एकवीरा देवी मंदिर

कळंब, नालासोपारा, ता. वसई, जि. पालघर

कोकणचे निर्माते आणि भगवान विष्णूंचा सहावा अवतार असलेले परशुराम या वीरपुत्राची जननी म्हणून आदिशक्ती एकवीरा देवी ओळखली जाते. निर्मळ माहात्म्यातही एकवीरा ही परशुरामाची आई असल्याचा उल्लेख आहे. रेणुका आणि एकवीरा ही आदिमाया पार्वतीची रूपे आहेत व तीने आपल्या भक्तांसाठी अनेक अवतार घेतले आहेत. कोकणात असलेल्या एकवीरा देवीच्या अनेक स्थानांपैकी वसई तालुक्यातील कळंब येथील खाडीतील खडकावर असलेली एकवीरा देवी ही स्वयंभू व जागृत समजली जाते. मनोकामना पूर्ण करणारी व नवसाला पावणारी ही देवी आहे, अशी भाविकांची श्रद्धा आहे.

नालासोपारा शहराच्या पश्चिमेकडे असलेल्या निर्मळ, कळंब आणि वाघोरी गावांच्या सीमेवर एकवीरा देवीचे स्वयंभू स्थान आहे. आता येथे एकवीरा देवीचे मोठे मंदिर दिसत असले तरी काही वर्षांपूर्वी हा भाग खाडीमध्ये होता. या खाडीतील चिखलामध्ये एक मोठा खडक होता. अनेक वर्षे येथील स्थानिक या खडकास देव मानून त्याची पूजा करीत असत. या खडकाची पूजा करून येथील कोळी बांधव मासेमारीसाठी खाडीत जात असत. या काळ्या खडकाची पूजा केल्यास खाडीतून चांगल्या प्रमाणात मासळी मिळते, अशी त्यांची श्रद्धा होती. याशिवाय विविध प्रकारे या देवस्थानाची येथील भाविकांना प्रचिती येत होती; परंतु खाडीच्या पाण्यात हे देवस्थान असल्यामुळे केवळ ओहोटीच्या वेळीच येथे पूजा-अर्चा होत होती.

असे सांगितले जाते, की साधारणतः १९९० च्या सुमारास येथील ग्रामस्थांनी या देवस्थानाचा उत्सव सुरू करण्याचे ठरविले. त्यानुसार उत्सवाच्या पहिल्याच दिवशी गावातील एका सद्‌गृहस्थाला एकवीरा देवीने स्वप्नदृष्टांत देऊन सांगितले की सर्व भाविक वर्षानुवर्षे ज्या खडकाची पूजा करीत आहेत ते स्थान माझे आहे. मी अनेक वर्षे ऊन, पाऊस व पाण्याचा मारा सहन करीत आहे. त्यामुळे मला आता निवारा हवा आहे. या जागेवर माझे मंदिर उभारा. या दृष्टांतामुळे हे देवस्थान एकवीरा देवीचे असल्याचे प्रचलित झाले. तेव्हापासून दरवर्षी येथे उत्सव साजरे होऊ लागले. मात्र उत्सवासाठी व मंदिर बांधण्यासाठी हा परिसर योग्य नसल्याने ग्रामस्थांनी कळंब गावापासून खाडीतील पाण्यात असलेल्या या खडकापर्यंत भराव टाकण्याचे ठरविले. हा भराव टाकून झाल्यानंतर सुरुवातीच्या काळात देवीने सांगितल्याप्रमाणे या खडकावर ताडा-माडाच्या झावळ्या, कौले, कारवी व कुडाच्या साह्याने एक लहानसे मंदिर बांधण्यात आले होते; परंतु भाविकांची वाढती संख्या व उत्सवाच्यावेळी येणाऱ्या भाविकांची संख्या पाहता ते मंदिर अपुरे पडू लागले. तेव्हा ग्रामस्थांनी काही वर्षांपूर्वी खडकावरील देवीचे स्थान कायम ठेवून येथे लोकवर्गणीतून व श्रमदानाने मोठे मंदिर उभारले.

कळंब गावाबाहेर खाडीकिनारी असलेल्या एकवीरा देवी मंदिराच्या तीनही बाजूने कांदळवन आहे. या कांदळवनाच्या हिरवाईत हे मंदिर उठून दिसते. मंदिराच्या समोरील बाजूस एक दीपमाळ व तुळशी वृंदावन आहे. या दीपमाळेच्या वैशिष्ट्यपूर्ण रचनेमुळे ती एका चौथऱ्यावर कमळपुष्पात उभी असल्याचे भासते. मुखमंडप, सभामंडप व गर्भगृह असे या मंदिराचे स्वरूप आहे. मंदिराचा मुखमंडप हा चार स्तंभांवर आहे. समोरील दोन स्तंभांजवळ द्वारपाल आहेत. खुल्या प्रकारच्या या मुखमंडपाच्या वर घुमटाकार शिखर व त्यावर कळस आहे. येथील सभामंडप हा बंदिस्त स्वरूपाचा आहे. सभामंडपाच्या मध्यभागी देवीचे वाहन सिंहाची मूर्ती आहे व पुढील बाजूस प्रदक्षिणा मार्ग सोडून गर्भगृहाची रचना आहे. गर्भगृहाच्या दर्शनी भिंतीवरील डावीकडील देवकोष्टकात कालभैरव व उजवीकडे गणपतीची मूर्ती आहे. गर्भगृहात एका वज्रपीठावरील सोनेरी मखरात एकवीरा देवी स्थानापन्न आहे. या देवीवर मुकुट, मुखवटा व अनेक दागिने आहेत. मंदिराच्या बाह्य भिंतींवर खालच्या बाजूला अनेक गजराज कोरलेले आहेत. त्यामुळे या गजराजांनी मंदिराचा भार उचलल्याचे भासते. गर्भगृहावर असलेल्या कळसावर अनेक देवकोष्टके आहेत व त्यामध्ये विविध देवदेवता व संतांच्या मूर्ती आहेत.

एकवीरा देवी मंदिर हे येथील कोळी, आगरी, भंडारी, दैवज्ञ ब्राह्मण, सीकेपी इत्यादी अनेक समाजातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. श्री एकवीरा देवी सेवा समितीतर्फे या मंदिरात वर्षभर विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. दरवर्षी चैत्र शुद्ध अष्टमीला येथे मोठी यात्रा भरते. वसई तालुक्यातील मोठ्या यात्रांपैकी ही एक समजली जाते. यावेळी मुंबई, ठाणे व पालघर जिल्ह्यातील अनेक कोळी व आगरी बांधवांची येथे उपस्थिती असते. अश्विन शुद्ध नवरात्रोत्सवही येथे मोठ्या थाटामाटाने साजरा केला जातो. या उत्सवाच्यावेळीही या परिसराला यात्रेचे स्वरूप आलेले असते. या नऊ दिवसांत आलेल्या भाविकांना मंदिर समितीतर्फे महाप्रसाद व भंडारा दिला जातो. हे देवीचे स्थान जागृत असल्यामुळे येथे नवस फेडण्यासाठी दररोज अनेक भाविक येत असतात. नवसपूर्तीनिमित्त भाविकांकडून देवीला दागिने अर्पण केले जातात.

उपयुक्त माहिती

  • नालासोपाऱ्यापासून ६ किमी, तर वसईपासून ८ किमी अंतरावर
  • वसई व नालासोपारा येथून एसटी व शहर परिवहन सेवा उपलब्ध
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहरीची सुविधा नाही
  • संपर्क : मंदिर कार्यालय, मो. ८६९८०६३१६७
Back To Home