पतित पावन मंदिर

रत्नागिरी, ता. व जि. रत्नागिरी

रत्नागिरी शहरातील पतित पावन मंदिर राज्यासह देशभरात सामाजिक समरसतेचे प्रतीक राष्ट्रीय तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. शूद्र अस्पृशांना मंदिरांच्या आसपासही फिरकण्याची मनाई असतानाच्या काळात, थेट गाभाऱ्यामध्ये जाऊन तेथील मूर्तींची स्वहस्ते पूजा करण्याचा अधिकार या मंदिरामुळे प्रत्येक समाजाला मिळाला. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रेरणेने १९३१ मध्ये मंदिराची निर्मिती झाली. यासोबतच १९३१ ते १९३७ या काळात मिरवणुका, जत्रा, विविध सांस्कृतिक कार्यक्रम, तसेच व्याख्याने यांच्या माध्यमातून सावरकरांनी सर्व समाजाला एकत्र आणण्याचा प्रयत्न केला होता.

विनायक दामोदर तथा स्वातंत्र्यवीर सावरकर यांना इंग्रज सरकारने १९२४ ते १९३७ या काळात रत्नागिरी येथे स्थानबद्ध केले होते. या काळात त्यांनी राजकारणात भाग घ्यायचा नाही, अशी ब्रिटिश सरकारची अट होती. या काळात त्यांनी अस्पृश्यतेविरुद्धच्या लढाईत स्वतःला झोकून दिले. येथील बहुजन समाजातील भागोजीशेठ कीर हे एक सधन व्यापारी गृहस्थ सावरकरांसोबत त्यांच्या लढाईत सामील झाले होते. भागोजीशेठ हे शिवभक्त होते; परंतु बहुजन समाजाचे असल्याने त्यांना मंदिर प्रवेशास मज्जाव होता. त्यामुळे स्वतःला पूजा करता यावी, यासाठी त्यांनी भागेश्वर मंदिर हे खासगी शिवमंदिर बांधले होते. हे समजल्यावर सावरकर यांनी भागोजीशेठ यांना सांगितले की आपण धनवान आहात म्हणून स्वतंत्र मंदिर बांधू शकलात; परंतु येथील दलित निर्धन आहेत, त्यांना देव नाही, मंदिर नाही आणि देवदर्शनही नाही. त्यांच्यावरचा अन्याय दूर व्हावा म्हणून सर्व समाजासाठी एक स्वतंत्र मंदिर आपण बांधावे.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी केलेली सूचना भागोजीशेठ यांनी त्वरित मान्य केली. १९३१ मध्ये त्यांनी रत्नागिरीतील वरच्या आळीत २० गुंठे जमीन विकत घेऊन, दीड लाख रुपये खर्चून, २० हजार चौरस फूट जागेत, या मंदिराची निर्मिती केली. मंदिरातील मूर्तींची प्राणप्रतिष्ठाही शुद्र समाजातील व्यक्तीच्या हस्ते म्हणजे भागोजीशेठ कीर यांच्या हस्ते वेदोक्त (वेदांतील मंत्रांचे उच्चारण करून पूजाविधी करणे) पद्धतीने करायची, असे सावरकर यांनी सुचविले. त्यासाठी काशीहून पंडितांना बोलावण्यात आले; परंतु ऐनवेळी शूद्राला वेदोक्ताचा अधिकार नाही, त्यामुळे विधी पुराणोक्त (पुराणातील मंत्रांचे उच्चारण करून पूजाविधी करणे) पद्धतीने करू, असे सांगून काशीच्या पंडितांनी त्यात खोडा घालण्याचा प्रयत्न केला. सावरकर यांना हे मान्य नव्हते. अखेर येथील मसूरकर महाराजांच्या आश्रमातील वेदशास्त्र संपन्न गणेश शास्त्री मोडक यांच्याकडून वेदोक्त विधीने २२ फेब्रुवारी १९३१ रोजी भागोजीशेठ कीर आणि त्यांच्या पत्नीच्या हस्ते या मंदिरात लक्ष्मी नारायणाच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली. सर्व जातीधर्माच्या लोकांबरोबरच स्त्रियांनीही यावेळी सहभोजन केले. नाशिक येथील काळाराम मंदिर सत्याग्रहानंतर एका वर्षाने या मंदिरात हा विधी पार पडला होता. हिंदू धर्मातील कोणत्याही जातीच्या किंवा पोटजातीच्या भाविकांना गर्भगृहात प्रवेश करून लक्ष्मी आणि नारायणाच्या मूर्तींची पूजा करण्याचा अधिकार आहे, हे सूचित करण्यासाठी सावरकर यांनी मंदिराला पतित पावन असे नाव दिले होते.

