गौतमेश्वर महादेव मंदिर

गोमेधर, ता. मेहकर, जि. बुलडाणा

प्राचीन काळी दंडकारण्याचा भाग मानल्या जाणाऱ्या मेहकर तालुक्यात, येथील पर्वतरांगांमध्ये सप्तर्षींनी तपश्चर्या करून महादेवांच्या शिवलिंगांची स्थापना केली. यांपैकी गौतम ऋषींनी स्थापन केलेले शिवलिंग गोमेधर येथे आहे. गर्द हिरव्यागार झाडीमध्ये, जवळून खळाळून वाहणाऱ्या नदीच्या पात्राजवळ हे मंदिर वसले आहे. श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारी हजारो भाविक मेहकर तालुक्यात सप्तर्षींनी स्थापन केलेल्या सातही मंदिरांची परिक्रमा करतात. वडळी ते विश्वीदरम्यानच्या ४५ किमी अंतराच्या या परिक्रमेत गौतमेश्वर मंदिराला तिसरे स्थान आहे. या प्राचीन मंदिरात महाशिवरात्रीच्या उत्सवादरम्यान होणारा शिव-पार्वतीचा विवाह सोहळा विशेष प्रसिद्ध आहे.

वैदिक परंपरेतील श्रेष्ठ तपस्वी आणि ‘सप्तर्षीं’पैकी एक म्हणून महर्षी गौतम यांची ओळख आहे. ब्रह्मदेवाचे मानसपुत्र आणि अंगिरस ऋषींचे वंशज असलेल्या गौतमांचा विवाह ब्रह्मदेवाचीच मानसकन्या असलेल्या अहिल्येशी झाला होता. महर्षी गौतमांचे वास्तव्य प्रामुख्याने दंडकारण्यात होते, असे पुराणांत कथित आहे. महान विचारवंत म्हणूनही गौतम ऋषी यांचे स्थान अढळ आहे. भारतीय तत्त्वज्ञानातील ‘न्यायदर्शना’चे प्रणेते म्हणून त्यांना ओळखले जाते. तसेच ‘गौतम धर्मसूत्रे’ या ग्रंथाची रचनाही त्यांनीच केली. रामायणात त्यांच्या शापाने शिळा बनलेल्या अहिल्येचा उद्धार श्रीरामांनी केल्याचा प्रसंग आहे.

शिवपुराणातील कथेनुसार, गोहत्येच्या कलंकातून मुक्ती मिळवण्यासाठी त्यांनी भगवान शंकराची कठोर तपश्चर्या केली. त्यांच्या भक्तीला प्रसन्न होऊन महादेवांनी आपल्या जटेतील गंगेला येथे अवतीर्ण होण्याचा आदेश दिला. हीच ती दक्षिण गंगा अर्थात ‘गोदावरी’ नदी होय. या पवित्र प्रवाहाने केवळ गौतम ऋषींचे पापच धुतले नाही, तर अवघ्या जनसामान्यांचा उद्धार केला. त्यानंतर गौतम ऋषींनी ध्यान व तपश्चर्या करण्यासाठी दंडकारण्याची निवड केली. गोमेधर येथील गर्द वनराईत त्यांनी तप केले आणि येथेच शिवलिंगाची प्रतिष्ठापना केली. अकराव्या-बाराव्या शतकात येथे हेमाडपंती स्थापत्यशैलीत मंदिर बांधण्यात आले. येथे अनेक तपस्वींचा वास होता. कालौघात हे मंदिर जीर्ण झाले. मूळ मंदिराचा १९६९ मध्ये जीर्णोद्धार करण्यात आला. या मंदिराचा उल्लेख ‘सेंट्रल प्रॉव्हिन्सेस अँड बेरार डिस्ट्रिक्ट गॅझेटियर्स – अकोला डिस्ट्रिक्ट, व्हॉल्यूम ए’ मध्ये आढळतो. पुढे १९७५ मध्ये येथे धर्मशाळा बांधण्यात आल्या. काही वर्षांपूर्वी या मंदिराचा नव्याने जीर्णोद्धार करण्यात आला. त्यानंतर या वास्तूला सध्याचे स्वरूप प्राप्त झाले.

प्राचीन काळी मेहकर हा दंडकारण्याचा भाग होता. त्रेतायुगात वनवासादरम्यान श्रीराम, सीतामाता व बंधू लक्ष्मण यांच्यासह या दंडकारण्यातून गेले होते. या दंडकारण्यातील दऱ्या-खोऱ्यांमध्ये अनेक तपस्वींनी तप केले. बकदालभ्य, वाल्मीकी, वसिष्ठ, गौतम, पाराशर, दुर्वास आणि विश्वामित्र या सप्तर्षींनीही येथे तप करून महादेवाच्या शिवलिंगांची प्रतिष्ठापना केली. बकदालभ्य ऋषींनी देळप, वाल्मीकी ऋषींनी वरवंड, वसिष्ठ ऋषींनी वडाळी, गौतम ऋषींनी गोमेधर, पाराशर ऋषींनी पाथर्डी, दुर्वास ऋषींनी दुर्गबोरी तर विश्वामित्र ऋषींनी विश्वी येथे तप करून शिवलिंग स्थापन केले. जिल्ह्यातील भाविकांमध्ये या मंदिरांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. श्रावण महिन्यात शिवशंकरांची आराधना केल्यास सुख-समृद्धी प्राप्त होते, अशी हिंदू धर्मामध्ये मान्यता आहे. त्यामुळे श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारी जिल्ह्यातील हजारो भाविक या सातही मंदिरांची परिक्रमा करतात. अनेक वर्षांपासून ही परंपरा अविरत सुरू आहे.

