घाटाई देवी मंदिर

घाटवण, ता. जावळी, जि. सातारा

सातारा शहरापासून पश्चिमेला असणाऱ्या प्रसिद्ध कास पठारालगत घाटवण येथील घनदाट वनराईत घाटाई देवीचे मंदिर आहे. हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेली घाटाई देवी हाकेला धावणारी नवसाला पावणारी आहे, अशी भाविकांची श्रद्धा आहे. दरवर्षी येथे होणारी यात्रा ही सातारा जिल्ह्यातील मोठ्या यात्रांपैकी एक असते. या यात्रेचे आकर्षण असते ते म्हणजे पाटण तालुक्यातील आवर्डे या गावातून सात डोंगर पार करीत येणारा मानाचा नंदी. या नंदीच्या दर्शनासाठी हजारो भाविक येथे उपस्थित असतात.

सातारा, पाटण, जावळी वाई तालुक्यांतील बहुसंख्य कुटुंबांची घाटाई देवी कुलस्वामिनी आहे. जावळी तालुक्यातील घाटवण या गावाबाहेर गर्द वनराईत देवीचे मंदिर आहे. मंदिर परिसर प्रशस्त असून काही वर्षांपूर्वी केलेल्या जीर्णोद्धारानंतर मंदिराला सध्याचे स्वरूप आले आहे. भव्य सभामंडप गर्भगृह असे मंदिराचे स्वरूप आहे. सभामंडपात बाजूबाजूला दोन नंदी स्थानापन्न असून गर्भगृहात देवीची अखंड पाषाणातील स्वयंभू मूर्ती आहे. या मंदिराच्या बाजूला वाघजाई देवीचे मंदिर गायमुख म्हणून प्रसिद्ध असलेले पाण्याचे दोन कुंड आहेत. या मंदिरापासून काही अंतरावर डोंगरात देवीचे मूळ ठाणे आहे. मंदिरापासून तेथे जाण्यासाठी पायवाट असून २० ते २५ मिनिटांत तेथे जाता येते.

घाटाई देवीचे मंदिर हे येथील यात्रेसाठी जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. दरवर्षी पौष कृष्ण चतुर्थीला देवीची भव्य यात्रा भरते. यावेळी देवीची मूर्ती सोन्याचांदीच्या दागिन्यांनी मढविली जाते. यात्रेसाठी पाटण तालुक्यातील आवर्डे येथून सासनकाठी पाठीवर भलेमोठे दोन नगारे घेऊन मानाचा नंदी देवीच्या भेटीसाठी निघतो. सात डोंगर पार करून डोंगरवाटेने ही सासनकाठी नंदी दोन दिवसांचा प्रवास करून घाटाई देवी मंदिराजवळ यात्रेच्या दिवशी सायंकाळपर्यंत येतो. संपूर्ण प्रवासात नगाऱ्यांचे वादन केले जाते. या मानाच्या नंदीचे दर्शन घेण्यासाठी हजारो भाविक उपस्थित असतात. अनेक भाविक नवसपूर्तीसाठी या नंदीच्या शिंगांना नोटांच्या माळा घालतात.

त्यानंतर सायंकाळपासून रात्री दहापर्यंत नित्रळ, सावली, रोहोट, पाटेघर, वडगाव, कुरूळ, कासाणी, आपटीमुरा, सांगवीमुरा, कुडेघर, आटाळी या गावांतून सात ते आठ सासनकाठ्या पालख्या येथे येतात. नगारा, झांज, लेझीम आदी वाद्यांच्या गजरात हजारो भाविकांसह गुलालाची उधळण करीत एक एक पालखी मंदिर परिसरात दाखल होतेत्यानंतर मानाचा नंदी त्यापाठोपाठ सर्व पालख्या मंदिराच्या सभामंडपात नेल्या जातात. असे सांगितले जाते की यावेळी नंदीच्या अंगात देवी येत असते. रात्री १२ वाजता देवीची महाआरती झाल्यानंर देवीची छबिना मिरवणूक निघते. प्रथम नंदी, त्यानंतर सासनकाठ्या त्यांच्या मागे सर्व पालख्या अशी मिरवणूक पहाटे चारपर्यंत चालते. दुसऱ्या दिवशी महानैवेद्य, महाप्रसाद आणि त्यानंतर निरोपाची मिरवणूक झाल्यानंतर येथील यात्रा सोहळा संपन्न होतो. या यात्रेसाठी सातारा जिल्ह्यातील अनेक तालुक्यांतून घाटवणसाठी एसटी महामंडळाकडून अधिक गाड्या सोडल्या जातात. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून यात्रेकरूंसाठी प्राथमिक उपचारांची सुविधाही येथे उपलब्ध करण्यात येते.

परळी, मेढा तारळे भागातील अनेक गावांत देवीचे मानकरी आहेत. पूर्वीच्या काळी देवस्थानतर्फे मानकरी गावांना मानाचे ताम्रपट दिले होते. आजही यापैकी काही गावांकडे हे ताम्रपट असल्याचे सांगितले जाते. घाटवण परिसरात देवीच्या मालकीची सुमारे ४६० एकर जमीन आहे. या जमिनीतील उत्पन्नाचा काही वाटा उत्सवासाठी देण्यात येतो. या मुख्य उत्सवाशिवाय नवरात्रीचा उत्सवही येथे मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात येतो. दर मंगळवारी शुक्रवारी देवीच्या दर्शनासाठी अनेक भाविक येथे येतात. दररोज सकाळी ते सायंकाळी पर्यंत भाविकांना या देवीचे दर्शन घेता येते.

उपयुक्त माहिती:

  • मेढ्यापासून २८ किमी, सातारा शहरापासून २८ किमी अंतरावर
  • मेढा येथून घाटवणसाठी एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत जाऊ शकतात
  • परिसरात निवास न्याहरीची सुविधा नाही
Back To Home