चिपळूण येथील प्रसिद्ध परशुराम मंदिरापासून जवळ असलेल्या खेड तालुक्यातील सोनगाव येथील घळईतील गणपती मंदिर जिल्ह्यातील प्रसिद्ध मंदिरांपैकी एक आहे. असे सांगितले जाते की भक्ताच्या भक्तीवर प्रसन्न होऊन या जागेवर स्वतःहून गणपती चालून आलेला आहे. निसर्गसमृद्ध परिसरात जांभ्या दगडाचे व टुमदार असे हे कौलारू मंदिर आहे. येथील गर्भगृहावर असलेले शिखर वैशिष्ट्यपूर्ण असून ते तीन मजली (तीन टप्प्यात) आहे.
या मंदिराची आख्यायिका अशी की सोनगावपासून जवळच असलेल्या कोथवली येथील एका शिल्पकाराने अवजड पाषाणातून एक गणेशमूर्ती घडविण्याचे ठरविले. मूर्ती घडविण्याचे काम सुरू असताना त्याला स्वप्नदृष्टांत झाला की मला सोनगावच्या बाबजी बरव्यांकडे नेऊन पोहोचव. त्याच रात्री गणेशाचे निस्सीम भक्त असलेल्या बाबजींनाही स्वप्नदृष्टांत झाला की मला तुझ्याकडे यायचे आहे, तुझ्या घराजवळील सुपारीच्या बागेत माझी स्थापना कर. स्वप्नदृष्टांतांनुसार मूर्ती बाबजींकडे येणार हे निश्चित झाले; परंतु मूर्तीची सुंदर जडणघडण पाहून सोनगावचे जमीनदार मंडलिक यांचा त्या मूर्तीवर जीव बसला. त्यांनी ही मूर्ती स्वतःसाठी सोनगावात आणण्याचे ठरविले. त्यानुसार बांबूची पालखी बनवून ५० ते ६० भोयांवर मूर्ती आणण्याची जबाबदारी सोपविली.
मूर्तीला घेऊन पालखी सोनगावात आली; परंतु जमीनदार मंडलिक यांच्या घराकडे वळणाऱ्या रस्त्यावर येताच भोयांना पालखी अचानक जड झाल्यासारखे वाटले. त्यांना पुढे पालखी नेता येईना. शेवटी पालखी खाली उतरवून त्यांनी जमीनदाराला तसा निरोप कळविला. झालेला प्रकार समजताच मंडलिक हबकले व गणपतीच्या इच्छेपुढे काही करता येणार नाही, हे समजल्यावर त्यांनी मूर्ती बाबजींकडे नेण्यास मान्यता दिली. त्याबरोबर ती पालखी हलकी झाली व मूर्ती बाबजींच्या सुपारीच्या बागेत ठेवण्यात आली. परिस्थिती हलाखीची असल्यामुळे बाबजी बरवे यांनी मूर्तीभोवती चार खांब रोवून त्यावर गवताचे छप्पर बनविले. वैशाख वद्य पंचमीला या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. तेव्हापासून अनेक वर्षे मंदिराच्या रचनेत विशेष फरक झालेला नव्हता. येथील नोंदीनुसार त्यांच्या पाचव्या पिढीतील लक्ष्मण मोरो बरवे यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार करून पक्के मंदिर बांधले होते. २००८ मध्ये केलेल्या नूतनीकरणानंतर मंदिराला सध्याचे स्वरूप प्राप्त झालेले आहे.
मुंबई–गोवा महामार्गावरून चिपळूण येथील परशुराम मंदिराच्या आधी सोनगाव येथे जाण्यासाठी रस्ता आहे. या रस्त्यापासून ७०० फूट खोल आणि वाशिष्ठी नदीपासून २५० फूट उंचावर डोंगराच्या उतारावर गणपतीचे हे स्थान आहे. त्यामुळे त्याला ‘घळईतील गणपती’ असे म्हटले जाते. ‘बरव्यांचा गणपती’ म्हणूनही पंचक्रोशीत हे मंदिर प्रसिद्ध आहे. मूषकमंडप, सभामंडप व गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. येथील मूषक मंडपात एका चौथऱ्यावर मूषकराज विराजमान आहे. सभामंडप हा आकाराने मोठा असून त्यातील भिंतींमध्ये १२ मोठ्या खिडक्या आहेत. त्यामुळे सभामंडपात पुरेसा प्रकाश व हवा असते.
गर्भगृहात उजव्या पायाची मांडी घातलेली आणि डावा पाय उभा, पण गुडघ्यात दुमडलेला अशी सुमारे चार फूट उंचीची शेंदूरचर्चित मूर्ती आहे. ही मूर्ती २५० वर्षांपूर्वीची असल्याचे सांगितले जाते. या मूर्तीसमोर प्राचीन दगडी पादुका आहेत. दरवर्षी वैशाख वद्य पंचमीला गणेशमूर्ती प्रतिष्ठापनेचा उत्सव येथे मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. सहस्रावर्तने, षोडशोपचारे पूजा, आरत्या व दुपारी गावजेवण असते. पौष महिन्यातील संकष्टी चतुर्थीलाही येथे उत्सव असतो. त्यावेळी सत्यनारायण पूजा, भारूड, भजन असे कार्यक्रम होतात. मंदिरासमोर बरवे घराण्यातील गणेशभक्तांच्या दोन संजीवन समाध्या आहेत. दररोज सकाळी ७ ते दुपारी १२ व सायंकाळी ४ ते रात्री ८ वाजेपर्यंत भाविकांना गणपतीचे दर्शन घेता येते. दररोज सायंकाळी ७.३० वाजता येथे सांजआरती होते.