विदर्भाचे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मलकापूरमधील गौरीशंकर मंदिर अत्यंत प्रसिद्ध आहे. येथील विष्णू सावजी यांच्या घरी शेगावचे श्री गजानन महाराज पाच वेळा आल्याची नोंद संतकवी दासगणू महाराज रचित ‘गजानन विजय’ ग्रंथात आढळते. त्यापैकी एका भेटीत गजानन महाराजांसोबत लोकमान्य टिळकही आले होते, असा उल्लेखही या संदर्भात सापडतो. भारताचे माजी उपपंतप्रधान व महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते या मंदिराचे उद्घाटन झाले. मंदिराच्या आवारात उभारलेल्या कृत्रिम टेकडीवर ‘गंगावतरण’चा सुंदर देखावा आहे. मलकापूरला येणारे भाविक या मंदिराला आवर्जून भेट देतात.
मलकापूरमधील विष्णू सावजी हे गजानन महाराजांचे निस्सीम भक्त होते. महाराजांनी त्यांच्या निवासस्थानी पाच वेळा मुक्काम केला होता. ११ जून ते २१ जून १९०३ या अकरा दिवसांच्या काळात योगिनी एकादशीच्या कार्यक्रमासाठी त्यांचा येथे मुक्काम होता; त्यानंतर १३ ऑगस्ट १९०३ रोजी ते पुन्हा येथे आले. १३ जुलै १९०५ रोजी आलेल्या महाराजांनी सावजी यांच्या घरी आठवडाभर वास्तव्य केले. १९०७ मध्येही ते येथे आले होते. १९०७ मध्ये गजानन महाराज आपले शिष्य भास्कर पाटील यांच्यासह नाशिकला गेले असताना, तेथून परतताना ते सावजींच्या घरी थांबले. सावजी यांना मराठवाड्यातील संत श्रीरंग महाराजांचाही आशीर्वाद लाभला होता. सावजी यांनी एकदा गजानन महाराज आणि श्रीरंग महाराजांना आपल्या घरी आमंत्रित करून त्यांची एकत्रित पूजा केली होती.
या मुक्कामात श्रीरंग महाराज घराबाहेरील एका छावणीत थांबले होते, तर गजानन महाराज घरात वास्तव्यास होते. पूजेच्या दुसऱ्या दिवशी श्रीरंग महाराजांनी सावजींच्या घरी भेट देऊन गजानन महाराजांची भेट घेतली. त्या वेळी त्यांनी गजानन महाराजांना पुष्पहार अर्पण केला, असे सांगितले जाते. त्यानंतर ६ मे १९०८ रोजी गजानन महाराज हे लोकमान्य टिळक आणि दादासाहेब खापर्डे यांच्यासह सावजींच्या घरी आले होते. विष्णू सावजींचे १० मे १९१२ रोजी देवळाली येथे निधन झाले. त्यांना गँगरीन झाल्यामुळे त्यांच्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली होती, अशी माहिती मिळते. गजानन महाराजांच्या या सर्व भेटींची नोंद ‘गजानन विजय’ ग्रंथात आहे.
गजानन महाराज जेव्हा या घरी येत, तेव्हा एका विशिष्ट पलंगावर विराजमान होत असत. याच पलंगावर विष्णू सावजी यांनी त्यांना अभ्यंगस्नान घातले होते. तो ऐतिहासिक पलंग आजही मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळील एका दालनात जतन करून ठेवण्यात आला आहे. विष्णू सावजींच्या निधनानंतर त्यांचे पुत्र गोविंद ऊर्फ दादासाहेब सावजी यांनी १९५८ मध्ये हे मंदिर बांधले. यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते या मंदिराचे उद्घाटन झाले होते.‘सेंट्रल प्रॉव्हिन्सेस अँड बेरार डिस्ट्रिक्ट गॅझेटियर्स – अकोला डिस्ट्रिक्ट’मध्ये या परिसरातील ऐतिहासिक संदर्भांचे वर्णन आढळते.
मलकापूर-नांदुरा मार्गावर, रेल्वेस्थानकापासून काही अंतरावर हे मंदिर स्थित आहे. मंदिराभोवती संरक्षक भिंत आहे. मुख्य प्रवेशद्वारातून आत आल्यावर मोठ्या प्रांगणात प्रवेश होतो. या प्रांगणात डावीकडे आवारभिंतीला लागून हे मंदिर आहे. सभामंडप आणि गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. संगमरवरी गर्भगृहात मोठ्या आकाराच्या शाळुंकेत सुबक शिवलिंग आहे. शिवलिंगाच्या समोर, उजव्या बाजूस नंदीची मूर्ती आहे. शिवलिंगाच्या मागे गणपती आणि पार्वतीमातेची चतुर्भुज मूर्ती आहे. मागील भिंतीवरील देवकोष्ठकामध्ये गजानन महाराजांची मूर्ती विराजमान आहे. सभामंडपातील एका खोलीत श्रीदत्तात्रेयांचे अवतार मानले जाणारे नाना महाराज तराणेकर यांची संगमरवरी मूर्ती आहे. तसेच, येथील एका देवकोष्ठकात पंढरपूरच्या विठ्ठलाची कृष्णधवल प्रतिमा आहे आणि शेजारीच शिर्डीच्या साईबाबांची मूर्ती स्थापन केलेली आहे. या सभामंडपात दादासाहेब सावजी यांच्यासह अनेक मान्यवरांच्या प्रतिमा आहेत.
मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूला असलेल्या दालनात गजानन महाराजांचा तो ऐतिहासिक पलंग आणि त्यांच्या पादुका जतन केल्या आहेत. येथे गजानन महाराजांची मोठी प्रतिमा तसेच त्यांचे दुर्मिळ कृष्णधवल छायाचित्रही पाहता येते. मंदिराच्या प्रांगणात मारुतीचे छोटे मंदिर आहे. त्यात हनुमानाची संगमरवरी मूर्ती प्रतिष्ठापित केली आहे. परिसरात औदुंबर वृक्षासह अनेक झाडे आहेत. येथे १०.५ मीटर उंचीची एक कृत्रिम टेकडी तयार करण्यात आली आहे. दगड आणि सिमेंटच्या साहाय्याने बनवलेल्या या टेकडीवर भगीरथाच्या प्रयत्नाने शिवशंकरांनी गंगेला पृथ्वीवर आणले, ही पौराणिक कथा दृश्यमान करण्यात आली आहे. पायऱ्यांनी या टेकडीवर जाता येते. शिखरावर १.५२ मीटर उंचीची गंगामातेची सुवर्णरंगी मूर्ती आहे आणि तिच्या उजवीकडे गणपती व पार्वतीच्या मूर्ती आहेत. टेकडीच्या पायथ्याशी नंदी आहे. शिखरावरील गंगेच्या मूर्तीपर्यंत भूमिगत नळ जोडणी केलेली आहे. त्यातून गंगामातेच्या हातातील कलशात पाणी जमा होऊन खाली पडते. हे पाणी पायथ्याशी साठवून पुन्हा पंपाद्वारे वर चढवले जाते. मलकापूरला भेट देणारे अनेक भाविक येथे येऊन गौरीशंकराचे तसेच गजानन महाराजांच्या पलंगाचे दर्शन घेतात. दरवर्षी पौष शुद्ध पंचमीला येथे गजानन महाराजांची पालखी येते, तेव्हा भाविकांची मोठी गर्दी होते.