गारेचा गणपती / वरदविनायक मंदिर

चिमणपुरा / फुटके तलाव, सातारा, जि. सातारा

महाराष्ट्रातील सातारा शहराला ऐतिहासिक धार्मिक पार्श्वभूमी आहे. आजूबाजूला असलेल्या सात टेकड्यांमुळे या शहराला सातारा नाव पडले. हे शहर मराठ्यांची राजधानी मराठी राजसत्तेचे एक प्रमुख केंद्र राहिलेले आहे. या शहरात जिल्ह्यात गणेशाची अनेक स्थाने आहेत. त्यापैकी चिमणपुरा भागातील प्राचीन गारेचा गणपती मंदिर प्रसिद्ध आहे. अडचणीत सापडलेल्यांनी आपली व्यथा येथे मांडल्यास हा गणपती त्यांचे निरसन करतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे.

सातारा शहराच्या पश्चिमेस चिमणपुरा परिसरात गारेचा गणपती मंदिर आहे. हे मंदिर सुमारे ४०० वर्षांपूर्वीचे आहे. मंदिराची आख्यायिका अशी की येथील गणपतीची गारेची (स्फटिकासारखा शुभ्र दगड) मूर्ती येथे स्थापना होण्यापूर्वी सोमवार पेठेतील शाहूनगर भागात राहणारे रखमाजी तेली यांच्या घरी होती. ते या मूर्तीची दुरूनच पूजा करीत आणि मूर्तीसमोर अखंड नंदादीप चालू ठेवीत असत. एकदा या रखमाजी तेली यांना गणपतीने स्वप्नदृष्टांत दिला सांगितले की मला नेण्यास काही ब्रह्मवृंद येतील, मला त्यांच्या स्वाधीन कर. ते माझी पुढील सर्व व्यवस्था करतील. अगदी त्याच वेळी वेदमूर्ती जोशी भागवत यांना गणपतीने दृष्टांत देऊनरखमाजी तेलीकडे मी आहे. तेथून मला घेऊन या माझी नीट व्यवस्था लावा’, असे सांगितले. त्यानुसार ब्रह्मवृंदाकडे तेली यांनी मूर्ती दिली. ग्रामस्थांच्या संमतीने ती वाजतगाजत चिमणपुऱ्यात आणून वैशाख शुद्ध तृतीयेस (अक्षय्य तृतीया) तिची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली.

असे सांगितले जाते की एकदा छत्रपती शाहू महाराज संकटात असताना ब्रह्मवृंदांनी सुचविल्याप्रमाणे त्यांनी या गणपतीसमोर आपली व्यथा मांडली. गणपतीच्या आशीर्वादाने त्यांना योग्य ते फलित मिळाल्यानंतर त्यांनी या मंदिरातील अखंड नंदादीप नैवेद्यासाठी तत्काळ देणगी दिली होती. १९९६ मध्ये केलेल्या जीर्णोद्धारानंतर मंदिराला सध्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. मंदिराच्या गर्भगृहात असलेली मूर्ती उजव्या सोंडेची असून बाजूस रिद्धीसिद्धी आहेत. या मंदिरात अक्षय्य तृतीयेच्या दिवशी देवाचा वाढदिवस साजरा केला जातो. माघ शुद्ध द्वितीया ते अष्टमीपर्यंत सात दिवस हा महोत्सव चालतो. गणपतीची पूजा कडक सोवळ्याने स्नानानंतर ओल्या अंगानेच केली जाते. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी महाआरतीचे आयोजन करण्यात येते.

गारेचा गणपती मंदिरापासून दीड किमी अंतरावरील, शनिवार पेठेतील, प्राचीन फुटके तलावाच्या मध्यभागी असणारे वरदविनायक मंदिरही हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. फुटका तलाव गणेश मंदिर म्हणूनही ते ओळखले जाते. या तलावात जिवंत पाण्याचे झरे असून त्यामुळे बाराही महिने त्यात पाणी असते. तलावाच्या डाव्या बाजूच्या कोपऱ्यातून पाणी बाहेर पडून ते खेळते राहावे, यासाठी वाट केलेली आहे. त्यामुळे त्यासफुटके तळेअसे संबोधिले जाते.

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर साधारणतः १९५४ पासून या तलावात गणेशोत्सव साजरा करण्याची प्रथा येथील नागरिकांनी सुरू केली. भाद्रपद चतुर्थीला एका तराफ्यावर गणेशमूर्ती ठेवून त्याची पूजा करण्यात आली होती. त्यानंतर या तलावाला अधिष्ठान प्राप्त झाले येथे दरवर्षी उत्सवाचे स्वरूप वाढत गेले. परिसरातील गणेशभक्तांनी एकत्र येऊन तराफ्यावर गणेशाची स्थापना करण्याऐवजी तलावाच्या मध्यभागीच गणेश मंदिर बांधण्याचे ठरविले. त्यानुसार १९९४ मध्ये येथे मंदिर बांधून त्यात काळ्या पाषाणात घडविलेल्या वैशिष्ट्यपूर्ण मूर्तीची आचार्य नारायण स्वामी यांच्या हस्ते प्रतिष्ठापना करण्यात आली.

तलावाच्या मध्यभागी असलेले हे मंदिर षटकोनी आकाराचे असून मुख्य रस्त्यापासून मंदिरापर्यंत जाण्यासाठी तलावात खांब टाकून छोटा पूल उभारण्यात आला आहे. मंदिराची बांधणी संगमरवराची आहे. मंदिराभोवती दोन फुटांचा प्रदक्षिणा मार्ग आहे. येथील गणेशमूर्ती चतुर्भुज आहे. वरच्या डाव्या हातात लाडू असून त्यावर सोंड स्थिरावलेली आहे, वरील उजवा हात वरदहस्त मुद्रेत आहे. वरदविनायकाच्या या मूर्तीवर चांदीचा वैशिष्ट्यपूर्ण मुकुट आहे.

माघी भाद्रपद चतुर्थीला येथे मोठ्या प्रमाणावर गणेशोत्सव साजरा होतो. यावेळी वरदविनायकाची रथातून मिरवणूक काढली जाते. दररोज या गणपतीसाठी नैवेद्य म्हणून जेवण ठेवले जाते. परिसरातील ३० घरांना यासाठी दिवस नेमून दिलेले आहेत. वरदविनायकाचे हे तलावातील मंदिर पाहण्यासाठी अनेक भाविक पर्यटक येथे आवर्जून येतात.

उपयुक्त माहिती:

  • सातारा बस स्थानकापासून किमी अंतरावर
  • सातारा बस स्थानकापासून सीटी बस अथवा रिक्षाने जाता येते
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत जाऊ शकतात
  • परिसरात निवास न्याहरीसाठी अनेक पर्याय
Back To Home