उत्तर भारतातील वृंदावन ही भूमी श्रीकृष्णाच्या वास्तव्याने पावन झालेली आहे. त्यासोबतच श्रीकृष्णाने आपल्या एका भक्तासाठी जेथे स्वतःला ‘गिरवी’ ठेवले, असे ठिकाण सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातही आहे. येथे असलेल्या गिरवी या गावात गोपाळकृष्णांचे मंदिर भाविकांचे श्रद्धास्थान आहे. येथील गोपाळकृष्णांची मूर्ती वैशिष्ट्यपूर्ण असून त्यातून हरिहर ऐक्याचे दर्शन होते. ज्या सिंहासनावर गोपाळकृष्ण स्थापित आहेत, ते सिंहासन शिवलिंगाच्या आकाराचे आहे. राज्यात श्रीकृष्णाची अशी एकमेव मूर्ती असल्याचे सांगितले जाते.
या मंदिराची आख्यायिका अशी की सुमारे ५०० वर्षांपूर्वी येथे बाबूराव देशपांडे हे कृष्णभक्त राहत होते. ते सतत कृष्णभक्तीत तल्लीन असत. एकदा समाधी अवस्थेत असताना त्यांना गोपाळकृष्णांनी दृष्टांत देऊन एक अशी जागा सांगितली जेथे शाळिग्राम आहे. त्या शाळिग्रामपासून माझी मूर्ती बनव, असेही सांगितले. दृष्टांतानुसार त्या जागेवर उत्खनन केले असता शाळिग्राम सापडला. या शाळिग्रामातून मूर्ती साकारण्यासाठी त्यांनी कारागिरांचा शोध सुरू केला. मात्र, अनेक दिवस होऊनही कारागीर सापडत नव्हते. अखेर बाबूरावांनी कृष्णाचा धावा केला व यात मदत करण्याची विनंती केली.
दुसऱ्याच दिवशी सकाळी त्यांच्या घरी जय व विजय नावाच्या दोन व्यक्ती आल्या. आम्ही मूर्ती बनविण्यासाठी आलो आहोत, असे त्यांनी सांगितले. दारात आलेल्या या कारागिरांपैकी एक थोटा, तर दुसरा आंधळा होता. त्यामुळे बाबूरावांच्या मनात काहीशी शंका उत्पन्न झाली; परंतु या कारागिरांनी बाबूरावांना अपेक्षित असलेली मूर्ती बनवून देण्याचा दावा केला. बाबूरावांकडे दुसरा पर्याय नसल्याने त्यांनी हे काम त्यांच्याकडे सोपविले. दोघांची शारीरिक अडचण पाहता ते मूर्ती कशी घडविणार याबद्दल त्यांना कुतूहल वाटू लागले. त्यामुळे त्यांनी मदतीसाठी काही माणसे त्यांना देऊ केली; परंतु त्यांनी कोणाचीही मदत न घेता शाळिग्राम असलेल्या खोलीत स्वतःला बंदिस्त करून घेतले. या काळात बाहेरचे जेवणही ते घेत नसत. बंद खोलीतच ते आपल्यासाठी जेवण बनवत असत. काही दिवसांनंतर त्यांनी खोलीचे दार उघडले आणि त्यांनी घडविलेली मूर्ती पाहिल्यावर बाबूरावांना त्यात आपल्याला दृष्टांत देणाऱ्या विष्णूचे रूप दिसले. कितीतरी वेळ ते त्या मूर्तीकडे एकटक पाहतच राहिले. त्यानंतर भानावर येऊन त्यांनी कारागिरांचे आभार मानले व त्यांना जेवणासाठी आपल्या घरी येण्याचे आमंत्रण दिले. तेव्हा मागच्या विहिरीवर आंघोळ करून येतो, असे सांगून ते विहिरीजवळ गुप्त झाले.
