मुंबईतील विद्याविहार हे तेथील शैक्षणिक संकुलाच्या नावाने ओळखले जाणारे उपनगर. त्यातील किरोळ या गावात गावदेवीचे प्राचीन मंदिर आहे. ही गावदेवी परिसरातील आगरी, कोळी आदी भूमिपुत्रांची रक्षकदेवता मानली जाते. विद्याविहारचे नागरीकरण होण्याच्या आधीपासून येथे विराजमान असलेले हे मंदिर या परिसरातील जुन्या ग्रामसंस्कृतीची एक महत्त्वपूर्ण खूण मानले जाते. स्थानिक भाविकांच्या श्रद्धेनुसार, या मंदिरातील गावदेवी ही भक्तांचे संकट हरण करणारी, तसेच नवसाला पावणारी आहे. या गावदेवीचा नवरात्रोत्सव येथे मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो.
भारतीय परंपरेत ग्राम हा घटक अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या प्रत्येक गावाचे संरक्षण करणारी दैवते हिंदू लोकधर्माने मानलेली आहेत. त्यांना ग्रामदैवते म्हणतात. वैदिक दैवतांहून भिन्न स्वरूप व प्रकृतीची ही दैवते स्त्री वा पुरुष रूपात असतात. लोकश्रद्धेनुसार ग्रामदैवते रोगराई, दुष्काळासारख्या नैसर्गिक आपत्ती यांपासून गावांचे संरक्षण करतात. त्यांच्या कृपेमुळे गावातील ‘पांढरी’प्रमाणेच ‘काळी’ म्हणजे शेतजमीनही समृद्ध होते, असे मानले जाते.
बहुतांश ग्रामदैवते ही स्त्रीरूपी आहेत. त्यांना गावदेवी म्हटले जाते. देशातील अनेक गावांमध्ये गावदेवीची मंदिरे आहेत. आर्यपूर्व मूळ भारतीयांच्या काही लोकदेव वा देवतांचे नंतर उन्नयन होऊन त्यांना पौराणिक चरित्र प्राप्त झाले असले, तरी त्यांचे ग्रामसंरक्षक स्वरूप मात्र टिकून राहिलेले आहे.
ग्रामदेवतांच्या मंदिरांच्या उत्पत्तीचा शोध घेणाऱ्या इतिहासकार उषा विजयलक्ष्मी यांच्या मते, ही मंदिरे उपासनेची ठिकाणे होतीच, मात्र त्याचबरोबर ग्रामसीमांची निश्चिती हाही त्यांचा एक उद्देश असे. पूर्वीच्या काळी गावांच्या सीमा या दगडांनी निश्चित केलेल्या असत. परंतु अनेकदा लोक या दगडखुणा हलवत व त्यावरून दोन गावांमध्ये वाद होत. या अशा वादांमुळे संस्कृतमध्ये ‘संग्राम’ हा शब्द आला आहे. याचा अर्थ दोन गावांतील लढाई वा भांडण असा आहे. या समस्येच्या निवारणासाठी सीमांचे कायमस्वरूपी चिन्ह म्हणूनही गावदेवीचे मंदिर सीमेवर उभारण्यात येत असे. या व्यावहारिकतेच्या पलीकडेही पवित्र श्रद्धास्थान, येथील कुटुंबांची कुलदेवता म्हणूनही गावदेवीची मंदिरे उभारली जात. किरोळ येथील गावदेवी ही या गावाची संरक्षण वा अधिष्ठात्री देवता मानली जाते.
