गाढेश्वर मंदिर

गाढेश्वर, ता. पनवेल, जि. रायगड

पनवेल तालुक्यात सह्याद्रीच्या रांगांमध्ये आणि माथेरानच्या पायथ्याशी महादेवाचे प्राचीन गाढेश्वर मंदिर आहे. या स्थानाबाबत अशी आख्यायिका आहे की शापित राजा गंधर्वसेनाने गाढवाच्या रूपात येथे कठोर तपश्चर्या केली होती. त्यांच्या भक्तीवर प्रसन्न होऊन साक्षात शिव प्रकट झाले आणि राजा शापमुक्त झाला, म्हणूनच या शिवलिंगाला ‘गाढेश्वर’ नाव पडले. परिसरातील गाढी नदी आणि गाढेश्वर धरणाचे नावही याच पौराणिक कथेवरून पडले आहे. दगडी बांधणीचे हे मंदिर आगरी-कोळी बांधवांचे सांस्कृतिक केंद्र असून येथे महाशिवरात्रीला मोठी जत्रा भरते. निसर्गसौंदर्य आणि आध्यात्मिक शांततेमुळे हे ठिकाण पर्यटक व निसर्गप्रेमींचे प्रमुख केंद्र ठरले आहे.

गाढेश्वर मंदिराची कथा अशी की उज्जयिनीचा राजा गंधर्वसेन इंद्रसभेत एका चुकीमुळे शापित झाला होता. त्यामुळे त्याला पृथ्वीवर गाढवाच्या योनीत जन्म घ्यावा लागला. या शापानुसार गंधर्वसेनाला दिवसा गाढवाचे रूप धारण करावे लागे आणि रात्री तो आपल्या मूळ मानवी रूपात येऊ शकत असे. या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी त्याने अनेक ठिकाणी भ्रमण केले आणि अखेर तो सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये असलेल्या पनवेल जवळील या घनदाट वनक्षेत्रात पोहोचला. या ठिकाणी निसर्गाचे सानिध्य आणि शांतता पाहून, आपली शापमुक्ती केवळ भगवान शंकराच्या कृपेनेच होऊ शकते हे ओळखून त्याने कठीण तपश्चर्या करण्याचा निर्णय घेतला.

या परिसरात वास्तव्य करत असताना गंधर्वसेनाने एका बाजूला गाढवाचे शरीर आणि दुसऱ्या बाजूला राजाचे मन अशा स्थितीत महादेवाची निस्सीम आराधना केली. गाढवाच्या रूपात असूनही त्याने आपली भक्ती आणि साधना अखंडपणे सुरू ठेवली. त्याची ही खडतर तपश्चर्या पाहून भगवान शंकर प्रसन्न झाले आणि त्यांनी गंधर्वसेनाला दर्शन देऊन त्याला त्या शापातून कायमची मुक्ती दिली. ज्या ठिकाणी राजाला त्याचे वैभवशाली मानवी रूप पुन्हा प्राप्त झाले आणि जिथे साक्षात महादेव प्रकट झाले, त्या स्थानावर एक शिवलिंग स्थापित झाले. या घटनेमध्ये ‘गाढव’ रूपाचा आणि राजाच्या उद्धाराचा संदर्भ असल्याने या शिवलिंगाला ‘गाढेश्वर’ असे नाव प्राप्त झाले. ज्या नदीच्या काठावर बसून राजाने ही साधना केली होती, त्या नदीलाही गंधर्वसेनाच्या गाढवाच्या रूपावरून ‘गाढी’ नदी असे नाव पडले.
पुराणकथांनुसार, सह्याद्रीचा हा प्रदेश भगवान परशुरामाची भूमी मानला जातो आणि येथे अनेक ऋषीमुनींनी तपश्चर्या केली होती. गाढेश्वर हे भगवान शंकराचेच एक रूप असून या ठिकाणी असलेली शिवपिंडी स्वयंभू असल्याची लोकमान्यता आहे. माथेरानच्या डोंगरातून उगम पावणारी गाढी नदी मंदिराच्या जवळूनच वाहत असल्याने या स्थानाला विशेष पावित्र्य लाभले आहे. मंदिर नेमके किती जुने आहे याविषयी ठोस ऐतिहासिक पुरावे उपलब्ध नसले, तरी ग्रामस्थांच्या मते हे स्थान किमान चार पिढ्यांपासून येथे अस्तित्वात आहे. पनवेल शहर सुमारे ३०० वर्षांहून अधिक जुने असून मराठा साम्राज्याच्या काळात ते एक महत्त्वाची बाजारपेठ आणि कोकणातील तांदूळ व्यापाराचे केंद्र होते. मंदिरालगत असलेले गाढेश्वर धरण हे प्रत्यक्षात इंग्रजांच्या काळात नदीच्या पाण्याचे नियमन करण्यासाठी आणि शेतीला पाणीपुरवठा करण्यासाठी बांधलेला एक बंधारा आहे.

