गुगुळादेवी मंदिर

गिरोली (खुर्द), ता. देऊळगाव राजा, जि. बुलडाणा

बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा शहराच्या सीमेवर वसलेल्या गिरोली (खुर्द) येथे गुगुळादेवीचे प्राचीन मंदिर आहे. हे मंदिर सातवाहन काळातील असल्याचे मानले जाते. विद्याधर नावाच्या एका भक्ताने येथे तूप आणि गुग्गुळ जाळून देवीची भक्ती केल्यामुळे या देवीचे नाव ‘गुगुळाई’ पडले. आजही मंदिरात दररोज गुग्गुळ जाळण्याची परंपरा सुरू आहे. ऐतिहासिक संदर्भानुसार, राजमाता जिजाऊंनी येथे येऊन देवीची पूजा केली होती. मंदिर परिसरात चैत्र पौर्णिमेला मोठी यात्रा भरते आणि नवरात्रोत्सवात पंधराशेहून अधिक नंदादीप अखंडपणे तेवत असतात. निसर्गरम्य परिसरात असलेले हे मंदिर विदर्भातील अनेक कुटुंबांचे कुलदैवत आहे.

या मंदिराबाबतची आख्यायिका अशी की पूर्वी सुवर्णमुखी नदीकाठी नारायणपूर गावात विद्याधर नावाचा एक ब्राह्मण राहत होता. लहानपणीच माता-पित्यांचे छत्र हरपल्यामुळे आणि अल्प बुद्धीमुळे त्याचे भाऊ व गावकरी त्याला हिणवत असत. या त्रासाला कंटाळून त्याने गृहत्याग केला आणि हिमालयात जाऊन तपश्चर्या केली. तेव्हा भगवान व्यंकटेशाने त्याला दर्शन देऊन विदर्भातील देऊळगाव राजा येथील बालाजींची उपासना करण्याची आज्ञा दिली. त्यानुसार विद्याधर देऊळगावला आला असता, बालाजींनी त्याला गिरोली परिसरातील डोंगरात असलेल्या विद्यादेवीची सेवा करण्याचा दृष्टांत दिला. विद्याधरने गिरोलीत येऊन ‘विद्यातीर्थ’ नावाच्या बारवेत स्नान केले आणि तिथल्या एका गुहेत राहून देवीची आराधना सुरू केली. तो दररोज धूप आणि तुपासह गुग्गुळ जाळून देवीची पूजा करत असे; त्यामुळे देवीला ‘गुगुळाई’ आणि विद्याधरला ‘गुगुळदानी’ अशी नावे मिळाली. देवीच्या कृपाप्रसादाने त्याला आत्मज्ञान प्राप्त झाले आणि तो पुन्हा देऊळगाव राजा येथे जाऊन बालाजींच्या सेवेत रुजू झाला. पुढे ‘गुगुळदानी’ या शब्दाचा अपभ्रंश होऊन ‘बुगदाणे’ हे नाव प्रचलित झाले. या कथेचा संदर्भ व्यंकटेश पुराणातही मिळतो.

देऊळगाव राजा येथील बालाजींची मूर्ती बुगदाणे घराण्याच्या पूर्वजांना याच गुगुळाई मंदिर परिसरात सापडली होती आणि ती त्यांनी राजे जगदेवराव जाधव यांना दिली, अशी नोंद १९१० च्या जिल्हा गॅझेटियरमध्ये आढळते. मंदिराच्या बांधकामाबाबत निश्चित माहिती उपलब्ध नसली तरी मंदिर परिसरातील सातवाहनकालीन धर्मशाळेवरून ते प्राचीन असल्याचे स्पष्ट होते. लखुजीराजे जाधव यांच्या वंशजांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता. राजमाता जिजाऊंनी येथे येऊन देवीची ओटी भरली होती. त्या प्रसंगाचे तैलचित्र आजही मंदिरात जतन केलेले आहे. त्यानंतर १९९६ मध्ये विश्वस्त मंडळाची स्थापना झाल्यावर या मंदिराचे पुन्हा नूतनीकरण करण्यात आले.

