शैवपंथ हा देशातील सर्वात मोठा पंथ असून गोव्यातील अनेक शैवपंथीय मंदिरे प्रसिद्ध आहेत. फोंडा येथील केशव नारायण मंदिर, शिवाजी महाराजांनी सोळाव्या शतकात जीर्णोध्दार केलेले सप्तकोटेश्वर मंदिर, बाराव्या शतकात उभारलेले तांबडी सुर्ला येथील शिव मंदिर, मंगेशकर घराण्याचे कुलदैवत असलेले मंगेशी मंदिर, याशिवाय अनेक भैरव, काळभैरव व वेताळ देवाची मंदिरे गोव्यात आहेत. यापैकीच एक प्राचीन व प्रसिद्ध गोमंतेश्वर महादेव मंदिर जुन्या गोव्यातील ब्रम्हपुरी भागात आहे. पूर्वी गोमंत देव, गोवेश्वर आणि आता गोमंतेश्वर अशा विविध नावांनी हे देवस्थान प्रसिद्ध आहे. येथील जागृत महादेव नवसाला पावतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
असे सांगितले जाते की चौदाव्या शतकात विजयनगरच्या सम्राटांनी ब्रम्हपुरी येथे एक शिक्षणसंस्था सुरू केली. या शिक्षण संस्थेस अग्रहार नावाने ओळखले जाई. याच ठिकाणी गोमंतेश्वर महादेवाचे मंदिर उभारण्यात आले व बाजूला पाण्याचे हौद किंवा तीर्थे निर्माण करण्यात आली. असे सांगितले जाते की पुढे सोळाव्या शतकात विजयनगर साम्राज्यातील एक अधिकारी माधव मंत्री यांनी या प्राचीन मंदिराचा जिर्णोद्धार केला होता. याच वेळी त्यांनी येथे आणखी एका तलावाची निर्मिती केली, ज्यास माधवतीर्थ म्हणून ओळखले जाते. सतराव्या शतकात पोर्तुगीज सरकारच्या काळात ही शिक्षण संस्था बंद पडली व मंदिरही पाडले गेले. त्यावेळी सभोवतालची तिर्थकुंडेही बुझवली गेली. १७५२ मध्ये पोर्तुगीजांनी तेथील तिर्थकुंड उघडले, पण नंतर ते पुन्हा बुजवून टाकले. त्यानंतर येथील स्थानिकांनी धाडस करून १७७५ साली या मंदिराची नव्याने उभारणी केली. परंतु १७७९ साली पोर्तुगीजांनी पुन्हा ते पाडले. त्यानंतर १९३२ च्या उत्खननात येथील तिर्थकुंडाचा शोध लागला. पुढे १९४७ साली देव गोमंतेश्वराचे मंदिर त्याच जागी परत उभे राहिले. असे सांगितले जाते की या प्राचीन आणि प्रसिद्ध मंदिराचा उल्लेख अनेक धर्मग्रंथ आणि ऐतिहासिक दस्तावेजांतही आहे.
गावापासून मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर मंदिराची पहिली स्वागतकमान आहे.
स्वागत कमानीच्या सज्जावरील मेघडंबरीत गोमंतेश्वराची मूर्ती आहे. या कमानीपासून काही अंतरावर उंच टेकडीवर हे मंदिर आहे. मंदिराच्या बाजूला प्रांगणात ब्रम्हपुरी तीर्थ नावाचा चौकोनी तलाव आहे. या तलावात पाण्याचा नैसर्गिक स्रोत आहे. तलावात उतरण्यासाठी चारही बाजूंनी पायऱ्या व मध्यभागी कारंजे आहेत. येथे शुचिर्भूत होऊन मंदिरात दर्शनाला जाण्याची प्रथा आहे. रांगमंडप, अर्धमंडप, सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. रांगमंडपात डाव्या व उजव्या बाजूला भिंतीलगत, प्रवेशद्वारे सोडून भाविकांना बसण्यासाठी कक्षासने आहेत. या रांगमंडपाच्या वितानावर चक्राकार नक्षी आहेत.
