थाडेश्वर महादेव मंदिर

श्रीकृष्णनगर, जालना, ता. जि. जालना

ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेले जालना शहर हे धार्मिक दृष्टीने महत्त्वाचे स्थान आहे. या शहरात आणि परिसरात प्राचीन व ऐतिहासिक मंदिरांची मोठी मालिका पाहायला मिळते. त्यांत जालन्यातील चारशे वर्षे प्राचीन व तळघरात स्वयंभू मूर्ती असलेले पंचमुखी हनुमान मंदिर, मोंढा परिसरातील हेमाडपंती स्थापत्यशैलीचे ढवळेश्वर महादेव मंदिर, जुन्या जालन्यातील अमृतेश्वर महादेव मंदिर आणि भोकरदन तालुक्यातील सुमारे हजार वर्षे प्राचीन असलेले कोदेश्वर महादेव मंदिर इत्यादी देवालयांचा समावेश होतो. याच मंदिरांच्या श्रेणीमध्ये जालना शहरातील श्रीकृष्णनगर परिसरातील थाडेश्वर महादेव मंदिर हे एक प्राचीन व ऐतिहासिक मंदिर म्हणून विशेष प्रसिद्ध आहे.

थाडेश्वर महादेव मंदिराच्या निर्मितीबाबतची आख्यायिका अशी की पूर्वी कुंडलिका नदीच्या काठावर असलेल्या या शांत व निसर्गरम्य परिसरात थाडेश्वरनाथ नावाचे एक नाथपंथीय साधू राहत होते. ते येथे राहून नेहमी महादेवाची आराधना करत असत. जप, तप आणि ध्यानधारणेमध्ये ते आपला संपूर्ण दिवस व्यतीत करत. या पद्धतीने साधना करत करत सुमारे बारा वर्षांचा कालखंड लोटला. काही काळाने थाडेश्वरनाथ यांना आपल्या मृत्यूची चाहूल लागली. त्यावेळी महादेवाचे प्रत्यक्ष दर्शन झाल्याशिवाय आपला मृत्यू झाला, तर आपला हा मनुष्यजन्म व्यर्थ होईल, अशी भावना त्यांच्या मनात निर्माण झाली. देवाचे दर्शन व्हावे या एकाच ध्यासाने त्यांनी अन्न आणि पाण्याचा पूर्णपणे त्याग केला. त्यांनी कठोर साधना सुरू केली. त्यांची ही निर्मळ भक्ती आणि कठोर तपश्चर्या पाहून भगवान शिव प्रसन्न झाले. एकदा थाडेश्वरनाथ ध्यान लावून बसले असतानाच महादेवाने त्यांना दृष्टांत दिला आणि सांगितले की “मी नदीपात्रात शिवपिंडीच्या रूपात पाण्याखाली आहे. तू मला त्या पाण्यातून वर काढ आणि या नदीच्या काठावर माझी स्थापना कर.”

महादेवांचा हा दृष्टांत होताच थाडेश्वरनाथ साधनेतून उठले आणि त्यांनी थेट कुंडलिका नदीच्या पात्रात झेप घेतली. नदीच्या खोल पात्रात काही वेळ शोध घेतल्यानंतर त्यांना तिथे एक शिवपिंड सापडली. नाथांनी ती पिंड नदीबाहेर आणली आणि काठावर तिची विधिवत स्थापना करून तिथे एक छोटे मंदिर बांधले. थाडेश्वरनाथ यांनी स्वतः स्थापित केलेली ही पिंड असल्यामुळे या महादेवास पुढे थाडेश्वर महादेव हे नाव मिळाले. त्यानंतर काही दिवसांनी थाडेश्वरनाथ यांनी याच मंदिर परिसरात समाधी घेतली.

कुंडलिका नदीच्या काठावर वसलेल्या या मंदिरापर्यंत जाण्यासाठी पक्का रस्ता आहे. मंदिराच्या समोरील भागात भाविकांच्या वाहनांसाठी एक प्रशस्त वाहनतळ आहे. संपूर्ण मंदिराच्या सुरक्षेसाठी आणि संरक्षणासाठी चारही बाजूंनी दगडी तटबंदी उभारलेली आहे. या तटबंदीमधील प्रवेशद्वारातून मंदिराच्या फरसबंदी केलेल्या प्रशस्त प्रांगणात प्रवेश होतो. मंदिराची रचना सभामंडप आणि गर्भगृह अशी आहे. सभामंडपात समोरील प्रवेशद्वारासोबतच डावीकडे व उजवीकडेही दरवाजे आहेत. या बंदिस्त सभामंडपाच्या आतमध्ये भिंतीला लागूनच दगडी कक्षासने आहेत. सभामंडपामध्ये गर्भगृहाच्या प्रवेशद्वारासमोर एका चौथऱ्यावर नंदीची पाषाणमूर्ती आहे. गर्भगृहाच्या द्वारशाखांवर उभ्या धारेची नक्षी कोरलेली आहे. गर्भगृहाच्या आतमध्ये जमिनीवर शिवपिंड आहे. पिंडीवर पितळाचे आवरण म्हणजेच कवच बसवण्यात आलेले आहे. शिवपिंडीच्या शेजारी महादेवाचे प्रतीक असलेला एक मोठा त्रिशूळ आणि डमरू ठेवलेला दिसतो. गर्भगृहाच्या मागील भिंतीला लागून असलेल्या एका उंच वज्रपीठावर गणपती आणि पार्वती माता यांच्या मूर्ती आहेत.