विद्याविहार हे उपनगर वसण्याआधी येथे जी छोटी-मोठी गावे वा पाडे होते, त्यांतील किरोळ हे एक मोठे गाव होते. हे गाव प्राचीन काळी साष्टी (सालसेत) बेटांतील तुरभे (तुर्भे) बेटाचा भाग होते. मुंबईचा आद्य राजा प्रताप बिंब, तसेच बिंबदेव यादव यांचा इतिहास सांगणाऱ्या ‘महिकावतीची बखर’ वा ‘बिंबाख्यान’ या ग्रंथांमध्ये किऱ्होळ या नावाने या गावाचा उल्लेख आहे. पुढे सोळाव्या शतकात पोर्तुगीजांनी साष्टी, तसेच मुंबईची सात बेटे ताब्यात घेतली. पोर्तुगीजांनी गोव्याप्रमाणेच येथे धर्मांधतेचा कहर केला. अनेक मंदिरे उद्ध्वस्त करून अनेक लोकांचे सक्तीने धर्मांतर केले. या काळातही स्थानिक नागरिकांनी आपल्या धर्मपरंपरा कसोशीने जतन करण्याचा प्रयत्न केला. ब्रिटिश अमदानीत येथे नागरिकांना धार्मिक मोकळीक मिळाली. जानेवारी १८०५मध्ये ब्रिटिश गव्हर्नर जोनाथन डंकन यांच्या कारकिर्दीत शीवचा पूल बांधण्यात आला. त्यामुळे कुरले (कुर्ला), किऱ्होळ तसेच त्या पलीकडील घाटे, कोपर (घाटकोपर) आदी गावे मुंबई बेटास जोडली गेली. या पुढील काळात येथे बडोद्याचे गायकवाड यांच्यासारखे संस्थानिक, तसेच मुंबईतील काही धनिक व्यापाऱ्यांनी आपले इमले उभारले. गायकवाड यांच्या मालकीची येथील जागा आज राजावाडी म्हणून ओळखली जाते.
१९५०च्या दशकात येथे अनेक उद्योगधंदे, कारखाने उभे राहिले. यामुळे येथील लोकवस्तीत वाढ होत गेली. किऱ्होळ आणि परिसराच्या विकासास खऱ्या अर्थाने चालना मिळाली ती येथे स्थापन झालेल्या रेल्वेस्थानकामुळे. त्याचे श्रेय गांधीवादी उद्योगपती करमसीभाई जेठाभाई सोमैया यांचे होय. त्यांनी येथे स्वतःच्या मालकीच्या जागेवर जून १९६०मध्ये कला आणि विज्ञान शाखेचे महाविद्यालय सुरू केले. याच्या दुसऱ्याच वर्षी या महाविद्यालयाची विद्यार्थिसंख्या एक हजाराच्या वर पोचली. त्या काळात किऱ्होळ व आसपासच्या भागातील रहिवाशांकडून येथे रेल्वे स्थानक उभारावे अशी मागणी करण्यात येत होती. करमसीभाई सोमैया यांनी यामुळे विद्यार्थ्यांचीही सोय होईल या हेतूने या मागणीस पाठिंबा दर्शविला आणि त्यांच्या प्रयत्नाने तीन महिन्यांच्या कालावधीत येथे रेल्वे स्थानक बांधण्यात आले. या स्थानकास विद्याविहार हे नाव देण्यात आले. सप्टेंबर १९६१ मध्ये तत्कालीन संरक्षणमंत्री व्ही. के. मेनन यांच्या हस्ते या स्थानकाचे उद्घाटन करण्यात आले. या स्थानकामुळे विद्याविहारची भौगोलिकदृष्ट्या दोन भागांत विभागणी झाली आहे. पूर्वेकडे राजावाडीचा भाग असून, पश्चिमेस किऱ्होळ (किरोळ) हे गाव आहे.
येथील गावदेवीच्या मंदिराचा नेमका इतिहास अनुपलब्ध आहे. मात्र बिंबराजाच्या काळापासून, म्हणजेच बाराव्या शतकापासून येथे देवीचे स्थान असावे असा अभ्यासकांचा तर्क आहे.