पुढे अर्धमंडपाचे प्रवेशद्वार आहे. अर्धमंडपात सभामंडपाच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला दर्शनी भिंतीलगत असलेल्या चौथऱ्यांवर द्वारपाल शिल्पे आहेत. सभामंडपाच्या लाकडी प्रवेशद्वारात द्वारशाखांवर व त्यावरील तोरणात पानाफुलांच्या नक्षी आहेत. बंदिस्त स्वरूपाच्या सभामंडपात एकमेकांना अर्धचंद्राकार तोरणांनी जोडलेले नक्षीदार स्तंभ असून स्तंभांवर घुमटाकार छत आहे. छताला पितळी घंटा व काचेचे रोषणाईयुक्त झुंबर टांगलेले आहेत. सभामंडपात गर्भगृहाकडे डाव्या व उजव्या बाजूला आणखी दोन दरवाजे आहेत. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारासमोर वज्रपिठावर नंदीची काळ्या पाषाणातील मूर्ती आहे.
अंतराळात स्तंभिका असलेला लाकडी कठडा असून कठड्याच्या दोन्ही बाजूला द्वारपाल शिल्पे आहेत. पुढे गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर चांदीचे मयूर तोरण आहे. तोरणात वर कीर्तीमुख आणि मध्यभागी ओंकार आहे. गर्भगृहात वज्रपिठावर शिवपिंडी आहे. मागील भिंतीलगत वज्रपिठावर गोमंतेश्वर महादेवाची चांदीची मूर्ती आहे. या मूर्तीमागे चांदीची नक्षीदार प्रभावळ आहे. गर्भगृहाच्या बाह्य बाजूने प्रदक्षिणा मार्ग आहे. मंदिराच्या अर्धमंडपाच्या छतावर लहान शिखर, त्यावर आमलक व कळस आहे. सभामंडपाच्या छतावर घुमटाकार शिखर आहे. अर्धमंडपाच्या शिखराप्रमाणेच येथेही शीर्षभागी आमलक व कळस आहे. छतावर समोरील बाजूला नंदी शिल्प आहे. गर्भगृहाच्या छतावर चार थरांचे गोलाकार शिखर आहे. शिखराच्या दुसऱ्या थरातील देवकोष्टकात विविध देवतांच्या मूर्ती व तिसऱ्या थरातील देवकोष्टकात शिवपिंडी आहेत.
मंदिराच्या बाजूला प्रांगणात अन्य देवीदेवतांची लहान मंदिरे व गोमंतेश्वर सभागृह आहे. येथे सांस्कृतिक कार्यक्रम व विवाह सोहळे आयोजित केले जातात. प्रांगणात सेवेकऱ्यांची निवासस्थाने व माधवतीर्थ कुंड आहे. कुंडाच्या बाजूला लहान देवळीत स्थानिक देवतेची पाषाण मूर्ती आहे.
महाशिवरात्री हा येथील मुख्य वार्षिक उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. यावेळी देवाच्या दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी परिसरातील हजारो भाविक या मंदिरात येतात. श्रावण मासातील दर सोमवारीही गोमंतेश्वर महादेवाच्या दर्शनासाठी येथे मोठी गर्दी होते. याशिवाय चैत्र पाडवा, दसरा, दिवाळी, कार्तिक पौर्णिमा, कोजागिरी पौर्णिमा, नागपंचमी, वैकुंठ चतुर्दशी आदी वर्षभरातील सण व उत्सव मंदिरात साजरे केले जातात. सोमवार, प्रदोष, एकादशी, पौर्णिमा, अमावस्या आदी दिवशी मंदिरात दर्शनाला येणाऱ्या भाविकांची गर्दी असते.