खिंडीतील गणपती / कुरणेश्वर मंदिर

सातारा, ता. सातारा, जि. सातारा

सातारा शहरातील अजिंक्यतारा या सुप्रसिद्ध गडाच्या पायथ्याशी असलेला खिंडीतील गणपती त्याजवळच असलेले कुरणेश्वर महादेवाचे मंदिर ही साताऱ्यातील प्रसिद्ध तीर्थस्थाने आहेत. शिवाजी महाराजांचा पदस्पर्श झालेली ही प्राचीन मंदिरे अनेक भाविकांची श्रद्धास्थाने आहेत. असे सांगितले जाते की गणपती मंदिरातील गर्भगृहातील मूळ मूर्तीच्या पुढे भिंत घातलेली असून ती मूर्ती कायमस्वरूपी झाकण्यात आलेली आहे भिंतीच्या पुढे ठेवण्यात आलेल्या नवीन मूर्तीची येथे पूजा केली जाते.

छत्रपती राजाराम महाराजांनी १६९८ मध्ये सातारा ही आपली राजधानी केली होती. त्यावेळी अजिंक्यतारा किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या या मंदिरांमध्ये अनेक भाविक दर्शनाला जात असत. त्यामुळे या मंदिराची परिसरात ख्याती होती. मराठ्यांचे राज्य नष्ट करण्याचा चंग बांधून आलेल्या औरंगजेबाला सातारा ताब्यात घ्यायचे होते. त्यासाठी त्याने सातारच्या उत्तरेस करंजे गावी आपला तळ ठोकला. मुलगा अजीमशहा यास उरमोडी खोऱ्यात, सर्जेराव कुरणाच्या बाजूस खिंडवाडीपर्यंत किल्ल्याच्या पूर्व उताराच्या पलीकडे तरबियतखान यांचे तळ होते. त्यामुळे औरंगजेबाने चहूबाजूने किल्ल्याला घेरले होते.

किल्ल्याला वेढा पडल्यानंतर औरंगजेबाच्या मुस्लिम सैन्यांकडून खिंडीतील गणपतीच्या मूर्तीची विटंबना होऊ नये म्हणून मूळ मूर्तीसमोर भिंत घालून त्यासमोर मेणाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली गेली. पुढे अनेक लढाया झाल्या. त्यात पुन्हा अजिंक्यतारा मराठ्यांनी ताब्यात घेतला. परिस्थिती स्थिरस्थावर झाल्यानंतर येथील मूळ मूर्ती बाहेर काढावी, असे भक्तांच्या मनात आले; परंतु त्यावेळी येथील पुजाऱ्याला गणपतीने दृष्टांत देऊन सांगितले की मला बाहेर काढण्याचा प्रयत्न करू नका. सध्या जी मूर्ती आहे तिचीच पूजा यापुढेही सुरू राहू दे. त्या मूर्तीतही माझाच वास आहे. तेव्हापासून आजपर्यंत मूळ मूर्ती ही गर्भगृहाच्या भिंतीच्या मागेच आहे मेणापासून बनविलेल्या मूर्तीची येथे पूजा होते.

सातारा शहरातून सज्जनगडाकडे जाणाऱ्या मार्गावरील एका बोगद्यातून बाहेर पडल्यावर मार्गालगतच खिंडीतील गणपती कुरणेश्वर महादेवाचे स्थान आहे. मार्गावर असलेल्या कमानीतून सुमारे १०० पायऱ्या उतरल्यावर गर्द झाडीमध्ये असलेले गणपतीचे मंदिर दिसते. सभामंडप गर्भगृह अशी या मंदिराची रचना आहे. सभामंडपात गणपतीचे वाहन मूषकाची हातात लाडू असलेली धातूची मूर्ती आहे. त्यापुढे गर्भगृहातील मखरात शेंदूरचर्चित गणपतीची मूर्ती आहे. मूर्तीच्या मस्तकावर चांदीचा मुकुट असून मूर्तीच्या मागील बाजूस चांदीच्या पत्र्यावर कोरीव काम करून सजावट करण्यात आली आहे. या मंदिराचा सभामंडप कौलारू असून गर्भगृहावर असलेल्या शिखरामधील देवळ्यांमध्ये विविध देवीदेवतांच्या मूर्ती आहेत.

