हरिहरेश्वर मंदिर,

गोळप, ता. रत्नागिरी, जि. रत्नागिरी

रत्नागिरी जिल्ह्यातील पावसपासून काही अंतरावर असलेले गोळप येथील हरिहरेश्वराचे मंदिर हे जिल्ह्यातील महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे. येथील वैशिष्ट्य असे की मंदिरात एकाच चौथऱ्यावर ब्रह्मा, विष्णू महेश अशा तीन स्वतंत्र मूर्ती आहेत. अशा प्रकारचे स्वतंत्र मूर्ती असलेले हे कोकणातील दुर्मिळ मंदिर आहे. या सुंदर मूर्ती गोळप गावासोबतच कोकणचे वैभव मानले जाते. १३५ वर्षांपासून सुरू असलेल्या कार्तिकोत्सवात टिपऱ्या आणि तलवारी फिरविणे हे येथील विशेष आकर्षण आहे.

रत्नागिरीपावस मार्गावर गोळप गाव आहे. मुख्य रस्त्यापासून काहीशा खालच्या भागात असलेल्या हरिहरेश्वर मंदिरात जाण्यासाठी जांभ्या दगडाची पाखाडी (पायवाट) आहे. या वाटेवरून जाताना ग्रामदैवत रवळनाथ मंदिरापासून पुढे गेल्यावर हरिहरेश्वर मंदिराचे दर्शन होते. सर्व बाजूंनी झाडांनी वेढलेल्या निसर्गसमृद्ध परिसरात हे मंदिर स्थित आहे. कौलारू दुमजली असलेल्या मंदिराभोवती जांभ्या दगडाची मजबूत तटबंदी आहे. तटबंदीत असलेल्या प्रवेशद्वारातून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. संपूर्ण प्रांगणात जांभ्या दगडाची फरसबंदी करण्यात आलेली आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर उंच चौथऱ्यावर कोकणी पद्धतीच्या तीन दीपमाळा आहेत त्या बाजूलाच एक लहानसे व्यासपीठ आहे. त्यावरून उत्सवाच्यावेळी विविध कार्यक्रम नाटके सादर केली जातात.

दोन सभामंडप, अंतराळ गर्भगृह असे मंदिराचे स्वरूप आहे. यातील पहिला सभामंडप हा खुल्या प्रकाराचा दुसरा अर्धमंडप प्रकारातील आहे. बांधकामात जास्तीत जास्त लाकडांचा वापर करण्यात आला आहे. दुसऱ्या सभामंडपात दोन फूट उंचीची दगडी बाकांची रचना आहे. अंतराळाच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला लाकडी जाळी असून तेथून अंतराळात प्रवेश होतो. या अंतराळात पुढील बाजूस कोकणी पद्धतीचे दगडी बांधकामातील गर्भगृह आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला गणपती आणि देव अनंत यांच्या मू्र्ती आहेत. गर्भगृहात एका चौथऱ्यावर ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्या सुबक सुंदर मूर्ती आहेत. यामध्ये आपल्या डाव्या बाजूला विष्णू, मध्यभागी ब्रह्मदेव आणि उजव्या बाजूला शंकराची मूर्ती आहे.

विष्णूची मूर्ती चतुर्भुज असून उजवीकडील खालच्या हातात पद्म, वरच्या हातात शंख, डावीकडील वरच्या हातात चक्र, तर खालच्या हातात गदा आहेत. आयुधांच्या क्रमांनुसार मूर्तिशास्त्रात अशा मूर्तीला केशवविष्णू असे संबोधले जाते. विष्णूच्या कानात मकरकुंडले, गळ्यात वैजयंतीमाला त्यातील कौस्तुभ मणी छातीपर्यंत आलेला आहे. मागे असलेल्या प्रभावळीवर विष्णूचे दशावतार कोरलेले आहेत. उजव्या पायाजवळ खाली गरुड, तर दोन बाजूंना चवरी ढाळणारे सेवक आहेत. सेवकांच्या मागे हातात कमळ घेतलेल्या भूदेवी आणि श्रीदेवी कोरलेल्या आहेत.

