मुंबईतील शीख समाजाच्या इतिहासात सायन-कोळीवाडा परिसरातील गुरु तेग बहादूर नगर (जीटीबी) हा भाग विशेष महत्त्वाचा ठरतो. फाळणीनंतर मुंबईत स्थायिक झालेल्या पंजाबी आणि शीख निर्वासितांच्या पुनर्वसनातून उभा राहिलेला हा परिसर आज ‘छोटा पंजाब’ म्हणून ओळखला जातो. याच परिसरात गुरुद्वारा श्री दशमेश दरबार स्थित आहे. याची गणना मुंबईतील प्रमुख गुरुद्वारांमध्ये केली जाते. गुरु ग्रंथ साहिबची पवित्र प्रत ठेवलेल्या वास्तूला गुरुद्वारा म्हटले जाते. शीख समाजाचे हे केवळ प्रार्थनागृह नाही, तर समाजाच्या शिक्षण, आरोग्य आणि सांस्कृतिक-सामाजिक उपक्रमांचे एक महत्त्वाचे केंद्र म्हणून कार्यरत आहे.
मुंबईच्या शीव आणि वडाळा या उपनगरांच्या सीमेवर वसलेले गुरु तेग बहादूर नगर हा भाग पूर्वी कोळीवाडा होता. सन १९४७ च्या फाळणीनंतर सध्याच्या पाकिस्तानातून रावळपिंडी, पेशावर, लाहोर, मुलतान आणि वायव्य सीमा प्रांतातून असंख्य शीख आणि हिंदू बांधवांना भारतात स्थलांतरित व्हावे लागले. सिंध प्रांतातून आलेल्या अनेक सिंधी निर्वासितांच्या छावण्या कल्याणनजीक उल्हासनगर येथे वसवण्यात आल्या.
तसेच, शीख आणि पंजाबी बांधवांसाठी शीव-कोळीवाडा परिसरात पुनर्वसन करण्यात आले. सुरुवातीला तत्कालीन सरकारने येथील लष्कराच्या जुन्या बराकींमध्ये या विस्थापित नागरिकांची तात्पुरती निवासव्यवस्था केली होती. त्या व्यवस्थेला सैनिकी छावणी वा ‘कोळीवाडा कँप’ असे म्हटले जाई. कालांतराने येथे पुनर्वसन वसाहती स्थापन करण्यात आल्या. पुढे या भागाला शिखांचे नववे गुरु तेग बहादूर यांच्या स्मरणार्थ त्यांचे नाव देण्यात आले.
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत, ‘चढदी कला’ म्हणजे कठीण परिस्थितीतही उच्च मनोबल, सकारात्मक आणि आनंदी वृत्तीने राहण्याची प्रवृत्ती, या उपजत गुणाच्या जोरावर शीख समुदायाने मुंबईच्या मातीशी स्वतःची नाळ जोडून घेतली. “नाम जपो, कीरत करो और वंड छको” म्हणजे प्रभूनामाचे स्मरण करा, प्रामाणिकपणे मेहनत करा आणि जे काही आहे ते एकमेकांत वाटून खा, हा गुरु नानकदेवांचा उपदेश आहे. यास अनुसरून शीख धर्मात ‘संगत’ म्हणजे देवाच्या चरणी एकत्र आलेला लोकसमुदाय आणि ‘पंगत’ म्हणजे जात, पात, धर्म बाजूला ठेवून एकत्र बसून जेवणे, या संकल्पनांना सर्वोच्च स्थान दिलेले आहे. त्याकरिता १९४७-४८ च्या सुमारास स्थानिक शिखांनी एकत्र येऊन येथे एका छोट्या पत्र्याच्या शेडमध्ये गुरु ग्रंथ साहिबची स्थापना केली आणि नामस्मरणाला सुरुवात केली.