श्रावण महिन्यातील तिसऱ्या रविवारी रात्री परिक्रमावासी वडाळी येथील शिवमंदिरात एकत्र येतात. मध्यरात्री १२ च्या सुमारास तेथील गोमुखाखाली स्नान करून महादेवाला जलाभिषेक केल्यानंतर ओल्या अंगाने या परिक्रमेला प्रारंभ होतो. विश्वी येथील मंदिरात शिवलिंगाचे दर्शन झाल्यावर या परिक्रमेचा समारोप होतो. सोमवारी सूर्योदयापूर्वी ही परिक्रमा पूर्ण करावी लागते. या सातही ठिकाणी गोमुखांमधून जलधारा कोसळत असतात. या धारांखाली स्नान केल्यास अभ्यंगस्नानाचे पुण्य मिळते, अशी भाविकांची श्रद्धा आहे.

गावातील मंदिराच्या कमानीपासून काही अंतरावर हे मंदिर आहे. मंदिराच्या बाजूने नदी वाहते. मंदिरासमोर पेव्हर ब्लॉकची फरसबंदी असलेले मोठे प्रांगण आहे. प्रांगणात दगडी दीपस्तंभ आहे. मंदिराभोवती असलेल्या आवारभिंतीतील दुमजली प्रवेशद्वारातून मंदिराच्या आतील प्रांगणात प्रवेश होतो. प्रांगणात असलेल्या नंदीमंडपात अखंड काळ्या पाषाणातील नंदीमूर्ती आहे. ओसरीसदृश अर्धखुला मंडप, सभामंडप व गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. सभामंडपाच्या प्रवेशद्वाराच्या ललाटबिंबावर गणेशमूर्ती आहे. भाविकांच्या रांगांचे व्यवस्थापन करण्यासाठी सभामंडपात स्टेनलेस स्टीलचे कठडे बसवण्यात आले आहेत. गर्भगृहात मोठ्या शाळुंकेमध्ये लंबवर्तुळाकार पाषाणात घडवलेले शिवलिंग आहे. या दगडी शाळुंकेवर पंचधातूचा पत्रा बसवण्यात आलेला आहे. त्यावर नाग, शिव-पार्वतीचा मुखवटा तसेच शंख कोरलेले आहेत. उत्सवाच्या वेळी या शिवलिंगावर शिवशंकरांचा पंचमुखी मुखवटा ठेवला जातो. मंदिराबाहेर प्रांगणात अखंड धुनी प्रज्ज्वलित असते. मंदिर परिसरात याआधी सेवा करणाऱ्या काही पुजाऱ्यांच्या समाध्या आहेत. काही पावलांवरच असलेल्या छोट्या मंदिरात गणेशमूर्ती तसेच शिवलिंग आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारासमोरील प्रांगणात येथे सेवा करणारे लक्ष्मणपुरी महाराज व शिवपुरी महाराजांची समाधिस्थाने आहेत.

मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या गोमुख कुंडाकडे जाण्यासाठी दगडी पायरीमार्ग आहे. या वाटेवर धर्मशाळा आहेत. शेगाव येथील गजानन महाराज मंदिरात जाणाऱ्या अनेक दिंड्या येथे मुक्कामी असतात. येथे मंदिर संस्थानाने भाविकांसाठी बांधलेले स्वयंपाकगृहही आहे. पायऱ्या उतरून आल्यावर गोमुख कुंड लागते. येथील गोमुखातून सतत जलधारा कोसळत असते. येथून काही अंतरावर नदीपात्र ओलांडल्यानंतर आणखी एक गोमुख कुंड आहे. भाविक या कुंडामध्येही स्नान करतात.

महाशिवरात्र हा येथील प्रमुख उत्सव असतो. त्यानिमित्त येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. अनेक भाविकांच्या उपस्थितीत रात्री शिव-पार्वती विवाह सोहळा होतो. या सोहळ्याचे साक्षीदार असलेले अनेक भाविक त्या रात्री सहपरिवार येथे मुक्कामी राहतात. अनेक भाविक शेतातील नवीन गव्हाचा नैवेद्यही येथील महादेवाला अर्पण करतात. दुसऱ्या दिवशी भाविकांना सुमारे ५० क्विंटल गव्हाची पुरी आणि वांग्याच्या भाजीचा महाप्रसाद देण्यात येतो. येथे लक्ष्मणपुरी महाराजांची पुण्यतिथी व गुरुपौर्णिमेनिमित्तही अनेक कार्यक्रम होतात. शारदीय नवरात्रोत्सवादरम्यान नवमीच्या दिवशी येथे होम-हवन केले जाते. उन्हाळ्याच्या सुटीत येथे बालसंस्कार शिबिरांचेही आयोजन केले जाते.

उपयुक्त माहिती:

  • मेहकर येथून २६ किमी अंतरावर
  • बुलडाणा येथून ८८ किमी अंतरावर
  • मेहकर येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवासाची सुविधा आहे
  • संपर्क : पुजारी, मो. ८८८८३५५१८७

गौतमेश्वर महादेव मंदिर

गोमेधर, ता. मेहकर, जी. बुलढाणा

Back To Home