गोपाळकृष्ण मंदिर (गोकुळ)

गोकुळ हॉल मार्ग, शीव (पूर्व), मुंबई

मुंबई आणि साष्टी (सालसेत) बेटांची शीव असलेले गाव म्हणजेच शीव किंवा सायन. मुंबईच्या आजच्या या आधुनिक उपनगरात गोकुळ या नावाने ओळखले जाणारे भगवान श्रीकृष्णाचे मंदिर स्थित आहे. अत्यंत देखणी काष्ठशिल्पे, प्राचीन पद्धतीच्या सुंदर कोरीव मूर्ती आणि दाक्षिणात्य श्रीकोविल पद्धतीचे गर्भगृह यामुळे हे मंदिर असंख्य भाविकांचे आकर्षणस्थान बनले आहे. ‘द बॉम्बे साऊथ कॅनरा ब्राह्मिन्स असोसिएशन’ या संस्थेतर्फे सहा दशकांपूर्वी या मंदिराची उभारणी करण्यात आली. आज हे मंदिर मुंबईतील दक्षिण कन्नड ब्राह्मण समुदायाचे महत्त्वाचे सांस्कृतिक आणि सामाजिक केंद्र बनले आहे.

शीव आणि त्या लगतच्या माटुंगा भागामध्ये दक्षिण भारतीयांची मोठी वस्ती आहे. ब्रिटिश वसाहतकाळात झालेल्या मुंबईच्या औद्योगिक आणि आर्थिक विकासामुळे, साधारणतः विसाव्या शतकाच्या प्रारंभी येथे देशभरातून मोठ्या प्रमाणावर स्थलांतरितांच्या लाटा आल्या. देशातील अनेक भागांतील विविध जाती, धर्म आणि पंथाचे लोक येथे येऊन स्थायिक झाले. यातच कर्नाटकातील दक्षिण भागातून, विशेषतः उडुपी आणि दक्षिण कन्नड भागातून आलेल्या आंग्लशिक्षित लोकांचाही समावेश होता. त्यातील ब्राह्मण समाजाने आपल्या धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक गरजांची पूर्ती करण्याच्या हेतूने सुमारे ९० वर्षांपूर्वी येथे आपली संघटना स्थापन केली. डॉ. यू. बी. नारायण राव हे या संघटनेचे संस्थापक-अध्यक्ष होते. या संघटनेच्या १९६१-६२ च्या व्यवस्थापन समितीमध्ये कुडपी भुजंग राव, डॉ. ललिता राव, ए. वेंकट राव अशा प्रतिष्ठित नागरिकांचा समावेश होता.

‘गोकुळ’ या लोकप्रिय नावाने ओळखल्या जाणाऱ्या ‘द बॉम्बे साऊथ कॅनरा ब्राह्मिन्स असोसिएशन’ या संस्थेतर्फे येथे आपल्या पूज्य दैवताचे म्हणजेच गोपालकृष्णाचे भव्य मंदिर उभारण्याचा संकल्प सोडण्यात आला. त्यासाठी चेन्नईचे के. सीताराम राव, दानशूर उद्योगपती शेठ ब्रिजलाल रुंगटा, झिमीदेवी श्रीराम झुनझुनवाला, त्याचप्रमाणे उडुपीच्या अष्टमठांचे (अदमर, पेजावर, काणियूर, सोदे, पुत्तिगे, शिरूर, पालिमारू) तसेच द्वारका पीठ, काशी मठाचे स्वामी आणि अन्य देणगीदारांकडून देणग्या गोळा करण्यात आल्या. या प्रयत्नांतून अखेर १९६१-६२ मधील व्यवस्थापन समितीच्या कार्यकाळात येथे गोपालकृष्णाचे भव्य मंदिर उभे राहिले. या मंदिरासाठी त्या काळी अडीच लाख रुपयांहून अधिक खर्च आला होता. नर्मदा महावीर प्रसाद रुंगटा यांनी दिलेली गोपाळकृष्णाची पाषाणमूर्ती येथे प्रतिष्ठापित करण्यात आली आणि महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल श्री प्रकाश यांच्या हस्ते १२ मार्च १९६२ रोजी या मंदिराचे उद्घाटन करण्यात आले. कालांतराने समाजाच्या वाढत्या धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक गरजांमुळे मंदिर वास्तूचा विस्तार करण्याची आवश्यकता निर्माण झाली. त्यातून संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुरेश राव यांच्या नेतृत्वाखाली मंदिराचा ‘पुनर्विकास प्रकल्प, २०१६-२०२२’ आखण्यात आला. त्या अंतर्गत २ जुलै २०१७ रोजी उडुपीतील पालिमारू मठाचे श्री विद्याधीश तीर्थ स्वामी आणि कुक्के येथील सुब्रह्मण्य मठाचे विद्याप्रसन्न तीर्थ स्वामी यांच्या हस्ते येथे भूमिपूजन करण्यात आले. ३० जून २०१९ रोजी उडुपीतील पेजावर मठाचे विश्वेश तीर्थ स्वामी यांच्या हस्ते या मंदिराचा शिलान्यास करण्यात आला.

