घाटशिळ मंदिर

तुळजापूर, ता. तुळजापूर, जि. धाराशिव

जळी, स्थळी, काष्ठी व पाषाणी देव पाहणारा हिंदू समाज अत्यंत श्रद्धाळू आहे. त्यामूळे तो मूर्तीत देव पाहतो. प्राणी, पक्षी, वनस्पती इतकेच काय तर दगडात सुद्धा देव पाहतो. त्यामुळेच भारतात विविध ठिकाणी झाडापानांची, नदी, तलाव, पशू पक्षांची पूजा होताना दिसते. देवाच्या कथेत अथवा संपर्कात आलेले एखादे ठिकाण किंवा वस्तू देव म्हणून पुजली जाते. असेच एक प्राचीन मंदिर तुळजापूर येथे आहे व इथे एका शिळेची पूजा होते. या मंदिरात आल्याने मनोवांच्छित फळ प्राप्त होते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. या शिळेस तुकाई नावानेही संबोधले जाते.
हे मंदिर तुळजाभवानी मंदिरास समकालीन असल्याचा जाणकारांचा अंदाज आहे. त्यामूळे ते यादवकालीन असल्याची शक्यता आहे. अठराव्या शतकात एका ब्रिटिश अधिकाऱ्याने या मंदिराचे काढलेले चित्र सध्या ब्रिटिश संग्रहालयात असल्याचेही सांगितले जाते. या मंदिराबाबत अनेक आख्यायिका जनमानसात प्रचलीत आहेत. एका अख्यायिकेनुसार प्राचीन काळी मार्कंडेय ऋषींच्या आश्रमातील गाय रानात चरून आल्यानंतर लंगडू लागली. ऋषींनी गाईचा पाय पहिला असता खुरात खडा रुतला असल्याचे त्यांना दिसले. ऋषींनी गाईच्या खूरात रुतलेला खडा काढला. पुढे हा खडा वाढत वाढत मोठ्या शिळेत रुपांतरीत झाला. आजही ही शिळा कणाकणाने वाढते, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
दुसरी आख्यायिका अशी की श्रीराम सीतेच्या शोधात फिरत असताना पार्वती माता श्रीरामाची परीक्षा घेण्यासाठी सीतेचे रूप धारण करून या शिळेवर उभी राहिली. परंतू रामाने देवीला ओळखले व तिचे चरण धरले आणि सीता कुठे आहे, असे विचारले. तेव्हा शिळेवर उभ्या असलेल्या देवीने श्रीरामाला दक्षिण दिशेला जाण्याचा सल्ला दिला.
तुळजापूर शहराच्या नैऋत्य दिशेला घाटमाथ्यावर असलेल्या या मंदिराकडे जाण्यासाठी सुमारे शंभर ते सव्वाशे पायऱ्या चढून वर यावे लागते. कोरीव पाषाणात बांधलेल्या या पायरीमार्गाच्या दोन्ही बाजूला दगडी बांधणीचे सुरक्षा कठडे आहेत. सुरक्षा कठड्यात प्रत्येक दहा फुटांवर चौकोनी स्तंभ व त्यावर गोलाकार पाषाण आहेत. पायरी मार्गाच्या सुरूवातीला दगडी बांधणीतील किल्लेवजा प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला सुमारे पाच फूट रुंदीच्या भिंती व त्यात पहारेकरी कक्ष आहेत. प्रवेशद्वारावर अर्धचंद्राकार कमान आहे. पायरीमार्गाच्या दोन्ही बाजूला डोंगरात घनदाट झाडी आहे.
पायरीमार्गाच्या मध्यांतरावर कोरीव पाषाणात बांधलेला सहा स्तंभ व सहा कमानी असलेला षट्कोनी मनोरा आहे. येथे ‘श्रीराम वनवास गमन’ असे लिहिलेला फलक आहे. हा पायरीमार्ग डोंगर माथ्यावर सपाट व वर्तुळाकार माचीपर्यंत पोहचतो. फरसबंदी माचीच्या सभोवती कोरीव पाषाणात बांधलेला बाशिंगी सुरक्षा कठडा आहे. येथून खालील घाट रस्त्याचे विहंगम दृष्य सुंदर दिसते. याशिवाय तुळजाभवानी मंदिर भक्तनिवासाकडून येथे येण्यासाठी रस्ता आहे.
माचीच्या मधोमध दगडी बांधणीचे षट्कोनी मंदिर आहे. लौकिक अर्थाने हे मंदिर नसून घडीव पाषाणातील षट्कोनी मेघडंबरी आहे. सुमारे तीन फूट उंच जगतीवर सहा चौकोनी स्तंभ, एकमेकांना चंद्रकोर कमानीने जोडलेली सहा प्रवेशद्वारे व त्यावरील छतावर उंच षट्कोनी शिखर असे या मंदिराचे स्वरूप आहे. सर्व स्तंभ काही इंच रूंद स्तंभपादावर उभे आहेत. स्तंभात प्रवेशद्वाराकडील बाजूला दीपकोष्टके आहेत. दर्शनी बाजूला प्रत्येक कमानीवर दोन्ही बाजूस दोन अशा एकूण बारा कमळ फुलांच्या नक्षी आहेत. मंदिरात जमिनीवर मधोमध विशाल स्वयंभू शिळा आहे. सहा बाजूंनी खूले असल्याने मंदिरात सर्व बाजूंनी भाविक या शिळेचे दर्शन घेऊ शकतात.
मंदिराच्या छतावर पाच थरांचे शिखर आहे. शिखराच्या पहिल्या षट्कोनी थरात स्तंभ व कमानी नक्षी आहेत. वरील तीन अष्टकोनी थरात प्रत्येकी आठ देवकोष्टके व त्यात विविध देवतांच्या मूर्ती आहेत. शिखरात शीर्षभागी आमलक व त्यावर उभ्या धारेची नक्षी आहे. आमलकावर कळस आहे.
मंदिरात चैत्र नवरात्री, शारदीय नवरात्रौत्सव, सोमवती अमावस्या, कार्तिक पौर्णिमा आदी पर्वकाळात भाविकांची गर्दी असते. नवस फेडण्यासाठी भाविक साडी चोळी, मणी मंगळसूत्र, बांगड्या, नारळ ओटी आदी वस्तू देवीस अर्पण करतात. काही भाविक नवस फेडण्यासाठी पायथ्यापासून घाटशीळ मंदिरापर्यंत गुडघ्यांवर चालून, हलगी वाजवीत येतात. मंदिरात मंगळवार, शुक्रवार आदी दिवशी भाविकांची गर्दी असते.

उपयुक्त माहिती

  • तुळजापूर बसस्थानकापासून १.२ किमी अंतरावर
  • राज्यातील अनेक शहरांतून तुळजापूरसाठी एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहरीची सुविधा आहे
Back To Home