गोमाजी महाराज संस्थान / श्री क्षेत्र नागझरी,

नागझरी, ता. खामगाव, जि. बुलडाणा

बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील श्री क्षेत्र नागझरी येथे श्री गजानन महाराजांचे गुरुस्थान असलेल्या गोमाजी महाराजांचे भव्य समाधी मंदिर आहे. स्वामी नृसिंह सरस्वतींच्या आवाहनाने गोदावरी आणि गोमाजी महाराजांच्या भक्तीने पयोष्णी (पूर्णा) नदी येथे प्रकट झाल्याची आख्यायिका आहे. मन नदीच्या काठावर वसलेले हे क्षेत्र साडेतीनशे वर्षांपूर्वीचे समाधी मंदिर, गोमुख कुंड आणि पाच स्वयंभू शिवलिंगांमुळे (पंचलिंग माळ) प्रसिद्ध आहे. आषाढी वारीनिमित्त गजानन महाराजांच्या पालखीचा येथे मुक्काम असतो. निसर्गरम्य परिसरातील हे हेमाडपंती स्थापत्यशैलीचे तीर्थक्षेत्र हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आहे.

पूर्णा नदीची उपनदी असलेल्या मन नदीच्या तीरावर हे क्षेत्र वसले आहे. येथील नागेश्वराचे प्राचीन शिवमंदिर तसेच या परिसरातील झऱ्यांमुळे या गावाला नागझरी हे नाव पडल्याचे सांगितले जाते. येथील गोमुख कुंडाच्या उत्पत्तीबाबत संत दासगणू महाराज लिखित ‘श्रीनागझरी माहात्म्य’ या ग्रंथातील पहिल्या अध्यायात सविस्तर वर्णन येते. त्यानुसार, नृसिंह सरस्वती आपल्या सात शिष्यांसह श्री क्षेत्र कारंजाहून नाशिक येथील त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी जात होते. महाशिवरात्रीला
त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेण्याचा त्यांचा मानस होता. माघ वद्य एकादशीला ते मन नदीच्या काठी आले. महाशिवरात्रीपर्यंत त्र्यंबकेश्वर क्षेत्री कसे पोचावे, अशी चिंता शिष्यांना लागली होती. त्यांनी ती नृसिंह सरस्वतींकडे व्यक्त केली असता, महाराजांनी “योगबळाने तुम्ही गौतमी तटावर स्नानासाठी जाऊ शकता,” असे उत्तर दिले. त्यावर “आम्हाला योगशास्त्राची काहीही माहिती नाही, त्यामुळे ते शक्य नाही. त्याऐवी विदर्भात गोदावरीसारखीच पवित्र असलेली एखादी सरिता (नदी) आहे का जिचे आम्ही गोदावरी म्हणून स्नान करू शकू?” अशी विचारणा शिष्यांनी केली. त्यावर नृसिंह सरस्वती यांनी शिष्यांना मन नदीचे माहात्म्य पटवून दिले. ते शिष्यांसह मन आणि बोर्डी नदीच्या संगमावर आले आणि हेच प्रयागरूप समजून येथे स्नान करण्यास सांगितले. या संगमावर सर्वांनी स्नान केल्यानंतर नृसिंह सरस्वती शिष्यांसह येथील माळावर आले आणि उत्तराभिमुख बसून त्यांनी गोदावरी नदीला आवाहन केले. त्याच क्षणी कडकड असा आवाज होऊन माळरानावर पुरुषभर उंचीचा मोठा खड्डा पडला. हा खड्डा म्हणजेच ‘कुशावर्त’ होय, असे मानून येथे प्रकट होण्याची प्रार्थना त्यांनी गोदावरीला केली. तत्क्षणी या खड्ड्यात निर्माण झालेल्या गोमुखातून गोदावरीची निर्मल जलधारा वाहू लागली. सर्वांनी या कुंडात स्नान केले. त्यानंतर नृसिंह सरस्वतींनी शिष्यांना येथे स्वयंभू प्रकट झालेल्या नागेश्वर, त्र्यंबकेश्वर, सोमेश्वर, विश्वेश्वर आणि गुप्तेश्वर या पाच शिवलिंगांचे दर्शन घडवले. त्यांपैकी गुप्तेश्वर शिवलिंग गोमुख कुंडात गुप्त स्वरूपात असते आणि केवळ भाग्यवान भाविकांनाच त्याचे दर्शन होते, असे मानले जाते. नृसिंह सरस्वतींचे येथे सात दिवस वास्तव्य होते; तसेच येथील पाच शिवलिंगांमुळे या माळाला ‘पंचलिंग माळ’ असे नाव पडल्याचे या अध्यायात नमूद आहे. मन आणि बोर्डी नदीचे संगमस्थान येथून काही किलोमीटर अंतरावरच आहे.

