कोकणाचे भूषण समजले जाणारे दापोली तालुक्यातील आंजर्ले हे गाव येथील कड्यावरील गणपती मंदिरामुळे प्रसिद्ध आहे. विस्तीर्ण समुद्र किनाऱ्याबरोबरच ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसाही या गावाला लाभला आहे. गावाच्या मध्यभागी असणारे दुर्गादेवीचे प्राचीन मंदिर येथील प्रमुख देवालय मानले जाते. कोकणातील मंदिर स्थापत्यकलेचा सुंदर नमुना असलेले हे मंदिर सुमारे ४०० वर्षे प्राचीन आहे. पेशवेकाळापासून साजरा होणारा येथील रथोत्सव हा दापोली तालुक्यातील मोठ्या उत्सवांपैकी एक आहे.
एका अख्यायिकेनुसार, एका योगी बाबाने आंजर्ले, केळशी व मुरूड ही गावे वसविली होती. साधारणतः १६ व्या शतकात ही गावे वसली होती. तेव्हापासून हे मंदिर अस्तित्वात आहे. या योगी बाबाला देवीने स्वप्नदृष्टांत देऊन सांगितले की सड्यावरील पारदुळे यांच्या परसात (घराच्या मागची बाजू, आवार) हरकिणाच्या राशीत मी आहे. तेथून मला आणून माझी गावात स्थापना कर. त्याप्रमाणे योगी बाबाने शोध घेतला असता गंडकी शिळेची अष्टभुजा महिषासुरमर्दिनी रूपातील देवीची मूर्ती तेथे सापडली. त्यावेळी लहानसे मंदिर बांधून त्यात त्यांनी देवीच्या या मूर्तीची प्रतिष्ठापना केली. पुढे शके १६५३ (५ जुले १७३१) रोजी थोरले बाजीराव पेशवे यांच्या काळात मंदिराचे नूतनीकरण होऊन मंदिराला सध्याचे स्वरूप प्राप्त झाले.
कड्यावरील गणपती मंदिरापासून साधारणतः दोन किमी अंतरावर खालच्या बाजूला आंजर्ले गावातील रस्त्याला लागून दुर्गादेवीचे मंदिर आहे. तटबंदीयुक्त असलेल्या मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या दुसऱ्या मजल्यावर नगारखाना आहे. प्रवेशद्वाराजवळील पायऱ्यांवरून नगारखान्यात जाता येते. पूर्वी दररोज सकाळी व सायंकाळी नगारखान्यातून सनई व चौघडा वाजविला जात असे. आताही तीच पद्धत मंदिरात कायम असून सनई–चौघडा यांची जागा काळानुरूप रेकॉर्डरने घेतली आहे. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला त्रिपूर (दीपमाळा) असून त्या बाजूला दोन तोफा ठेवण्यात आलेल्या आहेत.
प्रवेशद्वारातून पाच ते सहा पायऱ्या वर चढल्यावर दुर्गादेवी मंदिराच्या मुख्य प्रांगणात प्रवेश होतो. संपूर्ण सागवानी लाकूड वापरून या मंदिराचे बांधकाम करण्यात आलेले आहे. कोकणातील अन्य मंदिरांप्रमाणे याचे स्वरूप कौलारू असून त्यामध्ये दोन सभामंडप व गर्भगृह अशी त्याची रचना आहे. मंदिराचा बाहेरील सभामंडप हा नंतरच्या काळात बांधलेला असावा, असे वाटते. सभामंडप खुल्या स्वरूपाचे आहेत व त्यांचे संपूर्ण काम लाकडात केलेले आहे. लाकडांची एकमेकांत केलेली गुंफण पाहिल्यावर कोकणातील प्राचीन मंदिरांच्या रचनेची कल्पना येते.
मुख्य मंदिराचा सभामंडप व गर्भगृह यातील केवळ जोत्याचा भाग हा दगडी असून त्यावरील बांधकामात पूर्णपणे लाकडाचा वापर करण्यात आला आहे. या सभामंडपातील १२ पैकी आठ सागवानी खांबांवर वैशिष्ट्यपूर्ण कोरीव काम केलेले आहे. त्यामध्ये पक्षी, फुले व पाने यांची अत्यंत बारकाईने कलाकुसर केलेली आहे. या खांबांना रंगकाम केल्यामुळे त्यावरील नक्षीकाम आणखी उठून दिसते. येथील लाकडी खांबांवर केलेली कलाकुसर कोकणातील अन्य मंदिरांमध्ये अभावानेच पाहायला मिळते. या सभामंडपात वरच्या बाजूला अनेक देवी–देवतांची छायाचित्रे लावण्यात आलेली आहेत.