गणपती मंदिराच्या मागील बाजूस असणाऱ्या सभागृहवजा इमारतीजवळून आणखी खाली जाणारा दगडी पायऱ्यांचा मार्ग आहे. या वाटेने पुढे गेल्यावर कुरणेश्वर महादेव मंदिराकडे जाता येते. या सर्व परिसराचा मंदिर समितीतर्फे नियोजनबद्ध पद्धतीने विकास करण्यात आल्यामुळे हे स्थान भाविकांसोबतच पर्यटकांचेही आकर्षण बनले आहे. जागोजागी असलेल्या गर्द वेलींच्या कमानी, झाडांच्या खोडापासून साकारलेले काष्ठशिल्प, कारंजे आणि सगळीकडे झाडेच झाडे, असा हा परिसर आहे. येथे असलेल्या कुरणेश्वर मंदिरासमोर प्राचीन तुळशी वृंदावन असून मंदिरात प्रवेश करताना सभामंडपात समोरच अखंड काळ्या पाषाणातील नंदीची मूर्ती गर्भगृहात केदारेश्वर महादेवाची पिंडी आहेया मंदिराचा कळस घुमटाकार आहे. याशिवाय या परिसरात एक दत्तमंदिरही आहे.

मंदिर परिसरात आंबा, आवळा, गुलमोहर, चाफा आणि इतर अनेक वृक्ष आहेत. आवळ्याच्या झाडाखाली बसून जेवण करण्याची भारतीय संस्कृतीत फार प्राचीन परंपरा आहे, ज्यासआवळी भोजनअसे म्हणतात. अशा भोजनाचा लाभ घ्यायचा असेल तर तशी सोय येथे मंदिर समितीतर्फे उपलब्ध करून देण्यात आली आहे. असे सांगितले जाते की आवळ्याच्या सावलीत बसले असता या झाडांमधून निघणाऱ्या तरंगांमुळे सकारात्मक ऊर्जा मिळते. ज्या झाडावर परिपक्व आवळे असतात, त्या झाडाची शक्‍ती जास्त असते. या दृष्टीने कार्तिक महिन्यात आवळ्याच्या झाडाचे पूजन आवळी भोजन केले जाते. या झाडामध्ये श्रीविष्णूंचा वास असतो, असे मानले जाते. श्रीविष्णू ही चलनवलनाची, तरंगांची चेतनेची देवता आहे. श्रीविष्णूंचे पूजन करण्याच्या निमित्ताने आवळ्याच्या झाडाखाली बसावे, आवळे खावेत. यासोबतच काही पदार्थ झाडाखाली शिजवून खावेत. यामुळे आवळ्याच्या झाडाच्या सान्निध्यात राहण्याचे फायदे होऊ शकतात, असे आवळी भोजन करण्यामागचे विज्ञान आहे.

राजे प्रतापसिंह यांनी पदच्युत होण्यापूर्वी साताऱ्यातील बहुतेक सर्व देवस्थानांना दिवाबत्तीसाठी वर्षासन सुरू केले होते. त्यानुसार गणपती कुरणेश्वर मंदिरांना दरवर्षी २८ रुपये वर्षासन सुरू करण्यात आले होते. मराठ्यांनंतर ब्रिटिश सरकारकडून स्वातंत्र्य प्राप्तीनंतर महाराष्ट्र सरकारकडून अजूनही या मंदिरांना वर्षासन मिळत आहे. भाद्रपद शुद्ध चतुर्थी माघ शुद्ध चतुर्थीला येथे पाच दिवसांचे मोठे उत्सव साजरे होतात.

उपयुक्त माहिती:

  • सातारा बस स्थानकापासून किमी अंतरावर 
  • राज्यातील अनेक भागांतून सातारा येथे येण्यासाठी एसटी सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत जाऊ शकतात
  • परिसरात निवास न्याहरीचे अनेक पर्याय
Back To Home