प्राचीन महादेव मंदिर

हेलस, तालुका मंठा, जिल्हा जालना

जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यात वसलेले हेलस हे प्राचीन संस्कृतीचा वारसा जपणारे एक ऐतिहासिक गाव आहे. येथील पुरातन महादेव मंदिर संपूर्ण पंचक्रोशीतील भाविकांचे मोठे श्रद्धास्थान मानले जाते. ऐतिहासिक नोंदींनुसार प्राचीन काळी हे गाव हेलावंतीनगरी म्हणून ओळखले जात होते. या गावाला काही ठिकाणी ‘पालथी नगरी’ असेही म्हणतात, कारण पूर्वीच्या काळात येथे झालेल्या उत्खननात अनेक प्राचीन मूर्ती पालथ्या स्वरूपात सापडल्या होत्या. मुख्य म्हणजे हेमाडपंती स्थापत्यशैलीचे जनक मानले जाणारे हेमाद्रीपंत काही काळ या गावात वास्तव्यास होते आणि प्राचीन महादेव मंदिर परिसरात त्यांचीही एक मूर्ती असल्याचे सांगितले जाते.

हेलस गावाच्या दक्षिण दिशेला तीन फूट उंचीच्या आणि बसलेल्या स्थितीतील दोन प्राचीन मूर्ती आहेत. स्थानिक लोक त्यांना मोठ्या आदराने ‘मामा-भाचे’ म्हणतात. मात्र काही इतिहासकारांच्या आणि जाणकारांच्या अंदाजानुसार त्यातील एक मूर्ती हेमाद्रीपंत यांची असण्याची दाट शक्यता आहे. हेमाद्रीपंत हे तेराव्या शतकात देवगिरीच्या यादव साम्राज्याचे पंतप्रधान होते. ते देवगिरीचे राजे महादेव आणि राजा रामचंद्र यादव यांच्या कार्यकाळात मुख्य राज्यकारभारी म्हणजेच ‘करणाधिप’ म्हणून कार्यरत होते. हेमाद्रीपंत यांना हेमाडपंती स्थापत्यकलेचे आणि मोडी लिपीचे जनक मानले जाते. त्यांनीच मोडी लिपीला शासकीय व्यवहारात आणून तत्कालीन राजाश्रय मिळवून दिला. त्यांच्या या ऐतिहासिक कार्याचा मोठा प्रभाव हेलस गावावर प्रामुख्याने दिसून येतो. अनेक प्राचीन भग्नावशेष आढळणाऱ्या या गावाला पौराणिक, समृद्ध सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा लाभला आहे. येथील हेमाडपंती शैलीतील मंदिरांप्रमाणेच भग्नावस्थेतील अनेक मूर्ती आजही परिसरात विखुरलेल्या आढळतात. याशिवाय मोडी लिपी कोरलेले अनेक शिलालेख आणि प्राचीन दगडी स्तंभ नदीवरील पांडवघाट परिसरात पाहायला मिळतात.

हेलसमधील या पुरातन महादेव मंदिराला एक मोठे आणि प्रशस्त पटांगण आहे. या संपूर्ण मंदिरात जुन्या दगडी बांधकामाचा आणि नव्या आधुनिक बांधकामाचा एक सुंदर मिलाफ दिसतो. मंदिराच्या पटांगणातून आत आल्यानंतर मंदिरासमोर नव्याने उभारलेल्या अर्धखुल्या मंडपात प्रवेश होतो. या मंडपातून पुढे गेल्यानंतर मंदिराचा मूळ जुना सभामंडप सुरू होतो. सभामंडपाच्या प्रवेशद्वारावर गणेशाचे सुंदर ललाटबिंब आहे. मंदिराला प्राचीन दगडी उंबरा आणि देखणी द्वारशाखा आहे. जुन्या सभामंडपावरही पारंपरिक पद्धतीचे एक मोठे निमुळते छत आहे. हा सभामंडप दगडी स्तंभांवर उभारलेला आहे. भिंतींमध्ये देवकोष्टके तयार केलेली आहेत. त्यातील डावीकडच्या कोष्टकात भगवान दत्ताची तर उजवीकडच्या कोष्ठकात श्री गणपतीची मूर्ती विराजमान आहे. सभामंडपात पांढऱ्या संगमरवराचा एक नंदी आहे. मुख्य गर्भगृहाचा उंबरा काहीसा उंच आहे. तेथेही त्रिस्तरीय द्वारशाखा आणि गणेशाचे ललाटबिंब दिसते. गर्भगृहात प्राचीन शिवलिंग प्रतिष्ठित आहे आणि त्यावर रोजच्या पूजेसाठी पितळेचा मुखवटा बसवलेला आहे. शिवलिंगाबरोबरच शेजारील स्वतंत्र छोट्या मंदिरात पार्वतीची काळ्या पाषाणाची मूर्ती आहे. चार भुजा असलेल्या देवीच्या एका हातात शस्त्र आहे. महादेवाच्या मंदिरात शिव आणि पार्वतीचे असे स्थान अभावानेच दिसते. मंदिराच्या प्रदक्षिणामार्गावर प्राचीन शिला म्हणजेच मोठे दगड एकमेकांवर रचून केलेली भक्कम बांधणी दिसते. मंदिराचे एकूण बांधकाम प्राचीन काळातील उत्कृष्ट दगडी रचनेचे आहे. महादेवाचे मुख्य गर्भगृह जमिनीच्या पातळीपासून काहीसे खाली आहे.

या महादेव मंदिराला लागूनच एक ऐतिहासिक बारव म्हणजेच दगडी विहीर आहे. ही बारव तीस फूट रुंद, चौरस आकाराची आहे आणि तिची एकूण खोली सुमारे पंचावन्न फूट आहे. संपूर्णपणे दगडी बांधकाम असलेली ही प्राचीन बारव पावसाळ्यात जलसंचयामुळे पूर्ण भरलेली असते. या बारवेच्या आतील भागात नंदी आणि गणपतीच्या अत्यंत सुंदर कोरीव मूर्ती बसवलेल्या आहेत. कालौघात काही प्रमाणात पडझड झाल्यामुळे गावकऱ्यांनी पुढाकार घेऊन या ऐतिहासिक बारवेची डागडुजी केली आहे.

दरवर्षी महाशिवरात्रीला हेलस येथील या मंदिरामध्ये मोठी जत्रा भरते. याशिवाय श्रावण महिन्यात भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी होते. हेलस गावचेच नव्हे, तर संपूर्ण पंचक्रोशीतील मंठा, रानमळा, लिंबेवडगाव, कर्नावळ, बोरकिनी आणि टोकवाडी आदी भागांतून शेकडो भाविक मोठ्या श्रद्धेने या मंदिरात दर्शनासाठी येतात. या यात्रा आणि उत्सवांच्या काळात मंदिरात विधिवत अभिषेक, महाप्रसादाचा भंडारा, तसेच रात्रीच्या वेळी भजने आणि कीर्तनाचे विविध कार्यक्रम उत्साहाने होतात. या उत्सवांसोबतच या गावामध्ये साजरा होणारा वार्षिक गणेशोत्सवदेखील पंचक्रोशीतील भाविकांसाठी एक मोठा धार्मिक उत्सव असतो.

उपयुक्त माहिती

  • मंठा येथून ५ किमी अंतरावर
  • जालना येथून ६८ किमी अंतरावर
  • मंठा शहरापासून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहारीची सुविधा आहे

प्राचीन महादेव मंदिर

हेलस, तालुका मंथा, जिला जालना

Back To Home