असे सांगण्यात येते की एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभी साष्टी बेटांतील जमिनीची मोजणी आणि गावांच्या सीमा निश्चित करण्याचे काम ईस्ट इंडिया कंपनीने सुरू केले. त्याअंतर्गत १८१३ च्या सुमारास किऱ्होळ आणि आसपासच्या परिसरातील शेतजमीन, वस्त्या आणि धार्मिक स्थळे, देवस्थानांच्या जमिनी यांची नोंद सरकारी दप्तरात करण्यात आली. या जुन्या महसूल नोंदींमध्ये किऱ्होळ गावाच्या वेशीवरील ‘गावदेवी’ आणि ‘अंबिका’ या स्थानांचा ‘जुने देवस्थान’ म्हणून उल्लेख आढळतो. सुरुवातीला हे मंदिर छोट्या स्वरूपात होते. सन १९७१मध्ये नोंदणीकृत करण्यात आलेल्या ‘किरोळ (गांवदेवी) ग्रामस्थ मंडळ’ या संस्थेच्या पुढाकाराने करण्यात आलेल्या जीर्णोद्धारानंतर मंदिरास सध्याचे रूप प्राप्त झाले आहे.
पूर्वी गावाच्या शिवेवर केलेले हे मंदिर आता या विकसित उपनगराच्या मध्यभागी उभे आहे. या मंदिराच्या आवारभिंतीत उंच प्रवेशद्वार बांधलेले आहे. मंदिरासमोर छोटे प्रांगण आहे. त्यात वडाचे मोठे झाड आहे. येथे वटपौर्णिमेच्या दिवशी महिलांची मोठी गर्दी होते. आधुनिक बांधकामशैलीत बांधण्यात आलेल्या या मंदिराची संरचना सभामंडप आणि गर्भगृह अशी आहे.
सभामंडपात जमिनीवर कूर्ममूर्ती आहे. त्याचप्रमाणे येथे एका संगमरवरी चौथऱ्यावर पितळेची मोठी सिंहमूर्ती आहे. समोरच महिरपी प्रवेशद्वार असलेले गर्भगृह आहे. त्यात उंच संगमरवरी वेदीवर गावदेवीस अन्य तीन देवतांच्या मूर्ती प्रतिष्ठापित आहेत. काळ्या पाषाणात घडवलेल्या या मूर्तींचे स्वरूप साधारणतः सारखेच आहे. या देवी समपाद व वरद आणि अभयमुद्रेमध्ये आहेत. मूर्तींच्या बाजूला पितळेचे मोठे त्रिशूळ आहेत. वेदीवर मूर्तींसमोर देवीची चरणकमले विराजमान आहेत. या मंदिरवास्तूत शिवशंकराचेही स्थान आहे. तेथे संगमरवरी गोलाकारामध्ये पाषाणाची शिवपिंड प्रतिष्ठापित आहे. या पिंडीवर पितळी नागराजाने फणा उभारलेला आहे. पिंडीसमोर पाषाणाची छोटी नंदीमूर्ती आहे, तर पिंडीवर पितळेचे अभिषेकपात्र आहे.
गावदेवीच्या या मंदिरात पहाटे ६ ते दुपारी १२ आणि सायंकाळी ४ ते रात्री १०.३० या काळात भाविक दर्शनाचा लाभ घेऊ शकतात. येथे दर मंगळवारी रात्री ८.३० वाजता देवीची महाआरती केली जाते. परिसरातील अनेक भाविक या आरतीस आवर्जून उपस्थित असतात. मंगळवार आणि शुक्रवार हे देवीचे वार असल्यामुळे या दिवशी भक्तांची संख्या नेहमीपेक्षा अधिक असते. या दिवशी येथे अनेक महिला ओटी भरतात, तसेच केलेले नवस फेडतात. मंदिरात वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. नवरात्रोत्सव हा या मंदिरातील सर्वात मोठा उत्सव आहे. आश्विन नवरात्रीत नऊ दिवस देवीचा गाभारा आणि संपूर्ण मंदिर परिसर आकर्षक रोषणाईने सजवला जातो. नऊ दिवस अखंड दीप प्रज्वलित करून घटस्थापना केली जाते. अष्टमीला विशेष हवन-पूजा आणि महाप्रसादाचे आयोजन केले जाते. या उत्सवात हजारो भाविक सहभागी होतात. येथे दसऱ्याच्या दिवशी देवीस विशेष शृंगार केला जातो. दिवाळीत मंदिरात दीपोत्सव साजरा केला जातो.