
ऐतिहासिक नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात हर्सूल येथे हरसिद्धी मातेचे प्राचीन मंदिर आहे. महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजा भवानी मातेचे ठाणे समजले जाणाऱ्या या मंदिराची उभारणी चक्रवर्ती राजा विक्रमादित्य याने केली होती. असे सांगितले जाते की हरसिद्धी मातेचे महाराष्ट्रातील हे एकमेव मंदिर आहे. हेमाडपंती स्थापत्यशैलीत उभारलेल्या या मंदिरातील देवीची ख्याती नवसाला पावणारी, अशी आहे. त्यामुळे नवरात्रोत्सव तसेच कार्तिक पौर्णिमेच्या आदल्या दिवशी भरणाऱ्या देवीच्या यात्रेदरम्यान लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात.
हर्सूलची ग्रामदैवता असलेल्या या देवीबाबत विविध आख्यायिका आहेत. शंकरासोबत सारीपाटाच्या खेळात पराभूत झाल्यानंतर रुसलेली पार्वती माता येथे आली. त्यानंतर शंकराने तिला येथे दर्शन दिल्याने देवीला हरसिद्धी माता असे नाव पडल्याचे सांगितले जाते. दुसऱ्या आख्यायिकेनुसार, चंड व प्रचंड या दैत्यांनी एकदा कैलास पर्वतावर बळजबरीने प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी नंदीने त्याला रोखून धरले. या युद्धात नंदी जखमी झाला. त्यानंतर शंकराने केलेल्या आज्ञेनुसार चंडी देवीने या दैत्यांचा वध केला. त्यामुळे शंकर तिच्यावर प्रसन्न झाले. तेव्हापासून या देवीला हरसिद्धी असे नाव पडले. या युद्धात नंदीने देवीला साथ दिली होती. त्यामुळे येथे देवीसमोर नंदी आहे. स्कंदपुराणात याबाबतची कथा आहे.
हरसिद्धी माता ही उज्जैनचा राजा विक्रमादित्यची आराध्यदैवत होती. तिला प्रसन्न करण्यासाठी त्याने स्वतःचे शिर कापण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर देवी त्याच्यावर प्रसन्न झाली. देवीच्या आशीर्वादाने तो चक्रवर्ती राजा म्हणून प्रसिद्ध झाला.
राजा विक्रमादित्याने बांधलेले हरसिद्धी देवीचे भारतातील पहिले मंदिर उज्जैन येथे आहे व दुसरे हर्सूल येथे आहे. राजा विक्रमादित्य ११११ मध्ये तत्कालीन खडकी (आताचे छत्रपती संभाजीनगर) येथे आला होता. त्या काळी शहरात दिल्ली दरवाजातून प्रवेश करावा लागत असे. मात्र रात्रीच्या वेळी हा दरवाजा बंद होत असल्याने राजाला हर्सूलमध्ये मुक्काम करावा लागला. हा परिसर मनाला भावल्यामुळे त्याने येथे हरसिद्धी मातेचे मंदिर बांधण्याचा निश्चय केला. सुमारे पाच वर्षे मंदिराचे बांधकाम सुरू होते. ११११ मध्ये हे मंदिर बांधल्याचा संस्कृत भाषेतील उल्लेख मंदिराच्या एका भिंतीवर आहे. पुढे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या काळात या मंदिराचा जीर्णोद्धार झाला.
मंदिरासमोर दगडी दीपमाळ आहे. देवीच्या मुख्य मंदिरासमोर सूर्यकुंड नावाचे पाण्याचे छोटे कुंड आहे. त्यावर असलेली नंदीची सुंदर मूर्ती लक्ष वेधून घेते. नवरात्रोत्सव आणि यात्रेदरम्यान भाविक भक्तिभावाने या कुंडाची पूजा करतात. साधारणतः शंकराच्या मंदिरासमोर नंदी असतो. मात्र या मंदिरात हरसिद्धी देवीसमोर नंदीची भलीमोठी मूर्ती आहे. सभामंडप व गर्भगृह असे हरसिद्धी माता मंदिराचे स्वरूप आहे.
या मंदिरावर आकर्षक कलाकुसर असलेले शिखर आहे. दगडी बांधकाम असलेल्या गर्भगृहाच्या बहुतांश भागात शेंदरी रंग देण्यात आला आहे. येथे सोनेरी मुलामा दिलेल्या मखरात हरिसिद्धी माता विराजमान आहे. कलाकुसर असलेल्या मखराच्या मध्यभागी ‘श्री हरिसिद्धी माता दरबार’ असे कोरलेले आहे. मखरावर वरच्या बाजूस दोन्हीकडे सिंह आहेत. काळ्या पाषाणातील देवीची मूर्ती सुमारे साडेतीन फूट उंच आहे. चांदीचा मुकुट घातलेल्या या वस्त्रालंकारित देवीच्या नाकात नथ असून मूर्तीजवळ देवीचे शस्त्र त्रिशूल आहे. देवीच्या मूर्तीखाली तिचे वाहन असलेल्या सिंहाची पंचधातूची मूर्ती आहे. देवीच्या पायाजवळ शिवलिंग आहे. देवीच्या मूर्तीसमोर असलेल्या स्टेनलेस स्टीलच्या रेलिंगवर देवीच्या पादुका दर्शनासाठी ठेवण्यात आल्या आहेत.
