दुर्गादेवी मंदिर

मुरूड, ता. दापोली, जि. रत्नागिरी 

समाजसुधारक, ‘भारतरत्नमहर्षी धोंडो केशव कर्वे यांचे जन्मगाव असलेले दापोली तालुक्यातील मुरूड गावाला ऐतिहासिक, सामाजिक धार्मिक महत्त्व आहे. या गावाचे ग्रामदैवत असलेले दुर्गामाता देवीचे ३०० वर्षे प्राचीन जागृत मंदिर हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे येथील सभागृहातील लाकडी खांबांवर केलेले कोरीवकाम. वैशिष्ट्यपूर्ण कोरीवकाम असलेले हे कोकणातील एकमेव मंदिर समजले जाते.

मंदिराची अख्यायिका अशी की १२ व्या शतकात येथे जालंदर नावाचा राजा राज्य करीत होता. याच काळात गंगाधर, दिवाकर पद्माकरभट असे तीन नागर ब्राह्मण या राजाला भेटण्यासाठी आले होते. त्यांच्याकडे दुर्गादेवीच्या तीन मूर्ती होत्या. ब्राह्मण सत्पुरुष असल्याने राजाने त्यांचे योग्य आदरातिथ्य करून त्यांना मुरूड, गुहागर दिवेआगर (जि. रायगड) या तीन गावांच्या जहागिरी दिल्या. जहागिरी मिळाल्यावर त्यांनी येथे देवीच्या मूर्तींची स्थापना केली. गंगाधर भट यांनी मुरूड येथे दुर्गादेवीचे मंदिर बांधले. मुरूड गावावर वेळोवेळी अनेक आपत्ती आल्या त्यात दुर्गादेवीचे पुरातन मंदिर अनेकदा नादुरुस्त झाले. सध्याचे मंदिर हे १७६३ मध्ये वैशंपायन, दातार, जोशी, कर्वे बाळ या मंडळींनी बांधल्याची नोंद आहे. ही देवी येथील अनेक दातार कुटुंबीयांची कुलदेवी आहे.

मुरूड या शहरवजा गावाच्या मध्यवर्ती भागातील मुख्य चौकात दुर्गादेवीचे मंदिर आहे. मंदिराचा परिसर हिरवळीने नटलेला असून सुशोभित भासतो. या परिसरात नारळीपोफळीची झाडे मोठ्या प्रमाणावर दिसतात. मंदिराच्या परिसरातच एक लाकडी छोटेखानी गणपतीचे मंदिर देवीचे मूळ स्थान (स्वयंभूवा देवी) अशी मंदिरे आहेत. रस्त्यालगत असलेले येथील प्रवेशद्वार दुमजली असून वरच्या मजल्यावर नगारखाना आहे. प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला उंच दगडी दीपमाळ डाव्या बाजूला वरील नगारखान्यात जाण्यासाठी मार्ग आहे. प्रवेशद्वारातून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश केल्यावर तीन फूट उंचीच्या भक्कम दगडी चौथऱ्यावर हे कोकणी पद्धतीचे कौलारू रचनेचे दुमजली मंदिर आहे.

सभामंडप, अंतराळ गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. प्रांगणातून काही पायऱ्या चढून सभामंडपात प्रवेश होतो. सभामंडप हा खुल्या रचनेचा आहे. सभामंडपातील लाकडी खांबांवर वैशिष्ट्यपूर्ण कोरीव काम केलेले आहे. याशिवाय त्यावर काढलेल्या वेलबुट्टीमुळे सभामंडपाच्या सौंदर्यात अधिकच भर पडते. सभामंडपाच्या दोन्ही बाजूने भाविकांना बसण्याची सुविधा आहे. येथील दोन खांबांमध्ये एक भलीमोठी घंटा टांगलेली दिसते. पोर्तुगीजांच्या प्रार्थनास्थळी जशा मोठ्या घंटा आढळतात, त्या प्रकारची ही घंटा आहे. यावर लॅटिन भाषेत एक वाक्य कोरलेले आहे, ‘सर्व लोकांनी प्रभूची स्तुती करावी’, असा या वाक्याचा अर्थ आहे. ही घंटा मंदिरात कशी आली, याबाबत मात्र निश्चित माहिती उपलब्ध नाही.