पनवेल-माथेरान रस्त्यावरील नेरे गावापासून सुमारे सहा किमी अंतरावर मुख्य मार्गावरच हे मंदिर स्थित आहे. एका मोठ्या प्रवेशकमानीतून आत शिरल्यानंतर मंदिराच्या मोठ्या आवारात प्रवेश होतो. सन २०१२ मध्ये झालेल्या जीर्णोद्धारामुळे मंदिराला सध्याचे स्वरूप प्राप्त झालेले आहे. सभामंडप व गर्भगृह अशी या मंदिराची रचना आहे. सभामंडपात भाविकांना बसण्यासाठी कक्षासने आहेत. सभामंडपात प्रवेशद्वाराजवळ कासवाचे शिल्प व गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराजवळ एका चौथऱ्यावर नंदीची मूर्ती आहे. गर्भगृहाच्या दर्शनी भिंतीवरील देवकोष्टकांत गणपती व हनुमान यांच्या मूर्ती आहेत. गर्भगृहात मध्यभागी गाढेश्वर महादेवाची पिंड स्थापित आहे. मूळ पिंड खंडित झाल्यामुळे ही नवी पिंड काही वर्षांपूर्वी येथे नव्याने बसविण्यात आलेली आहे. येथील मूळ शिवलिंग हे मंदिराच्या परिसरातच जतन केलेले आहे. त्यासोबतच येथे अखंड पाषाणात कोरलेली काही प्राचीन शिल्पे पाहावयास मिळतात.

मंदिरात वर्षभर विविध धार्मिक उत्सव आणि सामाजिक कार्यक्रम उत्साहात साजरे केले जातात. महाशिवरात्री हा येथील सर्वात मोठा उत्सव असून या दिवशी हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात. या निमित्ताने मंदिरात पहाटेपासून विशेष अभिषेक व पूजा केली जाते. याच दिवशी येथे मोठी जत्रा असते. श्रावण महिन्यातही येथे भाविकांची गर्दी असते. विशेषतः श्रावणी सोमवारच्या दिवशी सामूहिक आरत्यांचे आयोजन केले जाते. त्रिपुरा पौर्णिमेला येथे दीपोत्सव साजरा करण्याची जुनी परंपरा असून यावेळी संपूर्ण मंदिर परिसर दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघतो. स्थानिक आगरी-कोळी समाजाचे सांस्कृतिक वैशिष्ट्य या सण-उत्सवांमध्ये प्रामुख्याने उमटते. पावसाळ्याच्या दिवसात जेव्हा गाढेश्वर धरणाचा परिसर हिरवागार असतो, तेव्हा निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने येथे येतात आणि आवर्जून मंदिरात दर्शन घेतात. दररोज सकाळी सहा ते एक व सायंकाळी चार ते साडेनऊ वाजेपर्यंत भाविकांना गाढेश्वर महादेवाचे दर्शन घेता येते.

ठळक वैशिष्ट्ये

  • पनवेलपासून १३ किमी अंतरावर
  • पनवेलपासून एसटी व खासगी वाहनांची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहारीची सुविधा

गढ़ेश्वर मंदिर

गढ़ेश्वर, ताल. पनवेल, जिला. रायगढ़

Back To Home