हनुमान मंदिर

पेंडगाव, ता. जि. बीड

रामभक्त म्हणून हनुमानाची सर्वदूर ओळख आहे. निःस्वार्थ भक्ती, पराक्रम व शक्ती म्हणजे हनुमान होय. आकाशमार्गे उड्डाण करणारा मारुती राईएवढा लहान आणि पर्वताएवढा मोठा होऊ शकतो. श्रीरामांना युद्धात मदत करणारा, सीतेला शोधून काढणारा आणि संजीवनी औषधी आणून लक्ष्मणाचे प्राण वाचवणारा हनुमान आपल्या भक्तांना सर्व संकटातून तारून नेतो. हनुमानाची उपासना करणाऱ्या भक्तांच्या वाट्याला साडेसाती येत नाही, अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे देशात गावोगावी मारुतीची मंदिरे आहेत. बीड तालुक्यातील पेंडगाव येथील दोन मूर्ती असलेले मारुती मंदिर विशेष प्रसिद्ध आहे. येथील हनुमान परिसरात ‘बडा हनुमान’ म्हणून प्रख्यात आहे.

हे मंदिर सोळाव्या शतकातील असल्याचे येथील ग्रामस्थ सांगतात. मंदिराचे मूळ दगडी बांधकाम हेमाडपंती शैलीचे होते. परंतु कालौघात ते जीर्ण झाल्याने मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे. या मंदिराबाबत आख्यायिका अशी की येथील मूळ मूर्ती फार प्राचीन आहे. पूर्वी या मूर्तीच्या अभिषेकासाठी गावातील तरुण चैत्र पौर्णिमेला काशीहून गंगा आणत असत. शेकडो वर्षांपूर्वी गावातील तरुण गंगेचे पाणी आणण्यासाठी काशीला गेले असता, गंगेच्या किनाऱ्यावर असलेल्या हनुमान मंदिरातील स्वयं हनुमान, त्या तरुणांसोबत खरेच हे अभिषेकासाठी गंगा नेत आहेत का, हे पाहण्यासाठी गावात आला असे मानले जाते. ग्रामस्थांची निस्सीम भक्ती पाहून, तो येथील मूळ मूर्तीशेजारी स्थापित झाला. तेव्हापासून मंदिरात मारुतीच्या दोन मूर्ती आहेत.

हे मंदिर सोलापूर-औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गाला लागून आहे. मुख्य रस्त्याला लागून मंदिराची स्वागत कमान आहे. दोन्ही बाजूला दोन चौकोनी स्तंभ व त्यावर सज्जा असे स्वागत कमानीचे स्वरूप आहे. मंदिराच्या डाव्या बाजूला तटबंदीला लागून प्रशस्त वाहनतळ आहे. मंदिरास बाशिंगी कठडा व त्यावर स्टेनलेस स्टीलच्या जाळ्या असलेली भक्कम तटबंदी आहे. तटबंदीत दोन्ही बाजूच्या स्तंभांवर गजपृष्ठ आकाराचे छत असलेले प्रवेशद्वार आहे. मंदिराचे प्रशस्त प्रांगण पेव्हर ब्लॉकने आच्छादित आहे आणि प्रांगणात मंदिरासमोर औदुंबर वृक्ष आहे.

सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. सभामंडप अर्धखुल्या स्वरूपाचा आहे. या सभामंडपात आठ नक्षीदार गोलाकार स्तंभ आहेत. सभामंडपात स्टेनलेस स्टीलचे सुरक्षा कठडे लावून दर्शनरांगांचे व्यवस्थापन केले आहे. सभामंडपाला लागून उजव्या बाजूला दर्शनमंडप आहे. उत्सवांच्या वेळी दर्शनरांगांचे व्यवस्थापन दर्शनमंडपातून केले जाते, तर इतर वेळी सभामंडपातून प्रवेश दिला जातो. सभामंडपाच्या पुढे काही इंच उंच व सुमारे दहा फूट रुंदीचा चौथरा आहे. या चौथऱ्याच्या सभोवती स्टेनलेस स्टीलचे सुरक्षा कठडे लावलेले आहेत. हे मंदिराचे अंतराळ आहे.

