शेगाव हे गजानन महाराजांचे मुख्य समाधी स्थळ असले, तरी त्यांच्या भक्तांनी आणि अनुयायांनी महाराजांच्या विचारांचा आणि कार्याचा वारसा पुढे नेण्यासाठी ठिकठिकाणी त्यांची मंदिरे उभारली आहेत. त्यांपैकी एक असलेले, बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यातील घिर्णी येथील गजानन महाराज मंदिर हे हजारो भक्तांच्या श्रद्धेमुळे अल्पावधीतच ‘प्रति शेगाव’ म्हणून नावारूपास आले आहे. या मंदिरात अखंड तेवणारी ज्योत आणि शिस्तबद्ध नित्योपासना भक्तांना शेगावच्या चैतन्याचीच अनुभूती देते. प्रकट दिन, ऋषीपंचमी व रामनवमीसारख्या उत्सवांच्या वेळी येथे भक्तांची मांदियाळी असते. राज्य सरकारने या क्षेत्राला ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा देऊन त्याचा गौरव केला आहे.
शेगावप्रमाणेच आपल्या गावातही गजानन महाराजांचे मंदिर असावे, या भावनेतून येथील ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून २०१९ मध्ये हे मंदिर बांधले. अल्पावधीतच प्रसिद्ध झालेले हे मंदिर व शेगाव येथील गजानन महाराजांचे मूळ मंदिर यांच्यात साधर्म्य असलेल्या अनेक गोष्टी आहेत. शेगावच्या मंदिराप्रमाणेच अष्टकोनी असलेले हे मंदिर एका शेतजमिनीत उभारले आहे आणि शेगावमधील मंदिराप्रमाणेच या जमिनीचा गट क्रमांक ४१ आहे. शेगावप्रमाणेच या मंदिरासमोर तीन रस्ते आहेत आणि मंदिरासमोरील जागेचा आकार चोळीच्या खणासारखा आहे.
मंदिराच्या बाजूला कालिंका नदी वाहते. शेगावमधील मंदिराप्रमाणेच येथील मूर्तीची उंची २.५ फूट आहे आणि मूर्तीची दिशाही समान आहे. शेगावप्रमाणेच येथेही राममंदिर आहे. याशिवाय येथेही अखंड ज्योत तेवत असते आणि भजन, आरती, अन्नदान व अन्य नित्यक्रमही शेगावप्रमाणेच होतात. दर गुरुवारी येथे महाआरती व अन्नदान होते.
मलकापूरच्या पूर्व दिशेला सुमारे सहा किमी अंतरावर हे मंदिर आहे. मंदिराबाहेर केळी व नारळांची झाडे आहेत. मंदिरासमोर खुला मंडप आहे. भाविकांच्या सोयीसाठी त्यावर पत्र्याचे छत घातलेले आहे. या मंडपात भाविकांना बसण्यासाठी आसने व उत्सवाच्या वेळी दर्शनरांगेचे नियोजन करण्यात येते. मंडपाच्या पुढील बाजूला उंच अधिष्ठानावर गर्भगृहाची रचना आहे. या गर्भगृहात महाराजांच्या लाकडी पादुका आहेत आणि वज्रपिठावर श्रीराम, लक्ष्मण, सीता व मारुती यांच्या संगमरवरी मूर्ती विराजमान आहेत. या मूर्तींच्या शेजारी असलेल्या काचेच्या पेटीत गजानन महाराजांची चांदीची मूर्ती आहे. या गर्भगृहाच्या तळमजल्यावर असलेल्या समाधीमार्गाकडे जाण्यासाठी सुमारे १५ पायऱ्या उतराव्या लागतात. या दर्शनमार्गाच्या प्रवेशद्वाराच्या वर गणेशाची मोठी मूर्ती आहे. या समाधी मंदिरात वज्रपीठावर महाराजांच्या पादुका व त्यामागे असलेल्या संगमरवरी मखरात गजानन महाराजांची संगमरवरी मूर्ती आहे.
