गीता मंदिर

पैठण शहर, ता. पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर

भगवान श्री योगेश्वर कृष्णाने कुरुक्षेत्रावर किंकर्तव्यमूढ झालेल्या अर्जुनास केलेला उपदेश हा श्रीमद्‌भगवद्‌गीता या नावाने महाभारतामध्ये अंतर्भूत आहे. गीता हा समस्त हिंदूंचा परमपवित्र धर्मग्रंथ आहे. या ग्रंथाने भारतातील आध्यात्मिक आणि सामाजिक क्रांतीस प्राचीन काळापासून चालना दिली आहे. भावार्थदीपिका अर्थात ज्ञानेश्वरी हा ग्रंथ गीतेवरीलच मराठी टीका आहे. वारकरी संप्रदायाचा पायाही हाच ग्रंथ आहे. हा ग्रंथ भारतीयांसाठी एवढा पूजनीय आहे की देशभरात अनेक ठिकाणी या ग्रंथास देवतेचा दर्जा देऊन त्याची मंदिरे उभारण्यात आली आहेत

भगवान श्रीकृष्णाने नीजधाम यात्रेस जाण्यापूर्वी जेथे विश्राम केला होता, त्याच स्थानी गुजरातमधील सोमनाथ ज्योतिर्लिंग मंदिराजवळ गीता मंदिर आहे. मथुरेत बिर्ला परिवाराने गीता मंदिर उभारले असून तेथे भव्य असा गीतास्तंभ आहे. त्याच प्रमाणे द्वारकेत, हरिद्वार येथील कनखल येथे, कर्नाटकातील तुमकूर येथेही गीता मंदिर आहे. ईशान्य भारतात गुवाहाटी येथे १९८१ साली १६ एकर जमिनीवर गीता मंदिराची उभारणी करण्यात आली. अशा प्रकारे भारताच्या सर्व भागांत गीता मंदिरे आहेत. महाराष्ट्रातील असे भव्य मंदिर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण शहरात आहे. वारकरी संप्रदायातील मोठे प्रस्थ गोदावरी भूषण पुरस्कारप्राप्त ... बाजीराव महाराज जवळेकर यांनी या मंदिराची उभारणी केली २५ फेब्रुवारी २०२१ या दिवशी वयाच्या ८५ व्या वर्षी याच गीता मंदिरात त्यांनी आपला देह ठेवला.

एका तीन मजली भव्य अशा वास्तूमधील या मंदिरात भगवद्‌गीतेतील तसेच कृष्णचरित्रातील अनेक प्रसंग चित्रित करण्यात आलेले आहेत. दुरूनच या मंदिराची भव्य लांबच लांब इमारत त्यावरील महाभारत युद्धातील प्रसंगांची चित्रे नजरेत भरतात. मंदिराच्या प्रवेशद्वारात उंच ओट्यावर ऐरावतांचे दोन पुतळे आहेत. दारावर विश्वरूप भगवान श्रीकृष्ण आणि त्यांच्या समोर नमनमुद्रेत बसलेल्या अर्जुनाचे भव्य चित्र लावण्यात आले आहे. प्रवेशद्वाराच्या वरच्या बाजूस शेषशायी नारायणाची प्रतिमा चित्रित केलेली आहेत. त्याच्या वरच्या मजल्यावर कुरुक्षेत्रावर अर्जुनाच्या रथाचे सारथ्य करीत असलेला श्रीकृष्ण, असा भव्य रंगीत पुतळा बसवण्यात आलेला आहे. या मंदिराच्या वरच्या दोन मजल्यांवर बाहेरच्या बाजूने बाल्कनीसदृश्य बांधकाम करण्यात आले आहे. तेथेही भिंतींवर महाभारतातील प्रसंग रंगविण्यात आले आहेत.

या प्रवेशद्वारातून पुढे आल्यावर मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. आतमध्ये चारही बाजूंनी तीन मजली इमारत आणि मध्ये मोकळे आवार अशी या मंदिराची रचना आहे. मुख्य मंदिराचे स्वरूप हे मुखमंडप, सभामंडप तळघर असे आहे. मुखमंडपाच्या घुमटाकार शिखराच्या समोरील बाजूस संत तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराज यांच्या मूर्ती आणि मधोमध भगवान व्यासांची ध्यानस्थ मूर्ती आहे. या मुखमंडपाच्या डावीकडून तळघरातील समाधीकडे जाण्यासाठी उजवीकडून बाहेर येण्याचा मार्ग आहे. मुखमंडपासमोरच्या गर्भगृहात योगेश्वर श्रीकृष्णाची सुदर्शनचक्रधारी संगमरवरी मूर्ती प्रतिष्ठापित करण्यात आलेली आहे. या गर्भगृहाच्या भिंतींवर गीतेतील श्लोक मुद्रित करण्यात आले आहेत, तर तळघरात ... बाजीराव बाबा जवळेकर यांचे समाधीस्थान असून तेथेच त्यांची शुभ्र संगमरवरी मूर्ती आहे. दररोज सकाळी ते रात्री १० वाजेपर्यंत भाविकांना या मंदिरात दर्शन घेता येते.

मंदिरास उंचच उंच सुळक्यासारखे शिखर आहे. त्यावर गणेशासह विविध देवीदेवतांच्या आणि संतांच्या मूर्ती आहेत. इमारतीतील दोन्ही मजल्यांवर अनेक खोल्या आहेत. त्या पुढे असलेल्या बाल्कनीच्या भिंती, कठडे, तसेच खांबांवरही विविध चित्रे रंगविण्यात आली आहेत. या मंदिरात सातत्याने कीर्तन, गीतापठण हरिनाम सप्ताह असे कार्यक्रम साजरे केले जातात

गीता मंदिराचे संस्थापक ... बाजीराव महाराज जवळेकर हे वारकरी संप्रदायात जवळेकर महाराज म्हणून प्रसिद्ध होते. त्यांनीच सर्वप्रथम पैठण नगरीमध्ये गोरगरिबांसाठी मोफत अन्नछत्र सुरू केले होते, ते आजही सुरू आहे. त्याचबरोबर जवळेकर महाराज आर्धांगवायू, अस्थमा यांसारख्या आजारांवर मोफत आयुर्वेदिक औषधी देत असत. पैठण येथील एकनाथ महाराज समाधी मंदिराच्या मागे असणाऱ्या गोदावरी तटावर भव्य असे मोक्षधाम व्हावे, यासाठी २००६ मध्ये जवळेकर महाराजांनी नाथ मंदिरात उपोषण केले होते. त्यांच्या त्या उपोषणाची दखल घेऊन, तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या सरकारने येथील गोदावरीच्या तीरावर मोक्षघाट उभारले. त्यामुळे या मोक्षघाटाचे जनक म्हणून जवळेकर बाबा ओळखले जातात. अयोध्येत श्रीराममंदिराची उभारणी व्हावी, यासाठी बाबांनी येथे कोट्यवधी रामनामाचा जप केला होता. त्यांना समाजभूषण, आयुर्वेदाचार्य या पुरस्कारांनीही सन्मानित करण्यात आले होते.

 

उपयुक्त माहिती:

  • पैठण बस स्थानकापासून एक किमी, तर छत्रपती संभाजीनगरपासून ५२ किमी अंतरावर
  • राज्यातील अनेक भागांतून पैठणसाठी एसटीची सेवा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
    परिसरात निवास व न्याहरीसाठी अनेक पर्याय
Back To Home