पाच एकरांपेक्षा मोठ्या असलेल्या मंदिर परिसरात पुरातन मंदिरांचे संकुल आहे. मुख्य मंदिराच्या डावीकडे लक्ष्मीनारायणाचे, तर उजवीकडे दत्त मंदिर आहे. समोरच रामकुंड नावाचा आणखी एक कुंड आहे. असे सांगितले जाते की सारीपाटाच्या खेळात पराभूत झाल्यानंतर रुसून येथे आलेल्या पार्वती मातेने आपले पातळ या कुंडात धुतले होते. मंदिर परिसरात पाताळेश्वर महादेव मंदिरही आहे. येथे जमिनीखाली पाण्याचा झरा असल्याने वर्षभर येथील शिवपिंडी पाण्याखालीच असते. भाविक पिंडीला दोन्ही बाजूंनी हात लावून ‘ॐ नमो शिवाय’ म्हणत दोनदा टाळ्या वाजवतात. त्यामुळे मनातील इच्छा पूर्ण होते, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
मंदिराजवळ रेणुका मातेचे प्राचीन मंदिर आहे. आंबट पदार्थांचे सेवन केल्यावर या देवीचे दर्शन न घेण्याची प्रथा आहे. या मंदिरासमोर असलेल्या चंद्रकुंडाजवळ नंदीची मूर्ती आहे. १९७२ च्या दुष्काळात चंद्रकुंडाने संपूर्ण हर्सूल गावाची तहान भागवली होती. पार्वती मातेने या कुंडातील पाणी प्राशन केले होते, अशी आख्यायिका आहे. परिसरात गणेश मंदिर, दक्षिणमुखी हनुमान तसेच संतगाडगेबाबा यांची मंदिरे आहेत.
येथील एका मंदिरात पैठणचे रामलाल बाबा आणि गेंदाई महाराज यांची लहान मंदिरे आहेत. शंभर वर्षांपूर्वी हरसिद्धी देवीच्या मंदिरात सेवा करणारे संत जानकीराम यांची समाधीही येथे आहे. नवसाला पावणारी देवी, असा देवीचा लौकिक असल्याने विविध भागांतील भाविक तिच्या दर्शनासाठी येथे येतात. येथे रामनवमीचा उत्सवही होतो. श्रावण महिन्यात हरसिद्धी मातेच्या मंदिरासमोरील कुंडातील पवित्र जल घेऊन खडकेश्वर येथील महादेव मंदिरात अभिषेक करण्यात येतो. या कावड यात्रेत शेकडो भाविक सहभागी होतात.
नवरात्रोत्सवादरम्यान सकाळी ५.३० वाजता देवीची पूजा करण्यात येते. सकाळी ७ वाजता आरती होते. सायंकाळी ५.३० वाजता पूजा आणि सायंकाळी ७ वाजता आरती होते. आठव्या माळेला होमहवन होतो. उत्सवादरम्यान देवीला नवा साज चढवण्यात येतो. नऊही दिवस येथे भजन, कीर्तन आदी धार्मिक कार्यक्रम होतात. देवीच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच भक्तांच्या रांगा लागलेल्या असतात. विजयादशमीच्या दिवशी परिसरातील भाविक नवरात्रोत्सवानिमित्त स्थापन केलेल्या घटातील उगवलेले धान व आपट्याची पाने (सोने) घेऊन मंदिरात आवर्जून येतात.
मंदिराच्या विश्वस्त मंडळातर्फे या उत्सवादरम्यान परिसरात आरोग्य व नेत्रतपासणी शिबिरांचेही आयोजन केले जाते.
कार्तिक पौर्णिमेच्या आदल्या दिवशी, गुरुनानक जयंतीला येथे हरसिद्धी मातेची मोठी यात्रा भरते. यात्रेदरम्यान दिवाणदेवडी ते हर्सूल अशी देवीची एक पालखी निघते. आणखी एक पालखी परिसरातील आईसाहेब नगर येथील औताडे–पाटील यांच्या घरून निघते. या पालख्या मंदिरात आल्यावर महाआरती होते. या यात्रेदरम्यान प्राण्यांची टक्कर तसेच कुस्त्यांच्या स्पर्धा भरवण्याची परंपरा आहे. कामानिमित्त विविध ठिकाणी स्थायिक झालेली गावातील मंडळी यात्रेसाठी आवर्जून गावात येतात. देवीची ओटी भरण्यासाठी या गावातील लग्न होऊन गेलेल्या मुलीही (माहेरवाशिणी) येथे येतात. या मंदिरात दत्तजयंतीचा उत्सवही होतो.
एकेकाळी या परिसरात अत्यंत समृद्धी होती. त्याच्या खुणा या परिसरात फिरल्यावर दिसतात. असे सांगितले जाते की हरसिद्धी देवीच्या नावावरून गावाचे नाव हर्सूल असे पडले. मंदिरापासून काही अंतरावर सतीचा महाल म्हणून ओळखली जाणारी प्राचीन वास्तू आहे. हा चिरेबंदी महाल चारही बाजूंनी बंद आहे. प्राचीन काळी सती जाण्याआधी महिला या महालात स्वत:ला कोंडून घेत असत, अशी आख्यायिका आहे. या परिसरात प्राचीन काळी बांधलेल्या भिंती आहेत. चारही बाजूंनी तटबंदी आहे आणि बुरूज आहेत.