या मूर्तीवर सुंदर कलाकुसर असलेला चांदीचा मुकुट आहे. मूर्तीसमोरच गजानन महाराजांची लहान संगमरवरी मूर्ती आहे. तिच्या डावीकडे हनुमान तर उजवीकडे बालकृष्णाच्या पंचधातूच्या मूर्ती आहेत. गर्भगृहातील वितानावर सुंदर नक्षी कोरलेली आहे. गर्भगृहातून बाहेर आल्यावर दुसऱ्या जिन्याने पुन्हा मंडपात येता येते. बाहेर येण्याच्या दरवाजाच्या वरील बाजूस शिवशंकरांची मूर्ती आहे.
या मंदिराच्या उजव्या बाजूस गजराजाचे शिल्प आहे. या शिल्पाच्या उजवीकडे दुसऱ्या गजराजाच्या शिल्पावर गणेशाची मूर्ती विराजमान आहे आणि गणेशाच्या दोन्ही बाजूंना रिद्धी-सिद्धी आहेत. ही मूर्ती असलेल्या भागात चारही बाजूंना स्टेनलेस स्टीलचे रेलिंग बसवण्यात आले आहे. नजीक असलेल्या औदुंबर वृक्षाच्या खाली चारही बाजूंनी श्रीदत्तात्रेय, गजानन महाराज, स्वामी समर्थ तसेच साईबाबांच्या प्रतिमा ठेवण्यात आल्या आहेत. या वृक्षाच्या दोन्ही बाजूंना वाघाची शिल्पे आहेत. परिसरात सोमेश्वर महादेवाचे स्थान आहे. येथील चौथऱ्यावर शिवलिंग व त्यासमोर नंदीची मूर्ती आहे.
मंडपाच्या डाव्या कोपऱ्यात गजानन महाराजांची गादी व पारायण स्थळ आहे. येथील मोठ्या सभागृहात गजानन महाराजांच्या गादीवर पादुका ठेवण्यात आल्या आहेत. गादीच्या मागील बाजूस गजानन महाराज, स्वामी समर्थ आणि साईबाबांच्या मोठ्या प्रतिमा आहेत. मंडपातील एका भिंतीवर वटवृक्षाखाली बसलेल्या गजानन महाराजांचे शिल्प कोरलेले आहे. या मंडपात गजानन महाराजांची पालखीही आहे. येथील भिंतींवर गजानन महाराजांच्या लीलांचे वर्णन करणाऱ्या अनेक प्रतिमा लावण्यात आल्या आहेत. या मंदिरावर उंच शिखर असून त्यावर द्विस्तरीय आमलक व कळस आहेत.
पंचक्रोशीतील अनेक भाविक येथे दर्शनासाठी येतात. दर गुरुवारी दुपारी येथे अन्नदान करण्यात येते. सायंकाळी महाआरतीनंतर मंदिर परिसरात गजानन महाराजांची पालखी मिरवणूक काढण्यात येते. येथे रामनवमी, गुरुपौर्णिमेसह विविध उत्सव होतात. रामनवमीच्या दिवशी श्रीराम-सीता-लक्ष्मणाच्या तसेच गर्भगृहातील गजानन महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करून पूजा करण्यात येते. या दिवशी येथे होमहवनही करण्यात येते. गजानन महाराज प्रकट दिनी येथे पहाटे काकडा आरती, गजानन याग तसेच गजानन महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करण्यात येतो. दुपारी भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात येते. सायंकाळी परिसरातून पालखी मिरवणूक काढण्यात येते. रात्री महाआरती करण्यात येते. या दिवशी दिवसभर येथे भजन व कीर्तन सुरू असते. प्रकट दिनाच्या उत्सवानिमित्त येथे शिवमहापुराण सप्ताहाचेही आयोजन करण्यात येते. ऋषीपंचमीच्या दिवशी गजानन महाराज पुण्यतिथीनिमित्त येथे विविध कार्यक्रम होतात. या दिवशी सकाळी गजानन महाराजांच्या मूर्तीवर दुग्धाभिषेक करण्यात येतो. त्यानंतर गावातून पालखी मिरवणूक काढण्यात येते. सायंकाळी भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात येते. या उत्सवांच्या वेळी घिर्णीला यात्रेचे स्वरूप येते. शेगावला जाणाऱ्या अनेक पालख्या आणि पायी दिंड्या आवर्जून घिर्णीला विसावा घेतात.