स्वामी विवेकानंद यांच्या ओजस्वी विचारांचा ग्रामीण भागात प्रचार व प्रसार करण्यासाठी स्थापन करण्यात आलेला विवेकानंद आश्रम मेहकर तालुक्यातील हिवरा (बुद्रुक) येथील विवेकानंद नगर येथे आहे. येथील संत शुकदास महाराज यांनी १९६५ मध्ये हा आश्रम स्थापन केला. मराठवाडा व विदर्भाच्या सीमेवर वसलेल्या या आश्रमात विवेकानंद जयंतीनिमित्त पौष वद्य पंचमीपासून सुरू होणारा तीन दिवसीय महोत्सव विशेष प्रसिद्ध आहे. या उत्सवाच्या अखेरच्या दिवशी आश्रमाच्या परिसरातील ४० एकर जागेत होणाऱ्या महापंगतीत हजारो भाविक महाप्रसादाचा लाभ घेतात.
या आश्रमाजवळच असलेल्या हरिहर तीर्थाला सातशे वर्षांहून अधिक प्राचीन इतिहास आहे. हे तीर्थ तसेच नजीकच्या कोराडी जलप्रकल्पाजवळील बेटावर सहा एकर क्षेत्रफळात उभारण्यात आलेले स्वामी विवेकानंद यांचे भव्य स्मारक पर्यटकांच्या आकर्षणाची केंद्रे आहेत. दरवर्षी असंख्य भाविक व पर्यटक येथे भेट देतात. हा आश्रम स्थापन करणारे शुकदास महाराज यांची निष्काम कर्मयोगी अशी ओळख होती. २४ नोव्हेंबर १९४३ रोजी, कार्तिक वद्य त्रयोदशीला हिवरा (बुद्रुक) येथे त्यांचा जन्म झाला. स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचा पगडा त्यांच्यावर होता. स्वामी विवेकानंद यांना त्यांनी गुरू मानले होते. वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांनी आपले धार्मिक अनुभव मांडणारा ‘अनुभूती’ हा ग्रंथ लिहिला.
स्वामी विवेकानंद यांच्या विचारांना सैद्धांतिक व वैचारिकदृष्ट्या मर्यादित न ठेवता शुकदास महाराजांनी ते विचार क्रियाशीलतेच्या व मानवकल्याणाच्या व्यावहारिक पातळीवर आणले. प्रत्येक मानवात ईश्वर असल्याच्या भावनेतून त्यांनी सामाजिक कार्याला सुरुवात केली. औषधोपचारांची त्यांना विशेष जाण होती. अनेक रुग्ण त्यांच्याकडे उपचारासाठी येत. त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल विविध संस्थांनी त्यांना गौरवले होते. राज्य सरकारनेही ‘दलितमित्र पुरस्कार’ देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला होता.
स्वामी विवेकानंद यांच्या स्मरणार्थ त्यांनी गावात १४ जानेवारी १९६५ रोजी या आश्रमाची स्थापना केली. हिवरा गावाला वळसा घालून जाणारी कोराडी नदी व काही अंतरावरून वाहणाऱ्या पैनगंगा नदीमुळे हा परिसर हिरवाईने नटलेला असतो. एक एकर २८ गुंठे जागेत आश्रमाची इमारत उभी आहे. येथेच मूळ जागेतून १९७२ मध्ये या आश्रमाचे स्थलांतर करण्यात आले. या आश्रमात स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचे आचरण केले जाते. त्याला अनुसरून भारतीय संस्कृतीशी निगडित अनेकविध धार्मिक, सामाजिक तसेच शैक्षणिक कार्यक्रम येथे राबवले जातात.
समाजसेवेचा वसा घेतलेल्या या आश्रमात विविध सामाजिक कामांद्वारे मानवसेवा केली जाते. येथे आरोग्य सेवेला विशेष महत्त्व देण्यात येते. या आश्रमाच्या उत्तर दिशेला सुमारे सातशे वर्षे प्राचीन असलेले हरिहर तीर्थ आहे. मध्यंतरीच्या काळात या तीर्थक्षेत्राला अवकळा प्राप्त झाली होती. शुकदास महाराजांनी या क्षेत्राचे गतवैभव पुन्हा प्रस्थापित केले. राज्य सरकारने या क्षेत्राला ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्राचा तसेच ‘क’ वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा दिलेला आहे.
