बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यात सप्तर्षींची सात मंदिरे आहेत. बुलडाणा जिल्ह्याचे हे वेगळेपण समजले जाते. ही सर्व मंदिरे प्राचीन असून ती डोंगराळ भागात वसलेली आहेत. या सर्व मंदिरांजवळ जिवंत पाण्याचे झरे आहेत. यांमध्ये वडाळी येथील वशिष्ठ ऋषी, देळप येथील बकदालभ्य ऋषी, गोमेधर येथील गौतम ऋषी, वरवंड येथील वाल्मिक ऋषी, पाथर्डी येथील पराशर ऋषी, दुर्गबोरी येथील दुर्वास ऋषी आणि विश्वी येथील विश्वामित्र ऋषी मंदिर यांचा समावेश होतो. यापैकी बकदालभ्य ऋषी मंदिर देळप आणि उटी या गावांच्या सीमेवर वसलेले आहे. बकदालभ्य ऋषींनी स्थापन केलेल्या येथील शिवपिंडीचा आकार चौकोनी आहे. या मंदिरालगत असलेल्या ‘ओलांडा’ या स्थानावरील औदुंबर वृक्षाजवळ बसून व्यक्त केलेल्या इच्छा पूर्ण होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
बकदालभ्य ऋषी हे भारतीय ऋषी परंपरेतील एक अत्यंत महत्त्वाचे आणि प्रभावशाली नाव आहे. वेदकाळापासून ते महाभारतापर्यंतच्या विविध कालखंडांत त्यांचा उल्लेख आढळतो. ‘दाल्भ्य’ हे त्यांचे गोत्र आणि ‘बक’ हे त्यांचे नाव मानले जाते. म्हणूनच त्यांना ‘बक दाल्भ्य’ किंवा ‘बकदालभ्य’ असे संबोधले जाते. छांदोग्य उपनिषदामध्ये (अध्याय १, खंड १२) बकदालभ्य ऋषींचा उल्लेख आहे. त्यानुसार एकदा बकदालभ्य ऋषी एका निर्जन स्थानी वेदाध्ययन करत असताना त्यांना एका श्वानाच्या रूपात एका देवतेने दर्शन दिले. त्यानंतर इतर अनेक श्वान तिथे आले आणि त्यांनी अन्नासाठी प्रार्थना केली. तेव्हा मुख्य श्वानाने (देवतेने) त्यांना ‘ओंकार’ आणि सामवेदाचे गायन कसे करावे, याचे ज्ञान दिले. महर्षी व्यासकृत ‘महाभारता’त बकदालभ्य ऋषींचा उल्लेख अनेक ठिकाणी येतो. विशेषतः ‘वनपर्वा’त पांडव वनवासात असताना बकदालभ्य ऋषींनी युधिष्ठिराची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी युधिष्ठिराला अत्यंत मोलाचा उपदेश केला. ते म्हणतात, ‘जेव्हा ब्राह्मण आणि क्षत्रिय एकत्र येऊन कार्य करतात, तेव्हाच राज्याचा आणि धर्माचा अभ्युदय होतो.’ तसेच, ‘शल्यपर्वा’त एका प्रसंगाचा उल्लेख आहे. धृतराष्ट्राने एकदा बकदालभ्य ऋषींचा अपमान केला होता. त्यामुळे क्रोधाविष्ट होऊन ऋषींनी एक असा यज्ञ सुरू केला की ज्यामुळे कुरुवंशाचा नाश होऊ लागला असता. हे समजताच धृतराष्ट्राने त्यांची क्षमा मागून त्यांना शांत केले. यावरून बकदालभ्य ऋषींचे सामर्थ्य आणि त्यांचा कोप किती प्रभावी होता, याची प्रचिती येते.
‘पद्म पुराणा’च्या उत्तरखंडात आणि ‘स्कंद पुराणा’त श्रीराम आणि बकदालभ्य ऋषी यांच्या भेटीचा वृत्तांत आहे. रावणाने सीताहरण केल्यानंतर श्रीरामांनी लंकेला जाण्याचा निश्चय केला. ते विशाल वानर सैन्यासह कनिष्ठ बंधू लक्ष्मणासोबत समुद्रकिनारी पोहोचले. मात्र, लाखो जलचर जीवांचा वास असलेला हा समुद्र पार कसा करणार, हा प्रश्न त्यांना पडला. त्यावर, ‘येथून जवळच साक्षात ब्रह्मदेवांनी दर्शन दिलेल्या बकदालभ्य ऋषींचा आश्रम आहे. तेच आपल्याला यावरील उपाय सांगतील,’ असे लक्ष्मण म्हणाला. त्यानुसार ते दोघे बकदालभ्य ऋषींच्या आश्रमात गेले. ऋषींनी त्यांना ‘विजया एकादशी’चे व्रत करण्यास सांगितले. ‘हे व्रत केल्यास तुम्ही आपल्या सैन्यासह हा विशाल समुद्र पार करू शकाल. तसेच रावणाविरुद्धच्या युद्धातही तुमचा विजय होईल,’ असे बकदालभ्य ऋषींनी त्यांना सांगितले. त्यानुसार केलेल्या व्रतानंतर श्रीरामांनी लंकेत जाऊन रावणावर विजय मिळविला होता. हे व्रत आणि त्याचे माहात्म्य बकदालभ्य ऋषींच्या नावानेच पुराणांमध्ये प्रसिद्ध आहे.