शीवमधील गोकुळ हॉल मार्ग या नावाने ओळखल्या जाणाऱ्या मार्गावरील शांत परिसरात मंदिराची ही भव्य बहुमजली वास्तू उभी आहे. या मंदिराच्या रचनेत द्रविड आणि तटीय कर्नाटकातील स्थापत्यशैलीचा संगम दिसून येतो. मंदिराच्या प्रवेशद्वारावर दक्षिण भारतीय पद्धतीचे छोटे परंतु आकर्षक असे सप्तस्तरीय गोपुर आहे. त्याच्या प्रत्येक स्तरावर ‘कूट’ आणि ‘शाला’ प्रकारच्या छोट्या देवकोष्टकांची रचना आहे. या गोपुरावर राधा-कृष्ण, शंकर, गरूड, हनुमान आदी विविध देवी-देवतांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. मुखमंडप, सभामंडप आणि गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. येथील मुखमंडपाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यातील जय आणि विजय या वैष्णव द्वारपालांच्या दोन मोठ्या मूर्ती. काळ्या पाषाणात घडवलेल्या आणि दाक्षिणात्य शिल्पकलेचे उत्तम उदाहरण असलेल्या या मूर्ती सभामंडपाच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना विराजमान आहेत.

या मंदिराचे लक्षणीय वैशिष्ट्य म्हणजे प्रामुख्याने होयसळ आणि विजयनगर साम्राज्यातील काष्ठशिल्पशैलीशी साधर्म्य दर्शवणारी येथील काष्ठशिल्पे आणि नक्षीकाम. उडुपी आणि मंगळूर भागातील मंदिरे ही त्यांच्या लाकडी कोरीव कामासाठी प्रसिद्ध आहेत. तोच वारसा या मंदिरात जपला गेलेला आहे. येथील सभामंडपाच्या द्वारचौकटी, त्याचा दरवाजा, सभामंडपाचा प्रवेशमार्ग आणि आतील भागावरील वितान यांत सर्वत्र लाकडाचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आला आहे. नक्षीकाम आणि विविध प्रकारची शिल्पे यांनी ते सुशोभित आहे. त्यातही खासकरून सभामंडपाच्या घुमटाकार वितानामध्ये आणि कडेपाटामध्ये केलेले कोरीव काम खास प्रेक्षणीय आहे. यात ‘अष्टदशदल’ (अठरा पाकळ्यांचे कमळ), श्रीचक्र आणि वैविध्यपूर्ण भौमितिक नक्षी, तसेच श्रीकृष्णाच्या जीवनचरित्रातील विविध लीला, तसेच दशावतारांची मालिका कोरलेली आहे. सभामंडपात भव्य स्तंभ असून, त्यावर वेलबुट्टी, कमलदल, यक्षकिन्नर, गजसिंह तसेच विविध वैष्णव प्रतीकांची नक्षी कोरलेली आहे. काही स्तंभांच्या शीर्षभागी कमानीसारखी रचना आहे.

