डिगेश्वर मंदिर

कोळबांद्रे, ता. दापोली, जि. रत्नागिरी

दापोली तालुक्यात कोळबांद्रे या गावात डिगेश्वर महादेवाचे प्राचीन मंदिर आहे. पंचक्रोशीतील ग्रामस्थांची या डिगेश्वरावर अपार श्रद्धा आहे. असे सांगितले जाते की पंचक्रोशीत पोलीस अथवा कोर्टकचेऱ्यांमध्ये जाण्याची सहसा आवश्यकता पडत नाही, येथे कायदा चालतो येथील ग्रामदैवत डिगेश्वराचा! या परिसरात कोणी कोणाला फसविले अथवा त्रास दिला तरआता डिगेश्वराला नारळ देईनएवढे वाक्य जरी पीडित व्यक्तीने उच्चारले, तरी समोरील माणूस घाबरून जातो. त्याचे वागणे एकदम सरळ होते. कारण त्याला माहिती असते की असे केले नाही तर डिगेश्वर निश्चितच आपल्याला शिक्षा देणार!

मंदिराची आख्यायिका अशी की कोळबांद्रे गावात सध्या जेथे मंदिर आहे, तेथे पूर्वी भात शेती होती. दाभोळ येथील श्री. लोखंडे हे त्यांच्या जमिनीची नांगरणी करीत असताना नांगराचा फाळ मातीच्या एका ढिगामध्ये रुतला. ज्या ठिकाणी फाळ रुतला होता, तेथून अचानक पाण्याचा प्रवाह सुरू झाला आणि हा प्रवाह वाहत जाऊन गावातील तलावाला जाऊन मिळाला. तेव्हापासून या तलावातील पाणी कधीही आटलेले नाहीज्या मातीच्या ढिगाऱ्यात नांगराचा फाळ रुतला प्रवाह सुरू झाला, त्या मातीतून शिवपिंडी वर आली होती. काही दिवसांत ग्रामस्थांकडून शास्त्रोक्त पद्धतीने या शिवपिंडीची येथे प्रतिष्ठापना करण्यात आली. ही शिवपिंडी जमिनीच्या ढिगातून वर आल्याने या देवालाढिगेश्वरअसे नाव पडले. पुढे त्याचा अपभ्रंश होऊनडिगेश्वरहे नाव प्रचलित झाले. या मंदिराला १८७४ मध्ये एक सनद देण्यात आली होती, म्हणजे त्या आधीपासून महादेवाचे येथे स्थान होते.

दापोलीतून सडवलेमार्गे कोळबांद्रे गावात जाताना रस्त्याच्या डाव्या बाजूला डिगेश्वर महादेवाचे मंदिर आहे. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या शेजारी असलेल्या मंदिरासमोर प्रशस्त प्रांगण आहे. या प्रांगणातून सहा पायऱ्या चढून मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ जाता येते. मुख्य मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर एक दीपमाळ मंदिराच्या उंचीइतका ध्वजस्तंभ आहे. सुमारे दोन ते अडीच फूट उंचीच्या जोत्यावर हे मंदिर आहे. सभामंडप, अंतराळ गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. २०१५ मध्ये केलेल्या जीर्णोद्धारानंतर मंदिराला सध्याचे स्वरूप आलेले आहे. दीपमाळेजवळून पाच ते सहा पायऱ्या चढून मंदिराच्या कमानीवजा प्रवेशद्वारातून सभामंडपात प्रवेश होतो. येथील सभामंडप हा अर्धमंडप प्रकारातील असून बाजूने भाविकांना बसण्यासाठी कक्षासने आहेत. या सभामंडपातच प्रदक्षिणा मार्ग सोडून अंतराळ गर्भगृह आहेयेथील अंतराळ हे काहीसे उंच असून त्यामध्ये गर्भगृहाच्या प्रवेशद्वारासमोर एका चौथऱ्यावर अखंड पाषाणातील नंदीची मूर्ती आहे. गर्भगृहाच्या द्वारपट्टीच्या उजवीकडे लक्ष्मीनारायण डावीकडील देवडीत गणपती यांच्या मूर्ती आहेत. गणपतीच्या मूर्तीच्या समोरील बाजूस एक लहान शिवपिंडी आहे. असे सांगितले जाते की डिगेश्वराच्या गाभाऱ्यात केवळ गुरव यांनाच प्रवेश असल्यामुळे आलेल्या भाविकांना विधी तसेच अभिषेक करण्यासाठी ही शिवपिंडी येथे ठेवण्यात आली आहे. द्वारपट्टीवर लाकडांत कोरलेली सुबक नक्षी दिसते. गर्भगृहात अखंड पाषाणातील शिवलिंग असून त्यावर पाच फण्यांच्या शेषाने छत्र धरलेले आहे. गर्भगृहावरील शिखर वैशिष्ट्यपूर्ण असून त्यावर अनेक देवीदेवतांची कोरीव शिल्पे लहानलहान कळस कोरलेले आहेत.

या मंदिराच्या शेजारी असलेल्या इतर दोन मंदिरांमध्ये गणपती, नंदी, चंडिका देवी, कोटेश्वरी देवी, झोलाईदेवी, काळकाई देवी, भैरी भवानी देवी, वाघजाई देवी, मानाई देवी यांच्या मूर्ती आहेत. डिगेश्वराच्या महाशिवरात्रीला होणाऱ्या मुख्य उत्सवासोबतच या देवांचेही विविध उत्सव येथे साजरे होतात. महाशिवरात्रीचा उत्सव येथे तीन दिवस साजरा केला जातो. यावेळी डिगेश्वरावर दुधाचा अभिषेक केला जातो. दिवसभर भजन, कीर्तन असे कार्यक्रम होतात. नवरात्रीत चंडिका देवी, कोटेश्वरी देवी, झोलाई देवी, काळकाई देवी, भैरी भवानी देवी, वाघजाई देवी, मानाई देवी या देवींचे उत्सव साजरे होतात. उत्सवकाळात येथील सर्व देवांना चांदीची रुपे लावली जातात.

होळी येथे पाच दिवस साजरी केली जाते. यावेळी देवाची पालखी सहाणेवर ठेवण्यात येते. त्यानंतर पाचव्या दिवशी पुन्हा पालखी मंदिरात जाते. यावेळी ओटी भरण्यासाठी नवस बोलण्यासाठी परिसरातील अनेक भाविक येतात. दर तीन वर्षांनी अधिक महिन्यात कोटेश्वरी देवी सडवली येथील कोटेश्वरी देवीच्या पालख्यांची कोळबांद्रे येथील नदीवर भेट होते. या बहिणींच्या भेटीचा सोहळा पाहण्यासाठी हजारो भाविक येथे उपस्थित असतात. येथील सर्व उत्सव कोळबांद्रे गावातील बारा वाड्यांतील ग्रामस्थ साजरे करतात.

उपयुक्त माहिती:

  • दापोलीपासून १२ किमी, रत्नागिरीपासून १४१ किमी अंतरावर
  • दापोली येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने थेट मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास न्याहरीची सुविधा नाही
  • संपर्क : मुरलीधर शंकर गुरव, पुजारी, मो. ९५२७२३५४३८
Back To Home