कालांतराने येथे गोमाजी महाराजांचे आगमन झाले. श्रीकृष्णाचे निःसीम भक्त असलेल्या गोमाजी महाराजांची पंढरपूरच्या विठ्ठलावरही अलोट श्रद्धा होती. ते येथील गोमुख कुंडात गुडघाभर पाण्यात उभे राहून भजन करत; तसेच परिसरातील गुहेत तपश्चर्या करत असत. येथील गोमुख कुंडाबाबत आणखी एक आख्यायिका प्रसिद्ध आहे. त्यानुसार, गोमाजी महाराज पूर्वी दररोज पयोष्णी (पूर्णा) नदीवर स्नानासाठी जात असत. मात्र, पुढे वार्धक्यामुळे त्यांना रोज तेथे जाणे अशक्य होऊ लागले. तरीही प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर ते नदीवर जात. त्यांच्या भक्तीवर पूर्णा नदी प्रसन्न झाली आणि “मी गोमुख कुंडात प्रकट होईन,” असा वर तिने दिला. दृष्टान्त म्हणून तिने गोमाजी महाराजांना त्यांची काठी प्रवाहात सोडण्यास सांगितली. या आख्यायिकेची सत्यासत्यता वादातीत असली तरी पूर्णा नदीला पूर येतो, तेव्हा गोमुख कुंडातील पाणीही वेगाने बाहेर पडते, असा अनुभव येतो.

गजानन महाराज गोमाजी महाराजांना गुरुस्थानी मानत. गजानन महाराज दरवर्षी पंढरपूरची वारी करत. वारीसाठी शेगाववरून निघाल्यावर ते येथे येऊन गोमाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेत असत. संत दासगणू महाराज लिखित ‘गजानन विजय’ ग्रंथात गोमाजी महाराजांच्या लीलांचे वर्णन आहे. त्यांच्याच ‘श्रीनागझरी माहात्म्या’ मध्येही गोमाजी महाराजांचा महिमा वर्णिलेला आहे.

शेगाव संस्थानची प्रगती ज्यांच्या मार्गदर्शनाखाली झाली, ते कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांच्या कुटुंबीयांचे गुरू म्हणूनही गोमाजी महाराज ओळखले जातात. तुकाजी महादजी पाटील शेगावकर यांनी गोमाजी महाराजांचे समाधी मंदिर बांधले. श्रीहरी तुकाजी पाटील यांच्या कुटुंबीयांनी १९२४ मध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार केला, असे मंदिराच्या प्रवेशद्वारावर नमूद आहे.

नागझरी येथील पंचलिंग माळरानावर हे समाधी मंदिर आहे. समाधीच्या उत्तरेस गोमाजी महाराजांचे शिष्य सदानंदगीर महाराजांची समाधी आहे. जुन्या निजाम सरकारने या समाधी मंदिरासाठी जमीन इनाम दिली होती. या देवस्थानाकडे ४१५ एकर इनाम जमीन आहे, असे ‘सेंट्रल प्रॉव्हिन्सेस अँड बेरार डिस्ट्रिक्ट गॅझेटियर्स – अकोला डिस्ट्रिक्ट, व्हॉल्यूम ए’ (१९१०) मध्ये नमूद आहे. काही वर्षांपूर्वी या मंदिराचा नव्याने जीर्णोद्धार करण्यात आल्यामुळे मंदिराला सध्याचे भव्य स्वरूप प्राप्त झाले आहे.

शेगावपासून सुमारे सात किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे. शेगाव येथील भक्तिनिवासापासून येथे येण्यासाठी रिक्षा उपलब्ध असतात. खासगी वाहनानेही येथे येता येते. नागझरी येथे रेल्वे स्थानकही आहे. मुंबई-कोलकाता मार्गावर असलेल्या या स्थानकापासून १.६ किलोमीटर अंतरावर हे मंदिर वसलेले आहे. मंदिरापासून थोड्या अंतरावर मन नदी वाहते. नागझरीतून जाणाऱ्या रस्त्यावरून शेगाव संस्थानातून पंढरपूरला जाणारी पालखी जाते, त्यामुळे या मार्गाला दिंडीमार्ग असेही म्हणतात. या मार्गावर शेगाव संस्थानाने गजानन महाराजांचे छोटे मंदिर उभारले आहे. गोमाजी महाराजांच्या समाधी मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी संस्थानातर्फे मोफत चहापानाची सोय केली जाते.

