सातारा जिल्ह्यातील वाई ही मंदिरांची नगरी म्हणून प्रसिद्ध आहे. या तालुक्याच्या शहरात १०० हून अधिक मंदिरे आहेत. त्यामध्ये एक मंदिर असे आहे की ज्याला प्रत्यक्ष शिवाजी महाराजांनी दिवाबत्तीच्या खर्चासाठी ५७ रुपये वर्षासन (वार्षिक रक्कम) लावून दिले होते, ते आजपर्यंत सुरू आहे. हे मंदिर आहे १२ व्या शतकातील धुंडी विनायकाचे! या मंदिरात येऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी या गणपतीचे दर्शन घेतले होते, असे सांगितले जाते.
वाई शहरातील ब्राह्मणशाही परिसरात असलेले धुंडी विनायक मंदिर हे सातारा जिल्ह्यातील प्राचीन मंदिरांपैकी एक विशेष ऐतिहासिक व धार्मिक महत्त्व असलेले मंदिर आहे. यादवांच्या काळात या मंदिराचे बांधकाम झाल्याचे सांगितले जाते. येथील गणेशमूर्ती स्वयंभू असून हा गणपती नवसाला पावतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे. वाई गावात होणाऱ्या कोणत्याही विवाहाची पहिली पत्रिका व पहिल्या अक्षता ढुंडिविनायकापुढे ठेवल्या जातात व त्यानंतर आपल्या कुलदैवतापुढे ठेवल्या जातात. शेकडो वर्षांपासून ही प्रथा सुरू आहे. त्यामुळे हा गणपती पूर्वीपासून ‘अक्षता गणपती’ म्हणूनही प्रसिद्ध आहे.
मंदिराची आख्यायिका अशी की प्रतापगडाच्या पायथ्याशी जेव्हा शिवाजी महाराज आणि अफझल खान यांची भेट होणार होती त्याआधी शिवाजी महाराजांनी मनोमन या ढुंडिविनायकाकडे स्वराज्याच्या कार्यात यश आल्यास मंदिराच्या दिवाबत्तीची सोय करेन, असा नवस केला होता. त्यानुसार या भेटीत शिवाजी महाराजांनी अफझल खानाचा वध करून यश मिळविले. बोललेल्या नवसाची परतफेड म्हणून महाराजांनी तेव्हा येथील किल्लेदाराकरवी या मंदिरासाठी एक लिफाफा पाठविला व त्यामध्ये मंदिराच्या दिवाबत्तीसाठी दरवर्षी ५७ रुपयांची तरतूद करण्यात आल्याचे कळविले. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर छत्रपती शाहू महाराज व इंग्रजांच्या काळातही हे वर्षासन सुरूच राहिले. आजही महाराष्ट्र सरकारकडून या मंदिराला दिवाबत्तीसाठी वर्षाला ५७ रुपये दिले जातात. छत्रपती शिवाजी महाराजांचे वर्षासन छत्रपती शाहू महाराजांनी सुरू ठेवल्याची सनद व इंग्रजांनी ती कायम ठेवल्याचे दस्तऐवज आजही या मंदिरात उपलब्ध आहेत.
दुसऱ्या आख्यायिकेनुसार, अफझल खान जेव्हा वाई प्रांतात होता, तेव्हा त्याच्या सैनिकांनी या परिसरातील अनेक मंदिरे उध्वस्त केली होती. आपला आलिशान वाडा बांधण्यासाठीही अफझल खानाने येथील अनेक प्राचीन मंदिरे पाडून त्याचे दगड बांधकामासाठी वापरले होते; परंतु अनेक प्रयत्न करूनही ढुंडिविनायकाच्या प्रचितीमुळे त्याला हे मंदिर पाडता आले नाही. तेव्हापासून वाई येथील वास्तव्याच्या काळात दररोज अफझल खानाच्या वाड्यातून या गणपतीसाठी नैवेद्य पाठविला जात असे.
ढुंडिविनायक मंदिर हेमाडपंती रचनेचे आहे. मंदिराभोवती असलेल्या तटबंदीच्या लहानशा दारातून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश करावा लागतो. हे मंदिर जमिनीपासून दोन ते तीन फूट उंचीच्या जोत्यावर बांधले आहे. मंदिराचा खालचा भाग हा दगडी असून शिखरासाठी विटा व चुन्याचा वापर झालेला आहे. सभामंडप आणि गर्भगृह असे मंदिराचे स्वरूप आहे. सभामंडात दगडी खांब असून गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला अष्टविनायकांच्या मूर्ती आहेत. याशिवाय ललाटबिंबावरही गणेशमूर्ती आहे.
गर्भगृहात असलेल्या मखरामध्ये शेंदूरचर्चित गणेशमूर्ती प्रतिष्ठापित आहे. मूर्तीच्या दोन डोळ्यांमध्ये व कपाळाच्या खालच्या बाजूला असलेल्या चक्रात लाल रंगाचा हिरा आहे. मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गावर मारुतीची मूर्ती, योगी, साधक, पायांमध्ये हत्ती पकडलेले वाघ अशी शिल्पे आहेत. आवारात चार संजीवन समाध्या आहेत. त्या येथील गणपतीची सेवा करणाऱ्या योगीपुरुषांच्या आहेत, असे सांगितले जाते. या समाध्यांचा आकार तुळशी वृंदावनासारखा आहे. दररोज या गणपतीसाठी जो नैवेद्य दाखवला जातो तोच नैवेद्य या समाध्यांजवळही ठेवला जातो. मंदिराचे शिखर त्रिस्तरीय असून त्यातील देवड्यांमध्ये अनेक देवी–देवतांच्या मूर्ती आहेत.
माघी गणेश जयंतीला या मंदिरात मोठा उत्सव साजरा केला जातो. या वेळी मंदिर परिसराची सुंदर सजावट केली जाते. सुमारे ५० ते ५५ हजार भाविकांना या दिवशी महाप्रसादाचे वाटप केले जाते. या शिवाय, मंदिरात गणेशयाग विधी केला जातो. त्यामध्ये विवाहोत्सुक तरुण–तरुणींसाठी काही यज्ञ व विधी केले जातात. दररोज सकाळी ६ ते ११ व सायंकाळी ५ ते ८ या वेळेत मंदिरातील गर्भगृहात जाऊन ढुंडिविनायकाचे भाविकांना दर्शन घेता येते. या वेळेव्यतिरिक्त गर्भगृह बंद ठेवले जाते. त्यावेळी सभामंडपातून भाविकांना दर्शन घेता येते.