छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकाळात ज्या मोजक्या जलदुर्गांची उभारणी झाली, त्यातील सुवर्णदुर्ग हा ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचा दुर्ग मानला जातो. तळकोकणातील सिंधुदुर्ग किल्ल्याइतकेच महत्त्व मध्य कोकणातील या सुवर्णदुर्गाचे होते. या सुवर्णदुर्गाचा शेजार लाभलेले व कोकणचे भूषण समजले जाणारे आंजर्ले येथील कड्यावरील गणपती मंदिर हे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. सुमारे ६०० वर्षांपूर्वीचे हे मंदिर सुप्रसिद्ध पर्यटनस्थळ म्हणूनही दिवसेंदिवस लोकप्रिय होत आहे.
पूर्वी गणपतीचे स्थान येथील समुद्र किनाऱ्यावर असलेल्या अजरालयेश्वर मंदिरात होते. मात्र समुद्रातील पाण्याची पातळी वाढल्याने मंदिर पाण्याखाली जाऊ लागले. त्यावेळी तेथून जवळ असलेल्या टेकडीवर (स्थानिक भाषेत कड्यावर) ग्रामस्थांनी मंदिर बांधून त्यात गणपतीची स्थापना केली. तेव्हापासून हे स्थान कड्यावरचा गणपती म्हणून प्रसिद्ध आहे. अशी समजूत आहे की समुद्रापासून टेकडीवर येताना मंदिराच्या वाटेवर गणपतीने एक पाय ठेवला म्हणून तेथे त्याच्या पायाचा ठसा उमटला आहे. त्याला ‘गणपतीचे पाऊल’ असे म्हटले जाते. गणपती मंदिरापासून साधारणतः १०० मीटरवर असलेल्या या ठिकाणाचीही भाविकांकडून पूजा केली जाते. असे सांगितले जाते की अजरालयेश्वर या मंदिरावरून या गावाचे नावही आंजर्ले पडले. आजही डिसेंबर ते मे महिन्यापर्यंत ओहोटीच्या वेळी या मंदिराचे भग्नावशेष समुद्रात पाहायला मिळतात.
समुद्रकिनाऱ्यावरून २२३ पायऱ्या चढून मंदिरापर्यंत येता येते. मंदिरात येण्यासाठी आता नव्याने थेट रस्ताही बनविण्यात आलेला आहे. पश्चिमेकडे अथांग समुद्र व पूर्वेकडे निसर्गसमृद्ध परिसरात गणपतीचे हे स्थान आहे. मंदिराच्या बांधणीवर विविध कालखंडातील म्हणजे मोगल, रोमन, युरोपातील गौथिक शैलीचा प्रभाव दिसतो. या मंदिराच्या सभोवताली सहा फूट उंचीचा दगडी तट (तटबंदी) आहे. मंदिराचे पूर्वीचे बांधकाम लाकडी होते. १७६८ ते १७८० या कालावधीत जीर्णोद्धार होऊन सध्याचे मंदिर अस्तित्वात आले. असे सांगितले जाते की आंजर्ले येथील दशग्रंथी विद्वान रामकृष्ण भट नित्सुरे यांना गणपतीने दृष्टांत देऊन ‘मंदिराचा जीर्णोद्धार करावा’ असे सांगितले; परंतु रामकृष्ण भट यांची आर्थिक बाजू कमकुवत होती. त्यांनी पुणे येथील थोरले माधवराव पेशवे यांच्या दरबारात मोठ्या हुद्द्यावर असलेल्या व मूळचे आंजर्ले येथील असलेल्या वासुदेव रघुनाथ ऊर्फ दादाजीपंत घाणेकर यांना दृष्टांताबद्दल सांगितले. त्यावेळी गणपती मंदिराच्या जीर्णोद्धाराला त्यांनीही मान्यता दिली. सुमारे १२ वर्षे चाललेल्या जीर्णोद्धारासाठी घाणेकर यांनी पैसा पुरविला.