त्या काळात हिंदू समाज धर्माच्या नावाखाली स्पर्शबंदी, रोटीबंदी, बेटीबंदी, शुद्धीबंदी, सिंधुबंदी, व्यवसायबंदी आणि वेदोक्तबंदी या सात अनिष्ट रुढींच्या साखळदंडांनी जखडलेला होता. इंग्रज सरकारने आकसाने लादलेल्या राजकीय बंदीवासाच्या काळात स्वातंत्र्यवीर सावरकरांनी रत्नागिरीतील आपल्या सहकाऱ्यांसोबत हिंदू समाजाच्या एकतेला हानिकारक ठरलेल्या या सप्तबंदीच्या विरोधात याच पतित पावन मंदिराच्या माध्यमातून जोरदार प्रहार केला आणि दृष्ट रुढींच्या शृंखला तोडून हिंदू समाजाला बंधमुक्त केले. मंदिर बांधले जात असतानाच सावरकरांनी या मंदिर परिसरात गणेशोत्सव साजरा करण्यास सुरुवात केली. त्यांनी या उत्सवाचे नाव बदलूनअखिल हिंदू गणेशोत्सवअसे ठेवले. हा उपक्रम अस्पृश्यतेच्या दुष्टतेचे निर्मूलन, हिंदू धर्मातील सर्व वर्गांमध्ये सुसंवाद निर्माण करण्यासाठी आणि एकसंध हिंदू समाजाची पुनर्बांधणी करण्याच्या दृष्टिकोनातून आयोजित करण्यात आला होता.

रत्नागिरी शहराच्या मध्यवर्ती भागात साधारणतः २० हजार चौरस फूट जागेवर हे मंदिर आहे. रस्त्यालगत असलेल्या मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वार कमानीच्या वरील बाजूसरत्नागिरी हिंदू सभेच्या वतीनेदेशवीर विनायकराव सावरकर यांचे विनंतीवरून भक्तिभूषण श्रीयुत भागोजी बाळूजी कीर यांनी हे श्री पतित पावनाचे मंदिर अखिल हिंदु प्रित्यर्थ स्वकीय व्ययाने श्री भागेश्वराच्या कृपेने बांधून लोक सेवेस अर्पण केले आहे. – ता. २४ फेब्रुवारी १९३१असे कोरलेले आहे. कमान मुख्य मंदिराच्या मध्यभागी हिरवळीवर शुभ्र संगमरवरात भागोजी कीर यांचा पुतळा उभारण्यात आलेला आहे.

दर्शनमंडप, सभामंडप, अर्धमंडप गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. दर्शनमंडपाच्या बाहेरील दोन्ही बाजूस तपश्चर्या करणाऱ्या साधूंची शिल्पे आहेत़, तर वरच्या बाजूला सिंहावर आरूढ, अष्टभुजा महिषासुरमर्दिनीचे उठावचित्र (म्युरल) आहे. येथील सभामंडप हा दुमजली असून त्यात सर्वत्र लाकडी काम आहे. वरच्या मजल्यावर भाविकांना विशेषकरून महिलांना सण उत्सवाच्या काळात मंदिरात होणारे कार्यक्रम पाहता यावेत, यासाठी बसण्याची सुविधा केलेली आहे. अर्धमंडपात संत गाडगे महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्या, तर गर्भगृहाच्या भिंतीवर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमा लावलेल्या आहेत.

सभामंडपापासून काहीशा उंचावर असलेल्या गर्भगृहात चार फूट उंचीच्या लक्ष्मीनारायणाच्या मूर्ती आहेत. विष्णूच्या हातात गदा, चक्र, शंख कमळ आहेत, तर लक्ष्मीच्या उजव्या हातात वरद डाव्या हातात कमळ आहे. या दोन्ही मूर्ती कमळावर उभ्या आहेत. विष्णू मूर्तीच्या पायाजवळ गरुडाची, तर लक्ष्मीच्या पायाजवळ हनुमान यांच्या मूर्ती आहेत. लक्ष्मीनारायणाच्या मूर्तींच्या वरील बाजूस भिंतीवर भारतमातेची मूर्ती कोरलेली आहे. गर्भगृहाच्या वरील बाजूस शिखर असून त्यावर सात अश्वांवर आरूढ असलेला सूर्य, गणपती शंकर यांची वैशिष्ट्यपूर्ण शिल्पे आहेत. मंदिरात दरवर्षी २४ फेब्रुवारीला भागोजीशेठ कीर यांची पुण्यतिथी, २६ फेब्रुवारीला स्वातंत्र्यवीर सावरकर यांची पुण्यतिथी, २८ मे रोजी सावरकर जयंती, श्रावण कृष्ण अष्टमीला (गोकुळाष्टमी) श्रीकृष्ण जयंती, आश्विन शुद्ध प्रतिपदा ते दशमी या काळात नवरात्रोत्सव माघ शुद्ध चतुर्थीपासून पुढील सात दिवस अखिल हिंदू गणेशोत्सव असे उत्सव साजरे होतात.

या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी भारतरत्न लता मंगेशकर, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, आशा भोसले, राष्ट्रीय कीर्तनकार गोविंदस्वामी आफळे अशा अनेक नामवंतांनी देणग्या दिलेल्या आहेत. मंदिराच्या उजव्या बाजूला स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक क्रांतिकारक दालन आणि वस्तुसंग्रहालय आहे. सकाळी १० ते दुपारी दुपारी ते सायंकाळी पर्यंत हे वस्तुसंग्रहालय पाहता येते.

उपयुक्त माहिती:

  • रत्नागिरी बस स्थानकापासून किमी अंतरावर
  • रत्नागिरी रेल्वेस्थानकापासून किमी
  • राज्यातील अनेक भागांतून रत्नागिरीसाठी एसटी सेवा
  • खासगी वाहने थेट मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • मंदिर परिसरात निवास न्याहरीसाठी अनेक पर्याय
Back To Home