गारमाता मंदिर

कराडे खुर्द, ता. पनवेल, जि. रायगड

पनवेल तालुक्यातील पाताळगंगा औद्योगिक क्षेत्राच्या परिसरात कराडे खुर्द हे गाव वसलेले आहे. औद्योगिक पट्ट्यात असूनही या गावाने आपली पारंपरिक ओळख आणि ऐतिहासिक वारसा आजही जपला आहे. पाताळगंगा नदीच्या तीरावर वसलेल्या या गावामध्ये ग्रामदेवता गारमाता देवीचे प्राचीन मंदिर आहे. पनवेलहून रसायनीमार्गे कराडे गावात प्रवेश करताच डाव्या बाजूस विस्तीर्ण तलावालगत हे मंदिर दिसते. पाताळगंगा नदीच्या प्रवाहामुळे कराडे गावातील माती आणि वातावरण नेहमीच सुपीक व थंड राहिले आहे, यामुळेच देवीला ‘गारमाता’ असे नाव पडले असावे, अशी स्थानिक लोकसमजूत आहे. ग्रामस्थांच्या श्रद्धेनुसार गारमाता देवी ही संपूर्ण गावाची रक्षणकर्ती असून संकट काळात ती भक्तांच्या हाकेला धावून येते. त्यामुळे प्रत्येक शुभकार्याची सुरुवात देवीच्या आशीर्वादाने करण्याची परंपरा पिढ्यानपिढ्या येथे चालत आली आहे.

गारमाता मंदिराचा इतिहास प्राचीन असून हे देवस्थान अनेक शतकांपासूनचे असल्याचे मानले जाते. मंदिराचा कालखंड मध्ययुगीन महाराष्ट्राच्या इतिहासाशी आणि प्रामुख्याने कोकणातील स्थानिक राजवटींशी जोडला गेलेला आहे. या परिसराच्या ऐतिहासिक संदर्भांचा अभ्यास करताना जवळच असलेल्या कराडे गढीचा उल्लेख येतो. पाताळगंगा नदीच्या काठावर ‘चौबुर्जी’ नावाची एक ऐतिहासिक गढी आहे. ही गढी उत्तर पेशवाईच्या काळात, विशेषतः दुसऱ्या बाजीराव पेशव्यांच्या कालखंडात बांधली गेली होती. जरी या गढीचा वापर लष्करी मोहिमांसाठी फारसा झाला नसला, तरी त्या काळातील प्रशासकीय व्यवस्थेमध्ये या ठिकाणाला महत्त्व होते. पूर्वी ही गढी कुलकर्णींच्या मालकीची होती आणि स्वातंत्र्यानंतर वैद्य कुटुंबाने ती लिलावात विकत घेतली. या गढीच्या सान्निध्यात असलेले गारमाता मंदिर हे तेव्हापासून येथील प्रमुख श्रद्धास्थान राहिले आहे.

ऐतिहासिक नोंदींनुसार, हे मंदिर पेशवेकालीन असून मानकोजींचे दिवाण मल्हार राघो कुलकर्णी यांनी ते बांधल्याचे सांगितले जाते. मात्र, मंदिरातील सध्याचे जे लाकडी कोरीव काम दिसते, ते साधारणपणे शके १८२३ (सन १९०१) सालातील आहे. मराठा साम्राज्याचा अस्त आणि इंग्रजी सत्तेचा वाढता प्रभाव अशा संधिकालखंडात या मंदिराचा जीर्णोद्धार झाला असावा. ऐतिहासिक दृष्टिकोनातून पाहिल्यास कराडे खुर्द हे गाव पेशवे काळात एक समृद्ध वस्ती म्हणून ओळखले जात होते. पाताळगंगा नदीच्या काठावर बांधलेला पक्का घाट आणि तेथील पेशवेकालीन शिवमंदिर या गोष्टी गारमाता मंदिराच्या ऐतिहासिक महत्त्वात भर घालतात. ब्रिटिशकालीन गॅझेटिअरमध्ये आणि रायगड जिल्ह्यातील मंदिरांच्या नोंदींमध्येही या परिसराचा, गावांचा आणि नद्यांचा उल्लेख आढळतो.

