गहिनीनाथ समाधी (मूळस्थान) मंदिर

गहिनीनाथ गड, चिंचोली, ता. पाटोदा, जि. बीड

मच्छिंद्रनाथांनी नाथसंप्रदायाची स्थापना केली आणि पुढे गुरु-शिष्य परपरेंने या पंथाचा संपूर्ण भारतात प्रसार नवनाथांनी केला. नवनाथ भारत भ्रमंतीदरम्यान ज्या ज्या ठिकाणी थांबले, तिथे त्यांनी मठ स्थापन केले. कालांतराने या ठिकाणी त्यांची समाधी स्थळे निर्माण झाली व ती सर्व ठिकाणे नाथ संप्रदायाची तीर्थक्षेत्रे म्हणून नावारूपास आली. पुढे नाथ संप्रदायाचा प्रभाव वाढल्याने ही संपूर्ण हिंदू धर्मीयांची परम श्रद्धास्थाने बनली. पाटोदा तालुक्यातील चिंचोली येथील गहिनीनाथ गडावरील गहिनीनाथ यांचे मूळ समाधी मंदिर त्यांपैकीच एक होय.

नवनाथ संप्रदायातील नऊ नाथांपैकी ‘गहिनीनाथ’ हे एक अत्यंत सिद्ध, तेजस्वी आणि करुणामयी व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात. गुरू गोरक्षनाथांचे पट्टशिष्य असलेल्या गहिनीनाथांचे स्थान आध्यात्मिक क्षेत्रात अढळ आहे. त्यांच्या जन्माची कथा त्यांच्या नावाप्रमाणेच अलौकिक आणि ‘गूढ’ आहे. गहिनीनाथांचा जन्म त्र्यंबकेश्वर येथील कुशवर्त तीर्थावरील चिखलातून (करळीतून) झाला, असे मानले जाते. गुरू गोरक्षनाथांनी पुतळा बनवून त्यात चैतन्य फुंकले आणि गहिनीनाथांचा जन्म झाला. बारा वर्षे या बाळाचे पालनपोषण व सांभाळ एका ब्राह्मण दाम्पत्याने केला. त्यानंतर गहिनीनाथांनी गोरक्षनाथांचे शिष्यत्व स्वीकारून नाथसंप्रदायाची धुरा सांभाळली. गोरक्षनाथांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी योगसाधनेचे आणि ब्रह्मविद्येचे सर्वोच्च शिखर गाठले. ‘श्री नवनाथ भक्तिसार’ या ग्रंथात त्यांनी भक्ती, ज्ञान, कर्म आणि ध्यान याद्वारे मोक्ष मिळवण्याचा मार्ग जगाला अवगत करून दिला.

गहिनीनाथांचे आध्यात्मिक योगदान म्हणजे त्यांनी नाथ पंथ आणि वारकरी संप्रदाय यांना जोडणारा सुवर्णसेतू बांधला. ब्रह्मगिरी पर्वताच्या सानिध्यात त्यांनी संत निवृत्तीनाथांना अनुग्रह दिला. गहिनीनाथांनी निवृत्तीनाथांना उपदेश केला की ‘जो गुप्त ज्ञानबोध मला गोरक्षनाथांकडून मिळाला, तो तू जगाच्या कल्याणासाठी प्रकट कर.’ याच प्रेरणेतून पुढे संत ज्ञानेश्वरांनी ‘ज्ञानेश्वरी’च्या माध्यमातून भक्तीची गंगा जनसामान्यांपर्यंत पोहोचवली. ईश्वर केवळ हिमालयातील गुहेत नसून तो प्रत्येक जीवाच्या हृदयात आहे, अशी शिकवण त्यांनी समाजाला दिली. योगसाधनेला भक्तीची जोड देऊन त्यांनी अध्यात्म सोपे केले. त्यांनी बीड जिल्ह्यातील चिंचोली गावात गहिनीनाथ गडावर संजीवन समाधी घेतली, असे मानले जाते.

