लोटांगण घालत गडावर येतात. शारदीय नवरात्रोत्सवादरम्यानही अनेक भाविक दर्शनासाठी येतात. शारदीय नवरात्रोत्सव आणि त्रिपुरारी पौर्णिमेच्या उत्सवादरम्यान येथे अन्नछत्र चालवले जाते.

गडावर इंद्रेश्वर महादेवाचेही स्थान आहे. गडाच्या डाव्या बाजूला असलेल्या खोल दरीतऋषीचा खोराम्हणून ओळखली जाणारी १० बाय १२ आकाराची गुहा आहे. या गुहेत शिवपिंडी आहे. पूर्वी या गुहेत अनेक ऋषीमुनी तप करत. या ठिकाणी दूध देणाऱ्या गायींना आणल्यास त्यांना पान्हा फुटतो, अशी ग्रामस्थांची श्रद्धा आहे. त्यामुळे परिसरातील अनेक जण आपल्या गायींना घेऊन येथे येतात. या गुहेच्या उत्तरेकडे, मंदिरापासून सुमारे तीन किमी अंतरावर तुळजापूरच्या भवानीदेवीचे उपपीठ असलेल्या जोगेश्वरी देवीचे मंदिर आहे. इंद्रगढी देवीच्या डाव्या बाजूला खान्देशच्या परिसराचे विहंगम दृश्य दिसते.

उपयुक्त माहिती:

  • सिल्लोड येथून ३६ किमी, तर छत्रपती संभाजीनगरपासून ७८ किमी अंतरावर
  • पाचारो, सिल्लोड येथून घाटनांद्रापर्यंत एसटीची सुविधा; तेथून पाच किमी खासगी वाहनांनी यावे लागते 
  • परिसरात न्याहरीची सुविधा नाही. निवासासाठी जोगेश्वरी मातेचे भक्त निवास उपलब्ध
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात 
  • संपर्क : रघुनाथ मोरे, अध्यक्ष, मो. ९७६३९६७४४३, पांडुरंग सोनवणे, उपाध्यक्ष, मो. ९९७०५८८०३४
Back To Home