रायगड जिल्ह्याच्या खालापूर तालुक्यातील खोपोली शहर हे सह्याद्रीच्या कुशीत वसलेले एक ऐतिहासिक ठिकाण आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधून कोकणात उतरताना लागणारे हे पहिले महत्त्वाचे केंद्र असून अठराव्या शतकात पेशवे काळात नाना फडणवीस यांनी येथे विरेश्वर महादेव मंदिर आणि पाषाणी पाण्याचा हौद बांधला होता. अशा समृद्ध ऐतिहासिक आणि धार्मिक पार्श्वभूमीवर पाताळगंगा नदीच्या काठावर स्वामी गगनगिरी महाराजांचा मठ उभारला आहे. सह्याद्रीच्या डोंगररांगा आणि नदीच्या पात्राने वेढलेले हे मंदिर खोपोली शहराचे आध्यात्मिक वैभव मानले जाते. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या या मंदिरात प्राचीन नाथ संप्रदायाची शिस्त आणि परंपरा काटेकोरपणे पाळली जाते.
गगनगिरी महाराज यांचे मूळ नाव श्रीपाद गणपतराव पाटणकर असे होते. त्यांचा जन्म पाटण तालुक्यातील मणदुरे येथे १९०६ साली दत्त जयंतीच्या दिवशी झाला. पाटणकर यांचे पूर्वीचे आडनाव साळुंखे असे होते. ते पूर्वीच्या चालुक्य घराण्यातील होते. त्यांच्या मूळ पुरुषाने पाटणची जहागिरी मिळविल्यामुळे त्यांना पाटणकर असे आडनाव प्राप्त झाले. या घराण्याच्या वंशविस्तारानंतर शिक्केकरी वाडा पाटण, बीबी, केर, वाजेगाव, रामपूर, दिवशी बुद्रुक व खुर्द, सावंतवाडी, तसेच सातभाई पाटणकर अशा शाखा निर्माण झाल्या. गगनगिरी महाराज हे त्या सातभाई शाखेतील होते. त्यांचे माता-पिता वारकरी संप्रदायातील होते. असे सांगितले जाते की महाराजांनी लहानपणीच गृहत्याग केला. संन्यास स्वीकारून त्यांनी भारतभ्रमण केले. त्या काळात त्यांनी अनेक नाथपंथीय सिद्ध पुरुषांची कृपा संपादन केली.
कालातंराने ते पुन्हा महाराष्ट्रात परतले. काही वर्षे त्यांनी दाजीपूरच्या जंगलात तपश्चर्या केली. त्यानंतर ते कोल्हापूर जिल्ह्यातील गगनगडावर गेले व तेथे त्यांनी तपश्चर्या केली.
गगनगिरी महाराज हे नाथसंप्रदायी हठयोगी होते. दशनामी संप्रदायाशी त्यांचे जवळचे संबंध होते. महाराजांच्या साधनेचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे त्यांची जलतपश्चर्या होय. ते त्यांच्या जलतपश्चर्येसाठीच प्रामुख्याने ओळखले जात. असे सांगितले जाते की ते नदी किंवा डोहाच्या तळाशी दीर्घकाळ ध्यान लावून बसत असत. कोल्हापूर जिल्ह्यातील दाजीपूरच्या जंगलात १९३२ ते १९४० अशी आठ वर्षे त्यांनी झाडांच्या ढोलीत राहून आणि झाडांच्या सालीची वस्त्रे परिधान करून कडक तपश्चर्या केली. याशिवाय त्यांनी १९४५ ते १९४८ या काळात राजापूरच्या अंगाळे येथे कायाकल्प साधना आणि १९४८ ते १९५० या काळात मुंबईत वाळकेश्वर येथील स्मशानभूमीजवळही वास्तव्य करून साधना केली होती. योग्याने एकाच ठिकाणी जास्त काळ राहू नये या न्यायाने कालांतराने ते गगनगडावरून रायगड जिल्ह्यातील खोपोली येथे आले.