हाच या गुरुद्वाराचा उगम होय. पुढे जसाजसा समुदाय आर्थिकदृष्ट्या स्थिरावला, तशी या धार्मिक स्थळाच्या विस्ताराची गरज भासू लागली. त्यातूनच ६ जानेवारी १९६८ रोजी, गुरु गोविंद सिंग जयंतीच्या दिवशी, प्रसिद्ध शीख संत बाबा जीवनसिंह कारसेवावाले यांच्या हस्ते या गुरुद्वाराची पायाभरणी करण्यात आली. या गुरुद्वाराचे नामकरण ‘गुरुद्वारा श्री दशमेश दरबार’ असे करण्यात आले. ‘दशमेश’ म्हणजे ‘दहावे पादशाह’ ही गुरु गोविंद सिंग यांची उपाधी आहे.
गुरु गोविंद सिंग हे शिखांचे दहावे व अखेरचे गुरु होत. शिखांचे नववे गुरु तेग बहादूर हे त्यांच्या पित्याचे, तर गुजरी हे आईचे नाव. गुरु तेग बहादूर यांच्या हत्येनंतर (इ.स. १६७५) वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी गुरु गोविंद सिंग गादीवर आले. आपल्या प्रभावी नेतृत्वाने त्यांनी शीख समाज सुसंघटित केला व शिखांमध्ये राजकीय जागृती निर्माण केली. ‘खंडे दा अमृत’ नावाचा दीक्षाविधीही त्यांनी सुरू केला. भाई दयासिंग, भाई धरमसिंग, भाई मोहकमसिंग, भाई साहिबसिंग आणि भाई हिंमतसिंग यांनी प्रथम दीक्षा घेतली. त्यांना ‘पंच प्यारे’ असे म्हणतात. यानंतर त्यांच्याकडून, म्हणजेच आपल्या शिष्यांकडून, स्वतः गुरु गोविंद सिंग यांनी दीक्षा घेतली.
ही न भूतो न भविष्यति अशी गोष्ट मानली जाते. या दीक्षेनंतर त्यांचे अनुयायी आपल्या नावापुढे ‘सिंग’ ही उपाधी लावू लागले, तसेच ‘पंच ककार’ म्हणजे केस, कंगवा, कच्छ, कडे आणि कृपाण धारण करू लागले. त्यांच्या अनुयायांना ‘खालसा’ म्हणजेच अत्यंत शुद्ध आणि पवित्र म्हणून संबोधले जाते. गुरु गोविंद सिंग हे खालसा पंथाचे संस्थापक होत. त्यांनी आपल्या अनुयायांना लष्करी शिक्षण देऊन त्यांची एक शिस्तबद्ध फौज तयार केली. “वाहे गुरु जी का खालसा, वाहे गुरु जी की फतेह” हा जयघोष त्यांनी दिला. औरंगजेबाविरुद्धच्या अनेक लढायांत गुरु गोविंद सिंग यांच्या अनुयायांनी विजय मिळविले. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर त्यांच्या मुलांत दिल्लीच्या तख्ताबद्दल चाललेल्या तंट्यात गुरु गोविंद सिंगांनी औरंगजेबाचा ज्येष्ठ पुत्र बहादुरशाह याची बाजू उचलून धरली व त्यास तख्तावर येण्यास मदत केली. त्यामुळे बहादुरशाहाने गुरु गोविंद सिंगांचा मोठा सन्मान केला.
गुरु गोविंद सिंग यांचे एक महत्त्वाचे कार्य म्हणजे, त्यांनी इ.स. १७०८ मध्ये आपल्यानंतर कोणतीही व्यक्ती गुरु होणार नाही, तर ‘गुरु ग्रंथ साहिब’ हेच आपले अंतिम गुरु असतील, अशी घोषणा करून शीख धर्मातील देहधारी गुरूंची परंपरा समाप्त केली.