आश्रमाच्या शिक्षण संकुलातून जाणारा डांबरी रस्ता थेट हरिहर तीर्थाच्या महाद्वारासमोर जातो. मुंबईतील महालक्ष्मी देवस्थानने हरिहर तीर्थाचे ४५ फूट लांब, २० फूट रुंद व ३५ फूट उंच असलेले महाद्वार बांधून दिले आहे. या महाद्वाराच्या दोन्ही बाजूंकडील देवकोष्ठकांमध्ये संत तुकाराम व संत ज्ञानेश्वर यांच्या मूर्ती आहेत. वरच्या बाजूला शिवशंकर व माता पार्वती यांच्या मूर्ती आहेत. महाद्वारातून आत पेव्हरब्लॉकची फरसबंदी असलेली मार्गिका आहे. परिसरात नयनरम्य वाटिका आहे. अंदाजे दोन एकर परिसरात असलेल्या या वाटिकेमध्ये फुलांची व शोभेची झाडे,
कारंजे, लहान मुलांसाठी खेळण्याची साधने, छोटा भीम, डोरेमॉन आदींचे पुतळे आहेत. या परिसरात श्रीहर (शिवमंदिर) तसेच श्रीहरी (बालाजी) मंदिरे आहेत. श्रीहर मंदिराच्या तटबंदीतील पायऱ्या चढल्यावर तेथील गंगेची मूर्ती, गोमुख, त्यातून अविरत प्रवाहित होणारी पावनधारा व प्रशस्त गंगाकुंड नजरेस पडते. बाजुने असलेल्या पायऱ्या उतरून कुंडात उतरता येते. गोमुखाच्या वरच्या बाजूस शिवाची मूर्ती आहे. गंगाकुंडाच्या दोन्ही बाजूंना शिवलिंग व नंदी आहेत. त्यापैकी एक शिवलिंग व नंदी सातशे वर्षांहून प्राचीन आहे. या कुंडाला लागून आशुतोष शिवाचे मंदिर आहे. या मंदिरासमोर उंच शाळुंकेमध्ये शिवलिंग आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर गणेशाची उजव्या सोंडेची पाषाणी मूर्ती आहे. उंच जोत्यावर उभ्या असलेल्या या मंदिरात सहा फूट उंच शिवशंकरांची ताम्रधातूची उभी मूर्ती आहे. या मूर्तीने व्याघ्रांबर नेसलेले आहे. मूर्तीसमोर ताम्रधातूमध्ये घडवलेली नंदीची मूर्ती आहे. या मंदिरात आदिवासी जमातीचे पुजारी सेवा करतात. सुबक बांधणी असलेल्या या मंदिराची उंची ५१ फूट आहे. मंदिर परिसरात दत्तात्रय, दुर्गामाता तसेच विठ्ठल-रखुमाईंच्या मूर्ती आहेत. सोमवार, अमावस्या व पर्वणी आदी प्रसंगी येथे स्नानासाठी व देवदर्शनासाठी भाविकांची रीघ लागते.
या मंदिरासमोरच बालाजी मंदिर आहे. काही पायऱ्या चढून आल्यावर मंदिरासमोर नक्षीदार व रेखीव कलाकुसर असलेल्या भव्य सभामंडपात प्रवेश होतो. येथील भिंतींवर विविध पौराणिक प्रसंग कोरलेले आहेत. या मंदिरातील गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या वरच्या बाजूस निद्रा घेणाऱ्या गणेशाचे शिल्प आहे. वरच्या बाजूला शेषशायी विष्णू व लक्ष्मीच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना कीर्तिमुख कोरलेली आहेत. ८१ फूट उंच असलेल्या या मंदिराच्या गर्भगृहात बालाजींची १२ फूट उंच मूर्ती आहे. या मूर्तीच्या प्रभावळीवर दशावतार कोरलेले आहेत. येथे दररोज आरती व विधिवत पूजा-अर्चा केली जाते. भाविकांना दही-भात, सुकामेवा व लाडूचा प्रसाद दिला जातो. समोरच असलेल्या मंदिरात श्रीकृष्णाची मूर्ती विराजमान आहे.
