दुर्गादेवी मंदिर

गुहागर, ता. गुहागर, जि. रत्नागिरी

तुळजापूरची भवानी, कोल्हापूरची महालक्ष्मी, आडिवऱ्याची महाकाली, त्याचप्रमाणे गुहागरची दुर्गादेवी ही अनेक भाविकांचे श्रद्धास्थान आहे. गुहागरच्या एका बाजूला श्री व्याडेश्वर दुसऱ्या बाजूला दुर्गादेवीचे मंदिर आहे. ही दोन्ही मंदिरे गुहागरची आराध्य दैवते असून ती या परिसराचे रक्षण करतात, अशी येथील रहिवाशांची श्रद्धा आहे. नवसाला पावणारी जागृत असणारी ही दुर्गादेवी येथील अनेक कोकणस्थ कऱ्हाडे ब्राह्मण कुटुंबीयांची कुलदेवता आहे.

मंदिराची अख्यायिका अशी की परशुरामांनी समुद्र मागे हटविल्यानंतर रेती मातीची भर घालून श्रीधर नावाच्या एका ब्राह्मणाने गुहागर हे गाव वसवले. त्यानंतर सुजलाम सुफलाम झालेल्या या प्रदेशात काही लोकांमध्ये दुफळी माजली. याचा फायदा घेऊन समुद्रमार्गे अनेक लुटारू, चाचे गावात येऊन येथील ग्रामस्थांना त्रास देऊ लागले. त्यांचे निर्दालन करण्यासाठी जगदंबेने महिषासुरमर्दिनीचे रूप घेऊन या अत्याचारी लोकांशी अंकुश, त्रिशूळ, सर्प, परशू इत्यादी अस्त्रांच्या साह्याने लढा दिला शत्रूचा निःपात करीत गावाला अभय दिले. त्यानंतर विश्रांतीसाठी देवी येथील समुद्रकिनाऱ्यावरील एका रुईच्या झाडाजवळ थांबली तिने नथीमधील एक मोती रुईच्या पानात टोचून ठेवला. त्यानंतर काही दिवसांनी देवीने काही ग्रामस्थांना स्वप्नदृष्टांत देऊन रुईच्या झाडाजवळ मी आहे, मला शोधून काढा माझे मंदिर उभारा, असे सांगितले. त्यानुसार ग्रामस्थांनी शोध घेतला असता पानामध्ये टोचून ठेवलेला मोती त्यांना आढळला. ग्रामस्थांनी देवीचा जयजयकार करून या ठिकाणी देवीची स्थापना केली. आज या ठिकाणी असलेला धर्मस्तंभ हे देवीचे मूळ स्थान मानले जाते.

सर्व बाजूंनी हिरव्यागार वनश्रीने नटलेला हा सगळा परिसर आणि त्याच्या मधोमध उभे असलेले दुर्गादेवीचे मंदिर उठून दिसते. पूर्वी हे मंदिर लहानसे होते; परंतु २००६ मध्ये केलेल्या जीर्णोद्धार नूतनीकरणानंतर ते प्रशस्त दुमजली सुंदर मंदिर बनलेले आहे. खुला सभामंडप, मुख्य सभामंडप गर्भगृह असे मंदिराचे स्वरूप आहे. येथील खुल्या सभामंडपाला तीन कमानी असून आतील बाजूस सुमारे दोन फूट उंचीच्या दगडी बाकांची रचना आहे. येथील मुख्य सभामंडप दुमजली आहे. कार्यक्रमांच्या वेळी वरच्या मजल्यावरही विशेषत: महिला भाविकांना बसण्याची सुविधा आहे.

गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला असलेल्या खांबांवर कोरीवकाम वरच्या बाजूला दोन सिंह एकमेकांसमोर उभे ठाकलेले चितारलेले दिसतात. गर्भगृहात एका चौथऱ्यावर चांदीच्या आसनावर सुमारे अडीच फूट उंचीची दुर्गादेवीची अष्टभुजाधारी संगमरवरी मूर्ती आहे. देवीच्या हातात त्रिशूळ, चक्र, गदा, धनुष्य, शंख, तलवार, भाला, ढाल, परशू अशी विविध अस्त्रे आहेत. देवीच्या मागे असणारी प्रभावळही चांदीची आहे. आसन प्रभावळीमध्ये चांदीचे सुंदर नक्षीकाम केलेले दिसते. मूर्तीसमोरील एका तबकात देवीच्या चांदीच्या पादुका आहेत. येथील गर्भगृहाभोवती रुंद असा प्रदक्षिणामार्ग आहे.

मंदिर पंचायतन स्वरूपाचे असून दुर्गादेवीच्या मुख्य मंदिरासह चार कोपऱ्यात आणखी चार मंदिरे येथे आहेत. त्यामध्ये लक्ष्मीनारायणाचे मंदिर आहे, ज्यात लक्ष्मी आणि नारायणाच्या सुबक मूर्ती आहेत. येथील गणपती मंदिरात लाकडी कलाकुसर दिसते. त्यामध्ये केशरी रंगाची गणपतीची मूर्ती आहे. सूर्यमंदिरात सूर्यनारायणाची धातूची मूर्ती आहे, तर महादेवाच्या मंदिरात नंदीदेव काळ्या पाषाणातील मोठे शिवलिंग असून त्यावर नागदेवता आहे. ही चारही मंदिरे अद्ययावत साधनांचा वापर करून बांधण्यात आली असली तरी तेथील जुन्या लाकडी नक्षीकामांचे काही भाग आजही पाहायला मिळतात. या मंदिरांच्या शेजारी चारही बाजूंनी दगडी पायऱ्या असलेला मोठा तलाव आहे.