मंदिराच्या मुख्य सभागृहाबाहेरील जोत्यावर दोन्ही बाजूला कीर्तिमुख कोरलेले आहेत. साधारणतः कीर्तिमुख हे शंकराच्या मंदिराबाहेर कोरलेले असतात; परंतु येथील कीर्तिमुख कोरण्याचे कारण गर्भगृहात गेल्यावर कळते. कारण येथील अष्टभुजाधारी, महिषासुरमर्दिनी दुर्गादेवीची मूर्ती ही दुर्मिळ असून ती शिवपिंडीवर स्थित आहे. त्यामुळे येथे शंकराचेही स्थान आहे, हे स्पष्ट होते. शिरावर चांदीचा टोप, कपाळावर कुंकू, नाकात मोत्याची नथ, विविध अलंकार व वस्त्र धारण केलेली येथील देवीची मूर्ती सुंदर भासते. या मूर्तीच्या मागे असणाऱ्या कलाकुसरयुक्त तांब्याच्या प्रभावळीमुळे मूर्तीचे सौंदर्य आणखी खुलून दिसते. देवी ज्या शिवपिंडीवर स्थित आहे ती पिंडी अखंड पाषाणातील व चौकोनी आहे.
मंदिराच्या शेजारी शिवपिंडीच्या आकाराचा वर्तुळाकार तलाव असून त्यात उतरण्यासाठी पूर्वेकडून दगडी पायऱ्या करण्यात आलेल्या आहेत. आतील बाजूने तलावाभोवती फिरता येईल, अशाप्रकारे येथील पायऱ्यांची रचना आहे. असे सांगितले जाते की या तलावाचे व येथे असणाऱ्या विहिरीचे बांधकाम हे मंदिराच्या बांधकामावेळीच करण्यात आले होते. चैत्र शुद्ध प्रतिपदा (गुढीपाडवा) ते चैत्र वद्य चतुर्थी असे १८ दिवस साजरा होणारा दुर्गादेवी रथयात्रा हा आंजर्ले गावाचा प्रमुख उत्सव होय. या उत्सवासाठी संपूर्ण आंजर्ले गाव सजले जाते. प्रत्येक घरासमोर रांगोळ्या काढल्या जातात, पताका व ध्वज लावले जातात. रथयात्रेच्या संपूर्ण मार्गावर रांगोळ्यांच्या पायघड्या काढल्या जातात. यावेळी गावातील स्त्रिया आवर्जून उपस्थित असतात. चैत्र वद्य प्रतिपदा ते तृतीया या तीन दिवसांत येथे यात्रा भरते. प्रतिपदेला सायंकाळी चार वाजता देवीला मुखवास (चांदीचा मुखवटा) चढविला जातो. यावेळी देवीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होते. द्वितीयेला महाप्रसाद व तृतीयेला रथोत्सव असतो. यावेळी देवीचा रथ हा भाविकांकडून खांद्यावर घेऊन गावभर फिरविला जातो. रथोत्सवाचा हा सोहळा पाहण्यासाठी हजारो भाविक उपस्थित असतात. पेशवेकाळात सुरू झालेला हा उत्सव, आजही त्याच पद्धतीने साजरा केला जातो. बारा बलुतेदार पद्धतीनुसार या उत्सवाच्या अनेक जबाबदाऱ्या त्या त्या समाजाकडे दिलेल्या आहेत. वर्षानुवर्षे त्याप्रमाणे ते आपापल्या जबाबदाऱ्या पार पाडतात. याशिवाय आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नऊ दिवस येथे नवरात्रोत्सव साजरा होतो.
दुर्गादेवी मंदिर, कड्यावरचा गणपती मंदिर याशिवाय आंजर्ले गावात अनेक मंदिरे आहेत. त्यामध्ये ग्रामदेवता सावणेकरीण हेही एक प्रसिद्ध मंदिर आहे. साधारणतः गावच्या उत्तर भागाला कोकणात सावणे असे म्हटले जाते. याच भागात हे मंदिर आहे. ही देवता गावावर उत्तर दिशेने येणाऱ्या संकटाचे निवारण करते, अशी ग्रामस्थांची श्रद्धा आहे. आंबा व काजूंच्या बागांमध्ये, ओढ्याच्या काठावर सावणेकरीण देवीचे हे उत्तराभिमुख सुंदर कौलारू मंदिर आहे. मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेला सावणेकरीण देवीचा उत्सव असतो. या वेळी देवीला मुखवास चढविला जातो.