गायमुख हनुमान
बाळापूर, ता. नागभीड, जि. चंद्रपूर
महाराष्ट्रात जवळपास प्रत्येक गावात हनुमानाचे मंदिर अथवा अन्य देवतांच्या मंदिरात हनुमानाची मूर्ती असते. हनुमान, मारुती, अंजनीसूत, पवनपुत्र, महाबली, संकटमोचन अशी या देवाची अनेक नावे आहेत; परंतु नागभीड तालुक्यात ‘सात बहिणींचा डोंगर’ या प्रसिद्ध पर्यटन स्थळापासून काही अंतरावर असलेले बाळापूर येथील हनुमान मंदिर हे ‘गायमुख हनुमान’ म्हणून प्रसिद्ध आहे. हे स्थान जागृत असून नागभीड तालुक्याचे ते ग्रामदैवत मानले जाते. हा गायमुख हनुमान नवसाला पावतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
या देवस्थानाला गायमुख हनुमान हे नाव पडण्यामागचे कारण असे की येथे एक कुंड आहे. या कुंडाच्या वरील भागात असलेल्या गायमुखातून बाराही महिने पाणी वाहत असते. कितीही कडक उन्हाळा असला तरी हा झरा निरंतर सुरूच असतो. या कुंडाजवळ असलेले स्थान म्हणून या मंदिराला ‘गायमुख हनुमान’ असे नाव पडले. चंद्रपूरमधील अनेक भाविकांचे हे श्रद्धास्थान असून येथे येणाऱ्या भाविकांच्या व पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळे महाराष्ट्र सरकारनेही या मंदिराला तीर्थक्षेत्राचा ‘क’ दर्जा देऊन या परिसराच्या विकासात हातभार लावला आहे.
मंदिराची आख्यायिका अशी की नागपूर येथील माधवराव मोखारे हे हनुमानाचे निस्सीम भक्त होते. एकदा त्यांना हनुमानाने स्वप्नदृष्टांत देऊन बाळापूर येथील जंगलात पिंपळाच्या झाडाखाली मी आहे, तेथे माझे मंदिर बांध, असे सांगितले. या दृष्टांतानुसार मोखारे यांनी या परिसरात शोध घेतला असता घनदाट जंगलातील एका मोठ्या पिंपळवृक्षाच्या खाली हनुमानाची स्वयंभू मूर्ती (शिळा) त्यांच्या नजरेस पडली. स्वप्नदृष्टांतानुसार ग्रामस्थांना सांगून त्यांनी येथील पिंपळाचे झाड हटवून मूर्तीची जागा तेथेच ठेऊन त्याभोवती मंदिर बांधले. सध्या असलेले मंदिर हे १९६५ मध्ये जीर्णोद्धार केल्याची नोंद आहे. मंदिर बांधण्याच्या आधीपासून येथे नैसर्गिक कुंड अस्तित्वात होते. १९६५ मध्ये मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या वेळी त्या कुंडाला आकार देऊन त्यात उतरण्यासाठी बाजूने पायऱ्या करण्यात आल्या.
याशिवाय हनुमान मंदिरासमोर आणखी २ मोठी कुंडे असून त्यापैकी एक पुरुषांसाठी, तर दुसऱ्या कुंडाचा वापर स्त्रियांना स्नान करण्यासाठी केला जातो.
नागभीड–सिंदेवाही मार्गावर असलेल्या तळोधी गावापासून बाळापूर येथे जाण्यासाठी मार्ग आहे. बाळापूर गावाच्या वेशीवर एका डोंगराच्या पायथ्याशी हे मंदिर आहे. एका कमानीतून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. कमानीजवळ अनेक पूजासाहित्याची दुकाने आहेत. या मंदिर परिसराला तटबंदी आहे. येथील मंदिर मध्यम आकाराचे असले तरी हा परिसर प्रशस्त आहे. या संपूर्ण परिसरात फरसबंदी असून यामध्ये धर्मशाळा, भाविकांना जेवण बनविण्यासाठी अनेक खोल्या, स्त्री व पुरुषांना स्नान करण्यासाठी स्वतंत्र कुंड, कपडे बदलण्यासाठी खोल्या व भाविकांना बसण्यासाठी अनेक बाकांची
व्यवस्था करण्यात आलेली आहे. निसर्गसमृद्ध वातावरणात असलेल्या या मंदिर परिसरात भाविकांबरोबरच दररोज पर्यटकांचीही वर्दळ असते.
सभामंडप व गर्भगृह असे गायमुख हनुमान मंदिराचे स्वरूप आहे. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर या मंदिराचा जीर्णोद्धार कधी झाला त्याची नोंद आहे. सभामंडप मोकळा असून गर्भगृहात हनुमानाची मूर्ती नसून सुमारे ५ फूट उंचीची शेंदूरचर्चित शिळा आहे. घरात कोणतेही शुभकार्य असेल तर पंचक्रोशीतील नागरिक पहिले आमंत्रण या गायमुख हनुमानाला देतात. शेतातील पेरणी असो वा कापणी, प्रत्येक कामाच्या आधी येथे येऊन या गायमुख कुंडाच्या तीर्थाने शिरा बनवून त्याचा देवाला नैवेद्य दाखविला जातो. त्यानंतर शेतातील कामे सुरू केली जातात. कोणतेही कार्य अथवा घरात नवीन अवजार घेतल्यानंतर या मंदिर परिसरात येऊन जेवण बनवून या देवाला नैवेद्य दाखविण्याची प्रथा आहे. त्यामुळे वर्षातील बाराही महिने अनेक कुटुंबे येथे येऊन जेवण व प्रसाद बनवत असतात. त्यासाठी मंदिर संस्थानातर्फे या भाविकांसाठी अनेक खोल्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. दरवर्षी मकर संक्रांतीच्या दिवशी येथे मोठी यात्रा भरते. त्यावेळी दूरवरून भाविक येथे दर्शनासाठी येत असतात.
ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, गायमुखातून येथील कुंडात सतत पाणी येत असते. या पाण्याचा वेगही जास्त आहे; परंतु कितीही पाणी आले तरीही कुंड भरून वहात नाही. कुंडातून पाणी बाहेर जाण्यासाठी कोणताही झरा अथवा नाला अशी सोय नाही. सुमारे ५० वर्षांपूर्वी या कुंडाच्या बाजूने खोलवर खोदकाम करून हे पाणी कोठे जाते याचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला होता; परंतु त्याचा शोध लागलेला नाही. कदाचित कुंडाच्या खालच्या बाजूला असलेल्या पोकळीतून हे पाणी जमिनीतील एखाद्या झऱ्याला मिळत असावे, असा अंदाज बांधला जातो. या कुंडातील पाणी येथे येणारे भाविक व पर्यटक पिण्यासाठी वापरतात.
उपयुक्त माहिती:
- तळोधी गावापासून ७ किमी, तर नागभीडपासून १९ किमी अंतरावर
- नागभीड व सिंदेवाही येथून एसटीची सुविधा
- खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत जाऊ शकतात
- मंदिर परिसरात निवास व न्याहरीची सुविधा नाही