येथून काही अंतरावर शुकदास महाराजांचे समाधी मंदिर आहे. शुकदास महाराजांनी ४ एप्रिल २०१७ रोजी, रामनवमीच्या दिवशी येथे समाधी घेतली. अलीकडेच येथे समाधी मंदिर बांधण्यात आले. मंदिरासमोरील चौथऱ्यावर स्वामी विवेकानंद, संत ज्ञानेश्वर, गौतम बुद्ध, महात्मा बसवेश्वर आणि भगवान महावीर
यांच्या ध्यानस्थ मूर्ती आहेत. गर्भगृहात शुकदास महाराजांची संगमरवरी मूर्ती असून समोर पादुका आहेत.
या आश्रमातर्फे दरवर्षी विवेकानंद जयंतीचा उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. पौष वद्य पंचमी ते सप्तमी असे तीन दिवस ज्ञानयज्ञ व अन्नदानाने हा महोत्सव पार पडतो. पौष वद्य पंचमीला स्वामी विवेकानंद आणि शुकदास महाराजांच्या रथारुढ प्रतिमेच्या मिरवणुकीने या महोत्सवाला सुरुवात होते. या मिरवणुकीत शेकडो भजनी दिंड्या, व्यायामशाळा पथके, लेझीम व ढोलताशा पथके सहभागी होतात. हरिहर तीर्थापासून सुरू होणारी ही शोभायात्रा विवेकानंद नगराची परिक्रमा करत गावातील हनुमान मंदिराजवळ विसावते. ग्रामस्थ जागोजागी गुलाल, फुलांची उधळण करतात. अनेक सुवासिनी रथांचे पूजन करतात. या उत्सवानिमित्त सायंकाळी दहीहंडी फोडण्यात येते. त्यानंतर एका व्यासपीठावर ज्ञानयज्ञ (वैचारिक सत्र) सुरू होतो. देशभरातील नामवंत व्याख्याते, गायक, प्रवचनकार, लोककलाकार या ज्ञानयज्ञात सहभागी होतात. सर्व धर्मांच्या प्रतिनिधींनाही धर्मविषयक विचार मांडण्यासाठी व्यासपीठावर संधी दिली जाते.
पौष वद्य सप्तमीच्या दिवशी, विवेकानंद जयंतीदिनी आश्रमाजवळील ४० एकर जागेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते. दुपारी ४ वाजेपर्यंत हा परिसर महापंगतीत बसलेल्या हजारो भाविकांनी फुलून जातो. पौष वद्य षष्ठीच्या सूर्योदयापूर्वीच महाप्रसादाच्या पाकसिद्धीला सुरुवात केली जाते. सुमारे दोनशे क्विंटल गव्हाच्या पिठाच्या पुऱ्या आणि दीडशे क्विंटल वांग्याच्या भाजीचा हा महाप्रसाद १८ तासांमध्ये तयार केला जातो. पौष वद्य सप्तमीच्या दिवशी महाप्रसादाने भरलेली ट्रॅक्टर्स व मेटॅडोर्ससारखी वाहने मिरवणुकीने वाजतगाजत महापंगतीच्या स्थळी येतात. मान्यवरांच्या हस्ते महाप्रसादाचे वितरण करण्यात येते. सुमारे सातशे ते आठशे स्वयंसेवक अवघ्या काही मिनिटांमध्ये उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप करतात. सुयोग्य नियोजन, भाविकांकडून पाळली जाणारी शिस्त आणि प्रशासनाचे सहकार्य हे या महापंगतीचे वैशिष्ट्य असते. याशिवाय येथे व्यासपौर्णिमा, श्रीकृष्ण जयंती, गोपालकाला, शुकदास महाराजांची जयंती आदी सण, उत्सवही साजरे केले जातात. रामनवमीच्या दिवशी शुकदास महाराजांचा संजीवन समाधी सोहळा पार पडतो.
आश्रमाच्या दक्षिण दिशेला एक किमी अंतरावर कोराडी प्रकल्पाच्या जलाशयाजवळील बेटावर विवेकानंद स्मारक आहे. बोटीने या बेटावर जावे लागते. १९८० मध्ये या स्मारकाचे काम सुरू झाले. सहा एकर जागेत असलेल्या या स्मारक परिसरातील उद्यानात नारळ व पामची सुमारे पाचशे झाडे आहेत. येथेही छोटा भीम, डोरेमॉन आदींचे पुतळे आहेत. या बेटावर उंच चबुतऱ्यावर स्वामी विवेकानंद यांचा २० फूट उंचीचा पूर्णाकृती पुतळा आहे. १९ जानेवारी २०१७ रोजी या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. विवेकानंद आश्रमाला भेट देणारे भाविक व पर्यटक येथेही आवर्जून येतात.