गौतम ऋषी मंदिर

आसरखेडा, ता. बदनापूर, जि. जालना

वसिष्ठ, विश्वामित्र, कश्यप, भारद्वाज, अत्रि, जमदग्नि आणि गौतम यांना ऋषीसमूहातील’सप्तर्षी’ म्हटले जाते. यातील गौतम ऋषींशी संबंधित आख्यायिका व पुराणकथा लोकजीवनाशी खोलवर जोडल्या गेलेल्या आहेत. या कथा लोकगीतांच्या माध्यमातून लोकसंस्कृतीचा भाग बनल्या आहेत. जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यात असलेल्या आसरखेडा गावाजवळ गौतम ऋषींचे एक प्राचीन व प्रसिद्ध मंदिर आहे. वैदिक काळाचा महिमा अधोरेखित करणाऱ्या या मंदिरात वर्णभेद नाकारणाऱ्या वारकरी संप्रदायाच्या प्रथा आणि परंपरा जोपासल्या जातात. गौतम ऋषींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या क्षेत्रात दर्शन घेतल्याने सर्व मनोरथ पूर्ण होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे.

आधुनिक काळात या मंदिराचा जीर्णोद्धार झाला असला तरी हे स्थान हजारो वर्षे प्राचीन असल्याच्या आख्यायिका प्रचलित आहेत. पुराणकथांच्या संदर्भांनुसार वैदिक काळात ‘दंडकारण्य’ असलेल्या या क्षेत्रात गौतम ऋषींनी दीर्घकाळ तपसाधना केली होती. त्यामुळे या भागाला ‘तपोभूमी’ म्हणून विशेष ओळख मिळाली आहे. गौतम ऋषींचा काळ रामायण काळाशी जोडणारी एक पुराणकथा येथे प्रसिद्ध आहे. या कथेनुसार देवांचे राजे इंद्राची नजर गौतम ऋषींच्या पत्नीवर म्हणजेच अहिल्येवर पडली. अहिल्येचा उपभोग घेण्याच्या उद्देशाने इंद्राने एका मायावी कोंबड्याची निर्मिती केली. त्या कोंबड्याने मध्यरात्रीच आरवून पहाट झाल्याचा आभास निर्माण केला. पहाट झाली असे वाटून गौतम ऋषी नित्यकर्मासाठी नदीवर स्नानासाठी गेले. ही संधी साधून इंद्राने गौतम ऋषींचे रूप धारण केले. त्याने कुटीत प्रवेश करून अहिल्येचा उपभोग घेतला.

नदीपात्रात पोहोचल्यावर अजून पहाट झाली नव्हती. त्यामुळे नदीने ऋषींना पात्राला स्पर्श करू नये, असे सांगून परत पाठवले. त्यामुळे गौतम ऋषी तातडीने कुटीत परत आले. तेथे आपली पत्नी अहिल्या आणि इंद्र एकत्र दिसल्याने ऋषी क्रोधित झाले. त्यांनी इंद्राला देहभर सहस्र भग पडण्याचा शाप दिला. त्याचबरोबर आपली पत्नी अहिल्येला पतिव्रताधर्म भ्रष्ट झाल्याच्या गैरसमजातून शिळा होऊन पडण्याचा शाप दिला. पुढे प्रभू श्रीरामाच्या पदस्पर्शाने अहिल्या या शापातून मुक्त झाली. या रामायण कालखंडाशी त्यांचा आणखी एक महत्त्वाचा संदर्भ जोडलेला आहे. गौतम ऋषींचे पुत्र शतानंद हे रामायण काळात मिथिलाधिपती राजा जनकाचे मुख्य पुरोहित होते.

गोदावरी अथवा गौतमी नदीच्या उत्पत्तीची कथाही गौतम ऋषींशी जोडलेली आहे. एकदा गौतम ऋषींच्या हातून अनवधानाने गोहत्या झाली होती. त्या पापक्षालनासाठी स्वर्गातील गंगेचे जल आवश्यक आहे, असा सल्ला ऋषींना मिळाला. त्यानुसार गौतम ऋषींनी त्र्यंबकेश्वर येथे शिवपिंडीची स्थापना केली. त्यांनी महादेवाची कठोर आराधना सुरू केली. त्यांच्या भक्तीने महादेव प्रसन्न झाले. महादेवांनी गोदावरी नदीच्या रूपात स्वर्गातील गंगा पृथ्वीवर आणली. या नदीच्या तीर्थात स्नान केल्यानंतर गौतम ऋषी पापमुक्त झाले. वेदांमधील अनेक महत्त्वाची सूक्ते आणि प्रकरणे गौतम ऋषींनी रचली असल्याचे सांगण्यात येते. विशेषतः ‘ऋग्वेद’ ग्रंथाच्या पहिल्या आणि चौथ्या मंडलातील अनेक सूक्तांचे द्रष्टे म्हणून गौतम ऋषी आणि त्यांच्या राहुगण आदी वंशजांचा स्पष्ट उल्लेख आढळतो.