हे समाधी मंदिर सुमारे आठशे वर्षांपूर्वीचे असल्याचे येथील ग्रामस्थ सांगतात. सतराव्या शतकात या समाधी मंदिराचा जीर्णोद्धार झाल्याचा शिलालेख मंदिराच्या प्रवेशद्वारावर कोरलेला आहे. या मंदिरास भक्कम तटबंदी आहे व तिला एक भव्य प्रवेशद्वार आहे. तटबंदीच्या बाहेर प्रवेशद्वारासमोर गहिनीनाथांच्या शिष्यांची समाधी स्थळे आहेत. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला चौथरे आणि आतील बाजूला पहारेकरी कक्ष आहेत. प्रवेशद्वारातून आत येताच मंदिराच्या फरसबंदी प्रांगणात विविध प्रकारचे प्राचीन वृक्ष नजरेस पडतात. प्रांगणात तुलसीवृंदावन व डाव्या बाजूला तटबंदीला लागून प्रशस्त ओवऱ्या आहेत. या ओवऱ्यांचा वापर भाविकांसाठी विश्रामस्थान व भक्तनिवास म्हणून केला जातो. प्रांगणात एक गोशाळा देखील आहे.

येथून पुढे उजव्या बाजूला सभामंडप व गर्भगृह अशी रचना असलेले मंदिर लक्ष वेधून घेते. सभामंडप अर्धखुल्या स्वरूपाचा आहे आणि तो दहा चौकोनी स्तंभांवर उभा आहे. त्यापुढे उंच चौथऱ्यावर गर्भगृह आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारासमोर जमिनीवर कासवशिल्प आहे. प्रवेशद्वाराच्या द्वारशाखा सपाट आहेत व ललाटबिंबावर गणपतीशिल्प आहे. तोरणात पुष्पनक्षी कोरलेली आहे आणि त्याच्या वरच्या बाजूस शके १६१९ मध्ये मंदिराचा जीर्णोद्धार केला असल्याचा प्राचीन शिलालेख आहे. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला व मंडारकावर कमलपुष्पांची नक्षी आहे.

गर्भगृहात जमिनीवर मध्यभागी गहिनीनाथांची समाधी आहे. समाधीवरील पाषाणास रुद्राक्षमाळा घातल्या आहेत. गर्भगृहात डाव्या बाजूच्या भिंतीलगत वज्रपीठावरील मखरात गहिनीनाथांची ध्यानस्थ मुद्रेतील मूर्ती आहे. या मूर्तीच्या डोक्यावर फेटा व गळ्यात रुद्राक्षमाळा आहेत. गर्भगृहात चारही भिंतींत दीपकोष्ठके आहेत. गर्भगृहाच्या बाह्य बाजूने प्रदक्षिणा मार्ग आहे. गर्भगृहाच्या छतावर चार कोनांवर चार मिनारसदृश स्तंभ आहेत. त्यांच्या शीर्षभागी आमलक व कळस आहेत. छतावर मध्यभागी घुमटाकार शिखर आहे.

समाधी मंदिराच्या शेजारीच हेमाडपंती स्थापत्यशैलीतील दगडी बांधकाम असलेले प्राचीन शिवमंदिर आहे. मंदिरात प्रत्येकी चार नक्षीदार स्तंभांच्या चार रांगा आहेत. सर्व स्तंभ चौकोनी स्तंभपादावर उभे आहेत. स्तंभदंडात चौकोन, षट्कोन, अष्टकोन, वर्तुळ असे विविध भौमितिक आकार आहेत. स्तंभांच्या शीर्षभागी कणी आणि त्यावर हस्त आहेत. मंदिरात जमिनीवर शिवपिंडी आहे, ज्यावर छत्र धरलेला पितळी नाग आहे. शिवपिंडीवर जलधारा धरलेले तांब्याचे अभिषेक पात्र छताला टांगलेले आहे. मंदिरात मागील भिंतीलगत वज्रपीठावर देवी पार्वतीची प्राचीन पाषाणमूर्ती आहे. शिवपिंडीच्या डाव्या बाजूला वज्रपीठावर संत तुकाराम महाराजांची मूर्ती आहे. मंदिराच्या मागील बाजूला पाण्याने भरलेला हौद आहे आणि हे सिंदफना नदीचे उगमस्थान असल्याचे सांगितले जाते.

मंदिरात पौष महिन्याच्या वद्य अष्टमीला गहिनीनाथांची पुण्यतिथी भक्तिपूर्ण वातावरणात साजरी केली जाते. मंदिरात गुरुपौर्णिमा व दत्त जन्मोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. वर्षभरातील अनेक सण व उत्सवांच्या वेळी हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात. गुरुवार, सोमवार, पौर्णिमा, अमावस्या, प्रदोष, एकादशी आदी दिवशी मंदिरात भाविकांची विशेष गर्दी असते.

उपयुक्त माहिती:

  • पाटोदा येथून ३७ किमी अंतरावर
  • बीड येथून ६३ किमी अंतरावर
  • पाटोदा येथून एसटीची सुविधा उपलब्ध
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहारीची सुविधा
Back To Home