१९९० च्या दशकात त्यांनी खोपोलीत मठाची स्थापना केली आणि ४ फेब्रुवारी २००८ रोजी वयाच्या १०१ व्या वर्षी तिथेच महासमाधी घेतली. या मठाचा प्रभाव सर्वसामान्यांपासून अनेक दिग्गजांपर्यंत राहिला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे महाराजांशी जवळचे नाते होते आणि त्यांच्या हातातील रुद्राक्षाची माळ महाराजांनीच प्रसाद म्हणून दिली होती. याशिवाय धीरुभाई अंबानी, यशवंतराव चव्हाण, बाळासाहेब देसाई, राजारामबापू पाटील, पतंगराव कदम, अभिनेत्री ममता कुलकर्णी यांसारख्या व्यक्तींनी महाराजांचे मार्गदर्शन घेतले होते.
पाताळगंगा नदीच्या काठावर असलेल्या या मठाच्या बहुमजली इमारतीच्या प्रवेशद्वारातून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. या प्रांगणातून प्रथम मठातील महाराजांचे विश्रांतीस्थळ असलेल्या इमारतीमध्ये प्रवेश होतो. मठाच्या मुख्य वास्तूमध्ये स्वामीजींच्या वास्तव्याच्या स्मृती जतन करण्यासाठी हे स्थान तयार करण्यात आले आहे. येथे सागवानी लाकडाचा एक नक्षीदार झुला असून त्यावर महाराजांची गादी, लोड आणि तक्के नीटनेटके मांडलेले आहेत. या झुल्यावर स्वामी गगनगिरी महाराजांची एक मोठी प्रतिमा विराजमान आहे. त्यापुढे महाराजांच्या मठातील समाधी मंदिराच्या मुख्य सभामंडपात प्रवेश होतो.
अर्धखुल्या स्वरूपाच्या प्रशस्त सभागृहाच्या बाहेरील बाजूला असलेले स्तंभ एकमेकांशी महिरपी कमानींनी जोडलेले आहेत व छतावर सुंदर नक्षीकाम आहे. सभामंडपाच्या पुढे असलेल्या मुख्य गर्भगृहात संगमरवरी नक्षीदार मखरात स्वामी गगनगिरी महाराजांची मूर्ती विराजमान आहे. समाधी मंदिराच्या पुढे महादेवाचे मंदिर आहे. प्रशस्त सभामंडप व गर्भगृह अशी या मंदिराची रचना आहे. येथील गर्भगृहात जमिनीवर चांदीच्या पत्र्याने मढविलेली महादेवाची पिंड आहे. याशिवाय येथे प्रभू श्रीराम, सीता माता आणि लक्ष्मण, रिद्धी-सिद्धिसह गणपती व माता पार्वती यांच्या मूर्ती आहेत. मठाच्या मागील डोंगरावर एक नैसर्गिक गुहा आहे. तेथे जाण्यासाठी पायऱ्यांची सुविधा आहे. या गुहेत महाराजांची ध्यानमुद्रेतील मूर्ती पाषाणी चौथऱ्यावर बसवलेली आहे. मुख्य आश्रमापासून येथे जाण्यासाठी १५ ते २० मिनिटांचा चढणीचा रस्ता आहे.
दररोज पहाटे ४.५० वाजता समाधीमध्ये मंगल स्नान होते. त्यानंतर ५.१५ वाजता सकाळची काकड आरती केली जाते आणि सकाळी ६.२५ वाजता समाधी दर्शनाला सुरुवात होते. सकाळी ११ वाजता पाद्य पूजा पार पडते, त्यानंतर दुपारी १२ वाजता मध्यान्ह आरती, दुपारी १ वाजता होमहवन, सायंकाळी ४ वाजता समाधी मंदिरात पोथी वाचन, सूर्यास्ताच्या वेळी धूप आरती आणि रात्री ८.३० वाजता सांज आरती होते. या मुख्य कार्यक्रमानंतर समाधी मंदिरात भक्तिगीते आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. दुपारी १ ते २ या वेळेत महाप्रसादाचे वाटप केले जाते. डोंगरावरील गुहेकडे जाण्यासाठी सकाळी ८ ते संध्याकाळी ५ अशी वेळ निश्चित केलेली आहे. मठात गुरुपौर्णिमा हा सर्वात मोठा उत्सव साजरा होतो. या उत्सवासाठी देशभरातून लाखो भाविक येथे येतात. हनुमान जयंतीला १०८ कार्यसिद्धी महायज्ञ केला जातो. तसेच दत्त जयंती आणि ४ फेब्रुवारी हा महाराजांचा महासमाधी दिन विशेष श्रद्धेने साजरा केला जातो. या दिवशी अखंड नामस्मरण आणि अन्नदान केले जाते.