नवसाला पावणारी, असा लौकिक असलेल्या एकलहरा देवीचे प्राचीन व जागृत मंदिर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. असे सांगितले जाते की करमाडजवळील पिंप्रीराजा येथील एकलहरा डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या या प्राचीन मंदिरातील दक्षिणमुखी देवीची प्रतिष्ठापना स्वतः संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांनी केली होती. चैत्र शुद्ध पौर्णिमा आणि अश्विन शुद्ध प्रतिपदा या दोन दिवशी येथे यात्रा भरतात. या यात्रांदरम्यान हजारो भाविक येथे देवीच्या दर्शनासाठी येतात. या मंदिरानजीक प्राचीन वास्तुकलेची साक्ष देणारी पुरातन बारवही आहे.
अशी आख्यायिका आहे की करमाडपासून काही अंतरावर असलेल्या गाढे जळगावच्या डोंगरातील रेणुका माता, तिच्या मंदिरासमोर झालेल्या यज्ञातून प्रकट झालेली अर्धनारी नटेश्वराच्या रूपातील गोलटगाव येथील रेणुका माता व एकलहरा देवी या तीन बहिणी आहेत. एकलहरा डोंगराच्या पायथ्याशी असल्यामुळे या देवीला एकलहरा देवी असे नाव पडले. छत्रपती संभाजीनगरपासून करमाडमार्गे पिंप्रीकडे जाताना लांबूनच मंदिराचे शिखर लक्ष वेधून घेते. मंदिराच्या महाद्वारापर्यंत काही भागांत पत्र्याची शेड टाकण्यात आली आहे. मंदिरासमोर दोन लहान आणि दोन मोठ्या अशा चार दीपमाळा आहेत. या मंदिराभोवती मजबूत दगडी तटबंदी असून त्यातील नगारखान्याच्या प्रवेशद्वाराखाली कीर्तिमुख व दोन्ही बाजूंना द्वारपालांचे शिल्प आहेत.
नगारखान्यातून आत आल्यावर भक्कम दगडी बांधकाम असलेली मंदिराची वास्तू दिसते. या मंदिरात प्रवेश करण्यासाठी तीन कमानीयुक्त प्रवेशद्वारे आहेत. या प्रवेशद्वारांसमोर मोठे होमकुंड व देवीचे त्रिशूळ हे शस्त्र आहे. सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह असे या मंदिराचे स्वरूप आहे. अंतराळात गर्भगृहासमोरील एका चौथऱ्यावर देवीच्या पादुका आहेत. गर्भगृहात भाविकांना प्रवेश नसल्याने येथे उभे राहूनच देवीचे दर्शन घेता येते. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावरील ललाटबिंबावर गणेश प्रतिमा आहे. गर्भगृहात चौथऱ्यावर आकर्षक नक्षीकाम केलेल्या मखरात एकलहरा देवीची शेंदूररर्चित मूर्ती आहे. देवीला जाड भुवया, कपाळावर ठसठशीत कुंकू, नाकात नथ व चांदीचे डोळे आहेत. उत्सवकाळात या देवीला चांदीचा मुकुट घातला जातो.
नवसाला पावणारी देवी, असा लौकिक असल्याने तिच्या दर्शनासाठी दररोज येथे शेकडो भाविक येतात. नवसपूर्तीनंतर भाविकांकडून मंदिरात नारळ बांधण्याची प्रथा आहे. नवरात्रोत्सवात येथे अनेक धार्मिक कार्यक्रम होतात. एकलहरा देवीच्या मंदिरामागे एका टेडकीवर देवीचे एक लहान मंदिर आहे. येथे येणारे भाविक या मंदिरातही दर्शनासाठी जातात. या टेकडीवरून सभोवतालच्या परिसराचे विहंगम दृश्य दिसते.
मंदिराच्या समोर काही अंतरावर देवीची पुरातन बारव आहे. अहिल्याबाई होळकरांनी बांधलेली ही दगडी बारव सुमारे ४० फूट खोल आहे. तीन दिशांनी असलेल्या पायऱ्यांवरून बारवेमध्ये उतरता येते. बारवेच्या दगडांवर आकर्षक कलाकुसर आहे. अत्यंत खोल असलेल्या या बारवेमध्ये बारमाही पाणी असते. पावसाळ्यात ती पूर्णपणे भरते. बारवेजवळ शिवलिंग तसेच काही मूर्ती आहेत. मंदिर परिसरात ही बारव असल्याने पूर्वी हा रस्ता व्यापारी मार्ग असावा, असा अंदाज लावता येतो. कारण पूर्वी व्यापारी मार्गांवर अशा बारव असत. तेथून जाणारे प्रवासी या बारवांतील पाण्याने आपली तहान भागवत असत.
देवीचे हे स्थान असलेल्या पिंप्री या गावालाही मोठा इतिहास आहे. १७५० ते १७६५ दरम्यान दक्षिण भारतात मराठे आणि निजाम यांच्यात सत्तेसाठी संघर्ष सुरू होता. त्या काळात राजे किंवा सरदारांपेक्षा त्यांच्या हाताखालील माणसांचाच बोलबाला असे. या दोन्ही सत्ता आपल्या मर्जीप्रमाणे चालवण्याचे काम देवाजीपंत चोरघडे (नागपूर येथील जानोजी राजे भोसले यांचे कारभारी), सखाराम बोकिल (पेशव्यांचे सेनापती), विठ्ठलसुंदर परसरामी (निजामाचा दिवाण) आणि नाना फडणवीस (पेशव्यांचे कारभारी) या साडेतीन शहाण्यांनी केले. त्यापैकी तलवार आणि डोके हे दोन्ही चालवणारे पहिले तिघे पूर्ण शहाणे, तर तलवार न चालवता केवळ डोके चालवणारे नाना फडणवीस यांना अर्धे शहाणे म्हटले जात असे.
आपल्या बुद्धीच्या जोरावर निजामाच्या दिवाणाच्या पदावर पोचलेल्या विठ्ठलसुंदर याने निजामाचे कान भऱत मराठा–निजाम यांचे संबंध बिघडवले. त्याच्यामुळेच ऑगस्ट १७६३ मध्ये राक्षस भुवन येथे निजाम व मराठे यांच्यात लढाई झाली. या युद्धात निजामाचा दारुण पराभव झाला. या युद्धानंतरच श्रीमंत थोरले माधवराव पेशवे यांनी पेशवेपदावर पकड तसेच रघुनाथरावांवर जरब बसवली. या लढाईत विठ्ठलसुंदर मारला गेला. मात्र या लढाईपूर्वी त्याने पुण्यात चांगली कामगिरी बजावली असल्याने निजामाने त्याच्या वारसाला औरंगाबादजवळचा काही मुलूख जहागीर म्हणून दिला. तो भाग चिमणाराजाची पिंप्री म्हणून ओळखला जात असे. पुढे या भागाला पिंप्रीराजा असे नाव पडले.