एकूण १,४३० पानांचा, ५,८९४ शबद (धार्मिक पदांचा), गुरुमुखी लिपीतील गुरु ग्रंथ साहिब हा शिखांचा पवित्र धर्मग्रंथ आहे. ‘इक ओंकार’ हा गुरु ग्रंथ साहिबमधील पहिला शब्द आहे. त्याला मूलमंत्र असे म्हटले जाते. या ग्रंथामध्ये गुरु नानक यांच्यासह शिखांचे सहा गुरु, त्याचप्रमाणे ‘इक ओंकार’ म्हणजे ईश्वर एक आहे असे मानणाऱ्या १५ हिंदू-मुस्लिम संतांच्या आणि १४ कवींच्या उपदेशवचनांचा (बानी) समावेश आहे. यामध्ये संत कबीर, रविदास, बाबा फरीद यांच्याप्रमाणेच संत नामदेव यांच्या वचनांचाही समावेश आहे. शिखांचे पाचवे गुरु अर्जुनदेव यांनी इ.स. १६०४ मध्ये या धर्मग्रंथाचे संकलन व संपादन केले.
पंजाबात उदयास आलेल्या शीख धर्माचा आणि महाराष्ट्राचा अत्यंत जवळचा भावनिक संबंध आहे. संत नामदेवांच्या ६१ पदांचा गुरु ग्रंथ साहिबमध्ये समावेश आहे. याचप्रमाणे शिखांच्या पाच सर्वांत पवित्र तख्तांमध्ये नांदेड येथील गुरुद्वारा समाविष्ट आहे. अकाल तख्त (अमृतसर), तख्त श्री हरिमंदिर साहिब (पटणा साहेब), तख्त श्री केशगढ साहिब (आनंदपूर), तख्त श्री दमदमा साहिब (तळवंडी) आणि तख्त सचखंड श्री हजूर साहिब (नांदेड) ही ती पाच तख्ते होत. नांदेड येथेच गुरु गोविंद सिंग यांनी आपल्या अनुयायांना गुरु ग्रंथ साहिबचे पालन करण्याचा आदेश दिला व गुरु ग्रंथ साहिबला गुरुपदी (गुरु गादी) विराजमान केले.
येथेच ७ ऑक्टोबर १७०८ रोजी त्यांचे परलोकगमन झाले. जीटीबी नगर येथील गुरुद्वारा श्री दशमेश दरबार गुरु गोविंद सिंग यांच्या पवित्र स्मृतींना समर्पित आहे.
आधुनिकता आणि पारंपरिक शीख स्थापत्यकलेचे एक उत्कृष्ट उदाहरण असलेल्या या भव्य गुरुद्वाराच्या वास्तूवर ‘हरिमंदिर साहिब तख्त’च्या स्थापत्यशैलीचा प्रभाव आहे. गुरुद्वारासमोर भाविकांच्या सोयीसाठी पत्र्याची मोठी शेड बांधलेली आहे. समोरच उंच अधिष्ठानावर गुरुद्वाराची पांढऱ्याशुभ्र संगमरवरी पाषाणात बांधलेली भव्य दुमजली वास्तू उभी आहे. त्यावर घुमट आणि लहान छत्र्या आहेत. मुख्य घुमटावर सोन्याचा मुलामा दिलेला कलश आहे. एकूण २६ पायऱ्या चढून गुरुद्वाराच्या मुख्य सभागृहात, म्हणजेच ‘दरबार साहिब’मध्ये प्रवेश होतो. येथे डावीकडे अत्यंत उंच असे ‘निशान साहिब’ (पवित्र त्रिकोणी ध्वज) फडकत आहे. या गुरुद्वाराचा ‘दरबार साहिब’ अत्यंत प्रशस्त आणि भव्य आहे. त्यात वरच्या बाजूस काचा लावलेल्या आहेत. भिंतींवर आणि छतावर ‘मीनाकारी’ केलेली आहे. संगतीसाठी आलेल्या भक्तांना बसण्यासाठी ‘दरबार साहिब’च्या जमिनीवर गालिचा अंथरलेला आहे. समोरच सोनेरी नक्षीदार पत्रा जडवलेली घुमटाकार ‘पालखी साहिब’ आहे.