याच बकदालभ्य ऋषींनी प्राचीन काळी अजिंठा पर्वतरांगेत वसलेल्या मेघंकर (आताचे मेहकर) परिसरातील दंडकारण्यात तप केले. त्यावेळी त्यांनी येथे शिवलिंगाची प्रतिष्ठापना केली होती. कालांतराने या ठिकाणी मंदिर उभारण्यात आले. काही वर्षांपूर्वी झालेल्या जीर्णोद्धारानंतर मंदिराला सध्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
मंदिराच्या मुख्य कमानीपासून काही अंतरावर मंदिर आहे. नगारखानासदृश प्रवेशद्वारातून आत आल्यावर मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. येथे दोन मंदिरे आहेत. त्यापैकी पहिल्या मंदिरात श्रीकृष्ण व सप्तर्षींचे स्थान आहे आणि शेजारी असलेल्या दुसऱ्या मंदिरात बकदालभ्य ऋषींनी स्थापन केलेली शिवपिंडी आहे. सभामंडप व गर्भगृह तसेच गर्भगृहाच्या खाली सप्तर्षींचे स्थान, अशी येथील मुख्य मंदिराची संरचना आहे. सहा पायऱ्या चढून उंच अधिष्ठानावर असलेल्या या मंदिराच्या सभामंडपात प्रवेश होतो. सभामंडपात पुढील बाजूस गर्भगृह आहे. या गर्भगृहात बासरी वाजविणाऱ्या श्रीकृष्णाची संगमरवरी मूर्ती आहे. मूर्तीमागे गोमातेचे शिल्प आहे. या गर्भगृहाच्या मागील बाजूने तळघरात जाण्यासाठी पायरी मार्ग आहे. येथून दहा ते बारा पायऱ्या उतरून तळघरातील गर्भगृहात प्रवेश होतो. गर्भगृहातील मोठ्या वज्रपीठावर सप्तर्षींच्या संगमरवरी मूर्ती आहेत. मंदिराला लागूनच महादेवाचे मंदिर आहे. या मंदिरासमोर प्रांगणात नंदीमंडप आहे. मंदिराची रचनाही सभामंडप व प्रदक्षिणा मार्ग सोडून गर्भगृह अशी आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर गणेशाचे शिल्प आहे. गर्भगृहात मोठ्या शाळुंकेमध्ये चौकोनी आकाराचे शिवलिंग आहे. शाळुंकेवर पितळी पत्र्याचे आवरण आहे.
मंदिर परिसरात वडाची अनेक झाडे आहेत. बकदालभ्य ऋषींनी वडाची पाने डोक्यावर ठेवून येथे तप केले होते, अशी आख्यायिका आहे. प्रांगणात असलेल्या नंदीमंडपाच्या मागील बाजूने पायऱ्या उतरून गोमुखापर्यंत येता येते. या गोमुखातून बाराही महिने अविरत जलधारा कोसळत असते. या गोमुखातून बाहेर पडणारे पाणी खालील कुंडात जमा होते. श्रावण महिन्यात होणाऱ्या सप्तर्षी मंदिर परिक्रमेदरम्यान शेकडो भाविक या पवित्र जलाने स्नान करून शिवलिंगाचे दर्शन घेतात. या कुंडातील जल भूमिगत मार्गाने काही पावलांवर असलेल्या अन्य एका कुंडात जमा होते. येथून काही पावलांवर ‘ओलांडा’ नावाचे स्थान आहे. येथे एका चौथऱ्यावर नंदी व शिवलिंगाचे दर्शन होते. येथे असलेल्या औदुंबराच्या झाडाजवळ काही वेळ बसून भाविक मनातील इच्छा व्यक्त करतात.
या मंदिरात शेकडो भाविक दर्शनासाठी येतात. भाविक येथील महादेवाला रोडग्यांचा नैवेद्य अर्पण करतात. महाशिवरात्र हा येथील प्रमुख उत्सव असतो. येथे रामनवमीचा उत्सवही मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारी होणाऱ्या परिक्रमेदरम्यान हजारो भाविक ‘हर हर महादेव’च्या जयघोषात येथील शिवलिंगाचे दर्शन घेतात. या मंदिरापासून काही अंतरावरच उटी येथे निसर्ग पर्यटन केंद्र आहे. जवळच एक झुलता पूल आहे, त्याला ‘ऋषी झुला’ असेही म्हणतात.