तलावाच्या काठावर निसर्गरम्य परिसरात वसलेले हे मंदिर कोकणातील पारंपरिक कौलारू घरांच्या स्थापत्यशैलीत बांधलेले आहे. मंदिराचे बांधकाम दगड, विटा आणि लाकडाच्या साहाय्याने करण्यात आले असून १९०१ मध्ये बांधलेल्या या मंदिराचे स्वरूप आजही जसेच्या तसे राखण्यात आले आहे. मंदिराचे छत पारंपरिक लाल कौलांनी बनवलेले आहे. तलावाच्या पाण्यात पडणारे मंदिराचे प्रतिबिंब अत्यंत आकर्षक दिसते. तलावाशेजारी असलेल्या मुख्य प्रवेशद्वारातून पाच पायऱ्या चढून उंच जोत्यावर असलेल्या मंदिराच्या सभामंडपात प्रवेश होतो. अर्धखुला सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी या मंदिराची रचना आहे. सभामंडपात भाविकांना बसण्यासाठी कक्षासने आहेत. सभामंडपातील भिंतींमध्ये दीपकोष्टके व जुन्या काळातील खुंट्या जागोजागी दिसतात. सभामंडपाच्या पुढे अंतराळ आहे. अंतराळाच्या प्रवेशद्वाराच्या उत्तरांगावर हे मंदिर कोणी व कधी बांधले त्याचा संदर्भ असलेला मजकूर कोरलेला आहे. अंतराळात मध्यभागी प्रदक्षिणा मार्ग सोडून एका चौकोनी खोलगट भागात गर्भगृहाची रचना आहे. या गर्भगृहात गारमातेसोबत महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती देवीच्या ‘तांदळा’ स्वरूपातील मूर्ती विराजमान आहेत. मंदिराच्या स्थापत्यशैलीमध्ये सागवानी लाकूडकामाचा प्रभावी वापर करण्यात आला आहे.

कराडे खुर्द येथील श्री गारमाता देवीचा वार्षिक यात्रा उत्सव दरवर्षी चैत्र शुद्ध नवमी म्हणजेच राम नवमीच्या दिवशी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी देवीची पालखी मिरवणूक काढली जाते. संपूर्ण गावातून वाजत-गाजत ही पालखी फिरवली जाते आणि या सोहळ्यासाठी पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. यात्रेच्या काळात मंदिरात विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. याशिवाय हनुमान जयंतीलाही येथे उत्सव साजरा होतो. नवरात्रोत्सवात नऊ दिवस मंदिरात विशेष पूजा, अर्चा आणि आरत्यांचे आयोजन केले जाते. विजयादशमीच्या दिवशी देवीची पालखी मिरवणूक काढली जाते. कराडे खुर्दची गारमाता दसऱ्याच्या दिवशी प्रत्यक्ष ‘जेवण ग्रहण’ करते, अशी भाविकांची गाढ श्रद्धा आहे. या दिवशी गर्भगृहात नैवेद्याचे ताट ठेवून अर्ध्या तासासाठी गर्भगृह बंद केले जाते. या दरम्यान सभामंडपात सर्व भाविक भक्तीभावाने जप करतात. यानंतर गर्भगृह उघडल्यानंतर देवीसाठी ठेवलेले जेवण पाहिले जाते. या वेळी जेवणातील काही पदार्थांवर देवीच्या हाताचे ठसे उमटल्याचे दिसून येते, असा भाविकांचा अनुभव आहे. उत्सवाच्या काळात रसायनी, मोहोपाडा, गुळसुंदे आणि वासांबे यांसारख्या आसपासच्या गावांतील लोक मोठ्या संख्येने येथे देवीच्या दर्शनासाठी येतात. उत्सवाच्या वेळी मंदिरात रोषणाई केली जाते आणि भजन-कीर्तनाचे कार्यक्रम पार पडतात. हे मंदिर भाविकांना दर्शनासाठी २४ तास खुले असते आणि येथे सकाळ-संध्याकाळ शास्त्रोक्त पूजा केली जाते.

उपयुक्त माहिती

  • पनवेलपासून २६ किमी अंतरावर
  • अलिबाग येथून ५१ किमी अंतरावर
  • पनवेल येथून एसटी व खासगी वाहनांची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहारीची सुविधा
  • संपर्क : राकेश करांदे, व्यवस्थापक, मो. ९०२८५८३८५८, सतीश जोशी, व्यवस्थापक, मो. ९९७५५७६६९३

गर्माता मंदिर

कराडे खुर्द, ताल. पनवेल, जिला. रायगढ़

Back To Home