मंदिरापासून काही अंतरावर एक धर्मस्तंभ आहे. असे सांगितले जाते की देवीचे ते मूळस्थान आहे. स्तंभाच्या टोकावर नंदीदेवाची मूर्ती आहे. त्याच्या खाली मुखवटे आणि काही फुले कोरलेली आहेत. खालच्या बाजूला श्री लक्ष्मी, श्री दुर्गा, श्री गणेश या देवतांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. हा खांब खाली चौकोनी, त्यावर अष्टकोनी, त्यावर सोळा कोनांमध्ये वर गोलाकार आहे. खांबाला लागून एक छोटी देवळी आहे, त्यात हनुमानाची मूर्ती आहे.

येथील एक वेगळे वैशिष्ट्य म्हणजे सोन्याच्या जरीने नक्षीकाम केलेला सुरेख गालीचा. त्याच्या मध्यावर पिसारा फुलवलेल्या मोराचे चित्र बाजूने वेलबुट्टीचे नक्षीकाम आहे. यावरपंडित हरी मानी जैपुर मी. फा. सु. रुदीस १८५६ उमरावतीअसा मजकूर वीणला आहे. त्यावरून हा बहुधा जयपूरहून वीणून आणला असावा असे वाटते. हा धोंडो गोपाळ लुकतुके यांनी दिल्याची नोंद आहे. याशिवाय काचेच्या लोलकाचे खूप मोठे झुंबर आहे. हे झुंबर गालीचा केवळ उत्सवाच्या वेळीच पाहता येतो.

पेशवाईच्या काळापासून दुर्गादेवीच्या उत्सवासाठी १४ खंडी भात, सहा झाडांचे नारळ सहा रुपये दरवर्षी मिळत असत. देवीकडे पूर्ण उंचीचा चांदीचा मुखवटा (रुपे) आहे. तो केवळ चैत्र नवरात्रोत्सवात नवमीच्या दिवशी आश्विन नवरात्रोत्सवात दहा दिवस लावला जातो. असे सांगितले जाते की देवीचा मोती हा प्रथम येथील जांगळी (कुणबी) लोकांना दिसला. त्यामुळे देवीची रूपे त्यांच्याकडे ठेवण्याचा मान आहे. आजही हा मोती देवीच्या दागिन्यांमध्ये असतो. देवीची साडी रोज तीन वेळा बदलली जाते रात्री परकर नेसविला जातो. पौष महिन्यातील प्रत्येक मंगळवारी देवीला शालू नेसविला जातो. या मंदिरात देवीपुढे वर्षभर नारळ फोडले जात नाहीत; परंतु वर्षातून एकदा धुळवडीच्या दिवशी गुहागरमधील प्रत्येक घरातील नारळ फोडला जातो. धुळवडीच्या रात्री प्रथम येथील श्री व्याडेश्वराला दुसऱ्या दिवशी देवीला रंगीत पाण्याने अभिषेक केला जातो.

मंदिराच्या आवारात वेदपाठशाळा आहे. येथे गुरुकुल पद्धतीने ऋग्वेदाचे शिक्षण दिले जाते. विद्यार्थी आणि अध्यापक या सर्वांचा खर्च मंदिर ट्रस्टमार्फत करण्यात येतो. आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या मुलींचाबेटी बचाओ, बेटी पढाओया उपक्रमांतर्गत कायमस्वरूपी शैक्षणिक खर्चही केला जातो. गायनाची आवड असणाऱ्या मुलींना गायनाचे शिक्षणही दिले जाते. ट्रस्टतर्फे वेळोवेळी रक्तदान शिबिरे, तसेच पूरग्रस्तांसाठी मदत देण्यात येते. याशिवाय सुमारे १०० भाविकांच्या निवासाची सोय होईल, असे सुसज्ज भक्त निवास आहे. (संपर्क : ०२३५९ २४०६६५) येथे उपाहारगृहाचीही सुविधा आहे. सकाळी सहा ते रात्री आठपर्यंत भाविकांना येथील दुर्गामातेचे दर्शन घेता येते.

उपयुक्त माहिती:

  • गुहागर बस स्थानकापासून . किमी, तर  रत्नागिरीपासून ९० किमी अंतरावर
  • मुंबई, ठाणे, पुणे, रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक  भागांतून थेट एसटी सेवा
  • खासगी वाहने थेट मंदिरापर्यंत जाऊ शकतात
  • मंदिर परिसरात निवास न्याहरीसाठी अनेक पर्याय
  • संपर्क : गणेश भिडे, उपाध्यक्ष, मो. ९४२११३६९६८
  • संतोष मावळंकर, सचिव, मो. ९५२९३०४६११
Back To Home