पौराणिक कथांच्या पलीकडे जाऊन त्यांचा वाङ्मयीन वारसा ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचा मानला जातो. भारतीय तत्त्वज्ञानातील ‘न्यायदर्शन’ या शाखेचे जनकत्व गौतम ऋषींकडे जाते. त्यांनी ‘न्यायसूत्रे’ या प्रसिद्ध ग्रंथाची रचना करून तर्कशास्त्र आणि प्रमाणशास्त्राचा पाया घातला. याच कारणामुळे त्यांना ‘अक्षपाद गौतम’ या नावानेही ओळखले जाते. यासोबतच, प्राचीन भारतीय न्यायव्यवस्थेचा आणि आचारसंहितेचा महत्त्वाचा पाया मानल्या जाणाऱ्या ‘गौतम धर्मसूत्र’ या ग्रंथाची रचना त्यांनीच केली. हे सूत्र उपलब्ध चारही प्रमुख धर्मसूत्रांपैकी सर्वात प्राचीन मानले जाते. यामध्ये मानवी कर्तव्ये, राजाचे नियम, संस्कार आणि तत्कालीन सामाजिक व्यवस्थेचे प्रत्यक्ष ऐतिहासिक संदर्भ समाविष्ट आहेत.

आसरखेडा गावापासून काही अंतरावर असलेल्या या मंदिराच्या प्रवेशद्वारापर्यंत येण्याकरिता पक्का रस्ता आहे. या संपूर्ण मंदिराला दगडी तटबंदीने वेढलेले आहे. या तटबंदीमध्ये एक दुमजली प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वाराच्या वरील मजल्यावर नगारखान्याची रचना केलेली आहे. प्रवेशद्वाराच्या छतावर घुमटाकार अशी तीन शिखरे आहेत. प्रवेशद्वाराच्या समोर असलेल्या एका उंच चबूतऱ्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा स्थापित आहे.

सभामंडप आणि गर्भगृह अशी या मंदिराची रचना आहे. अर्धखुल्या स्वरूपाच्या सभामंडपाच्या बाह्य बाजूला एक कठडा बांधलेला आहे. सभामंडपाच्या छताला भाविकांनी अर्पण केलेल्या पितळी घंटा टांगलेल्या आहेत. सभामंडपातील कठडा आणि छत यांच्या दरम्यान लोखंडी जाळ्या लावलेल्या आहेत. या जाळ्यांमुळे हा सभामंडप सुरक्षित आणि बंदिस्त झालेला आहे. सभामंडपाच्या पुढे लोखंडी जाळीदार कठडे लावून अंतराळाची जागा उभारण्यात आलेली आहे. या अंतराळाच्या पुढे मंदिराचे अष्टकोनी गर्भगृह आहे. या गर्भगृहात शेकडो वर्षे जुना विशाल वटवृक्ष आहे. असे सांगितले जाते की याच वटवृक्षाखाली बसून गौतम ऋषी तपसाधना करीत असत. या वटवृक्षाभोवती एक मोठा पार बांधलेला आहे. या पारावर गौतम ऋषी, दत्तात्रेय, समर्थ रामदास स्वामी आणि इतर देवीदेवतांच्या मूर्ती प्रतिष्ठित आहेत. गर्भगृहाचे छत एका बाजूने उघडे ठेवलेले आहे. हा वटवृक्ष छतातून थेट वर गेलेला आहे. मंदिराच्या बाह्य बाजूने प्रदक्षिणामार्ग तयार केलेला आहे. गर्भगृहाच्या छतावर वटवृक्षाच्या हिरव्यागार फांद्यांचे एक नैसर्गिक शिखर तयार झालेले येथे पाहायला मिळते.

मंदिराच्या जवळच प्रांगणामध्ये संतोषी मातेचे एक लहान मंदिर आहे. मंदिराच्या गर्भगृहामध्ये संतोषी मातेची मूर्ती आहे. संतोषी माता मंदिराच्या बाजूला अगदी अशाच प्रकारची रचना केलेले गंगामाता मंदिर आहे. या गंगामाता मंदिराच्या शेजारी शनिदेवाचे मंदिर आहे. मंदिराच्या परिसरामध्ये देवस्थानचे कार्यालय, पुजाऱ्यांची निवासस्थाने, भाविकांसाठी अन्नछत्र आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी सभागृहाची उभारणी करण्यात आलेली आहे.

भाद्रपद शुद्ध पंचमी म्हणजेच ऋषीपंचमी हा दिवस येथील वार्षिक उत्सव म्हणून साजरा केला जातो. या उत्सवाच्या वेळी मंदिर परिसरात मोठी जत्रा भरते. याशिवाय मंदिरात फाल्गुन वद्य अष्टमीपासून ते गुढीपाडव्यापर्यंत सात दिवसांचा हरिनाम सप्ताह आयोजित केला जातो. या सप्ताहाच्या काळात परिसरातील नामवंत कीर्तनकार आणि भजनी बुवांची भजने तसेच कीर्तने सादर केली जातात. या काळात मंदिरात भाविकांसाठी अखंड महाभोजनाचे कार्यक्रम चालतात. दर महिन्याला येणाऱ्या पौर्णिमा आणि अमावस्येला मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी होते. येथे गुढीपाडवा, हनुमान जयंती, रामनवमी, शारदीय नवरात्र, दसरा आणि दिवाळी हे सर्व सण व उत्सव भक्तीभावाने साजरे केले जातात. या वेळी संपूर्ण परिसरातील हजारो भाविक दर्शनासाठी आवर्जून येतात. भाविकांना दर्शन घेण्यासाठी हे मंदिर २४ तास खुले असते.

उपयुक्त माहिती

  • बदनापूर येथून ३८ किमी अंतरावर
  • जालना येथून २२ किमी अंतरावर
  • बदनापूर व जालना येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहारीची सुविधा आहे
  • संपर्क : काकासाहेब खैरे, मो. ९८६०८८२९६३

गौतम ऋषि मंदिर

असरखेड़ा, बदनापुर, जिला. जलना

Back To Home