अंतराळात गर्भगृहाच्या डाव्या उजव्या बाजूला सभामंडपातील खांबांपेक्षाही मोठे असे दोनदोन खांब आहेत. या चारही खांबांवर असलेल्या शिल्पकृती कोकणातील मंदिरांमधील दुर्मिळ शिल्पकृती मानल्या जातात. खांबांवर विविध देवीदेवता, दशावतार, घोड्यावरील युद्ध, हत्तीवर बसून तीन माणसे वेगवेगळी हत्यारे घेऊन युद्ध करतानाचा प्रसंग, सिंह, वाघ, सर्प असे विविध प्राणी कोरलेले आहेत. खांबांवरील तुळ्यांवरही पोपट, मोर, फुले असे कोरीव काम आहे. विशेष म्हणजे येथील बांधकामासाठी लोखंडाचा किंवा खिळ्याचा वापर करण्यात आलेला नाहीसर्व लाकडे एकमेकांत गुंफून हे बांधकाम करण्यात आलेले आहे. गर्भगृहात असलेली दुर्गादेवीची मूर्ती शाळिग्राम शिळेची, अष्टभुजा, चार फूट उंचीची, वैशिष्ट्यपूर्ण कोरीवकामाची आहे. डावीकडील कोनाड्यात देवीची दुसरी छोटी मूर्ती आहे.

चैत्र शुद्ध प्रतिपदा ते नवमी या कालावधीत, तसेच आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून सुरू होणाऱ्या नवरात्रीच्या काळात दुर्गादेवीचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो. पूर्वीच्या काळी चैत्र शुद्ध सप्तमीला देवीची मूर्ती सोनार वाड्यात पालखीतून नेली जात असे अष्टमीला ती परत येई. सध्या मूर्तीऐवजी देवीची प्रतिकृती नेली जाते. पूर्वीच्या काळी गावाच्या इतिहासाची नोंद करून ठेवण्यासाठी बखर लिहिली जात असे. या बखरीमध्ये येथील पालखीबाबतचे नियोजन केलेले आहे. त्यानुसार देवीच्या रथाला चार भोई चार खांब असावेत. पुढील उजवीकडील बाजू ब्राह्मणांनी, डावीकडील बाजू सोनार, तर मागील उजवी बाजू मराठा आणि मागील डावी बाजू ही कुणबी मराठा समाजातील लोकांनी धरावी, असे त्यात उल्लेख आहेत. आंजर्ले गावची देवी, वाघरची देवी, व्यासची देवी आणि मुरूडची देवी या चारही बहिणी असल्याचे मानले जाते. रामनवमीलाही येथे रथोत्सव साजरा केला जातो. या उत्सवात सोनार हे मुख्य मानकरी असतात.

वार्षिक उत्सवांव्यतिरिक्त भाविकांच्या सोयीसाठी या मंदिरात विविध विधी केले जातात. त्यामध्ये दुर्गादेवी अभिषेक, देवीसाठी नैवेद्य, पाठ वाचन, खणनारळ ओटी, साडीची ओटी, नंदादीप (कायमस्वरूपी नऊ दिवसांसाठी), नवचंडी यज्ञ, ब्राह्मण सवाष्णी कुमारिका, सहस्त्र आवर्तने, दुग्धाभिषेक, कुंकुमार्चन या विधींचा समावेश आहे. त्यासाठी मंदिर समितीतर्फे काही शुल्क आकारले जाते. (संपर्क : दुर्गादेवी देवस्थान ट्रस्ट९२२५८७०५८२, ९४२२७५४३९०)

उपयुक्त माहिती:

  • दापोलीपासून १२ किमी, तर रत्नागिरीपासून १५८ किमी अंतरावर
  • दापोली, मंडणगड येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने थेट मंदिरापर्यंत जाऊ शकतात
  • परिसरात निवास न्याहरीसाठी अनेक पर्याय
Back To Home