येथील हरिहर स्वरूपातील मूर्ती बनविण्यासाठी साक्षात त्यांच्याकडे विष्णू व महादेव स्वतः जय–विजय यांच्या रूपात आल्याची बाबूरावांना जाणीव झाली. आजही मंदिराच्या मागे विहीर व या कारागिरांचे स्मारक आहे. बाबूराव महाराजांनी येथे मंदिर बांधून एका शुभमुहूर्तावर यथोचित पूजाविधी करून त्यात या गोपाळकृष्णांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली. मंदिरातील सर्व उत्सव, सेवा यांचे नियम लावून व मंदिराचा कारभार पुढील पिढीकडे सुपूर्द करून मूर्ती स्थापनेनंतर वर्षभरातच त्यांनी संजीवन समाधी घेतली. समाधिस्थान गोपाळकृष्ण मंदिराच्या खाली तळघरात आहे.
गिरवी येथील गोपाळकृष्ण मंदिराची ‘दक्षिण भारतातील वृंदावन’ अशी ख्याती आहे. या मंदिराभोवती १५ ते १८ फूट उंचीची तटबंदी असून तटबंदीतील प्रवेशद्वारातून मंदिर परिसरात प्रवेश होतो. या तटबंदीच्या आतील बाजूस ओवऱ्या असून त्यात भाविकांना राहण्याची सुविधा आहे. तसेच अनेक भाविक येथे बसून विष्णूसहस्त्रनामावलीचे पठण करतात. मंदिराचे बांधकाम दगडात असून कळसासाठी चुना व विटांचा वापर करण्यात आल्याचे दिसते. २००५ ते २०१० या काळात केलेल्या जीर्णोद्धारानंतर मंदिराला सध्याचे स्वरूप आले आहे.
हेमाडपंती रचनेच्या या मंदिरात सभामंडप व गर्भगृह आहे. सभामंडप हा खुल्या प्रकारातील असून तेथे केवळ दगडी स्तंभ आहेत. चहूबाजूने तो मोकळा आहे. सभामंडपापासून काही उंचीवर गर्भगृह आहे. गर्भगृहातील एका चौथऱ्यावर गोपाळकृष्णाची अखंड पाषाणातील चार फूट उंचीची मूर्ती आहे. त्यात कृष्ण एका पायावर उभा आहे. दुसऱ्या पायाची आढी घातली असून केवळ अंगठ्यावर तो पाय टेकलेला आहे. मूर्तीची घडण अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे. चेहऱ्यावर प्रसन्न भाव, विशाल नेत्र व मूर्तीवर पाषाणात घडविलेले अलंकार आहेत. उजव्या बाजूस मुरली वाजवीत आहे, अशा रितीने दोन्ही हात आहेत. या मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे गोपाळकृष्णांच्या हातांवरील शिराही स्पष्टपणे दिसून येतात, हे मूर्तिकाराचे कौशल्य आहे. कृष्णाच्या पायाजवळ दोन्ही गाई असून तल्लीन होऊन त्या मुरली ऐकत आहेत, असा भाव त्यांच्या चेहऱ्यावर आहे. या मूर्तीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यातून हरिहराचे दर्शन होते. ज्या सिंहासनावर गोपाळकृष्ण विराजमान आहेत ते सिंहासन शिवलिंगाकार आहे.
मंदिराच्या शिखरावर असलेल्या देवड्यांमध्ये अनेक शिल्पे आहेत. त्याचबरोबर मुख्य कळसाबरोबर येथे अनेक लहान– लहान कळसही आहेत. मुख्य मंदिराच्या शेजारी तटबंदीला लागून एक गणेश मंदिर आहे. दरवर्षी येथे जन्माष्टमीचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो. आषाढी आणि कार्तिकी एकादशीला गोपाळकृष्णांच्या प्रतिमेची आणि पादुकांची मिरवणूक काढली जाते. वैशाख वद्य प्रतिपदेला बाबूराव महाराजांच्या समाधीवर अभिषेक केला जातो.