येथून पुढे गर्भगृहाचे प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वाराच्या लाकडी द्वारशाखांवर पानाफुलांची नक्षी आहे, तसेच लाकडी झडपांना स्टेनलेस स्टीलच्या नळ्या आहेत. प्रवेशद्वाराच्या वर लाकडी नक्षीदार तोरण आहे. गर्भगृहात जमिनीवर हनुमानाच्या संगमरवरी पादुका आहेत. या पादुकांच्या चारही बाजूंना शुभचिन्हे कोरलेली आहेत. गर्भगृहात वज्रपीठावर मारुतीच्या दोन पाषाण मूर्ती आहेत. यातील एक गावातील मूळ मूर्ती आहे, तर दुसरी मूर्ती काशीहून आलेल्या मारुतीची असल्याचे सांगितले जाते. मूर्तींना शेंदूरलेपन केले आहे आणि मुख, नेत्र, नासिका चांदीच्या आहेत. मूर्तींच्या बाजूला पितळी गदा व मागे चांदीची प्रभावळ आहे. प्रभावळीत पर्णलता, पुष्पलता, सूर्य, स्वस्तिक, ओम आदी शुभचिन्हे कोरलेली आहेत. मूर्तींच्या तीन बाजूंनी छतविरहित अर्धमखराची रचना आहे. देवाच्या डोक्यावरील पितळी छत्र मखराला लावलेले आहे. वज्रपीठाच्या सभोवती स्टेनलेस स्टीलचा सुरक्षा कठडा आहे, त्याच्या बाजूने देवाला प्रदक्षिणा घातली जाते.

गर्भगृहाच्या बाह्य बाजूने प्रदक्षिणा मार्ग आहे. प्रदक्षिणा मार्गावर स्थानिक देवतेची शेंदूरचर्चित प्राचीन पाषाण मूर्ती आहे. तसेच गर्भगृहाच्या मागील बाजूला उजव्या कोपऱ्यात जमिनीवर शिवपिंडी व नंदी आहेत. शिवपिंडीवर छत्र धरलेला पितळी नाग आहे आणि जलधारा धरलेले तांब्याचे अभिषेकपात्र छताला टांगलेले आहे. गर्भगृहाच्या छतावर तीन थरांचे अष्टकोनी शिखर आहे. यातील प्रत्येक थरात आठ देवकोष्ठके आहेत. सर्व देवकोष्ठकांत विविध देवतांच्या मूर्ती आहेत. पहिल्या थरात प्रत्येक दोन देवकोष्ठकांच्या मध्ये गजराज शिल्पे आहेत, तर दुसऱ्या थरात व्याघ्र व तिसऱ्या थरात कुंभ शिल्पे आहेत. शिखराच्या शीर्षभागी एकावर एक असे दोन आमलक व त्यावर कळस आहे.

चैत्र पौर्णिमा अर्थात हनुमान जयंती हा येथील मुख्य वार्षिक उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या दिवशी मारुतीच्या अभिषेकासाठी काशीहून आणलेल्या गंगेचे पाणी वापरले जाते. त्यासाठी गावातील तरुण घागरी घेऊन चैत्र पाडव्याला काशीकडे प्रयाण करतात. शेकडो वर्षांपासून ही परंपरा चालत आली असल्याचे येथील ग्रामस्थ सांगतात. हनुमान जयंतीच्या दिवशी परिसरातील हजारो भाविक देवाच्या दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी येतात. यावेळी मंदिरात महाअभिषेक, भजन, कीर्तन, प्रवचन, जागरण, संगीत आदी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. मंदिरास रोषणाई करून सजावट केली जाते. भाविकांसाठी दिवसभर महाप्रसादाचे वाटप केले जाते. या हनुमानाला महाप्रसादाचा नवस बोलण्याची प्रथा असल्याने, दर शनिवारी अनेक भाविकांतर्फे महाप्रसादाचे आयोजन केले जाते. दर शनिवारी हजारो भाविक देवाच्या दर्शनासाठी येतात. मंदिरात चैत्र पाडवा, रामनवमी, दसरा, दिवाळी आदी सण व उत्सव साजरे केले जातात.

उपयुक्त माहिती:

  • बीडपासून १० किमी अंतरावर
  • राज्यातील अनेक शहरांतून बीडसाठी एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहारीची सुविधा
  • संपर्क : मंदिर कार्यालय, मो. ९५०३७५७२७१

हनुमान मंदिर

पेंडगांव, जिला. बीड

Back To Home