सभामंडपामध्ये गर्भगृहाच्या समोर एक मोठी छत्रीसारखी रचना आहे. दक्षिण भारतीय परंपरेत त्यास कनक मंडप किंवा ब्रह्मरथ मंडप अशा संज्ञांनी ओळखले जाते. यापासून काही पावलांवर मंदिराचे गर्भगृह स्थित आहे. विशेष प्रकारच्या संगमरवरी पाषाणात हे गर्भगृह बांधलेले आहे. त्यावर चारही बाजूंनी उतरते छप्पर व कलश आहे. या गर्भगृहाची रचना दाक्षिणात्य पद्धतीच्या श्रीकोविलसारखी आहे. त्याचे प्रवेशद्वार चांदीच्या नक्षीदार पत्र्याने मढवलेले आहे. या द्वारचौकटीवर ललाटबिंबस्थानी कीर्तिमुख आहे. तर चौकटीच्या खालच्या बाजूला द्वारपालांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. द्वारचौकटीच्या वरच्या भागामध्ये गजलक्ष्मीची संगमरवरी पाषाणात कोरलेली मूर्ती आहे. आत उंच वेदीवर चांदीचे मखर आहे. या मखरास मकरतोरण आहे. त्याच्या वरच्या मधल्या भागात कीर्तिमुख आहे, तर मकरतोरणाच्या खालील स्तंभांवर व्यालमूर्ती कोरलेल्या आहेत. या मखरात गोपालकृष्णाची मूर्ती विराजमान आहे. संगमरवरी पाषाणात घडवलेली ही मूर्ती त्रिभंग मुद्रेत आहे. मूर्तीच्या मस्तकावर सोनेरी मुकुट आहे, तर हातांत सोनेरी बासरी आहे. कृष्णमूर्तीच्या मागे गोमाता उभी आहे. या गर्भगृहाच्या बाह्यभिंतीवर विविध देवकोष्ठकांमध्ये भगवान विष्णूच्या विविध नावांच्या मूर्ती विराजमान आहेत. त्याचप्रमाणे येथे गणेशमूर्तीचेही दर्शन घडते.

या मंदिरात रोज सकाळी ७ ते दुपारी १ आणि सायंकाळी ५ ते रात्री ९ या काळात भाविक देवदर्शनाचा लाभ घेऊ शकतात. मंदिरात रोज सकाळी ७.३०, ११.४५ आणि रात्री ७.३० वाजता आरती होते. मंगलआरतीनंतर प्रार्थना, उत्तर पूजा, राजोपचार, अर्घ्य, पाद्य, शंख तीर्थ प्रोक्षण, कृष्ण अर्पण आणि प्रसाद वाटपाने पूजा विधींची सांगता होते. भाविकांच्या पूर्वनोंदणीनुसार येथे दीपाराधना, अष्टोत्तर अर्चना, सहस्रनाम अर्चना, अलंकार पूजा, महापूजा, उदयास्त पूजा, रंगपूजा इत्यादी सेवाही केल्या जातात. गोकुळाष्टमी हा या मंदिरातील एक महत्त्वाचा उत्सव होय. भगवान श्रीकृष्णाचा हा जन्मोत्सव येथे पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. असे सांगण्यात येते की यासाठी खास बंगळूरहून विमानाने आणलेल्या फुलांनी मंदिर आणि मूर्ती सजवली जाते. जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी साजरा होणारा ‘मोसरू कुडिके’ हा उत्सव भाविकांच्या विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो. हा उत्सव मुंबईतील ‘गोविंदा’सारखा असतो. उडुपीमध्ये साजरा केला जातो त्याच पद्धतीने तो येथे विविध लोकप्रिय लोकनृत्यांसह साजरा होतो. या मंदिराच्या प्रांगणात एक तुळशीवृंदावन आहे. येथे दररोज तुळशीपूजा केली जाते, तसेच कार्तिक महिन्यात येथे ‘तुळशी विवाह’ सोहळा मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. याशिवाय येथे मंदिराचा प्रतिष्ठापना दिन, महाशिवरात्र, नरसिंह जयंती, मध्व नवमी, शंकर जयंती, पुरंदर दास आराधना, राघवेंद्र स्वामी पुण्यतिथी, रामनवमी आदी सणही मोठ्या भक्तीभावाने साजरे केले जातात. याचप्रमाणे मकर संक्रांतीला सामूहिक सत्यनारायण पूजा, सौर उपाकर्म (सामूहिक यज्ञोपवीत/जानवे बदलण्याचा विधी), नवरात्र आणि दीपाराधना यांसारखे लोकप्रिय सार्वजनिक धार्मिक कार्यक्रमही आयोजित केले जातात.

उपयुक्त माहिती

  • दादर रेल्वे स्थानकापासून ५ किमी अंतरावर
  • मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानक व एसटी स्थानकापासून ९ किमी अंतरावर
  • शहरातील अनेक भागांतून बेस्ट बसची सुविधा उपलब्ध आहे
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहारीसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत
  • संपर्क : मंदिर कार्यालय, दूरध्वनी ०२२-२४०७१४२४

गोपालकृष्ण मंदिर (गोकुल)

गोकुल हॉल रोड, सायन (पूर्व), मुंबई

Back To Home