जांभ्या दगडांचे बांधकाम असलेल्या या मंदिरांच्या भिंतींना संगमरवरापासून बनविलेल्या चुन्याचा (झिंको पॉलिश) वापर करण्यात आलेला आहे. त्यामुळे हे मंदिर संगमरवरासारखे शुभ्र दिसते. मंदिराचा परिसर विस्तीर्ण असून परिसरात सर्वत्र पुरातन बकुळ वृक्ष आहेत. याशिवाय येथील उद्यानात विविध फुलझाडे व शोभेची झाडे लावल्यामुळे मंदिराच्या सौंदर्यात आणखीन भर पडते. मंदिरासमोर असलेला तलाव, सुदर्शन तलाव म्हणून प्रसिद्ध आहे. सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. मंदिराची उंची सुमारे ६५ फूट इतकी आहे. सभामंडपाला तीन कमानी म्हणजेच तीन प्रवेशद्वारे आहेत. त्यापैकी मध्यभागी असलेली कमान मोठी, तर इतर दोन लहान आहेत. सभामंडपावर घुमटाकृती छत आहे. घुमटाच्या टोकाला कमलपुष्पे कोरलेली आहेत. अंतराळ काहीसे लहान असून त्यात अनेक घंटा लावलेल्या दिसतात.
गर्भगृहात गणपतीची सिंहासनाधिष्ठित, उजव्या सोंडेची, सुमारे पाच फूट उंचीची, देखणी व सुबक मूर्ती आहे. शिरावर सोनेरी मुकुट परिधान केलेली ही मूर्ती चतुर्भुज आहे. उजवीकडील एका हातात अंकुश व दुसरा हात आशीर्वाद देतानाचा आहे, डावीकडील एका हातात परशु, तर दुसरा हात गुडघ्यावर ठेवलेला आहे. मूर्तीच्या मागे असलेल्या पाषाणी प्रभावळीवर कोरीवकाम असून संपूर्ण मूर्ती ही तैलरंगाने रंगविलेली आहे. मूर्तीच्या चरणांजवळ गणपतीचे वाहन मूषक आहे. बेसॉल्ट खडकापासून बनविलेल्या या मूर्तीच्या दोन्ही बाजूला एक–एक फूट उंचीच्या रिद्धी–सिद्धीच्या मूर्ती आहेत. गणपतीची मूर्ती दाभोळमधील पाथरवटांनी (मूर्तिकारांनी) घडविल्याचे सांगितले जाते.
मंदिराच्या गर्भगृहावर सुंदर शिखर असून त्याला मुख्य कळसासह १६ कळस व १६ उपकळस आहेत. या शिखरावर अष्टविनायकांची शिल्पे कोरलेली आहेत. माघ शुद्ध प्रतिपदेपासून माघ शुद्ध पंचमीपर्यंत पाच दिवसांचा गणपतीचा जन्मोत्सव येथे साजरा होतो. दररोज सकाळी ७ ते सायंकाळी ७ यादरम्यान भाविकांना येथील गणपतीचे दर्शन घेता येते. मंदिर संस्थानतर्फे येथे भाविकांसाठी भक्त निवासाची सुविधा करण्यात आलेली आहे.
गणपती मंदिरासोबतच आंजर्ले हे गाव दापोली तालुक्यातील महत्त्वाच्या व प्रसिद्ध पर्यटनस्थळांपैकी एक आहे. विस्तीर्ण समुद्र किनाऱ्याबरोबरच ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसाही या गावाला लाभला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांपासून अगदी पेशवाईच्या काळापर्यंत अनेक राजे व सरदार यांचा येथे वावर असायचा. आंजर्ले, आडे, केळशी व मुरूड ही गावे समुद्रकिनाऱ्यावर वसलेली असल्याने जंजिऱ्याच्या सिद्दी सैन्यांकडून त्यावर अनेकदा धाडी पडत असत. त्यामुळे या गावांमध्ये कायम अस्थिरता असे. त्यामुळेच ‘आजबाई सारवा, उद्याबाई तारवा’ ही म्हण येथे जन्माला आली. याचा अर्थ आज घराची सारवासारव वा इतर कामे आहेत; परंतु कधी सैनिक येऊन तारवांतून (जहाजांतून) घेऊन जातील, ही भीती येथे कायम असायची. मात्र दिवसेंदिवस या परिस्थितीत बदल होत गेला आणि स्थिरता येऊ लागली.