विदर्भातील पूर्णा आणि विश्वगंगा नद्यांच्या पवित्र संगमावर वसलेले हरसोडा येथील धूपेश्वर महादेव मंदिर हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. वराह पुराण आणि पयोष्णी माहात्म्यात उल्लेख असलेल्या या पवित्र स्थानाशी श्रीरामांच्या वनवासातील वास्तव्याच्या आणि त्यांनी स्थापन केलेल्या शिवलिंगाच्या पौराणिक कथा जोडलेल्या आहेत. सोळाव्या शतकातील संत मध्वमुनी ज्या शिवलिंगाला नित्य धूप अर्पण करत असत, तेच हे मंदिर ‘धूपेश्वर’ म्हणून ख्याती पावले. विठ्ठल लहरी महाराज आणि रामभाऊ महाराज यांसारख्या थोर सिद्ध पुरुषांच्या प्रदीर्घ तपश्चर्येने हे क्षेत्र पावन झाले आहे, अशी मान्यता आहे.
पूर्णा नदीच्या काठावर धूपेश्वर महादेव (हरसोडा, ता. मलकापूर, बुलडाणा), वांगेश्वर महादेव (तेल्हारा, बुलडाणा) आणि लिंगेश्वर महादेव (भोन, ता. संग्रामपूर, बुलडाणा) ही महादेवाची प्राचीन मंदिरे आहेत. त्यापैकी धूपेश्वर महादेवाच्या शिवलिंगाबाबत अनेक आख्यायिका प्रचलित आहेत. प्राचीन काळी पयोष्णी नदीला मोठा पूर आला, तेव्हा त्यात अनेक ऋषी-मुनी वाहून जाऊ लागले. त्यावेळी त्यांनी शिवशंकरांची प्रार्थना केली. हे ऋषी ज्या ज्या ठिकाणी किनाऱ्याला लागले,
तेथे त्यांनी शिवलिंगांची स्थापना केली. त्यानुसार हरसोडा येथे मध्वमुनींनी धूपेश्वर महादेवाच्या शिवलिंगाची प्रतिष्ठापना केल्याचा उल्लेख ‘सेंट्रल प्रॉव्हिन्सेस अँड बेरार डिस्ट्रिक्ट गॅझेटियर्स – अकोला डिस्ट्रिक्ट, व्हॉल्यूम ए’ (१९१०) मध्ये आढळतो.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, हा भाग पूर्वी दंडकारण्याचा प्रदेश होता. वनवासादरम्यान येथे आलेल्या श्रीरामांनी वाळूच्या शिवलिंगाची प्रतिष्ठापना केली. अन्य एका आख्यायिकेनुसार, श्रीराम हे सीतामाता आणि बंधू लक्ष्मणासह येथून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या कोटेश्वर महादेवाच्या मंदिरात मुक्काम करून येथे आले होते. येथे त्यांनी सकाळी अल्पोपहार केला. मध्वमुनी लिखित ‘सारासार विचार’ ग्रंथात हा उल्लेख आढळतो. सोळाव्या-सतराव्या शतकात हा ग्रंथ लिहिणारे मध्वमुनी कोळेगाव येथील दत्त मंदिराच्या परिसरात वास्तव्यास होते. ते येथील प्राचीन शिवलिंगाची आरती करून धूप दाखवत असत, त्यामुळे या मंदिराला धूपेश्वर महादेव मंदिर असे नाव पडल्याचीही आख्यायिका आहे. अनेक वर्षांपूर्वी येथे किसनभारती महाराज नावाच्या सत्पुरुषाने महादेवाची सेवा केली.
कालांतराने गुरांना चारण्यासाठी येथे येणाऱ्या एका गुराख्याच्या मुलाला जंगलात असलेल्या प्राचीन शिवलिंगाचे दर्शन झाले. त्यानंतर त्याने गृहत्याग करून शिवशंकराची आयुष्यभर सेवा केली. पुढे ते विठ्ठल लहरी महाराज या नावाने प्रसिद्ध झाले. विठ्ठल लहरी महाराजांनी केलेली साधना व शिवशंकरांच्या निस्वार्थ सेवेमुळे त्यांना अनेक सिद्धी प्राप्त झाल्या आणि त्यांनी येथे अनेक लीला केल्या. त्यांनीच या मंदिराचा प्रथम जीर्णोद्धार केल्याचेही सांगितले जाते. त्यांनी १९४६ मध्ये येथे संजीवन समाधी घेतली.
त्यांच्या पश्चात येथे रामभाऊ महाराज यांचे आगमन झाले. त्यांचा जन्म १५ फेब्रुवारी १९२३ रोजी झाला. येथे येण्यापूर्वी रामभाऊ महाराजांना दुर्धर आजार झाला होता. त्यामुळे त्यांचे पोट पुढे आले होते, तसेच हातपायही बारीक झाले होते. अनेक उपचारांनीही हा आजार बरा होत नव्हता. अकोल्यातील परसो येथे वास्तव्यास असलेल्या परोत्तर महाराजांच्या सल्ल्यानुसार ते येथे आले. येथील शिवलिंगाची मनोभावे सेवा केल्यानंतर त्यांचा आजार बरा झाला. त्यानंतर त्यांनी येथे केलेल्या साधनेतून त्यांना सिद्धी प्राप्त झाली. त्यांनीही येथे अनेक लीला केल्या.