देऊळगाव राजापासून चार किलोमीटर अंतरावर निसर्गरम्य परिसरात हे मंदिर वसलेले आहे. या विस्तीर्ण मंदिर परिसरात अनेक वृक्ष आहेत व जमिनीवर पेव्यर ब्लॉक्सची फरसबंदी करण्यात आली आहे. प्रवेशद्वाराजवळील चार-पाच पायऱ्या चढून वर आल्यावर प्रांगणात प्रवेश होतो. या प्रांगणात मंदिरासमोर दोन दगडी दीपस्तंभ आहेत. त्यांपैकी एका दीपस्तंभावर बाहेरून चढता येते, तर दुसऱ्यात आतील बाजूस दोन फूट उंचीच्या सात-आठ पायऱ्या आहेत. प्रांगणात मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ होमकुंड आहे. दर्शनमंडप, सभामंडप आणि गर्भगृह अशी या मंदिराची रचना आहे. अर्धखुल्या दर्शनमंडपातून सभामंडपात प्रवेश होतो. येथील सभामंडप प्रशस्त आहे. सभामंडपातून चार पायऱ्या चढून गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराजवळ येता येते. या पायरीमार्गाच्या दोन्ही बाजूंना देवीचे वाहन असलेल्या सिंहाच्या पंचधातूंच्या मूर्ती आहेत. गर्भगृहातील मोठ्या पीठासनावर चार खांबांच्या दगडी मखरात देवीची शेंदूरचर्चित उभी मूर्ती आहे. या मूर्तीच्या शेजारी दोन छोटे तांदळे आहेत. ही देवीची मुले असल्याची लोकमान्यता आहे. अनेक भाविक या देवीला महालक्ष्मी, महाकाली आणि महासरस्वती या रूपांत पूजतात.

चैत्र पौर्णिमेला येथे मोठी यात्रा भरते. त्या दिवशी सकाळी देवीच्या मूर्तीवर अभिषेक आणि पूजा झाल्यानंतर दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात. सायंकाळी नवस पूर्ण करण्यासाठी अनेक भाविक मंदिर परिसरात बैल नसलेल्या आणि एकमेकांना जोडलेल्या बारा गाड्या ओढतात. काही भाविक दीपस्तंभांवर चढून साखरफुटाणे व रेवड्या उधळून आपली नवसपूर्ती करतात. रात्री भजन आणि कीर्तन झाल्यावर देवीची महाआरती केली जाते व त्यानंतर भाविकांना महाप्रसादाचे वाटप होते. गुगुळाई देवी जिल्ह्यातील अनेक कुटुंबांची कुलदेवता असल्यामुळे येथे दर्शनासाठी दररोज शेकडो भाविक येतात. शारदीय नवरात्रोत्सवादरम्यान मंदिर परिसरात मोठी गर्दी असते. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील अनेक भाविक नऊ दिवस येथे मुक्कामी राहून उपवास व देवीची आराधना करतात. या उत्सवात गर्भगृहाच्या उजवीकडील खोलीत अखंड नंदादीप प्रज्वलित केले जातात. सुरुवातीला १०१ असलेल्या या नंदादीपांची संख्या आता १५०० वर पोहोचली आहे. यासाठी भाविकांकडून आगाऊ नोंदणी केली जाते.

मंदिराच्या दक्षिण दिशेला पारिजातकाचा एक प्राचीन वृक्ष आहे. मंदिराच्या उत्तर दिशेला सातवाहन काळात बांधलेली एक धर्मशाळा आहे. तिच्या बांधकामात घोड्याच्या मुखाच्या आकाराच्या हलक्या विटांचा वापर करण्यात आला आहे. मंदिराच्या मागील बाजूला असलेल्या टेकडीवरील गुहेत एक भुयारी मार्ग आहे.

हा मार्ग सिंदखेड राजा येथील राजवाड्यापर्यंत जातो, असे सांगितले जाते. मंदिर परिसरात एक दगडी बारव आहे, तिला विद्यातीर्थ असे म्हणतात. यातील पाण्याने स्नान केल्यास त्वचारोग बरे होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. तसेच मंदिर परिसरात भाविकांच्या ध्यानधारणेसाठी २५ बाय ४० आकाराचे एक ध्यानमंदिर बांधण्यात आले आहे. मंदिराच्या समोर सरस्वती उद्यान नावाचे दोन बगीचे आहेत. त्यामध्ये विविध प्रकारची सुमारे चारशे झाडे आहेत. येथे गुग्गुळाच्या झाडांसह अनेक औषधी वनस्पतींचे जतन केले असून या झाडांच्या फांद्यांचा सुगंध अत्तरासारखा येतो.

उद्यानातील दहा टाक्यांमध्ये पाच रंगांची कमळे लावलेली असून तिथे एक कृत्रिम धबधबाही आहे. मंदिर परिसरात मुलांसाठी विविध प्रकारची क्रीडा साधने असलेले उद्यान आणि शुभ कार्यांसाठी दोन मोठी सभागृहे आहेत. गावातील तरुणांच्या पुढाकारातून येथे एक गोशाळा उभारण्यात आली आहे. त्यात ५० गायींचे संगोपन केले जाते.

उपयुक्त माहिती

  • देऊळगाव राजा येथून ५ किमी अंतरावर
  • बुलडाणा येथून ८५ किमी अंतरावर
  • देऊळगाव राजा येथून एसटी व खासगी वाहने उपलब्ध
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहारीसाठी अनेक सुविधा
  • संपर्क : भाऊसाहेब आढाव, व्यवस्थापक, मो. ७४९८८२२५४८,
  • अनंत उपाध्ये, पुजारी, मो. ९९२१०७५९२३

गुगुला देवी मंदिर

गिरोली (खुर्द), त. देउलगांव राजा, जिला. बुलढाणा

Back To Home