रत्नागिरी जिल्ह्यातील पावसपासून जवळ असलेले गणेशगुळे हे गणपतीचे जागृत व स्वयंभू स्थान म्हणून प्रसिद्ध आहे. ‘गुळ्याचा गणपती पुळ्याला गेला’ ही म्हण याच स्थानावरून पडल्याचे सांगितले जाते. समुद्रात मासेमारी करणारा कोळी समाज व समुद्रामार्गे प्रवास करणारे व्यापारी आपल्या होड्या व गलबतांचा प्रवास सुरळीत व्हावा म्हणून या गणेशाला नवस बोलत असत. येथे बोललेला नवस पूर्ण होतो, अशी अनेकांची श्रद्धा आहे. त्यामुळेच या गणेशाची ओळख ‘गलबतवाल्यांचा गणेश’ अशीही आहे.
मंदिराबाबत अख्यायिका अशी की पावस येथील रामचंद्रपंत चिपळूणकरांना पोटदुखीचा आजार होता. वैद्यांना त्यांच्या दुखण्यावर उपाय सापडत नव्हता. सततच्या वेदनांमुळे त्रस्त झालेल्या रामचंद्रपंतांनी अखेर जलसमाधी घेण्याचा निश्चय केला आणि ते गुळ्याच्या समुद्र किनाऱ्याकडे निघाले. मात्र, वेदना असह्य झाल्याने त्यांना पुढे जाता येईना म्हणून ते तेथील एका झुडपामध्ये पडून राहिले. त्या अवस्थेतही त्यांनी येथे गणेशाचे अनुष्ठान सुरू केले. २१ दिवस झाल्यानंतर गणेशाने त्यांना दृष्टांत दिला व सांगितले की तू लवकर बरा होशील. या ठिकाणी माझे वास्तव्य आहे. येथे माझे मंदिर बांध, मंदिराच्या बांधकामास सातारचे शाहू महाराज मदत करतील. रामचंद्रपंतांना झालेला साक्षात्कार आणि त्यांची पोटदुखी बरी झाल्याचे परिसरात समजल्यानंतर भाविकांची या ठिकाणी रीघ लागली. कालांतराने या गणेशाची महती सातारच्या शाहू महाराजांच्या कानावर गेल्यावर त्यांनी येथे मंदिर बांधले.
पौराणिक कथेनुसार, संकष्टनाशन स्तोत्रात गणेशाचे चौथे स्वरूप गजवक्र असे आहे. या गजवक्राने गजासुराला (हत्तीचे मुख व राक्षसाचे शरीर अशा स्वरूपात याचा जन्म झाल्याने त्याचे गजासुर हे नाव पडले) पराभूत केले होते. त्यामुळे गजासुराचा पुत्र लंबासुर संतप्त झाला व त्याने हिमालयात जाऊन महादेवाची खडतर तपश्चर्या केली. त्यावर प्रसन्न होऊन महादेवाने लंबासुराला अमर होण्याचा वर दिला. मात्र, तू जर माझ्या कुटुंबीयांना त्रास देशील तर माझ्या त्रिशुळाने तुझा नाश होईल, असेही बजावले. महादेवाकडून वर मिळाल्यावर लंबासुर उन्मत्त झाला. त्याला आता कसलीच भीती राहिली नव्हती. त्याने सर्वत्र उत्पात माजवण्यास सुरुवात केली. ऋषी–मुनींसह देवादिकांनाही त्याने त्राही त्राही करून सोडले. सर्व देवांनी गणेशाचे स्तवन करून ओंकारयज्ञ आरंभला. तेव्हा यज्ञकुंडातून श्रीगणेश प्रकट झाले. लंबासुराच्या वधासाठी अवतरलेला हाच तो लंबोदर होय. या लंबोदराने लंबासुराशी युद्ध सुरू केले, पण लंबासुराने मायावी युद्ध चालविले होते. त्याने पाश व अंकुश ही लंबोदराची शस्त्रे पळवली. ही लढाई गणपतीपुळे येथे झाली. अदृश्य लंबासुर तेथून गणेशगुळे येथे पळाला. लंबोदराने त्याला तेथेही गाठले. आता आपले काही खरे नाही, हे जाणवलेल्या लंबासुराने मध्य प्रदेशातील ओंकार–अमलेश्वरालगत नर्मदा नदीत उडी घेतली. महादेवाच्या
वरामुळे अभय मिळालेल्या लंबासुराचा वध करण्यासाठी लंबोदराने महादेवाची पूजा सुरू केली आणि त्याला प्रसन्न करून घेऊन त्याच्याकडून त्रिशूळ मिळवला. या त्रिशुळाने गणेशाने लंबासुराचा वध केला. तेव्हापासून गणपतीपुळे, गणेशगुळे व ओंकार–अमलेश्वर या जोतिर्लिंगाजवळचा पाचसोंडेचा गणेश हे लंबोदर नावाने ओळखले जाऊ लागले.