एकदा प्रसादासाठी दूध नव्हते, त्यावेळी त्यांनी एका भाविकाला नदीपात्रातून ग्लास भरून पाणी आणण्यास सांगितले. त्यानंतर त्यांनी या जलाचे दुधात रूपांतर केले. येथील नंदीच्या मूर्तीला त्यांनी हिरवा चारा खाऊ घातला, अशा अनेक लीलांचा त्यात समावेश आहे. त्यांनी अनेक व्यसनाधीन व्यक्तींना व्यसनमुक्त केले. त्यांच्या कृपेमुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होण्यापासून वाचली. त्यांचे २७ जुलै २०१४ रोजी निधन झाले. त्यांचे समाधी स्थानही या मंदिराच्या परिसरातच आहे. विठ्ठल लहरी महाराज व रामभाऊ महाराज यांच्या जीवनावर आधारित चरित्रे त्यांच्या झाडे आडनावाच्या अनुयायाने लिहिली आहेत. काही वर्षांपूर्वी या मंदिराचा नव्याने जीर्णोद्धार करण्यात आला. त्यावेळी वाळूच्या शिवलिंगाच्या जागी नव्या शिवपिंडीची प्रतिष्ठापना करण्यात आली.
मलकापूरपासून तालुक्याच्या हद्दीवर असलेल्या हरसोडा या गावाचे पूर्वी धरणामुळे पुनर्वसन झाले. सध्या जुने आणि नवे अशी दोन गावे आहेत, असे सरकारी गॅझेटियरमध्ये नमूद आहे. गावातील धूपेश्वर पूल हा खानदेश आणि विदर्भाला जोडतो. पयोष्णी नदीच्या काठावर असलेले हे मंदिर दुमजली आहे. संगमरवरी दगडाचा वापर करून हे मंदिर बांधण्यात आले आहे. परिसरात फुले व प्रसादाची दुकाने आहेत. मंदिरात येण्यासाठी पूर्व व उत्तर दिशेला दोन प्रवेशद्वार आहेत.
सभामंडप व गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. मुख्य प्रवेशद्वाराजवळ दोन बाजूंना असलेल्या पायऱ्या चढून सभामंडपात प्रवेश होतो. सभामंडपात नंदी व उंच शिवलिंग आहे. त्यासमोर धूपेश्वर महादेवाचे अष्टकोनी गर्भगृह आहे. गर्भगृहात उंच शाळुंकेमध्ये शिवलिंग आहे. गर्भगृहातील देवकोष्ठकांमध्ये गणेश, सरस्वती तसेच दत्तात्रेयांच्या मूर्ती आहेत. शिवपिंडीच्या मागील बाजूस नागाची पंचधातूची मूर्ती आहे. सभामंडपात एका ठिकाणी विठ्ठल लहरी महाराज व रामभाऊ महाराज यांच्या संगमरवरी मूर्ती आहेत. नजीकच रामभाऊ महाराज यांचे शिष्य शांतारामजी जोशी यांची मूर्ती आहे. या मंदिरात सेवा करणाऱ्या नामदेव महाराजांची मूर्तीही या वास्तूमध्ये आहे.
सभामंडपात एका ठिकाणी विठ्ठल लहरी महाराज व रामभाऊ महाराजांच्या प्रतिमा आहेत आणि येथे विठ्ठल लहरी महाराजांच्या पादुका आहेत. मंदिराच्या वास्तूमध्ये रामभाऊ महाराजांचा विश्रांती कक्षही आहे. येथे त्यांच्या गादीचे, मूळ छायाचित्राचे तसेच पादुकांचे दर्शन होते. त्यांनी वापरलेली वस्त्रे तसेच अन्य वस्तूंचेही येथे जतन करण्यात आले आहे. मंदिरापासून काही अंतरावर रामभाऊ महाराजांचे समाधीस्थान आहे.
या मंदिरात अनेक भाविक दर्शनासाठी येतात. मंदिर व्यवस्थापनातर्फे येथे भाविकांना अन्नदान करण्यात येते. काही भाविकांकडूनही येथे अन्नदान केले जाते. महाशिवरात्र हा येथील सर्वात मोठा उत्सव असतो. या दिवशी दिवसभर भाविकांची मोठी गर्दी असते. त्या दिवशी सुमारे वीस क्विंटल फराळाचे वाटप करण्यात येते. येथे विठ्ठल लहरी महाराज तसेच रामभाऊ महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्तही अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. अनेक भाविक येथे मुलांचा जावळ विधीही करतात.