दापोली तालुक्यातील चंद्रनगर येथे असलेले स्वयंभू घाणेकरीण देवीचे स्थान हे पंचक्रोशीतील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. जागृत व नवसाला पावणारी, अशी देवीची ख्याती आहे. शिमगोत्सवात येथील पालख्यांसोबत केला जाणारा तमाशासदृश्य ‘गोमूचा नाच’ हे येथील आकर्षण असून त्यामध्ये राजस्थानी स्त्री वेशभूषा करून तरुण–तरुणी पारंपरिक गीतांवर नृत्य करतात. देवीचे हे स्थान सुमारे ५०० वर्षांपूर्वीचे असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
दापोली शहरापासून काही अंतरावर चंद्रनगर हे गाव आहे. या गावातील मुख्य रस्त्याला लागून घाणेकरीण देवीचे सुंदर मंदिर आहे. असे सांगितले जाते की प्राचीन काळी हे मंदिर झोपडीसारखे आणि गवताने शाकारलेले होते. मंदिराच्या भिंती नारळाच्या झावळ्यांच्या होत्या, पण मंदिराला दरवर्षी कोणत्या ना कोणत्या कारणाने आग लागत असे आणि त्यामध्ये पूर्ण मंदिर आगीच्या भक्षस्थानी पडत असे. त्यामुळे दरवर्षी नव्याने मंदिर बनवावे लागत असे. साधारणतः ३५० वर्षांपूर्वी दगडी व लाकडी खांब असलेले, मातीच्या भिंतींचे आणि कौलारू छप्पर असलेले मंदिर बांधण्यात आले. त्यानंतर पुन्हा २०१७ मध्ये झालेल्या जीर्णोद्धारानंतर सध्याचे हे भव्य मंदिर आकारास आले.
रस्त्यालगत असलेल्या मंदिराच्या कमानीवजा प्रवेशद्वारातून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. मुख्य मंदिराशिवाय प्रांगणात देवी वाघजाई व देवी कालिका ऊर्फ काळकाई यांची देवस्थाने आहेत. मंदिरासमोरील जागेत फरसबंदी असून देवीची पालखी ठेवण्यासाठी सहाण बांधण्यात आली आहे. उत्सवात पालखीची विधिवत आणि यथासांग पूजा करून देवीच्या शिमगोत्सवाची सांगता याच सहाणेवर होते. याशिवाय मंदिराच्या उजवीकडेच्या बाजूला भाविकांच्या सोयीसाठी पत्र्याची शेड उभारण्यात आली आहे. सभामंडप व गर्भगृह अशी या मंदिराची रचना आहे. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला देवीचे वाहन सिंहाच्या मूर्ती आहेत. येथून सभामंडपात प्रवेश होतो. हा सभामंडप अर्धमंडप स्वरूपाचा असून तिन्ही बाजूने भाविकांना बसण्यासाठी कक्षासने आहेत. या सभामंडपात कीर्तन–भजन, प्रवचन, हरिनाम सप्ताह आदी धार्मिक कार्यक्रम होत असतात.
गर्भगृहाच्या द्वारशाखेवर दोन्ही बाजूला चवऱ्या ढाळणाऱ्या स्त्री–प्रतिमा आहेत. गर्भगृहात घाणेकरीण देवीची काळ्या पाषाणातील प्राचीन मूर्ती आहे. मुख्य मूर्तीसह येथे देवी महामाई, मानाई यांच्याही पाषाणी मूर्ती आहेत. बापदेव, जोगेश्वरी, लिंगायतदेव ही दैवतेही आहेत. या सर्व प्राचीन आणि पाषाणी मूर्ती असल्याने त्या सुस्थितीत राहाव्यात, यासाठी गर्भगृहातील सर्व मूर्तींवर वज्रलेप चढवण्यात येतो. असे सांगितले जाते की देवीचे स्थान जमिनीत असल्यामुळे मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या वेळी तिची स्थापना चौथऱ्यावर करण्याचे ठरले होते; परंतु अनेक प्रयत्न करूनही देवीचे स्वयंभू पाषाण जागचे हालले नाही. त्यामुळे देवीचे स्थान तिच्या मूळ जागीच ठेऊन मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. गर्भगृहाभोवती प्रदक्षिणेसाठी प्रशस्त मार्ग आहे.
सध्याचे देवीचे मंदिर आरसीसीचे आहे. मंदिरात चौकोनी आणि घुमटाकार खांब असून गाभाऱ्यावर उंच शिखर व त्यावर सुंदर कळस आहे. विशेष म्हणजे या शिखरावरही वैशिष्ट्यपूर्ण नक्षीकाम असून त्यावर प्रामुख्याने देवांची आणि संतांची शिल्पे कोरलेली आहेत. सणाच्या आणि उत्सवाच्या कालावधीत देवीला सोन्याची व चांदीची रूपे (मुखवटे) लावली जातात. तसेच मंदिरातील इतर सर्व देवतांना चांदीची रूपे लावण्यात येतात. गावातील एकूण नऊ वाड्यांकडून घटस्थापनेपासून दसऱ्यापर्यंत जाखडी नृत्य व दांडीया नृत्य यांसारखे सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रम आयोजित करून देवीचा जागर केला जातो. विजयादशमीला सर्व देवतांना सोने वाटल्यानंतर देवीच्या नवरात्रोत्सवाची सांगता होते.
चंद्रनगर गावचा शिमगोत्सव पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. फाल्गुन शुद्ध पंचमीपासून देवीच्या या उत्सवाची सुरुवात होते. शिमगोत्सव काळात दोन पालख्या गावात सोबत फिरतात. पहिल्या पालखीत देवी घाणेकरीण, देवी महामाई व देवी मानाई यांच्या चांदीच्या मूर्ती असतात, तर दुसऱ्या पालखीत मुलुख भावकीची देवी वाघजाई व मिसाळ भावकीची देवी कालिका यांच्या चांदीच्या मूर्ती असतात. पालख्यांसोबत येथे होणारा तमाशासदृश्य ‘गोमूचा नाच’ हे या उत्सवाचे प्रमुख वैशिष्ट्य. त्यात येथील युवक–युवती राजस्थानी स्त्रीवेशात तमाशातील पारंपरिक गीतांवर नृत्य करतात. आजच्या आधुनिक काळातही जपलेला हा वारसा अनुभवण्यासाठी अनेक जण या उत्सवास आवर्जून भेट देतात. सरतेशेवटी शिमगोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी ‘आरधान’ हा महाप्रसादाचा विधी असतो. याचे वैशिष्ट्य असे की हा महाप्रसाद मांसाहाराचा असतो. देवीलाही मांसाहाराचाच नैवेद्य दाखवला जातो.
येथील आख्यायिका अशी की पूर्वी हा भाग घनदाट जंगलांचा होता. त्यामुळे येथे वाघांचा संचार असे. हे वाघ घाणेकरीण देवीच्या परवानगीनेच येथील एखाद्या प्राण्याची शिकार करीत असत. मात्र, एखाद्या दिवशी शिकार न मिळाल्यास वाघ मंदिराच्या पायरीवर शेपटी जोरजोरात आपटत डरकाळी फोडत असत. त्यानंतर देवी त्यांच्या शिकारीची तजवीज करीत असे.