त्यास तख्त असेही म्हटले जाते. त्यात ‘मंजी साहिब’ म्हणजे मलमली बिछाना आहे. त्यावर ‘रुमाला साहिब’ म्हणजे नक्षीदार रेशमी वस्त्राने झाकलेला पवित्र गुरु ग्रंथ साहिब विराजमान आहे. ‘पालखी साहिब’च्या मागे वरच्या बाजूस असलेल्या भिंतीवर अमृतसरच्या सुवर्णमंदिराची भव्य प्रतिमा लावलेली आहे. ‘पालखी साहिब’च्या डाव्या बाजूला छोटा मंच आहे. तेथे रोज ‘कीर्तन’ (गुरुबाणीचे गायन) आणि ‘कथा’ चालते. त्याच्या श्रवणासाठी केवळ जीटीबी नगरमधीलच नव्हे, तर मुंबईच्या विविध भागांतून भाविक येथे येतात.
इमारतीच्या खालच्या मजल्यांवर लंगर हॉल, कार्यालय, वर्गखोल्या, ग्रंथालय आणि सामाजिक उपक्रमांसाठीचा सभामंडप आहे. लंगर मंडप हा गुरुद्वाराचा अत्यंत महत्त्वाचा भाग मानला जातो. “वंड छको” म्हणजेच जे काही आहे ते एकमेकांत वाटून खा, या गुरु नानकदेवांच्या उपदेशानुसार शीख धर्मीय लंगरचा, म्हणजे मोफत सामुदायिक भोजनाचा उपक्रम निष्ठेने चालवतात. जात, धर्म, भाषा, आर्थिक स्थिती असा कोणताही भेदभाव न करता येथे येणाऱ्या प्रत्येकास भोजन दिले जाते. येथील स्वयंपाकघरात अन्न शिजवण्यापासून ते भांडी घासण्यापर्यंतची सर्व कामे भाविक स्वतःहून सेवा म्हणून करतात.
या गुरुद्वारात पहाटे ४ ते रात्री ९:३० वाजेपर्यंत सर्वधर्मीय भाविक दर्शनाचा लाभ घेऊ शकतात. गुरुद्वाराची दिनचर्या रोज ‘अमृत समयी’ (पहाटे साधारण ३:३० ते ४:०० वाजता) सुरू होते. या वेळी गुरुग्रंथ साहिब सुखासनातून आणून तख्तावर औपचारिक मांडणी करण्याचा ‘प्रकाश’ नामक विधी केला जातो. यानंतर सकाळी ८ वाजेपर्यंत ‘नितनेम’ (सकाळच्या जपुजी साहिब आणि जाप साहिब आदी दैनंदिन प्रार्थना आणि ‘आसा दी वार’चे कीर्तन होते). येथे दुपारी आणि संध्याकाळी पुन्हा प्रार्थना आणि कीर्तन केले जाते. रात्री ८:३० ते ९ च्या दरम्यान ‘रहरास साहिब’ (संध्याकाळची प्रार्थना) झाल्यानंतर ‘सुखासन’ (गुरुग्रंथ साहिब आदराने विश्रामगृहात नेण्याचा विधी) केला जातो.
वर्षभर विविध धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक उत्सव अत्यंत उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने येथे साजरे केले जातात. ‘गुरुपूरब’ हा यातील सर्वांत महत्त्वाचा उत्सव होय. गुरु नानक देव आणि गुरु गोविंद सिंग यांच्या ‘प्रकाश पर्वाच्या’ (जन्मोत्सव) निमित्ताने येथे पवित्र ग्रंथासह भव्य मिरवणूक काढली जाते. त्यास ‘नगर कीर्तन’ असे म्हणतात. या मिरवणुकीत शीख तरुण ‘गटका’ (शिखांची पारंपरिक युद्धकला) सादर करतात. याशिवाय खालसा पंथाचा स्थापना दिन म्हणून येथे ‘बैसाखीचा’ सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या दिवशी संपूर्ण परिसरात विद्युत रोषणाई केली जाते.