मंदिराच्या शिखराची रचना वैशिष्ट्यपूर्ण आहे. सभामंडपाच्या छतावर पिरॅमिडच्या आकाराचे, उतरत्या पायऱ्यांची रचना असलेले एक चौकोनी शिखर आहे. शिखराच्या शीर्षभागावर दगडी आमलक व कळस आहे. गर्भगृहाच्या छतावर मोठे चौकोनी शिखर आहे. या शिखराच्या चारही बाजूंनी लहान लहान अंगशिखरांची रचना केलेली आहे. नागर स्थापत्यशैलीच्या रचनेशी साधर्म्य दर्शवणारे हे शिखर दूरवरूनही भाविकांचे लक्ष वेधून घेते.

थाडेश्वर महादेव मंदिराच्या डाव्या बाजूला रुद्र हनुमान मंदिर आहे. या लहान मंदिरात मध्यभागी एका दगडी वज्रपीठावर हनुमानाची पाषाणमूर्ती प्रतिष्ठित आहे. हनुमान मंदिराच्या अगदी बाजूलाच या मंदिराचे मूळ संस्थापक असलेल्या थाडेश्वरनाथ बाबांची समाधी आहे. या समाधीच्या उंच चौथऱ्यावर धोलपूर पाषाणाचा म्हणजेच धोलपूरच्या प्रसिद्ध लाल दगडाचा वापर करून एक नक्षीदार मखर बांधलेले आहे. या मखराच्या आतमध्ये एक छोटी शिवपिंड आहे. समाधी स्थानाच्या मागच्या बाजूला राधाकृष्ण मंदिर आहे. सभामंडप आणि गर्भगृह अशी या मंदिराची पारंपरिक रचना आहे. या मंदिराच्या गर्भगृहात असलेल्या वज्रपीठावर भगवान श्रीकृष्ण आणि राधा माता यांच्या पांढऱ्या संगमरवरी मूर्ती आहेत. राधाकृष्ण मंदिराच्या अगदी बाजूलाच एक छोटे श्रीकृष्ण सुभद्रा मंदिर आहे. या मंदिरातील वज्रपीठावर असलेल्या मखरात सुभद्रा माता आणि आपले परम मित्र सुदामा यांना प्रेमाने मिठी मारलेल्या स्वरूपातील भगवान श्रीकृष्णाची एक दुर्मिळ व वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती पाहायला मिळते. सुभद्रा श्रीकृष्ण मंदिराला लागूनच याच परिसरात प्रसिद्ध खाटूशाम आणि जलाराम बापा यांची मंदिरे आहेत. काही दिवंगत महंतांच्या समाध्याही याच भागात एका ओळीत बांधलेल्या आहेत. मंदिराच्या या प्रांगणात भाविकांची राहण्याची आणि जेवणाची सोय व्हावी यासाठी एक मोठे अन्नछत्र, पुजारी व मंदिराच्या सेवेकऱ्यांची निवासस्थाने आणि एक अद्ययावत भक्त निवास आहे. प्रांगणात एका बाजूला एक लोखंडी जाळी आहे. या जाळीजवळ भाविक आपली एखादी इच्छा पूर्ण व्हावी म्हणून लाल कापडामध्ये गुंडाळलेला नारळ नवस बोलून श्रद्धेने बांधतात. पुढे आपली ती इच्छा किंवा मनोरथ पूर्ण झाल्यानंतर भाविक येथे पुन्हा येतात आणि तो बांधलेला नारळ सोडून आपला नवस पूर्ण करतात.

महाशिवरात्री, हनुमान जयंती, श्रीकृष्ण जन्मोत्सव आणि श्रावणी सोमवार हे येथील प्रमुख आणि मोठे उत्सव मानले जातात. मुख्य सणांव्यतिरिक्त मंदिरात दसरा, दिवाळी, नागपंचमी, नारळी पौर्णिमा, गुरुपौर्णिमा आणि रामनवमी इत्यादी सण व उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरे केले जातात. उत्सवांच्या काळात मंदिराच्या वतीने लघुरुद्र, महाभिषेक, अखंड भजन, कीर्तन आणि महाप्रसाद वाटप अशा विविध प्रकारच्या धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे नेटके आयोजन केले जाते. दरवर्षी फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी येथे खाटूशाम बाबांची जत्रा भरते. तसेच दर महिन्याला येणाऱ्या एकादशी आणि प्रदोषच्या दिवशी येथील शिवपिंडीवर साज म्हणजेच शृंगार केला जातो. हा शृंगार पाहण्यासाठी भाविक दर एकादशीला येथे आवर्जून येतात. दररोज सकाळी ६ ते दुपारी १ व सायंकाळी ४ ते रात्री १० वाजेपर्यंत भाविकांना येथे दर्शन घेता येते.

उपयुक्त माहिती

  • जालना मध्यवर्ती बस स्थानकापासून ३ किमी अंतरावर
  • राज्यातील अनेक शहरांतून जालनासाठी एसटी व रेल्वेची सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहारीसाठी अनेक पर्याय
  • संपर्क : घनश्यामदास गोयल, अध्यक्ष, मो. ९८२३०८८६६१,
  • ओमप्रकाश मंत्री, उपाध्यक्ष, मो. ९८९०९३०४३९

ठडेश्वर महादेव मंदिर

श्रीकृष्णनगर, जालना, दूरभाष। जिला. जलना

Back To Home