मध्यभागी ब्रह्मदेवाची मूर्ती आहे. ही मूर्ती अतिशय सुबक देखणी आहे. ब्रह्मदेवाचा मुकुट हा नेहमी जटामुकुट दाखवला जातो. मात्र याठिकाणी तो विष्णूसारखा किरीटमुकुट दाखवला आहे, हे या मूर्तीचे एक वैशिष्ट्य म्हणावे लागेल. चार तोंडे असलेल्या या मूर्तीमधील तीन तोंडे समोरून दिसतात, तर चौथे तोंड मागे वळलेले आहे. समोरील तिन्ही तोंडांना दाढी आहे. यातील उजवीकडील खालचा हात वरद मुद्रेत असून त्यात अक्षमाला आहे, तर डावीकडील खालच्या हातात कमंडलू आहे. वरच्या दोन हातांत स्रुक आणि सुवा ही यज्ञासाठी लागणारी उपकरणे आहेत. पायाशी दोन्ही बाजूंना सेवक दाखवलेले आहेत. ब्रह्मदेवाच्या मूर्तीमागेही प्रभावळ आहे; परंतु त्यात कोणत्याही मूर्ती कोरलेल्या नाहीत. मात्र त्याच्या आजूबाजूला असलेल्या खांबांवर साधक तपस्वी यांच्या मूर्ती दिसतात.

येथील महेश म्हणजेच शिवाची मूर्ती जटामुकुटधारी असून कानात सर्पकुंडले आहेत. उजवीकडील वरच्या हातात डमरू, तर खालच्या हातात मातुलुंग हे फळ आहे. डावीकडील वरच्या हातात त्रिशूल खालच्या हातात कापलेले शिर आहे. अशी अख्यायिका आहे की वादविवादामुळे संतप्त झालेल्या शंकराने ब्रह्मदेवाचे पाचवे शिर कापले होते आणि नंतर ते त्याच्याच हाताला चिकटून राहिले. पुढे १२ वर्षे भ्रमंती केल्यावर वाराणसी क्षेत्री ते गळून पडले. या अख्यायिकेनुसार मूर्तीच्या डाव्या हातात कापलेले शिर दिसत आहे. शंकराच्या दंडामध्ये नागबंध कोरलेला दिसतो. पायाशी हातात पुष्पहार घेतलेले सेवक, तर त्यांच्या मागे चवरी ढाळणारे सेवक आहेत. उजव्या बाजूला असलेल्या सेवकाच्या मागे नंदी आहे.

ब्रह्माविष्णूमहेशाच्या मूर्ती वैशिष्ट्यपूर्ण असून त्या एकाच कलाकाराने कोरलेल्या दिसतात. या मूर्तींवर असणारे अलंकार, आयुधे एकसारखीच कोरलेली दिसतात. तिन्ही मूर्तींच्या चेहऱ्यावरील भावसुद्धा सात्विक भासतात. असे सांगितले जाते की तीनशे ते चारशे वर्षे प्राचीन असलेल्या या तीनही मूर्ती काशीहून आणलेल्या आहेत. मंदिराच्या आवारात महालक्ष्मी, क्षेत्रपाळ आणि गरुडाचे मंदिर आहे. मंदिरासमोरून नदीकडून जाणारी एक वाट आहे. या वाटेवर मोठ्या चिऱ्यांचा तलाव आहे. त्यात गोमुखातून पाणी पडत असते. असे सांगितले जाते की गोमुखातून येणारे पाणी हरिहरेश्वर मूर्तीच्या खालून येते. हरिहरेश्वरच्या आरतीतही तसा उल्लेख आहे.

हरिहरेश्वर मंदिर प्राचीन असले तरी येथे होणाऱ्या कार्तिकोत्सवाला १३५ वर्षांची परंपरा आहे. कार्तिक शुद्ध दशमीपासून कार्तिक वद्य प्रतिपदेपर्यंत हा उत्सव चालतो. यामध्ये दररोज इतर ठिकाणी कुठेही नसलेल्या टिपऱ्या आणि तलवारी (पट्टे) फिरविल्या जातात. सफाईदारपणे फिरविल्या जाणाऱ्या तलवारी येथील आकर्षण आहे. दशमीला सर्व देवांना पोषाख घालून सजविले जाते. उत्सवासाठी हजारो भाविक उपस्थित असतात. नोकरीव्यवसायानिमित्त बाहेरगावी गेलेले ग्रामस्थ, तसेच माहेरकरणीही आवर्जून उत्सवासाठी येतात.

उपयुक्त माहिती:

  • रत्नागिरीपासून १३ किमी अंतरावर
  • पावस रत्नागिरी येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या पाखाडीपर्यंत जातात
  • मंदिर परिसरात निवास न्याहरीची सुविधा नाही
Back To Home