गणेशगुळे हे तीर्थक्षेत्र रत्नागिरी–पावस–पूर्णगड मार्गावर पावसपासून तीन किमी अंतरावर आहे. मुख्य रस्त्यावरून काहीशा खोलवर असलेल्या या मंदिरावरील दोन घुमटाकृती शिखर दुरूनच नजरेस पडतात. त्यापैकी एक गोलाकार, तर दुसरे अष्टकोनी आहे. कमानीपासून साधारणतः २० पायऱ्या उतरून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. डोंगरउताराच्या बाजूने चार फूट उंच चौथऱ्यावर गणेशाचे हे दक्षिणाभिमुख मंदिर आहे. मंदिर आजही चांगल्या स्थितीत असून त्याची बांधणी जांभ्या दगडात केलेली आहे. मंदिराच्या प्रांगणात संपूर्ण फरसबंदी आहे. मंदिराला केलेल्या सुंदर रंगकामामुळे ते खुलून दिसते. मुख्य प्रवेशद्वारासमोर तुलशी वृंदावन आणि हातात लाडू घेतलेल्या मूषकाची पितळी मूर्ती आहे. प्रवेशद्वाराच्या भिंतीवर १९७० मध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार झाल्याची नोंद आहे.
मंदिरात दोन गाभारे आहेत. त्यातील पहिल्या गाभाऱ्यात, दुसऱ्या गाभाऱ्याच्या प्रवेशद्वाराजवळ सुमारे अकरा फूट उंचीची शिळा आहे. त्याचीच गणेशमूर्ती म्हणून भाविक पूजा करतात. दुसरा गाभारा हा पुरातन काळापासून कायमस्वरूपी बंद आहे. मंदिरावरील दोन घुमट पाहिल्यावर याची कल्पना येते. गणेशमूर्तीच्या मागे पाहिल्यास दोन गाभाऱ्यांमधील दरवाजा आणि त्याची कमान स्पष्ट दिसते. गाभाऱ्यात असलेल्या शिळेतून (गणेशमूर्तीच्या नाभीतून) पूर्वी सतत पाणी वाहत असे. आज ते बंद असले तरी त्याच्या खुणा येथे जाणवतात. मुख्य मंदिराच्या डाव्या बाजूला सभागृह आहे. उंचावर असलेल्या मंदिराच्या समोरच्या भागात खोल दरी आणि तेथील हिरव्यागर्द वनसंपदेने नटलेला परिसर नजरेत साठवता येतो.
मंदिराजवळ जांभ्या दगडात खोदलेली, सुमारे ७० फूट खोल पायऱ्या असलेली, विहीर (स्टेपवेल) आहे. ती पांडवकालीन असल्याचे स्थानिकांकडून सांगितले जाते. विहिरीचे वैशिष्ट्य असे की यातील पाण्याचा स्तर कधीही कमी–जास्त होत नाही. पावसाळ्यातही हा स्तर कायम असतो.
मंदिरात माघी चतुर्थीला तीन दिवसांचा उत्सव साजरा होतो. यावेळी परिसरातील अनेक गावांतून टाळ–मृदुंगांच्या गजरात दिंड्या येतात. भाद्रपदातील गणेश चतुर्थीला येथील ब्राह्मण मंडळींकडून दीड दिवसांचा गणेशोत्सव साजरा केला जातो. दररोज सकाळी ६ ते रात्री ८ पर्यंत भाविकांना येथील गणेशाचे दर्शन घेता येते. गणेश मंदिराशिवाय गणेशगुळे गावात श्री आदित्यनाथ, श्री वाडेश्वर व श्री लक्ष्मीनारायण ही मंदिरे आहेत. हे गाव गणपती मंदिरांसाठी प्रसिद्ध असले तरी येथील दोन किमी लांबीचा समुद्र किनारा अनेक पर्यटकांसाठी आकर्षण आहे. माड व सुरुच्या बनांसोबतच या किनाऱ्यावर स्फटिकासारखी असलेली पांढरी वाळू हे येथील आकर्षण आहे. थंडीच्या दिवसांत या वाळूवर मोठी कासवे अंडी घालण्यासाठी येतात.