मंदिराच्या प्रवेशद्वारानजीक वाहनतळाची सोय आहे. जवळच काही छोटी उपहारगृहे आहेत. मंदिराच्या प्रवेशद्वारापर्यंत जाणाऱ्या मार्गिकेच्या दोन्ही बाजूंना डेरेदार वृक्ष आहेत. मंदिराच्या सुंदर प्रवेशद्वारावर गणेशाचे शिल्प आहे. या प्रवेशद्वारातून आत आल्यावर ३५ पायऱ्या उतराव्या लागतात. सुरुवातीला दोन्ही बाजूंना गोमाता व वासरांचे शिल्प लक्ष वेधून घेते. पायऱ्या उतरून खाली आल्यावर मोकळ्या भागात पूजासाहित्य व विविध वस्तूंची दुकाने आहेत. उजव्या बाजूला गोमुख कुंड आहे. येथील गोमुखातून सदैव जल प्रवाहित असते. गोमुखाच्या वरच्या बाजूस गोदावरी मातेचे छोटे मंदिर आहे. या कुंडात महिला व पुरुष भाविकांना स्नानासाठी स्वतंत्र सोय आहे. कपडे बदलण्यासाठीही व्यवस्था आहे. अनेक भाविक या कुंडात पाय धुतल्यानंतर गोमाजी महाराजांच्या दर्शनासाठी पुढे जातात. कुंडापासून काही पावलांवरच समाधी मंदिराचे प्रवेशद्वार आहे. येथे नगारखानाही आहे. या प्रवेशद्वाराला असलेला भक्कम लाकडी दरवाजा आजही सुस्थितीत आहे. प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूस समाधी मंदिराकडे जाण्यासाठी पायऱ्या आहेत. एका भुयारात ही समाधी आहे. समाधीस्थानाकडे जाण्याचे जुने भुयार आता बंद करण्यात आले आहे. गोमाजी महाराजांनी ध्यानधारणेसाठी हे भुयार खोदले होते, असे सांगितले जाते. दगडी बांधकाम असलेल्या समाधी मंदिराच्या प्रवेशद्वारावर गणेशाची मूर्ती आहे. समाधीस्थानी गोमाजी महाराजांची सुंदर संगमरवरी मूर्ती आहे आणि मूर्तीवर कापडी रंगीत फेटा आहे. मूर्तीच्या मागे सोनेरी मुलामा दिलेली नक्षीदार प्रभावळ आहे. मूर्तीच्या डावीकडे काठी आणि समोर पादुका आहेत. दर्शन घेऊन बाहेर आल्यावर दगडी फरसबंदी केलेले प्रांगण लागते. मंदिराच्या गर्भगृहावर देखणे शिखर आहे. मंदिराच्या चारही बाजूंनी विस्तीर्ण ओवऱ्या आहेत आणि प्रांगणाच्या मधोमध उंच ध्वजस्तंभ आहे. या तीन मजली मंदिरामध्ये येण्यासाठी दोन्ही बाजूंनी पायऱ्या आहेत. डावीकडील पायऱ्यांजवळ गोमाजी महाराजांचा लाकडी रथ आहे. त्यात महाराजांची प्रतिमा व पादुका आहेत. या रथातून उत्सवाप्रसंगी मिरवणूक काढली जाते. ओवऱ्यांमध्ये एका ठिकाणी गोमाजी महाराजांच्या मूर्तीची प्रतिकृती आहे. येथून काही अंतरावर नागेश्वर, त्र्यंबकेश्वर, सोमेश्वर व विश्वेश्वर महादेवाची स्वयंभू शिवलिंगे असलेली शिवालये आहेत. या शिवालयांचा १९५० च्या दशकात जीर्णोद्धार करण्यात आला. नागेश्वर मंदिरासमोर लाकडी सभामंडपात यज्ञकुंड आहे. येथे शिवशंकरांच्या सुंदर मूर्तीचे दर्शन घडते. समोरच नंदीचे छोटे मंदिर आहे. मंदिर परिसरातील एका वृक्षाजवळ सीतामातेचेही मंदिर आहे.

मंदिराच्या परिसरात असलेल्या झऱ्यांपैकी एका झऱ्यातून उगम पावणारी मोहना नदी गावाजवळून वाहते. या पूर्वाभिमुख नदीच्या मार्गात तिला अनेक उपप्रवाह मिळतात. त्यांपैकी एक तळे ‘रामकुंड’ म्हणून ओळखले जाते. पूर्व दिशेला ‘गोपाळकुंड’ नावाचे दुसरे कुंड आहे. येथील गोमुख कुंडातील वाहून जाणारे पाणी मोहना नदीला मिळते आणि पुढे पूर्व दिशेला वळून बोर्डी नदीला जाऊन मिळते.

गोमाजी महाराजांच्या मंदिरात दररोज काकडा आरती आणि हरिपाठ होतो. सकाळी ११ वाजता आरतीनंतर महाप्रसादाचे वाटप केले जाते. ग्रहण, सोमवती अमावस्या, अधिक मास अशा पर्वणीवर येथे भाविकांची मोठी गर्दी असते. माघ वद्य चतुर्थीला गोमाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. याशिवाय रामनवमी, हनुमान जयंती आदी उत्सवही मोठ्या उत्साहात साजरे होतात. भाविकांच्या निवासासाठी परिसरात सुसज्ज भक्तनिवास उभारण्यात आले आहे. आषाढी एकादशीच्या वारीनिमित्त गजानन महाराजांची पालखी पंढरपूरला जाताना वाटेत या क्षेत्री मुक्कामी असते.

उपयुक्त माहिती:

  • खामगाव येथून २४ किमी अंतरावर
  • शेगाव येथून ७ किमी अंतरावर
  • खामगाव व शेगाव येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहारीची सुविधा

गोमाजी महाराज संस्थान/श्री क्षेत्र नागज़ारी,

नागज़ारी, खामगांव, जिला. बुलढाणा

Back To Home